High Blood Pressure Cause : शरीरातील रक्तदाब वाढणं हे आपल्याला साधारण लक्षण वाटत असतं आणि आपण तपासणी पुढे ढकलत असतो. मात्र, उच्च रक्तदाबामुळे गंभीर शारीरिक समस्या उद्भवतात, असा इशारा डॉक्टर अनेकदा देत असतात. असंच बंगळुरूमधील ३८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत झालं आहे. आपण पूर्णपणे निरोगी असल्याचे त्याला वाटत होते, तो नियमित व्यायाम करत होता, क्वचितच आजारी पडायचा तसेच डोकेदुखी किंवा चक्कर येण्यासारखा कोणताही त्रास त्याला नव्हता. मात्र, कार्यालयात झालेल्या नियमित आरोग्य तपासणीत त्याचा रक्तदाब (Blood Pressure) १५६/९६ मिमीएचजी नोंदवला गेला.
सुरुवातीला त्याने सतत बसून काम करत असल्याने रक्तदाब वाढला असावा असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. डॉक्टरांनी त्याला घरी असताना आठवडाभर नियमित रक्तदाब तपासण्याचा सल्ला दिला. यावेळी त्याला रक्तदाब सातत्याने वाढत असल्याचे आढळले. पुढील तपासणीत उच्च रक्तदाबामुळे त्याच्या हृदय आणि मूत्रपिंडांमध्ये (Kidneys) काही प्राथमिक बदल दिसून आले. विशेष म्हणजे, कोणतीही लक्षणे दिसत नसताना उच्च रक्तदाबाचा धोका अनेक वर्षांपासून शांतपणे वाढत होता.
राजेशची ही कहाणी काही अपवाद नाही. भारतात लाखो लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास (Hypertension) आहे, पण त्यांना त्याची कल्पनाच नसते. कारण ‘आपल्याला काहीच त्रास होत नाही म्हणजे आपण पूर्णपणे निरोगी आहोत,’ असा समज अनेकजण करून घेतात.
अनेकांना रक्तदाब वाढण्याची लक्षणे म्हणजे डोकेदुखी, चक्कर किंवा नाकातून रक्त येणे ही असल्याचे वाटते. प्रत्यक्षात मात्र उच्च रक्तदाब असलेल्या अनेकांना वर्षानुवर्षे कोणतीही ठळक लक्षणे जाणवत नाहीत, त्यामुळे हा आजार शरीराला आतून शांतपणे इजा करत राहतो.
रक्तदाब म्हणजे रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर पडणारा रक्ताचा दाब. हा दाब दीर्घकाळ राहिल्यास रक्तवाहिन्या हळूहळू कडक होऊ लागतात. या प्रक्रियेशी शरीर जुळवून घेत असल्याने अनेकांना कोणतीही अस्वस्थता जाणवत नाही. मात्र, या वेळेत हृदय, मूत्रपिंड आणि इतर अवयवांवर सतत ताण येत असतो.
बंगळुरू येथील नारायण इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिअॅक सायन्सेसमधील वरिष्ठ सल्लागार भगीरथ रघुरामन यांनी सांगितले की, उच्च रक्तदाबाची समस्या आता तरुणांमध्येही वाढत आहे. भारतातील सुमारे १२ टक्के तरुण उच्च रक्तदाबाने ग्रस्त असल्याचे विविध अभ्यासातून समोर आले आहे, त्यामुळे कमी वयातच हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर विकारांचा धोका वाढू शकतो.
उच्च रक्तदाबाची ही लक्षणे दुर्लक्षित करू नका
उच्च रक्तदाबाला (Hypertension) अनेकदा ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते, कारण सुरुवातीला त्याची ठळक लक्षणे दिसत नाहीत. मात्र, शरीर काही सूक्ष्म संकेत देत असते. अनेकजण ते वाढते वय, थकवा किंवा व्यस्त जीवनशैलीचा परिणाम समजून दुर्लक्षित करतात.
- रात्री वारंवार लघवीला जाणे : रक्तदाब जास्त असल्यास मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो, त्यामुळे रात्री अनेकदा लघवीला जावे लागू शकते
- कानात ठोके ऐकू येणे किंवा ‘शूं…शूं…’ असा आवाज जाणवणे : काहींना हृदयाच्या ठोक्यांच्या तालासोबत कानात असा आवाज ऐकू येतो. हे रक्तप्रवाहातील बदलाचे लक्षण असू शकते.
- मान किंवा खांदे सतत जड वाटणे : चुकीचं बसण्यामुळेच नव्हे, तर काहीवेळा रक्तदाबामुळेही मान आणि खांद्याच्या भागात सतत ताण जाणवू शकतो.
- झोप नीट न लागणे : रात्री वारंवार जाग येणे, झोप मध्येच तुटणे किंवा शांत झोप न लागणे, याचा संबंध उच्च रक्तदाबाशी असू शकतो. जर्नल ऑफ क्लिनिकल स्लीप मेडिसिनमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये अशा झोपेच्या समस्या अधिक प्रमाणात आढळून आल्या आहेत.
- डोळ्यात अचानक लाल ठिपका दिसणे : वेदना नसतानाही डोळ्यात लाल डाग दिसल्यास तो लहान रक्तवाहिनी फुटल्याचा संकेत असू शकतो. काही वेळा यामागे उच्च रक्तदाबही याला कारणीभूत ठरू शकतो.
उच्च रक्तदाब वाढण्यामागची प्रमुख कारणे
- अति मिठाचे सेवन : लोणचे, पापड यांसारख्या पारंपरिक पदार्थांसोबतच पॅकेज्ड स्नॅक्स, रेडी-टू-ईट पदार्थ आणि फास्ट फूडमध्येही मोठ्या प्रमाणात मीठ असते, त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.
- लठ्ठपणा : वाढते वजन आणि शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो.
- बैठी जीवनशैली : नियमित व्यायामाचा अभाव आणि दिवसभर बसून काम करणे हे देखील उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरू शकते.
- मानसिक ताण : सततचा ताण, चिंता आणि तणाव यामुळेही रक्तदाब वाढू शकतो.
- भारतीयांमध्ये धोका अधिक : तज्ज्ञांच्या मते, इतर देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये कमी रक्तदाबाच्या पातळीवरही हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका अधिक असू शकतो.
- अभ्यासात काय आढळले? ८,६०० हून अधिक भारतीय रुग्णांच्या अभ्यासात आढळले की, अति मिठाचे सेवन (३९%), लठ्ठपणा (३२.९%), बैठी जीवनशैली (२८.६%) आणि मानसिक ताण (२०.७%) हे उच्च रक्तदाबासाठी जोखीम ठरत असल्याचे समोर आले.
तज्ज्ञांच्या मते, ‘मास्क्ड हायपरटेन्शन’ ची (Masked Hypertension) प्रकरणेही वाढत आहेत. या स्थितीत डॉक्टरांकडे तपासणी करताना रक्तदाब सामान्य दिसतो, मात्र कामाच्या ताणात किंवा झोपेच्या वेळी तो वाढलेला असू शकतो; त्यामुळे केवळ एका तपासणीवर अवलंबून राहणे योग्य नाही.
यासाठी डॉक्टर ‘रूल ऑफ थ्री’ (Rule of Three) पाळण्याचा सल्ला देतात. घरी असताना सलग तीन दिवस, एकाच वेळी रक्तदाब मोजावा. या तीन दिवसांची सरासरी जर १३५/८५ mmHg पेक्षा जास्त येत असेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहून डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आवश्यक असल्यास २४ तासांच्या अॅम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग (ABPM) चाचणीद्वारे दिवसभर आणि रात्री रक्तदाबात होणारे बदलही तपासता येतात.
रक्तदाब मोजण्याची योग्य वेळ कोणती?
तज्ज्ञांच्या मते, दिवसभरात यावेळी रक्तदाब मोजणे उपयुक्त ठरू शकते –
- सकाळी उठल्यानंतर (सर्वात महत्त्वाची वेळ) : उठल्यानंतर एका तासाच्या आत, नाश्ता करण्यापूर्वी आणि रक्तदाबाची औषधे घेण्यापूर्वी रक्तदाब मोजावा.
दुपारच्या वेळेत (गरजेनुसार) : दुपारी १२ ते ३ या वेळेत, जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर किमान दोन तासांनी रक्तदाब मोजता येतो. ज्यांचा रक्तदाब वारंवार बदलतो, त्यांच्यासाठी ही वेळ उपयुक्त ठरू शकते.
संध्याकाळी : रात्रीच्या जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर किमान दोन तासांनी रक्तदाब मोजावा. जर संध्याकाळी रक्तदाबाची औषधे घ्यायची असतील, तर ती घेण्यापूर्वी रक्तदाब तपासणे अधिक योग्य ठरते. - रक्तदाब मोजण्यापूर्वी किमान ३० मिनिटे चहा, कॉफी, मद्यपान करू नये आणि व्यायाम करणेही टाळावे; यामुळे रक्तदाबाची नोंद अधिक अचूक मिळण्यात मदत होते. तसेच, एकदाच रक्तदाब मोजण्याऐवजी सलग दोन ते तीन वेळा मोजून एकूण सरासरीची नोंद घ्यावी. अशीच नोंद सलग सात दिवस ठेवल्यास रक्तदाबाचे अधिक विश्वासार्ह चित्र समोर येते.
भारतीयांनी रक्तदाबाची तपासणी कधी सुरू करावी?
तज्ज्ञांच्या मते, १८ वर्षांनंतर प्रत्येकाने नियमितपणे रक्तदाब तपासण्यास सुरुवात करावी.
- १८ ते ३९ वर्षे : जर रक्तदाब १२०/८० mmHg पेक्षा कमी असेल आणि इतर कोणताही धोका नसेल, तर वर्षातून किमान एकदा रक्तदाब तपासावा. मात्र, रक्तदाब १२०–१३९/८०–८९ mmHg दरम्यान असेल किंवा लठ्ठपणा, कुटुंबात उच्च रक्तदाबाचा इतिहास यांसारखी जोखीम असेल तर दर ३ ते ६ महिन्यांनी तपासणी करणे गरजेचे आहे.
- ४० वर्षांनंतर : पूर्वी रक्तदाब सामान्य असला तरी दर ६ ते १२ महिन्यांनी रक्तदाब तपासणे आवश्यक आहे.
- या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी : उच्च रक्तदाब, मधुमेह, दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार (CKD), लठ्ठपणा, हृदयविकार असलेले रुग्ण किंवा गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करावी. आवश्यक असल्यास घरी नियमित रक्तदाब मोजण्याचा सल्ला तुम्हाला डॉक्टर देतात.
