चीनमध्ये कारच्या दरवाजावरील लपलेल्या हँडलवर (हिडन डोअर हँडल) बंदी घालण्यात आली आहे. चीनमध्ये २०२७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. कारच्या दरवाज्यावरील हिडन डोअर हँडलवर बंदी घालणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांना हिडन डोअर हँडलचे श्रेय दिले जाते. या हॅण्डललाच फ्लश डोअर हँडल असेही म्हणतात. भारतात सध्या ईव्ही कारची मागणी वाढत आहे. चीनने या हँडलवर बंदी का आणली, ते जाणून घेऊयात.
हिडन डोअर हँडलबाबत इलॉन मस्क काय म्हणाले ?
इलॉन मस्क यांनी २०१३ मध्ये हिडन डोअर हँडल विकसित केल्याचे पहिल्यांदा सांगितले होते. त्यावेळी माहिती देताना मस्क म्हणाले, आम्ही (टेस्ला) एक इंटरस्टिंग डोअर हँडल बनवलं आहे. पण त्याच्यात काही सेन्सरशी निगडीत त्रुटी आहेत. तुम्ही ते हँडल वापरून दरवाजा लावाल, पण तो दरवाजा नंतर उघडणारच नाही. हे ग्राहकांसाठी खरोखर त्रासदायक आहे.” असे इलॉन मस्क म्हणाले होते.
चीनमधील CGTN या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये कार अपघातानंतर किंवा कारचे चार्जिंग संपल्यानंतर हिडन डोअर हँडलने आतील प्रवाशांना कारचा दरवाजा उघडता आला नाही. कारमधील प्रवासी आतच अडकून पडले होते. दरम्यान, चीनने कारच्या दरवाजांवरील हँडलबाबत एक नियमावली जारी केली आहे. चीन हा जगातील सर्वाधिक कारचे उत्पादन करणारा देश असून चीनमध्ये कारची मोठ्या प्रमाणात विक्री होते.
इलेक्ट्रिक कार विकसित करण्याचे श्रेय हे इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीला दिले जाते. इलेक्ट्रिक कारमध्ये विविध बदल करत टेस्लाने नवीन तंत्रज्ञान आणले. हिडन डोअर हँडल किंवा फ्लश डोअर हँडल हे त्याचेच एक उदाहरण आहे. प्रचलित पद्धतीनुसार कारच्या दरवाज्यावरील हँडल ओढून किंवा कारच्या हँडलला (पट्टीला) वर करून आपण दरवाजा उघडतो.
मायलेज पाच ते दहा किमी वाढते?
दक्षिण कोरियातील कार उत्पादक कंपनी ह्युंदाईने त्यांच्या संकेतस्थळावर हिडन डोअर हँडलबाबत माहिती दिली आहे. हिडन डोअर हँडल कारच्या दरवाजाला लावलेले असेल तर ते कारवर येणारा “एअरोडायनामिक ड्रॅग” कमी करते. एअरोडायनामिक ड्रॅग म्हणजे कार ज्यावेळेस धावत असते त्यावेळी समोरून येणाऱ्या हवेचा तिच्यावर दाब असतो. त्यामुळे तिचा वेग कमी होतो. हिडन डोअर हँडलचा वापर कारमध्ये केल्याने कारचे मायलेज पाच ते दहा किमी वाढते, असे चीनमधील ‘चायना डेली’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या एका वृत्तात म्हटले आहे. महागड्या कारमध्ये ऑटोमॅटिक स्टाईल व मॅन्युअल स्टाईल असे दोन प्रकारचे हँडल दिले जातात, असे ह्युंदाईने सांगितले. ऑटोमॅटिक हँडल हे हात न लावता चावी जवळ नेली की आपोआप उघडतात, तर मॅन्युअल हँडल हे हँडलच्या एखाद्या विशिष्ट भागावर बोटाने दाबले की उघडतात.
भारतातील कोणत्या कारमध्ये आहेत हिडन डोअर हँडल ?
टेस्ला कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये हिडन डोअर हँडल देणे सुरू केल्यानंतर इतर कंपन्यांनी देखील हिडन डोअर हँडल लावण्यास सुरूवात केली. ‘चायना डेली’तील वृत्तानुसार, चीनमध्ये ईव्ही व हायब्रिड कारमध्ये हिडन डोअर हँडलचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल, २०२५ मध्ये विक्री झालेल्या ६० टक्के कारमध्ये हे हँडल असल्याचे समोर आले. भारतात टाटाच्या सिएरा (Tata Sierra) आणि कर्व्ह (Curvv), कियाच्या सेल्टोस आणि सिरोस, महिंद्राच्या एक्सईव्ही ९ई, बीई ६ आणि एक्सयूव्ही ७०० या कार्समध्ये हे हँडल देण्यात आले आहे.
हिडन डोअर हँडलवर बंदी का घालण्यात आली ?
कारच्या दरवाजांवर लावलेल्या हिडन किंवा फ्लश डोअर हँडलमध्ये तांत्रिक बिघाड येण्याची शक्यता जास्त असते. चीनमधील कार उत्पादक कंपनीत काम करणाऱ्या एका इंजिनियरने दिलेल्या माहितीनुसार, सेन्सर हे दरवाजाच्या समोरील भागावर लावले जाते. त्यामुळे कारचा अपघात झाल्यानंतर किंवा कारला आग लागल्यानंतर अथवा कारच्या बॅटरीचे नुकसान झाल्यास सेन्सर खराब होते. त्यामुळे आपात्कालिन परिस्थितीत कारचा दरवाजा उघडणे अशक्य होते. अपघातानंतर कारमध्येच प्रवासी अडकू शकतात.
चीनमधील फायनान्शियल टाइम्सनुसार, २०२४ मध्ये हिडन डोअर हँडल असलेल्या कारचा अपघात झाला होता. अपघातानंतर कारचे हिडन डोअर हँडल बाहेरील लोकांना उघडताच आले नाही. लोकांनी कारमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी कारच्या खिडक्या फोडल्या. त्यात एका दोन वर्षीय बालकासह तिघांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, चीनमध्ये असे अनेक अपघात घडल्यानंतर कारचे दरवाजेच उघडता आले नाहीत.
हिडन डोअर हँडलची अमेरिकेलाही समस्या
कारचे इलेक्ट्रॉनिक डोअर हँडल बंद पडण्याचे प्रमाण वाढल्यानंतर अमेरिकेने देखील या प्रकरणी चौकशी व तपास करण्याचे आदेश अमेरिकेतील नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफटी अॅडमिनिस्ट्रेशनला (NHTSA) दिले होते. पालकांना त्यांची लहान मुले कारमध्ये अडकल्यानंतर कारच्या काचा फोडाव्या लागल्या, अशा किमान चार घटना अमेरिकेत घडल्यानंतर यंत्रणा जागृत झाली. लहान मुलांना हिडन किंवा इलेक्ट्रॉनिक हँडलमुळे कारमध्ये दरवाजा उघडून आत जाणे सहज साध्य होते. परंतु, बाहेर येण्याचे हँडल त्यांना माहिती नसते, अशा अनेक घटना अमेरिकेत घडल्या आहेत. टेस्लाचे डिझाईन प्रमुख फ्रान्ज व्हॉन होल्झॉसेन यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, कारमध्ये इलेक्ट्रॉनिक व मॅन्युअल असे दोन्ही हँडल देण्याबाबत टेस्लाचा विचार सुरू आहे. चीनमध्ये हिडन, फ्लश डोअर हँडलवर २०२७ पासून बंदी लागू केली जाणार आहे. चीनने घेतलेला निर्णय इतर देशांसाठी महत्वाचा ठरू शकतो. भारतात देखील कारची मोठ्या प्रमाणात विक्री होते. भारतात सध्या इलेक्ट्रॉनिक कारची मागणी वाढत आहे.

