प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांच्या हृदयातील रक्तवाहिनी खुली करण्यासाठी कोरोनरी स्टेंट बसवल्याचे सांगितले जाते. मात्र, कोहली यांचे प्रकृती आणखीनच खालावली आणि ते रुग्णालयातच अचानक कोसळले. डॉक्टरांना प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाही. यादरम्यान कोहली यांच्या निधनानंतर एक अत्यंत महत्वाचा वैद्यकीय प्रश्न उपस्थित झाला आहे. जर स्टेंट बसवल्यानंतर बंद झालेली रक्तवाहिनी पुन्हा खुली होते, तर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कसा होऊ शकतो? असा सवाल समाजमाध्यमांवर उपस्थित केला जात आहे, त्याविषयी…

स्टेंट बसवल्यानंतरही हार्ट अटॅक का येतो?

याबाबत फरिदाबाद येथील अमृता रुग्णालयातील हृदय व छातीरोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. समीर भाटे यांनी एनडीटीव्हीला महत्त्वाची माहिती दिली. स्टेंट बसवल्यानंतर बंद पडलेली रक्तवाहिनी उघडून शरीरातील रक्तप्रवाह पूर्ववत करता येतो; पण त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान स्नायूंचे कायमस्वरुपी झालेले नुकसान भरून काढता येत नाही. त्यामुळे अँजिओप्लास्टी तांत्रिकदृष्ट्या यशस्वी झाली असली, तरी रुग्णाची प्रकृती खालावण्याची शक्यता असते, असे डॉ. समीर सांगितले. हृदयाची मुख्य रक्तवाहिनी पूर्णपणे बंद पडल्यानंतर त्या भागातील स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. हा अडथळा जितका जास्त वेळ टिकून राहतो, तितके हृदयाच्या स्नायूंचे कायमस्वरूपी नुकसान वाढते. स्टेंटमुळे रक्तप्रवाह पुन्हा सुरू होऊन पुढील संभाव्य हानी टळते; पण आधीच निकामी झालेले स्नायू पुन्हा जिवंत होऊ शकत नाहीत. “कुकू कोहली यांच्या मृत्यूचे नेमके कारण त्यांच्या वैद्यकीय नोंदी पाहिल्याशिवाय सांगता येणार नाही. मात्र वैद्यकीयदृष्ट्या त्यांच्या निधनामागे अनेक कारणे असू शकतात, असेही डॉ. समीर यांनी स्पष्ट केले.

हृदयाच्या स्नायूंचे नुकसान झाल्यास कोणता धोका

हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर सर्वात मोठी चिंता हृदयाच्या स्नायूंना झालेल्या हानीची असते. हृदयाच्या एका मोठ्या भागाला दीर्घकाळ रक्त न मिळाल्यास शस्त्रक्रियेनंतरही ते प्रभावीपणे रक्त पंप करू शकत नाही. परिणामी हार्ट फेल्युअर, कार्डिओजेनिक शॉक किंवा अ‍ॅरिथमिया यांसारख्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या परिस्थितीत हृदयाची पंपिंग क्षमता इतकी कमी होती की, शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना आवश्यक तेवढा रक्तपुरवठा खंडित होतो आणि आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध असतानाही यामध्ये मृत्यूचा धोका वाढतो.

हार्ट अटॅकनंतर सुरुवातीचा काळ का महत्त्वाचा?

फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. आशिष जयकिशन यांच्या मते, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आणि रुग्णावर अँजिओप्लास्टी झाल्यानंतर सुरुवातीचा काळ अत्यंत संवेदनशील असतो. या काळात रुग्णाचे हृदयाचे ठोके अनियमित होणे, रक्तपुरवठ्याची क्षमता कमी होणे किंवा पुन्हा अडथळा निर्माण होणे अशा समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत रुग्णावर बारकाईने देखरेख ठेवणे अत्यंत गरजेचे असते. तसेच अँजिओप्लास्टी आणि स्टेंट हा केवळ उपचाराचा एक भाग आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल, धूम्रपान, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहार यांसारख्या जोखीम घटकांवर नियंत्रण न ठेवल्यास अँजिओप्लास्टीनंतरही रक्तवाहिन्यांचे नुकसान चालूच राहते, असा इशाराही डॉ. जयकिशन यांनी दिला.

हृदयाच्या ठोक्यांची लय बिघडणे ठरते प्राणघातक

‘Ventricular Fibrillation’ ही हृदयविकाराच्या झटक्यानंतर उद्भवणारी आणखी एक अत्यंत गंभीर आणि जीवघेणी गुंतागुंत मानली जाते. या स्थितीत हृदयाच्या खालच्या कप्प्यांचे ठोके अनियमित होतात आणि ते रक्त योग्य प्रकारे पंप करण्याऐवजी केवळ थरथरू लागतात. डॉ. समीर भाते यांच्या मते, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर सुरुवातीच्या काळात अशा प्रकारच्या हृदयाच्या लयीतील बिघाड अत्यंत धोकादायक ठरतो. यामुळे कोरोनरी स्टेंट टाकलेली रक्तवाहिनी पूर्णपणे मोकळी आणि सुरळीत असली तरीही रुग्णाला अचानक हृदयक्रिया बंद पडण्याचा मोठा धोका असतो. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये बसवलेल्या स्टेंटच्या आतच रक्ताची गाठ तयार होऊ शकते. वैद्यकीय भाषेत याला ‘स्टेंट थ्रोम्बोसिस’ म्हटले जाते. आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या औषधयुक्त स्टेंट ही गुंतागुंत आता दुर्मीळ झाली आहे; मात्र असे घडल्यास रक्तवाहिनीचा प्रवाह अचानक बंद होऊन रुग्णाला पुन्हा तीव्र हार्ट अटॅक येऊ शकतो. हृदयाचा रक्तवाहिनीचा विकार हा शरीराच्या केवळ एकाच भागात मर्यादित नसतो, हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. स्टेंटमुळे तात्पुरती अडचण निर्माण करणारा रक्तवाहिनीतील संकोच दूर होतो; पण रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याची मूळ प्रक्रिया थांबत नाही. त्यामुळेच अँजिओप्लास्टी यशस्वी झाल्यानंतरही रुग्णाला नियमित औषधोपचार, वैद्यकीय तपासणी आणि जीवनशैलीत बदल करणे बंधनकारक असते.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर शरीरात काय होते?

हृदयविकाराच्या झटक्यानंतरची प्रकृती पूर्ववत होणे म्हणजे केवळ बंद झालेली रक्तवाहिनी खुली करणे एवढेच नसते. पुढील उपचार ठरवण्यापूर्वी डॉक्टर हृदयाच्या स्नायूंना किती नुकसान झाले आहे, हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता किती आहे, हृदयाची लय कशी आहे, इतर कोणत्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहे आणि हृदयविकाराशी संबंधित इतर जोखमीचे घटक कोणते आहेत, याचे मूल्यांकन करतात. हृदयाचे आरोग्य दीर्घकाळ जपण्यासाठी डॉक्टरांनी लिहून दिलेली हृदयाशी संबंधित औषधे नियमित घेणे, कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे, रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवणे, धूम्रपान पूर्णपणे बंद करणे, हृदयासाठी आरोग्यदायी आहार घेणे, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू शारीरिक हालचाली सुरू करणे, डॉक्टरांनी सुचवल्यास हृदय पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी होणे, यांसारख्या बाबी महत्वाच्या ठरतात. या उपायांचा उद्देश पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी करणे आणि हृदयाच्या उर्वरित स्नायूंचे संरक्षण करणे हा आहे.

स्टेंट बसवल्यानंतर मृत्यूचा धोका कमी होतो?

कोरोनरी स्टेंट जीव वाचवणारा ठरू शकतो, कारण तो बंद झालेल्या रक्तवाहिनीत रक्तप्रवाह पुन्हा सुरू करतो. मात्र, स्टेंट हा हृदयविकाराच्या आजारावरील पूर्ण उपचार नाही. तसेच हृदयाच्या स्नायूंना आधीच कायमस्वरूपी झालेले नुकसानही तो पूर्ववत करू शकत नाही. डॉ. समीर यांच्या मते, हृदयविकाराच्या झटक्यानंतर रक्तवाहिनी खुली होणे ही निश्चितच मोठी उपलब्धी आहे; पण त्यातून रुग्णाचा धोका पूर्णपणे टळतो, याची हमी मिळत नाही. हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णाची प्रकृती आणि उपचारांचे परिणाम अनेक घटकांवर अवलंबून असतात. रक्तप्रवाह किती लवकर पूर्ववत झाला, हृदयाच्या स्नायूंना किती नुकसान झाले, हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता किती आहे, हृदयाची लय किती स्थिर आहे आणि हृदयाच्या इतर कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर आजार किंवा ब्लॉकेज शिल्लक आहे का, यावर पुढील परिस्थिती अवलंबून असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.