Heart attack cases rising: हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर या दोन्ही स्थिती हृदयाशी संबंधित आणि जीवघेण्या असू शकतात; मात्र त्यांची कारणे, लक्षणे आणि उपचार वेगवेगळे आहेत. हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर म्हणजे काय, असे एखाद्याला विचारले तर अनेकदा या दोन्ही संज्ञा एकाच अर्थाने वापरल्या जातात. दोन्ही शब्द भीतीदायक वाटतात, दोन्हींचा संबंध हृदयाशी आहे आणि दोन्ही स्थिती जीवघेण्या ठरू शकतात. मात्र, वैद्यकीयदृष्ट्या हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर या पूर्णपणे वेगळ्या अवस्था आहेत. भारतासारख्या देशात हा गोंधळ अधिक गंभीर ठरू शकतो, कारण हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार हे आरोग्यावरील मोठे ओझे आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये भारतातील असंसर्गजन्य आजारांमुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी २७ टक्के मृत्यू हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजारांशी संबंधित होते. तसेच ४० ते ६९ वर्षे वयोगटातील ४५ टक्के मृत्यूंचा संबंध या आजारांशी होता. ईएचसीसी हॉस्पिटलच्या कार्डियाक सायन्सेस विभागाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. अजित बाना यांनी संगितले की, “माझ्या वैद्यकीय अनुभवात वारंवार दिसणारा गैरसमज म्हणजे हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर एकच स्थिती आहेत, अशी धारणा. अनेकदा कुटुंबीय माहिती देताना ‘डॉक्टर, त्यांना हार्ट फेल्युअर झाले होते,’ असे सांगतात; प्रत्यक्षात ते काही वर्षांपूर्वी झालेल्या हार्ट अटॅकचा उल्लेख करत असतात.” “या दोन्ही स्थितींचा परस्पर संबंध असला, तरी त्या प्रत्यक्षात वेगळ्या आहेत. हा फरक समजल्यास लक्षणे लवकर ओळखता येतात आणि योग्य वेळी उपचार घेता येतात,” असे त्यांनी ‘टीओआय हेल्थ’शी बोलताना सांगितले.

हृदय म्हणजे पंप, तर रक्तवाहिन्या म्हणजे इंधन पुरवणाऱ्या नळ्या

या दोन्ही स्थितींमधील फरक समजावून सांगताना डॉ. बाना एक साधे उदाहरण देतात. “हृदय हा शरीरातील रक्ताभिसरण चालू ठेवणारा पंप आहे, तर कोरोनरी धमन्या या त्या पंपाला काम करण्यासाठी रक्त आणि प्राणवायू पुरवणाऱ्या नळ्यांसारख्या आहेत,” ते सांगतात.

हार्ट अटॅक म्हणजे काय?

  • हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमन्यांपैकी एखादी धमनी अचानक बंद झाल्यास हार्ट अटॅक येतो.
  • धमनीतील अडथळ्यामुळे हृदयाच्या स्नायूच्या एका भागाला रक्त आणि प्राणवायू मिळणे थांबते. रक्तपुरवठा तातडीने पूर्ववत झाला नाही, तर त्या भागातील स्नायूंच्या पेशी नष्ट होऊ लागतात.
  • “ही वैद्यकीय आणीबाणी आहे. अशा वेळी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते,” डॉ. बाना सांगतात.
  • रुग्णाला जितक्या लवकर रुग्णालयात नेले जाते, तितकी हृदयाच्या स्नायूंचे कायमस्वरूपी नुकसान टाळण्याची शक्यता वाढते.
  • हार्ट फेल्युअर म्हणजे हृदय बंद पडणे नव्हे!
  • हार्ट फेल्युअरमध्ये हृदयाचे ठोके थांबत नाहीत. या स्थितीत हृदयाचे स्नायू कमकुवत किंवा कडक झाल्यामुळे शरीराच्या गरजेनुसार पुरेसे रक्त पंप करता येत नाही.
  • “हृदय काम करणे थांबवत नाही; मात्र ते पूर्वीइतक्या कार्यक्षमतेने काम करू शकत नाही. हार्ट फेल्युअर बहुधा हळूहळू वाढत जाते आणि कालांतराने हृदयाच्या झालेल्या नुकसानीचा तो परिणाम असतो,” डॉ. बाना स्पष्ट करतात.

दोन्ही स्थितींमध्ये गोंधळ का होतो?

  • हार्ट अटॅकमुळे पुढे हार्ट फेल्युअर होऊ शकते. त्यामुळे अनेकांना दोन्ही अवस्था एकच वाटतात.
  • मोठ्या हार्ट अटॅकमध्ये हृदयाच्या स्नायूंचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. स्नायूंच्या मोठ्या भागावर परिणाम झाल्यास रक्त पंप करण्याची हृदयाची क्षमता कमी होत जाते. काही महिने किंवा वर्षांनंतर त्या रुग्णाचं हार्ट फेल्युअर होऊ शकतं.
  • मात्र, हार्ट फेल्युअर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला यापूर्वी हार्ट अटॅक आलेला असेलच असे नाही.
  • दीर्घकाळ अनियंत्रित राहिलेला उच्च रक्तदाब, हृदयाच्या झडपांचे आजार, कार्डिओमायोपॅथी, हृदयाच्या स्नायूंवर परिणाम करणारे संसर्ग आणि काही आनुवंशिक विकार यांमुळेही हृदय कमकुवत होऊ शकते.

हार्ट अटॅकची लक्षणे

हार्ट अटॅकच्या वेळी पुढील लक्षणे दिसू शकतात:

  • छातीत दडपण, जडपणा किंवा आवळल्यासारखे वाटणे
  • हात, खांदा, जबडा किंवा पाठीकडे पसरणारी वेदना
  • अचानक घाम येणे
  • धाप लागणे
  • मळमळ किंवा उलटीची भावना
  • चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवणे

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये लक्षणे नेहमी ठरावीक स्वरूपाची असतीलच असे नाही.

Heart Attack and Heart Failure are these differant things | हार्ट अटॅक व हार्ट फेल्युअर वेगवेगळे

त्यांना तीव्र छातीत दुखण्याऐवजी असामान्य थकवा, श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत सौम्य अस्वस्थता जाणवू शकते. अनेकदा ही लक्षणे आम्लपित्त, गॅस किंवा अपचन समजून दुर्लक्षित केली जातात.

हार्ट फेल्युअरची लक्षणे वेगळी

  • हार्ट फेल्युअरची लक्षणे बहुधा हळूहळू वाढतात.
  • “रुग्ण सांगतात की आता एक मजला जिना चढतानाही मध्ये थांबावे लागते. झोपताना किंवा पूर्णपणे आडवे झाल्यावर त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. घोटे आणि पाय सुजू लागतात आणि रोजची साधी कामे केल्यानंतरही अतिशय थकवा जाणवतो,” डॉ. बाना सांगतात.
  • ही लक्षणे वाढते वय, व्यायामाचा अभाव किंवा कमी शारीरिक क्षमता यांमुळे होत आहेत, असे समजून दुर्लक्ष केले जाते. प्रत्यक्षात, ही हृदयाला शरीराच्या गरजेनुसार रक्तपुरवठा करता येत नसल्याची चिन्हे असू शकतात.

हार्ट फेल्युअरची संभाव्य लक्षणे अशी:

  • चालताना किंवा जिना चढताना धाप लागणे
  • आडवे झोपल्यावर श्वास घेण्यास त्रास होणे
  • रात्री अचानक दम लागून जाग येणे
  • पाय, घोटे किंवा पोटावर सूज येणे
  • सतत थकवा जाणवणे
  • नेहमीची कामे करण्याची क्षमता अचानक कमी होणे
  • काही दिवसांत वजन वाढणे, विशेषतः शरीरात द्रव साचल्यामुळे

कोणती लक्षणे कधीही दुर्लक्षित करू नयेत?

  • “छातीत नवीन प्रकारची अस्वस्थता, कारण नसताना धाप लागणे किंवा नेहमीची कामे करण्याची क्षमता अचानक कमी होणे यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका,” असा सल्ला डॉ. बाना देतात.
  • “मोठी घटना घडण्यापूर्वी हृदय अनेकदा काही इशारे देते. तो वेळेत ओळखून वैद्यकीय मदत घेतल्यास नियंत्रणात ठेवता येणारी स्थिती जीवघेण्या आणीबाणीत बदलण्यापासून रोखता येऊ शकते,” ते म्हणतात.
  • छातीत तीव्र वेदना किंवा दडपण, अचानक श्वास घेण्यास त्रास, बेशुद्ध पडणे अथवा वेदना हात, जबडा किंवा पाठीकडे पसरणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्यावी.

हृदय काय सांगते आहे, ते ओळखा

  • हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअरमधील फरक समजून घेणे म्हणजे केवळ योग्य वैद्यकीय शब्द वापरणे नव्हे. हृदय देत असलेले इशारे ओळखून नुकसान कायमस्वरूपी होण्यापूर्वी उपचार घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
  • “सुदैवाने, लवकर निदान झाल्यास दोन्ही स्थितींवर आता अधिक प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. औषधे, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, हार्ट फेल्युअरचे आधुनिक व्यवस्थापन, मेकॅनिकल सर्क्युलेटरी सपोर्ट आणि हृदय प्रत्यारोपणातील प्रगतीमुळे उपचारांचे परिणाम मोठ्या प्रमाणात सुधारले आहेत,” डॉ. बाना सांगतात.
  • “मात्र, भरून न येणारे नुकसान होण्यापासून प्रतिबंध करण्याइतका प्रभावी दुसरा कोणताही उपचार नाही,” असेही ते स्पष्ट करतात.
  • त्यामुळे एखाद्याचे “हृदय कमकुवत आहे” एवढी माहिती पुरेशी ठरत नाही. त्यामागील नेमके कारण समजणे आवश्यक आहे.
  • हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर यांतील फरक ओळखल्याने रुग्ण किती लवकर वैद्यकीय मदत घेतो, यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः हार्ट अटॅकच्या वेळी वाचवलेलं प्रत्येक मिनिट हृदयाचे नुकसान कमी करण्यात आणि रुग्णाचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतं