जगभरात हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्यांमुळे मृत्यू होण्याची प्रमाण झपाट्याने वाढले आहे. दरवर्षी दोन कोटींहून अधिक लोकांचा या विकाराने मृत्यू होत असल्याची बाब जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीतून समोर आली आहे. केवळ पुरुषांनाच नव्हे तर महिलांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याने त्याबाबत नवनवीन संशोधन सुरू आहे. यादरम्यान एका ताज्या संशोधनाने जगभरातील अनेक देशांची चिंता वाढवली आहे. हृदयविकाराचा धोका आता तिशीच्या उत्तरार्धात म्हणजेच वयाच्या ३५ व्या वर्षापासूनच वाढत असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. नेमकी काय आहेत त्यामागची कारणे? हृदयविकाराबाबत तज्ज्ञांनी काय सांगितले? त्याविषयीचा हा आढावा…

वयानुसार हृदयविकाराचा धोका कसा वाढतो?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हृदयविकार हा अचानक उद्भवणारा आजार नसून, तो शरीरात अनेक वर्षांपासून हळूहळू होत असलेल्या बदलांचा परिणाम असतो. हृदयविकारामागील सर्वात महत्त्वाच्या प्रक्रियेला ‘Atherosclerosis’ म्हणतात. त्याद्वारे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी, कोलेस्ट्रॉल आणि दाहक पेशी जमा होऊ लागतात. कालांतराने या साठ्यामुळे प्लाक तयार होतो आणि रक्तवाहिन्या अरुंद होऊन रक्ताभिसरणात अडथळे येतात. जसजसे वय वाढते, तसतसे रक्तवाहिन्यांची नैसर्गिक लवचिकता कमी होऊ लागते आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीत वाढ होते. या बदलांमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये प्लाक तयार होण्याची प्रक्रिया वेगाने होते. जेव्हा धमन्यांमधील हा प्लाक फुटतो, तेव्हा रक्ताची गुठळी तयार होऊन धमनी पूर्णपणे बंद होते. परिणामी हृदयाच्या स्नायूंना जाणारा रक्तप्रवाह थांबतो आणि त्यातून हृदयविकाराचा झटका येतो. ही प्रक्रिया अत्यंत धिमी असल्याने लक्षणे जाणवण्यापूर्वी कित्येक वर्षे आधीच धमन्यांचे नुकसान होण्यास सुरुवात झालेली असते. याच कारणामुळे हृदयविकारतज्ज्ञ तिशी किंवा चाळीशीतील लोकांना आरोग्याची नियमित तपासणी करण्याचा सल्ला देतात.

आणखी वाचा : नोकरीच्या ठिकाणी महिलांवर लग्न किंवा मातृत्वाचे नियोजन लपवण्याची वेळ का येते? कारण काय?

तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका का वाढतोय?

हृदयविकार हा प्रामुख्याने वृद्धांशी संबंधित आजार मानला जात असला तरीही आधुनिक जीवनशैलीतील बदलांमुळे आता तरुणांनाही त्याचा धोका वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मागील काही वर्षांत ४० वर्षांखालील व्यक्तींमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. बंगळुरूच्या स्पर्श रुग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुनील क्रिस्टोफर यांच्या मते, हृदयविकाराचा धोका वयाच्या ३५ वर्षांपासूनच सुरू होऊ शकतो. बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. कोलेस्टेरॉल वाढणे, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि इन्सुलिन प्रतिकार यांसारखी लक्षणे या काळात संथपणे विकसित होऊ शकतात. त्यामुळे तिशीतील तरुणांनी आरोग्याची नियमित तपासणी करून जीवनशैलीवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.

हृदयविकार वाढवणारे मुख्य घटक कोणते?

कामाचे जास्त तास, आर्थिक ताण आणि झोपेचा अभाव यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. याचा थेट परिणाम रक्तदाब, चयापचय आणि शरीरातील सूज यावर होतो. धूम्रपान आणि मद्याचे अतिसेवन हे विशेषतः तरुणांमध्ये हृदयविकारासाठी कारणीभूत ठरणारे मोठे घटक आहेत. व्यायामाचा अभाव आणि तासनतास एका जागी बसून काम केल्यामुळे हृदय कमकुवत होते. या सर्व कारणांमुळे जगभरात ४० वर्षांखालील लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढत असल्याचे डॉ. सुनील यांनी म्हटले आहे. इंडियन हार्ट असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, भारतातील हृदयविकाराची सुमारे २५ टक्के प्रकरणे ४० वर्षांखालील पुरुषांशी संबंधित आहेत. त्याशिवाय ३५ ते ५४ वयोगटातील महिलांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यावरून स्पष्ट होते की, हृदयविकार आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही.

हेही वाचा : तीनवेळेस आला ब्रेन स्ट्रोक; वेदनारहित स्ट्रोकमुळे काहीच का जाणवले नाही? ५३ वर्षीय व्यक्तीचे पुढे काय झाले?

हृदयविकाराच्या झटक्याची इतर लक्षणे कोणती?

कोलकाता येथील बी. एम. बिर्ला रुग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिल मिश्रा यांनी हृदयविकाराच्या काही दुर्लक्षित लक्षणांबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते, छातीत दुखणे किंवा दबाव येणे या व्यतिरिक्त अनेक लोक सुरुवातीच्या काही लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. विनाकारण थकवा जाणवणे, साध्या कामातही धाप लागणे, छातीत धडधड होणे किंवा चक्कर येणे, जबडा, मान किंवा डाव्या हातामध्ये अस्वस्थता जाणवणे, अचानक खूप घाम येणे, यांसारखी लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. बहुतांश तरुण या लक्षणांकडे अनेकदा अॅसिडिटी किंवा ताणतणाव समजून सर्रास दुर्लक्ष करतात. मात्र, वेळीच वैद्यकीय तपासणी केल्यास मोठा धोका टाळता येऊ शकतो, असे डॉ. मिश्रा यांनी स्पष्ट केले.

हृदयविकार टाळण्यासाठी काय करावे?

डॉ. अनिल मिश्रा यांच्या मते, हृदयविकार टाळण्यासाठी लहान वयापासूनच निरोगी जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, फळे-भाज्या आणि संपूर्ण धान्यांनी युक्त संतुलित आहार, तसेच प्रक्रिया केलेल्या अन्नाचे कमी सेवन यामुळे हृदयविकाराचा धोका टाळतो येतो. त्यासाठी धूम्रपान टाळणे, मद्यपान मर्यादित ठेवणे, ताणतणाव नियंत्रणात ठेवणे आणि पुरेशी झोप घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नियमित तपासण्या केल्याने रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते. तरुण वयात केलेले छोटे पण सातत्यपूर्ण बदल भविष्यातील मोठ्या हृदयविकारांपासून संरक्षण देऊ शकतात, असेही डॉ. मिश्रा यांनी स्पष्ट केले.