Modi script Shivaji Maharaj history: महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान केवळ एका राजाचे नाही, तर राज्यव्यवस्था, युद्धनीति, लोकसंरक्षण, भाषा, धर्मनिरपेक्ष प्रशासन आणि स्वराज्य या संकल्पनांना प्रत्यक्ष आकार देणाऱ्या युगपुरुषाचे आहे. मात्र शिवाजी महाराजांचा आणि पुढील मराठा साम्राज्याचा बराचसा इतिहास आजही पूर्णपणे लोकांसमोर आलेला नाही. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हा इतिहास मोडी लिपीत लिहिलेल्या लाखो-कोट्यवधी कागदपत्रांत दडलेला आहे. म्हणूनच, राज्य सरकारने मोडी लिपी अभ्यासकांची अधिकृत यादी तयार करून या कागदपत्रांच्या वाचन, संपादन आणि अभ्यासाला चालना देण्याचे ठरवले आहे.

मोडी: शिवकालीन आणि पेशवेकालीन इतिहासाचा मूळ कणा

मोडी लिपी ही मराठी भाषेची प्रशासकीय, व्यापारी आणि दैनंदिन व्यवहारातील धावती लिपी होती. यादवकाळापासून ते ब्रिटिश काळापर्यंत या लिपीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत होता. मराठा काळात तर फर्माने, सनद, राजाज्ञा, महसूल नोंदी, लष्करी पत्रव्यवहार, वतनपत्रे, जमीन व्यवहार, इनाम नोंदी, किल्ल्यांची माहिती, खर्चखाते, दौत्यांची पत्रे आणि दरबारातील दैनंदिन व्यवहार मोडी लिपीतच होत असत. त्यामुळे शिवकालीन आणि पेशवेकालीन इतिहासाचा मूळ कणा या दस्तऐवजांमध्ये दडलेला आहे.

मोडी कागदपत्रे वाचणे अपरिहार्य

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी अस्सल कागदपत्रांचे महत्त्व वारंवार अधोरेखित केले. बखरी, आख्यायिका आणि लोकपरंपरा महत्त्वाच्या असल्या तरी इतिहासाचा खरा पाया मूळ पत्रे, आज्ञापत्रे, करारनामे आणि तत्कालीन नोंदी यांत असतो, असे मत राजवाडे यांनी व्यक्त केले आहे. राजवाडे यांनी संपादित केलेल्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथसंपदेतून हे स्पष्ट होते की, मराठा इतिहास जाणून घेण्यासाठी मोडी कागदपत्रे वाचणे अपरिहार्य आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील राजकीय हालचाली, किल्ल्यांचे महत्त्व, सरदारांशी संबंध, महसूलव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेची रूपरेषा अशा अनेक बाबी मोडी दस्तऐवजांतून अधिक स्पष्ट होऊ शकतात.

इतिहास अभिलेखीय पुराव्यांमधून उभा राहतो

शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आजपर्यंत अनेक ग्रंथ लिहिले गेले. सर जदुनाथ सरकार यांचे Shivaji and His Times, गो. स. सरदेसाई यांचे New History of the Marathas आणि Main Currents of Maratha History, तसेच सेतुमाधवराव पगडी, ग. ह. खरे, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांसारख्या अभ्यासकांनी शिवकालाचा सखोल अभ्यास केला. परंतु या अभ्यासकांनीही अनेक ठिकाणी मोडी, फारसी, संस्कृत आणि इंग्रजी कागदपत्रांच्या तुलनात्मक अभ्यासावर भर दिला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ गौरवकथांमधून नव्हे, तर अभिलेखीय पुराव्यांमधून अधिक भक्कमपणे उभा राहतो.

Modi script Shivaji Maharaj history
A sample of a letter written in Modi.

मोडी लिपीची खासियत

मोडी लिपीची खासियत म्हणजे ती वेगाने लिहिण्यासाठी तयार झालेली लिपी आहे. देवनागरीप्रमाणे प्रत्येक अक्षर वेगळे न लिहिता, हात न उचलता सलग लिहिण्याची पद्धत यात दिसते. म्हणूनच ती प्रशासकीय व्यवहारासाठी अत्यंत उपयुक्त ठरली. महसूल अधिकारी, कारकून, चिटणीस, फडणीस, कुलकर्णी आणि दफ्तरातील कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणावर लेखन करावे लागत असे. त्यासाठी मोडी ही लिपी सोयीची होती. परंतु,आजच्या वाचकाला ती कठीण वाटते, कारण तिचे वळण, अक्षररचना, संक्षेप, अनुस्वारांचा वापर, शब्दांचे अपभ्रंश आणि कालानुसार बदललेली शैली समजण्यासाठी विशेष प्रशिक्षण आवश्यक असते. या लिपीची चिटणिशी, महादजीपंती, बिवलकरी, आणि रानडी अशी विविध वळणे (Font styles) इतिहासप्रसिद्ध आहेत.

मोडी लिपी आणि व्युत्पत्तीचे सिद्धान्त

मोडी लिपी आणि कुटिल

मोडी लिपीच्या उगमाबाबत मतभेद आहेत. काही अभ्यासक तिचा संबंध कुटिल किंवा नागरी लिपीच्या धावत्या रूपाशी जोडतात. अनेक इतिहासकार मोडीला स्वतंत्र लिपी मानत नाहीत. मोडी हा देवनागरी आणि प्राचीन ‘कुटिल लिपी’चाच एक आधुनिक अवतार आहे, असे ते मानतात. प्राचीन ‘ब्राह्मी लिपी’ हे सर्व भारतीय लिपींचे मूळ मानले जाते. या ब्राह्मीपासून भारतातील अनेक लिपींचा विकास झाला. गुप्तोत्तर कालखंडात ‘कुटिल लिपी’ अस्तित्वात आली.

मुरडलेली मोडी

ब्राह्मी लिपीतील स्वर, व्यंजन आणि मात्रा लिहिणे अधिक सोपे व गतिमान व्हावे, म्हणून हा बदल करण्यात आला होता. कुटिल हा संस्कृत शब्द आहे, तर ‘मोडी’ हा अस्सल मराठी शब्द आहे; परंतु या दोघांचा मूळ अर्थ आणि उद्देश एकच आहे! लिहिण्याचा वेग वाढवण्यासाठी जेव्हा मुळाक्षरांच्या मूळ वळणात वाकडेपणा, वक्रता किंवा ‘मोड’ आणली गेली, तेव्हा त्या शैलीला संस्कृतमध्ये ‘कुटिल’ आणि मराठीत ‘मुरडलेली’ म्हणजेच ‘मोडी’ म्हटले गेले.

हेमाडपंत आणि मोडी लिपी

यादवकालीन हेमाडपंतांच्या काळात प्रशासकीय मराठी लेखनाला गती मिळाल्याचे काही अभ्यासक मानतात. सुमारे ७०० वर्षांपूर्वी देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य असताना मोडीचा जन्म झाला असे मानले जाते. यादव राजा सिंघणच्या काळापासून दरबारी कामे संस्कृतमध्ये चालत होती. मात्र, हेमाडपंतांनी ही प्रथा बदलून राजकीय कागदपत्रे, सनद, दानपत्रे, फर्मान आणि हुकूमनामे मराठीत लिहिण्याचा उपक्रम सुरू केला. राज्यात बाजरीचे बी आणि मोडी लिपी आणण्यासाठी हेमाडपंत लंकेला गेले होते अशी एक दंतकथा प्रसिद्ध होती. परंतु, सिंहली आणि मोडी लिपीत कोणतेही साम्य नसल्याने हा दावा इतिहासकारांनी फेटाळला आहे. मात्र, यादव राजे महादेव व रामदेव यांच्या काळात हेमाडपंताने ही लिपी सुरू केल्याचे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे मान्य करतात. राजवड्यांच्या मते, ‘मोडी’ हा शब्द फारसी भाषेतील ‘शिकस्ता’ (मोडलेली) या शब्दाचे हुबेहूब मराठी भाषांतर आहे.

बाळाजी आवजी चिटणीस आणि मोडी लिपी

मोडी कुणी विकसित केली?

शिवकालात बाळाजी आवजी चिटणीसांनी प्रशासकीय मराठीची अधिक सुबक, व्यवहारक्षम आणि राजकीय दप्तरी वापरासाठी योग्य अशी मांडणी विकसित केली असावी, असेही मत व्यक्त केले जाते. त्यांनी मोडी लिपी विकसित केल्याचा उल्लेख पाश्चात्त्य अभ्यासक डेव्हिड डिरिंजर यांच्या पुस्तकात येतो. मात्र, शिवपूर्व काळातील मोडी कागदपत्रेही उपलब्ध असल्यामुळे मोडी लिपीचा शोध बाळाजी आवजींनीच लावला, हा दावा अनेक इतिहासकार स्वीकारत नाहीत.

मोडी कागदपत्रांचे महत्त्व

मोडी कागदपत्रांचे सर्वांत मोठे महत्त्व म्हणजे ती तत्कालीन समाजजीवनाचे जिवंत चित्र उभे करतात. शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ युद्धे, स्वाऱ्या आणि किल्ले यापुरता मर्यादित नाही. त्यांच्या प्रशासनात शेतकरी, गावकऱ्यांचे संरक्षण, स्त्रियांचा सन्मान, मंदिर- मशीद- संस्था यांच्याशी संबंध, व्यापारमार्ग, बंदरे, आरमार, जमीन महसूल, गड-किल्ल्यांची व्यवस्था, धान्यसाठा, घोडदळ, पायदळ, शिस्त, गुप्तवार्ता व्यवस्था अशा अनेक स्तरांचा समावेश होता. या सर्वांची सविस्तर माहिती मोडीतील दप्तरी नोंदींतून मिळू शकते. आज्ञापत्रे, महसूल आदेश, किल्लेदारांना पाठवलेली पत्रे, गावकऱ्यांच्या तक्रारी, इनाम-जागीर नोंदी, व्यापाऱ्यांशी पत्रव्यवहार अशा दस्तऐवजांतून स्वराज्याची प्रत्यक्ष कार्यपद्धती दिसते. त्यामुळे मोडी कागदपत्रांचा अभ्यास म्हणजे शिवाजी महाराजांना उत्तम माणूस म्हणून आणि चांगला प्रशासक व आणि दूरदर्शी नेतृत्व म्हणून समजून घेण्याची संधी मिळते.

पेशवेकालीन मोडी

पेशवेकाळात मोडी लिपीचा वापर आणखी व्यापक झाला. पुणे दफ्तर, सातारा, कोल्हापूर, तंजावर, ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा, नागपूर आणि राजस्थानातील संग्रहालयांत मोडीतील मोठे दस्तऐवजसंग्रह उपलब्ध आहेत. प्रज्ञा देशपांडे यांच्या Scripts of Power आणि Creative Pasts यांसारख्या संशोधनांतून पश्चिम भारतातील लेखनसंस्कृती, दफ्तरी व्यवहार आणि ऐतिहासिक स्मृती यांचे महत्त्व स्पष्ट होते. तसेच पुष्कर सोहोनी यांच्या “Marathi of a Single Type: The Demise of the Modi Script” या लेखात मोडी लिपीच्या अस्ताची प्रक्रिया आणि मुद्रणयुगातील बदल स्पष्ट केले आहेत.

मोडी लिपी मागे पडण्याचे कारण

मोडी लिपी मागे पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे आधुनिक मुद्रणप्रणाली. मोडीची अक्षरे सलग, वक्र आणि धावती असल्याने धातूच्या खिळ्यांतून छपाई करणे अवघड होते. देवनागरी मात्र मुद्रणासाठी अधिक सोपी ठरली. १९५० नंतर मोडीचा प्रशासकीय आणि शैक्षणिक वापर ब्रिटिशकालीन मुद्रण, देवनागरीचा वाढता वापर आणि स्वातंत्र्योत्तर शिक्षणव्यवस्था यामुळे कमी झाला. परिणामी, इतिहासाची मोठी किल्लीच समाजाच्या हातातून निसटली. आज अनेक कुटुंबांकडे, देवस्थानांकडे, वाड्यांमध्ये, जुन्या दप्तरांमध्ये मोडी कागदपत्रे पडून आहेत; पण ती वाचणारे तज्ज्ञ कमी आहेत.

Modi script Shivaji Maharaj history

काय गरजेचे आहे?

याच पार्श्वभूमीवर सरकारची मोडी अभ्यासकांची अधिकृत यादी आणि दस्तऐवज वाचनाची मोहीम महत्त्वाची ठरते. मात्र ही मोहीम केवळ प्रतीकात्मक राहू नये. मोडी कागदपत्रांचे वैज्ञानिक जतन, डिजिटल स्कॅनिंग, वर्गीकरण, लिप्यंतर, भाषांतर, ऐतिहासिक पडताळणी आणि सार्वजनिक प्रवेश या सर्व पातळ्यांवर काम होणे आवश्यक आहे. विद्यापीठांमध्ये मोडी अभ्यासाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम, इतिहास संशोधकांसाठी प्रशिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मोडी ओसीआर विकसित करणे आणि जिल्हानिहाय अभिलेख शोधमोहीम राबवणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक स्मृतीचे पुनरुज्जीवन

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जितका प्रेरणादायी आहे, तितकाच तो संशोधनशीलही आहे. त्याला भावनिक अभिमानाची गरज आहेच, पण त्याहून अधिक गरज आहे ती अस्सल पुराव्यांची. मोडी लिपीतील कागदपत्रे उलगडली, तर शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे अनेक अज्ञात पैलू उजेडात येऊ शकतात. स्वराज्याची अर्थव्यवस्था कशी चालत होती, गड-किल्ल्यांचे व्यवस्थापन कसे होत होते, सरदारांवर नियंत्रण कसे ठेवले जात होते, सामान्य प्रजेबाबत शासनाची भूमिका काय होती, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या दप्तरांत सापडू शकतात. म्हणूनच मोडी लिपीचा अभ्यास हा केवळ भाषिक किंवा लिपिशास्त्रीय विषय नाही; तो महाराष्ट्राच्या ऐतिहासिक स्मृतीचे पुनरुज्जीवन आहे.