Viral visuals: या धक्कादायक घटनेचे व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. व्हिडीओमध्ये ‘कुआउटेमाॅक’ ही नौका लखलखणाऱ्या दिव्यांनी सजलेली आणि भव्य मेक्सिकन झेंडा मिरवताना दिसतं आहे. शेकडो लोक त्याला निरोप देण्यासाठी ईस्ट रिव्हरच्या काठावर आले होते. परंतु, क्षणातच सर्वकाही चित्र पालटलं. नौका पुलाखालून जाऊ पाहतं असताना अचानक जहाजावरील झगमगती रोषणाई बंद झाली आणि काही कळायच्या आतच नौका पुलाच्या खांबावर आदळली आणि त्याचे शीड तुटून ते सरळ पाण्यात हेलकावे घेत राहिलं.

घटनेचा तपशील

न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्युत नियंत्रण हरवल्यामुळे नौका थेट ब्रिजच्या पायाकडील भागावर जाऊन आदळली. या धडकेत नौकेवरील २७७ पैकी १९ जण जखमी झाले असून, त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे आणि दोन जणांचा मृत्यू झाला.

 (AP Photo/Kyle Viterbo)

मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. “कुआउटेमाॅक नौकेवरील दोन सदस्यांच्या मृत्यूमुळे आम्ही अत्यंत दुःखी आहोत,” असं त्या म्हणाल्या.

अपघाताची पार्श्वभूमी

ही नौका ६ एप्रिल रोजी मेक्सिकोच्या अ‍ॅकापुलको बंदरातून निघाली होती. ब्रुकलिन ब्रिजखालून जाताना शीडाची उंची पुलाच्या मधल्या जागेपेक्षा (१३५ फूट) अधिक असल्याने (१४७ फूट) ते थेट धडकले. यामुळे शीड तुटले. हा या वर्षातील अमेरिकेतील दुसरा मोठा अपघात आहे. २०२४ साली बाल्टिमोरमध्येही एका जहाजाच्या धडकेने पूल कोसळला होता आणि या अपघातात अनेक कामगारांचा जीव गेला होता.

ब्रुकलिन ब्रिज

ब्रुकलिन ब्रिज हा न्यूयॉर्क शहरातील ईस्ट रिव्हरवर वसलेला जगप्रसिद्ध ऐतिहासिक पूल असून, तो मॅनहॅटन आणि ब्रुकलिन या दोन महत्त्वाच्या भागांना जोडतो. या पूलाचे बांधकाम १८७० साली सुरू झाले आणि २४ मे १८८३ रोजी तो सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्या काळातील ब्रुकलिन ब्रिज हा जगातील सर्वात लांब वायर सस्पेन्शन ब्रिज होता आणि पहिल्यांदाच स्टील केबल्स वापरून तो तयार करण्यात आला होता. जर्मन वंशीय अभियंता जॉन ए. रोब्लिंग यांनी या पूलाची रचना केली होती. परंतु, त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांचा मुलगा वॉशिंग्टन रोब्लिंग यांनी हे काम पुढे नेले. वॉशिंग्टनला गंभीर आजार झाल्यानंतर त्यांची पत्नी एमिली रोब्लिंग यांनी अभियंते व कामगार यांच्यात मध्यस्थ म्हणून काम पाहिले आणि पूलाचे बांधकाम पूर्णत्त्वास नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्थापत्यशास्त्रातील अद्वितीय नमुना मानल्या जाणाऱ्या या पूलाची १९६४ साली राष्ट्रीय ऐतिहासिक ठिकाण म्हणून नोंद झाली. आजही हा पूल न्यूयॉर्क शहराच्या अभिमानास्पद वास्तूंमध्ये गणला जातो आणि त्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व अभियांत्रिकी वारसा टिकून आहे.

 (AP Photo/Kyle Viterbo)

ब्रुकलिन ब्रिजला धडक दिलेल्या मेक्सिकन नौदलाच्या नौकेचा इतिहास

कुआउटेमाॅक (Cuauhtémoc) ही मेक्सिकन नौदलाची एक प्रसिद्ध प्रशिक्षण नौका आहे. या नौकेची बांधणी १९८२ साली झाली करण्यात आली होती. नौकेला मेक्सिकोच्या शेवटच्या अॅझटेक सम्राटाच्या सन्मानार्थ नाव देण्यात आलं. ही नौका मेक्सिकन नौदलातील कॅडेट्सना समुद्री प्रशिक्षण देण्यासाठी दरवर्षी जगभर दौरे करतं. २९७ फूट लांब व १२ मीटर रुंद असलेली ही नौका जगभरातील विविध बंदरांना मैत्रीपूर्ण भेटी देतं आणि मेक्सिकोच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतिनिधित्व करतं. कुआउटेमाॅक नौकेमध्ये उंच शीड, पारंपरिक शिडांचे व्यवस्थापन आणि रचना यामुळे त्याला ‘समुद्रावरील राजदूत’ (Ambassador of the Seas) असंही म्हटलं जातं. आत्तापर्यंत ६० हून अधिक देशांना कुआउटेमाॅकने भेट दिली आहे. १८ मे २०२५ रोजी न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रिजला झालेल्या अपघाताने ही नौका पुन्हा चर्चेत आली.

हा व्हिडीओ पाहून नेटकरीही हादरले असून अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलं, “देवा, असं काही पुन्हा घडू नये,” तर दुसऱ्याने जहाजावरील नौसैनिकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

व्हिडीओ:

अपघात इतिहासात नोंदला गेला…

सजलेली, झगमगणारी, आणि अभिमानाने समुद्रावर आरूढ झालेली नौका काही क्षणांतच वेदनांनी भरलेल्या कहाणीचं प्रतीक ठरली. ब्रुकलिन ब्रिजसारख्या ऐतिहासिक वास्तूखाली, टेक्नॉलॉजी आणि नियोजनाच्या एका चुकवलेल्या क्षणाने दोन निष्पाप जीव घेऊन गेले. ‘समुद्रावरील राजदूत’ म्हटल्या जाणाऱ्या कुआउटेमाॅकसारख्या जहाजाचा प्रवास एका थरारक वळणावर येऊन थांबला. या अपघाताने केवळ दोन जीव नव्हे, तर नौदलाच्या एका गौरवशाली मिशनला काळोखाच्या सावलीत झाकून टाकलं आहे.