Morning heel pain causes and Plantar Fasciitis treatment: “सकाळी उठल्यावर पहिलं पाऊल टाकताना टाचेत खूप दुखतं… पण थोडं चाललं की कमी होतं.” ही तक्रार आजकाल घराघरात ऐकायला मिळते. अनेक जण याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतात, परंतु हा ‘प्लांटर फेशिया’ नावाच्या स्नायूंच्या पट्ट्याला आलेली सूज किंवा इजा असू शकते.

टाचेत नेमकं काय दुखतं?

अनेक जण सुरुवातीला या वेदनेकडे दुर्लक्ष करतात, कारण वेदना दिवसभर टिकत नाही. पण हा साधा वाटणारा त्रास हळूहळू वाढू शकतो. मग प्रश्न पडतो, सकाळीच वेदना जास्त का जाणवते? टाचेत नेमकं काय दुखतं?

‘प्लांटर फेशिया’

आपल्या पायाच्या तळाशी ‘प्लांटर फेशिया’ नावाचा एक मजबूत पट्टा असतो. हा टाचेतून बोटांपर्यंत जातो आणि तळव्याच्या आर्चला आधार देतो. चालणं, उभं राहणं आणि धावण्यासारख्या क्रिया करताना शरीराचं वजन पेलून धरण्यात प्लांटर फेशियाची महत्त्वाची भूमिका असते. या फेशिया वर सतत किंवा जास्त ताण पडल्यास त्यात सूक्ष्म इजा निर्माण होतात. यालाच सामान्यतः “प्लांटार फेशियाएटिस” म्हटलं जातं.

Heel pain relief exercises for Plantar Fasciitis | Causes of morning heel pain in Marathi | टाच दुखीवर घरगुती उपाय | प्लांटर फेशियाइटिस टाच दुखी लक्षणे
टाच दुखी आणि प्लांटर फेशियाइटिसवर प्रभावी उपचार (Image- Gemini)

सकाळीच वेदना का वाढते?

रात्री झोपताना पायांचे तळवे आरामदायक स्थितीत असल्यामुळे, प्लांटार फेशिया वरचा ताण कमी असतो. सकाळी उठल्यावर पाहिलं पाऊल जमिनीवर ठेवलं की:

  • फेशिया अचानक ताणला जातो
  • आधीच असलेल्या सूक्ष्म इजांवर दाब पडतो
  • संवेदनशील भागावर भार पडतो
    म्हणूनच पहिलं पाऊल सगळ्यात जास्त दुखतं. काही वेळ चालल्यानंतर फेशिया ताणलेल्या स्थितीशी जुळवून घेतो आणि वेदना कमी वाटते.

कुणाला हा त्रास जास्त होतो?

हा त्रास बऱ्याच घटकांवर अवलंबून असतो, हे घटक व्यक्तिगणिक आणि पारिस्थितीगणिक वेगळे असतात. पुढे दिलेल्या एका किंवा जास्त कारणांमुळे प्लांटार फेशियाईटिस होऊ शकतो. काही वेळा यापैकी कोणतेही घटक नसताना ही होऊ शकतो.

  • अचानक जास्त चालणं किंवा व्यायाम सुरू करणं
  • कामाच्या निमित्ताने सतत उभं राहणे
  • वजन जास्त असणं
  • सपाट पाय (flat foot) किंवा खूप उंच आर्च
  • कडक चप्पल किंवा बूट वापरणं
  • अति सपाट चप्पल वापरणं
  • कडक पृष्ठभागावर अनवाणी चालणं
  • दीर्घकाळ बसून राहिल्यानंतर अचानक हालचाल

ही सगळी कारणं पायावरचा `लोड’ वाढवतात.

“थोडं चाललं की बरं वाटतं” मग दुर्लक्ष करावं का?

अनेक जण हा त्रास सहन करत राहतात, कारण वेदना काही वेळाने कमी होते. पण हा दृष्टिकोन योग्य ठरत नाही.

कमी होण्याने वेदना संपत नाही

  • वेदना कमी झाली म्हणजे समस्या संपली असं नाही
  • वेदना कमी झाली तरी फेशियावर आलेला ताण कायम राहतो
  • सूक्ष्म इजा वाढू शकतात

वेळेत लक्ष दिलं नाही तर वेदना दिवसभर आणि दीर्घकाळ जाणवू शकते.

उपचाराचा योग्य दृष्टिकोन

१. पूर्ण विश्रांती योग्य उपाय नाही
पूर्ण विश्रांती घेतल्यास सुरुवातीला आराम मिळतो, पण यामुळे फेशियाची भार घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे संतुलित हालचाल आवश्यक आहे.

२. लोड मॅनेजमेंट
पायावर अचानक जास्त ताण येऊ देऊ नये. चालणं, उभं राहणं याचा कालावधी हळूहळू वाढवावा.

३. योग्य पादत्राणे वापरणे/इन्सोल्सचा वापर करणे
कुशन आणि आर्च सपोर्ट असलेले शूज/ चप्पल वापरणं महत्त्वाचं आहे. पूर्णपणे फ्लॅट आणि कडक चप्पल टाळाव्या. उंच टाचेच्या सँडल्स देखील टाळाव्या.

४. सकाळी उठल्यावरची सवय बदला

  • सकाळी जाग आल्या आल्या लगेच उठून उभं राहू नका, अंथरुणातच पावलं आणि पायांच्या हालचाली करा.
  • टाच आणि पायाला सौम्य स्ट्रेच द्या
  • मग हळूहळू वजन टाका

यामुळे सुरुवातीची पावले टाकताना होणारा त्रास कमी होतो.

५. वेदना तीव्र असल्यास तळव्यांना बर्फाचा शेक द्या.

फिजिओथेरेपीची भूमिका
या समस्येचा उपचार फक्त टाचेपुरता मर्यादित नसतो. फिजिओथेरेपीमध्ये संपूर्ण ‘कायनेटिक चेन’ विचारात घेतली जाते म्हणजे पाय, घोटा, गुडघा आणि खुबा यांचं एकत्रित कार्य.

फिजिओथेरेपिस्ट खालील गोष्टींवर लक्ष देतात:

  • पायाच्या स्नायूंची ताकद वाढवणं
  • पोटरीच्या स्नायूंची लवचिकता सुधारणं
  • चालण्याची पद्धत सुधारणं
  • पायावर येणारा लोड संतुलित करणं

यामुळे केवळ वेदना कमी होत नाही, तर समस्या पुन्हा होण्याचा धोका कमी होतो.

प्लांटार फेशियाईटिस

प्लांटार फेशियाईटिस अचानक होत नाही. ती हळूहळू सवयी, हालचाली, शरीराचं वजन आणि पावलांवर येणारा ताण यांच्या परिणामातून तयार होणारी समस्या आहे. त्यामुळे त्यावरचे उपचारही दीर्घकालीन असणं गरजेचं आहे.

टाचेत होणारी वेदना हा शरीराने दिलेला संदेश

सकाळी उठल्यावर टाचेत होणारी वेदना हा शरीराने दिलेला संदेश आहे . ‘पहिलं पाऊल दुखतं’ याचा अर्थ पायावरचा ताण योग्य पद्धतीने व्यवस्थापित होत नाही.
लक्षात ठेवा:

  • वेदना कमी झाली म्हणजे समस्या संपली असं होत नाही
  • योग्य हालचाल आणि लोड मॅनेजमेंट गरजेचं आहे
  • योग्य मार्गदर्शनाने पूर्ण आराम मिळू शकतो