LDL Cholestrol leads to Heart : लहानपणी मित्रांसोबत खेळताना प्रीतम चावला या व्यक्तीला वारंवार थकवा यायचा. धावताना तो पटकन दमून जायचा, जेवल्यानंतर शरीर जड व्हायचं आणि व्यायामाचे क्लासही तो अनेकदा टाळायचा. त्यामुळे मित्र त्याला खेळायला सोबत घेत नसत. स्वतःमध्येच काहीतरी कमी आहे, अशी भावना त्याच्या मनात घर करू लागली होती. मात्र, यामागील कारण आळस नव्हतं, तर वाढलेलं कोलेस्ट्रॉल होतं. कुटुंबात कोलेस्ट्रॉलचा इतिहास असल्यामुळे प्रितमच्या वडिलांनी त्याची तपासणी करून घेतली आणि अवघ्या आठव्या वर्षीच प्रितमला औषधोपचार सुरू करावे लागले. आज २७ वर्षांचा प्रितम इंजेक्शन आणि गोळ्यांच्या मदतीने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवत आहे.

अशा शारीरिक बदलांना सामोरे जाणारे प्रीतम हे एकमेव व्यक्ती नाहीत. साकेत शर्मा यांनाही वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी पहिला हृदयविकाराचा झटका आला आणि दोन वेळा स्टेंट बसवावे लागले. तर ७२ वर्षीय सुनील भट्ट यांना रुग्णालयात दाखल झाल्यानंतर यापूर्वीच तीन ‘सायलेंट हार्ट अटॅक’ येऊन गेल्याचे समजले.

प्रीतम, साकेत आणि सुनील हे Gen Z, Boomer आणि Gen X अशा तीन वेगळ्या पिढीचे आहेत, मात्र यांच्यात एक समान धागा आहे. तिघांनाही फॅमिलिअल हायपरकोलेस्टेरोलेमिया (Familial Hypercholesterolemia) हा अनुवांशिक आजार आहे. या आजारामुळे शरीरात ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल (Low-Density Lipoprotein – LDL) अतिशय वेगाने वाढते आणि त्यामुळे कमी वयातच हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका अनेकपटींनी वाढतो.

हा आजार आई-वडिलांकडून मुलांमध्ये जनुकांद्वारे (Genes) येतो. शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रक्तातून बाहेर टाकण्याची नैसर्गिक क्षमता कमी होत असल्याने एलडीएल सतत वाढत राहते. या आजारामुळे कमी वयातच हृदयविकाराचा धोका संभवण्याचे प्रमाण भारतीयांमध्ये अधिक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या आजारात केवळ आहार आणि व्यायाम पुरेसे ठरत नाहीत. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुष्यभर औषधोपचार सुरू ठेवावे लागतात. औषधांमध्ये अनियमितता झाली किंवा एखादा डोस चुकला, तरी एलडीएलची पातळी पुन्हा वेगाने वाढू शकते.

दिल्लीतील अपोलो हार्ट व्हॉल्व्ह क्लिनिकचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गौतम नाईक सांगतात, ‘फॅमिलिअल हायपरकोलेस्टेरोलेमिया असलेल्या रुग्णांनी कधीही निष्काळजीपणा करता कामा नये. हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे किंवा इतर आरोग्य समस्या असतील, तर एलडीएलची पातळी ५० mg/dL पेक्षा कमी ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी जीवनशैलीवर नियंत्रण आणि नियमित औषधोपचार या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.”

फक्त ‘स्टॅटिन’चा औषधोपचार अपुरा

फॅमिलिअल हायपरकोलेस्टेरोलेमियाच्या रुग्णांसाठी केवळ स्टॅटिन औषधे पुरेशी ठरत नाहीत. स्टॅटिन ही औषधे यकृतामध्ये (लिव्हर) कोलेस्ट्रॉल तयार करणाऱ्या एन्झाइमवर नियंत्रण ठेवतात. मात्र, या आजारात शरीरातील ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल (LDL) खूप जास्त प्रमाणात वाढत असल्याने अनेक रुग्णांना त्यासोबत PCSK9 इनहिबिटर नावाची विशेष औषधेही घ्यावी लागतात. ही औषधे यकृतातील PCSK9 या प्रथिनावर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे यकृताला रक्तातील अतिरिक्त एलडीएल कोलेस्ट्रॉल अधिक प्रभावीपणे बाहेर काढता येते आणि हृदयविकाराचा तसेच स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते.

उपचार प्रभावी; पण खर्च प्रचंड

एलडीएल कोलेस्ट्रॉल औषधांमुळे बाहेर पडू शकते. मात्र, ही औषधे इंजेक्शनच्या स्वरूपातच द्यावी लागतात आणि त्यांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. दर पंधरा दिवसांनी घ्याव्या लागणाऱ्या या इंजेक्शनसाठी महिन्याला ४० हजार रुपये, तर वर्षभरात जवळपास पाच लाखांपर्यंतचा खर्च येऊ शकतो.

काही रुग्णांमध्ये कालांतराने अधिक प्रभावी औषधांची किंवा एकत्रित उपचारांची गरज भासू शकते. आजार गंभीर स्वरूपाचा असल्यास लायपोप्रोटीन अफेरेसिस (रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल फिल्टर करण्याची विशेष प्रक्रिया) सारख्या उपचारांचाही आधार घ्यावा लागू शकतो.
नव्या गोळीमुळे आशेचा किरण

याच पार्श्वभूमीवर औषधनिर्मिती कंपनी मर्कने विकसित केलेल्या लिपफेंड्रा (Lipfendra) या नव्या गोळीमुळे डॉक्टरांमध्ये आशा निर्माण झाली आहे. एनलिसिटाइड (Enlicitide) या घटकावर आधारित ही गोळी इंजेक्शनप्रमाणेच एलडीएल कोलेस्ट्रॉल सुमारे ६० टक्क्यांनी कमी करण्यास मदत करते.
या औषधाला अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाने (FDA) ने मंजुरी दिली असली, तरी भारतात नियामक मान्यता मिळाल्यानंतरच ते उपलब्ध होऊ शकणार आहे. तज्ज्ञांच्या मते, हे औषध इंजेक्शनपेक्षा तुलनेने कमी किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अनेक रुग्णांसाठी उपचार अधिक सुलभ होऊ शकतात.

लहानपणापासूनच औषधांवर जगण्याची वेळ

लहानपणी प्रितमला या आजाराचे निदान झाले, तेव्हा त्याच्या रक्तातील एलडीएलची पातळी १३० mg/dL होती. सामान्यतः ती ११० mg/dL पेक्षा कमी असणे अपेक्षित असते. आज परदेशी व्यापार विषयात एमबीए करणाऱ्या २७ वर्षीय प्रितमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी तब्बल ४५० mg/dL इतकी आहे, म्हणजेच साधारण मर्यादेपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे.

प्रीतम सांगतो की, ‘आजही मला सतत थकवा जाणवतो. जास्त व्यायाम करता येत नाही. आता पुन्हा औषधांचा डोस बदलण्याची गरज भासू शकते.’
डॉ. गौतम नाईक यांच्या मते, प्रितमच्या आजाराचा त्याच्या आहाराशी फारसा संबंध नाही. ‘हा अनुवांशिक आजार असल्यामुळे त्याच्या शरीराला रक्तातील एलडीएल कोलेस्ट्रॉल सामान्य व्यक्तीप्रमाणे बाहेर काढता येत नाही. यकृत म्हणजे शरीरातील कोलेस्ट्रॉल साफ करणारी यंत्रणा या दृष्टिकोनातून पाहिल्यास प्रीतमच्या बाबतीत ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करीत नाही हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे इतरांच्या तुलनेत त्याच्या शरीराला रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी अनेक दिवस लागतात. परिणामी, वाईट कोलेस्ट्रॉल लहानपणापासूनच रक्तात साचत राहते,’ असेही ते नमूद करतात.

वेळेत तपासणी गरजेची

डॉ. गौतम नाईक पुढे सांगतात की, फॅमिलिअल हायपरकोलेस्टेरोलेमिया असलेल्या व्यक्तींना कमी वयातच हृदयविकाराचा धोका अधिक असतो. त्यामुळे वेळेत निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

डॉ. नाईक असेही नमूद करतात की, “भारतात अनेकांना हा आजार असल्याची कल्पनाच नसते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतरच अनेकजण सांगतात की, त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना ४० किंवा ५० व्या वर्षीच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने वयाच्या वीस वर्षांपासून नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी.’ लिपिड प्रोफाइल (कोलेस्ट्रॉल तपासणी), रक्तातील साखर, HbA1c आणि हृदयाची तपासणी अशा काही तपासण्या ते सुचवतात.

कुटुंबातील इतरांचीही तपासणी गरजेची

तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीमध्ये हा आजार आढळल्यास त्याच्या जवळच्या नातेवाईकांचीही तपासणी करणे आवश्यक असते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कुटुंबात काही सदस्यांना कमी वयातच जर हृदयविकार किंवा जास्त कोलेस्ट्रॉलचे निदान झाले असेल तर दोन वर्षांच्या वयानंतर मुलांचीही कोलेस्ट्रॉल तपासणी करणे आवश्यक ठरते.

याशिवाय प्रत्येक मुलाने ९ ते ११ वर्षे आणि पुन्हा १७ ते २१ वर्षे या वयोगटात किमान एकदा लिपिड प्रोफाइल तपासणी करून घ्यावी. प्रौढांनी १९ वर्षांनंतर नियमित कोलेस्ट्रॉल तपासणी सुरू करावी आणि किमान दर पाच वर्षांनी ती पुन्हा करावी. जास्त धोका असलेल्या व्यक्तींनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वारंवार तपासणी करून घ्यावी.

फक्त आरोग्यदायी सवयी पुरेशा नसतात

प्रीतमची कहाणी ही लहानपणापासून अनुवांशिक आजारासोबत जगण्याची कहाणी आहे, तर साकेत शर्मांचा अनुभव सांगतो की, आरोग्यदायी जीवनशैली असूनही आनुवंशिक कोलेस्ट्रॉलचा धोका टाळता येत नाही. गुरुग्राममधील व्यावसायिक असलेले साकेत यांनी कधीही धूम्रपान किंवा मद्यपान केले नाही. ते शाकाहारी आहेत, नियमित चालतात, योग करतात आणि त्यांचे वजनही अवघे ६० किलो आहे. तरीही वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर २००४ आणि २०१४ मध्ये त्यांच्यावर दोन वेळा अँजिओप्लास्टी करावी लागली.

मेदांता रुग्णालयाचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनीष बन्सल यांच्या मते, साकेत हे असे रुग्ण आहेत, ज्यांच्यामध्ये नेहमीचे उपचारही अनेकदा पुरेसे ठरत नाहीत. ‘अनेक उपचारांनंतरही त्यांचे एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी जास्तच राहिली. स्टॅटिन औषधांमुळे त्यांना स्नायूंमध्ये वेदना होऊ लागल्या. त्यामुळे आता त्यांना वर्षातून दोन वेळा दिल्या जाणाऱ्या इन्क्लिसिरॅन या इंजेक्शनद्वारे उपचार सुरू आहेत. हे औषध शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉल अधिक प्रभावीपणे कमी करण्यास मदत करते.”

साकेत यांच्यासाठी सर्वात वेदनादायक बाब म्हणजे हा आजार आता पुढच्या पिढीतही दिसू लागला आहे. ‘माझा २२ वर्षांचा मुलगा कोलेस्ट्रॉलची औषधे घेत आहे. ३० वर्षांच्या मुलीवरही उपचार सुरू आहेत. माझ्या पत्नीच्या वडिलांनाही आणि माझ्या काकांनाही वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचा त्रास होता,’ असे साकेत सांगतात. त्यांच्या अनुभवातून हा आजार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम करू शकतो, हे स्पष्ट होते.

तीन वेळा हृदयविकाराचा झटका, तरीही अनभिज्ञ

७२ वर्षीय सुनील भट्ट यांना हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे कधीच गंभीर वाटली नाहीत. २०१५ मध्ये दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत असताना नेहमी ट्रेनमध्ये चढताना त्यांच्या छातीत जडपणा जाणवायचा. सुरुवातीला त्यांनी तो अॅसिडिटीचा त्रास समजून उपचार घेतले. मात्र तपासणीत हृदयाच्या दोन प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये ९५ टक्के ब्लॉकेज असल्याचे समोर आले.

मात्र यापेक्षाही मोठा धक्का त्यांना बसला, जेव्हा डॉक्टरांनी त्यांना यापूर्वीच तीन ‘सायलेंट हार्ट अटॅक’ येऊन गेल्याचे सांगितले. डॉ. मनीष बन्सल यांच्या मते, अँजिओप्लास्टीनंतरही त्यांचे एलडीएल कोलेस्ट्रॉल जास्तच राहिले. स्टॅटिन औषधांमुळे स्नायूंमध्ये वेदना सुरू झाल्याने आता त्यांच्यासाठी केवळ इंजेक्शनद्वारे उपचार करण्याचा एकमेव पर्याय उरला आहे.

मात्र अशी प्रभावी इंजेक्शन उपचारपद्धती अत्यंत महाग असल्याने अनेक रुग्णांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहते. परिणामी, काहींना कमी परिणामकारक उपचारांवरच समाधान मानावे लागते.

औषधांसोबतच सुनील भट्ट यांनी आता आपल्या जीवनशैलीतही मोठे बदल केले आहेत. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर झोप या गोष्टी त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनल्या आहेत. ‘आता प्रत्येक दिवस नियोजन करूनच जगावा लागतो. पण नातवंडांसोबत खेळण्यासाठी मी ही शिस्त आनंदाने पाळतो,’ असे ते सांगतात.