पाऊस लांबल्याने प्रत्येकाच्याच जिवाची काहिली होत आहे. माणसाकडे उष्णतेपासून बचाव करण्याचे किमान अनेक उपाय आहेत, पण मुक्या प्राण्यांचे या उन्हाने काय हाल होत आहेत, याची कल्पनाच केलेली बरी. उष्णतेच्या लाटांदरम्यान या जिवांवर कोणते परिणाम होतात, याचेही अभ्यास सुरू आहेत. यातील काही निष्कर्ष अचंबित करणारे आहेत. वाढत्या उष्णतेमुळे प्राण्यांच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होतो आणि ते गोंधळल्यासारखे वागतात असे अभ्यास सांगतो…
वाढत्या उष्णतेविषयी संशोधन
पश्चिम ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील अमांडा रिडली या वर्तनशास्त्रज्ञ उष्णतेच्या लाटेदरम्यान सदर्न पाइड बॅबलर पक्ष्याचे वर्तन कसे असते याचा अभ्यास करत आहेत. या पक्ष्याच्या मादीची विचार करण्याची क्षमता वाढत्या उष्णतेमुळे कमी होते. मध्यम आकाराचे हे काळे-पांढरे पक्षी पारदर्शक अडथळ्याच्या मागे असलेल्या चविष्ट अळ्या मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. थंड दिवसांमध्ये हे पक्षी पटकन समजून घेतात की त्यांना फक्त त्या छोट्या प्लास्टिकच्या भिंतीभोवती फिरून जायचे आहे. पण तापमान वाढले की हे पक्षी हट्टाने त्या अडथळ्यावरच चोच मारत राहतात. हा प्रयोग उष्णतेच्या काळातील पक्ष्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सुरू होता. याचा निष्कर्ष असा की उष्णतेच्या लाटांदरम्यान प्राण्यांची विचारशक्ती गोंधळून जाते.
अन्नाशोध, पिलांसाठी कमी वेळ
उष्णतेचा प्राण्यांवर परिणाम होतो याचे अभ्यासाअंती भरपूर पुरावे मिळाले आहेत. उदाहरणार्थ, पक्षी अन्न शोधण्यात आणि पिल्लांना खाऊ घालण्यात कमी वेळ घालवतात; ते कमी गातातही किंवा चिवचिवाट कमी करतात. त्याऐवजी, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ते तासन्तास पंख पसरून बसतात आणि चोच उघडी ठेवून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही प्राणी सावलीत जातात किंवा थंड बिळांमध्ये लपून बसतात. पण त्यामुळे ते खातही नाहीत. मधमाशा कडक उन्हात उडताना स्वतःवर मिळेल तेथून पाण्याचे थेंब शिंपडतात. यामुळे त्यांच्या मेंदूला थंडावा मिळतो, असे स्टॉकहोम विद्यापीठातील एमिली बेअर्ड या मेंदूविकार तज्ज्ञ सांगतात.
आक्रमकतेत वाढ
तापमान वाढल्यावर इतर प्रजातीही अधिक आक्रमक होऊ शकतात. २०२३ मधील एका अभ्यासात अमेरिकेतील आठ शहरांमधील जवळपास ७० हजार कुत्र्यांच्या चाव्यांच्या घटनांचा आढावा घेण्यात आला. त्यातून असे दिसून आले की उन्हाळी दिवसांमध्ये अशा घटना अधिक घडतात. जास्त उष्णता असेल तर धोका १० टक्के जास्त वाढतो. मात्र कुत्रे उष्णतेमुळे अधिक आक्रमक होतात की उन्हाच्या काहिलीने चिडचिड झालेले लोक त्यांना चिथावतात, हे शास्त्रज्ञ ठामपणे सांगू शकले नाहीत. २०२५ मध्ये चीनमधील एका अभ्यासात असे दिसून आले की साप आणि मांजरींसह अनेक प्राणी उष्णता वाढल्यावर माणसांना चावण्याची अधिक शक्यता असते. प्राणी एकमेकांबाबतही विशेषतः अन्नासाठी अधिक आक्रमक होताना दिसतात. इटलीतील अपेनाइन पर्वतांच्या उतारांवर प्रथिनयुक्त वनस्पती खाणाऱ्या शॅमॉय या शेळीसदृश वन्यप्राण्यांचे शास्त्रज्ञांनी दुर्बिणींच्या मदतीने निरीक्षण केले.
दोन उन्हाळ्यांतील १६०० तासांहून अधिक निरीक्षणांत असे दिसून आले की तापमान १२ वरून १७ अंश सेल्शियसपर्यंत वाढल्यावर वनस्पती कमी झाल्या आणि शॅमॉयची आक्रमकता वाढली. हे प्राणी अन्नाच्या ठिकाणांवर हक्क सांगू लागले, धमकावणाऱ्या हालचाली करू लागले, काही वेळा हल्लेही तीव्र झाले. अभ्यासकांच्या मते, हवामान बदलामुळे २०८० पर्यंत शॅमॉयची आक्रमकता ५० टक्क्यांनी वाढू शकते. गोल्डन ज्युली नावाचा लहान उष्णकटिबंधीय मासाही उष्मा वाढल्यास अधिक भांडखोर होतो. २५.५ अंश सेल्शियस तापमानाचे पाणी २९ अंशांपर्यंत गरम केल्यास हा मासा अधिक आक्रमक होतो. तो आरशावर चावण्याचा प्रयत्न करतो आणि शेपटी आपटतो.
शिकण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम?
उष्णतेच्या लाटा प्राण्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम करतात. मेंदू अधिक गरम झाल्यास मज्जातंतूंच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे संवेदना, स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते. एका प्रयोगात पक्ष्यांसमोर दोन छिद्रे असलेला लाकडी ब्लॉक ठेवण्यात आला. प्रत्येक छिद्रावर झाकण होते. पक्षी झाकणावर चोच मारल्यास ते उघडत असे आणि त्याखाली रिकामे छिद्र किंवा खाणे दिसत असे. एक झाकण गडद रंगाचे आणि दुसरे त्याच रंगाच्या फिकट छटेचे होते. उष्णतेच्या लाटांदरम्यान पक्ष्यांना हे शिकण्यासाठी दुप्पट प्रयत्न करावे लागले की खाणे नेहमी एकाच छटेच्या झाकणाखाली लपवलेले असते.
दुसऱ्या गटातील शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रेलियातील सुंदर गाणारे झेब्रा फिंच पक्षी तपासले. त्यांनाही उच्च तापमानात बौद्धिक अडचणी येतात, असे आढळले. काही वर्षांपूर्वी संशोधकांनी दाखवून दिले की गरम वातावरणात उंदरांना गुंतागुंतीचे मार्ग शोधण्यात अडचण येते आणि त्यांनी आदल्या दिवशी पाहिलेल्या वस्तूही ते विसरतात. मासे आणि कीटक यांसारख्या शरीराचे तापमान नियंत्रित करू न शकणाऱ्या प्राण्यांसाठी उष्णतेच्या लाटा विशेषतः हानिकारक ठरू शकतात. “हवेच्या तापमानातील बदलांचा परिणाम मेंदूच्या तापमानावर होतो,” असे स्टॉकहोम विद्यापीठातील मेंदूविकार तज्ज्ञ एमिली बेअर्ड सांगतात. बेअर्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भुंग्यांना गोड सुक्रोजचा संबंध निळ्या रंगाशी आणि कडू क्विनाईनचा संबंध पिवळ्या रंगाशी जोडायला शिकवण्याचा प्रयत्न केला. २५ अंश तापमानात बहुतांश भुंगे हे शिकले, पण ३२ अंश तापमानात निम्म्याहून कमी भुंगे ते शिकू शकले.
परिसंस्थेवर कोणता परिणाम?
हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा हा प्रकार रोजचाच होत असताना, प्राणीजगतातील अशा बौद्धिक क्षमतांतील बिघाडाचा परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होऊ शकतो आणि आधीच धोक्यात असलेल्या प्रजातींना अधिक जोखमीचा सामना करावा लागू शकतो. परागीकरण करणारे कीटक कोणत्या फुलांना भेट द्यायची हे विसरले, तर पिके आणि वन्य वनस्पतींचे नुकसान होऊ शकते. जर पक्ष्यांना सहज अन्न सापडले नाही, तर त्यांची पिल्ले जगू शकणार नाहीत. तापमान वाढत असलेल्या ग्रहावर तीक्ष्ण बुद्धिमत्ता विशेषतः महत्त्वाची ठरते. “बदलत्या हवामानात वर्तनानुसार स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता अधिक महत्त्वाची बनते,” असे रिडली म्हणतात.
मानवावर काय परिणाम?
उष्ण तापमानामुळे विचारशक्तीवर परिणाम होतो याचे पहिले संकेत मानवांवरील अभ्यासांतून मिळाले होते. १९व्या शतकात बेल्जियन खगोलशास्त्रज्ञ अॅडॉल्फ क्विटलेट यांनी असे निरीक्षण मांडले की फ्रान्समध्ये उन्हाळ्यात हिंसक गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. नंतरच्या अभ्यासांमध्ये उच्च तापमानाचा हिंसाचाराशी, मानसिक आरोग्याशी संबंधित रुग्णालयात दाखल होण्याशी, आत्महत्यांशी आणि जुगाराशी संबंध आढळला. गरम वातावरणात लोकांना निर्णय घेण्यात अडचण येते आणि त्यांची स्मरणशक्ती कमी होते. वातानुकूलन नसलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत, शैक्षणिक वर्षाचे तापमान फक्त एक अंश फॅरेनहाइटने वाढल्यास परीक्षेतील गुण १ टक्क्याने घटतात, असे एका अभ्यासात आढळले.
manisha.devne@expressindia.com
