High Protein Diet Side Effects : वजन कमी करायचं असो किंवा शरीरात स्नायूंची वाढ करायची असो, यासाठी प्रोटीनचा आहार घेण्याचा सल्ला दिला जातो, त्यामुळे अनेकजण डाएटमध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवतात. पण, जास्त प्रोटीन घेणं म्हणजे जास्त फायदा असतो का? गरजेपेक्षा जास्त प्रोटीन घेतल्यास काय परिणाम होतात? तर अतिरिक्त प्रोटीनचे सेवन केल्यास पोट फुगणं, बद्धकोष्ठता, जास्त तहान लागणं आणि तोंडाची दुर्गंधी यांसारख्या समस्या काही लोकांमध्ये दिसू शकतात. इतकंच नाही तर आहारात प्रोटीनचं प्रमाण वाढवूनही वजन कमी न होण्याची शक्यता असते असं तज्ज्ञ सांगतात.
ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथील मिनिमली इन्व्हेसिव्ह, बॅरिएट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरीचे कन्सल्टंट डॉ. प्रशांत हंसराज साळवी सांगतात की, प्रोटीन शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ते स्नायूंची दुरुस्ती, रोगप्रतिकारक शक्ती, हार्मोन्सचं संतुलन आणि रक्तातील साखरेचं संतुलन राखण्यास मदत करतं. मात्र, एकाच पोषक घटकाचा अतिरेक केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे प्रोटीनचा आहार योग्य प्रमाणात घेणे महत्त्वाचे आहे. तसेच प्रोटीनसोबत फायबर, पुरेसे द्रवपदार्थ आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स यांचा समतोल राखल्यास आपल्याला ते अधिक उपयुक्त ठरू शकतं.
पोट फुगणं, बद्धकोष्ठतेची शक्यता
आहारात प्रोटीनचं प्रमाण वाढवल्यावर अनेकदा फळं, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचं सेवन कमी केलं जातं. परिणामी आहारात फायबरचं प्रमाण कमी होतं. फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांचं संतुलन राखण्यास मदत करतं, त्यामुळे फायबरचं प्रमाण कमी झाल्यास पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे पोट फुगणं आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
याशिवाय, लॅक्टोजचं पचन नीट न होणाऱ्या व्यक्तींनी जर व्हे (दूध फाटल्यानंतर उरलेला पांढरट-पिवळसर द्रव पदार्थ) किंवा पनीरसारख्या दुग्धजन्य प्रोटीनचे सेवन केले तर पोटात अस्वस्थता जाणवू शकते, असंही डॉ. साळवी नमूद करतात.
तोंडाची दुर्गंधी आणि जास्त तहान का लागते?
डॉ. साळवी पुढे सांगतात, आहारात प्रोटीनचं प्रमाण वाढवले आणि कार्बोहायड्रेट्सचं सेवन कमी केले तर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी चरबीचा वापर करू लागतं, या अवस्थेला केटोसिस असे म्हटले जाते, त्यामुळे तोंडातून वेगळ्या प्रकारची किंवा अप्रिय दुर्गंधी येऊ शकते.
प्रोटीनच्या चयापचयातून तयार होणारे घटक, विशेषतः युरिया, शरीरातून बाहेर टाकण्यासाठी किडनीला अधिक पाण्याची गरज असते, त्यामुळे प्रोटीनचं प्रमाण वाढवलं आणि त्या तुलनेत पाणी कमी प्यायलं तर जास्त तहान लागू शकते किंवा डिहायड्रेशनदेखील होऊ शकतं.
त्वचा आणि मूडवरही होऊ शकतो परिणाम?
जास्त प्रमाणात दुग्धजन्य प्रोटीन घेतल्याने काही लोकांमध्ये मुरुमांचा त्रास वाढू शकतो, तर प्रोटीनचे प्रमाण वाढवताना आहारात कार्बोहायड्रेट्स अचानक कमी केल्यास थकवा येऊ शकतो किंवा मूडमध्ये बदल जाणवू शकतो.
कार्बोहायड्रेट्स शरीराला ऊर्जा देतात आणि सेरोटोनिनच्या निर्मितीतही त्यांची भूमिका असते. एकाच प्रकारचा आहार शारीरिक किंवा मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो, त्यामुळे आहारात फक्त प्रोटीनचे प्रमाण वाढवण्याऐवजी इतर पोषक घटकांचाही योग्य प्रमाणात समावेश करणं महत्त्वाचं आहे, असं डॉ. साळवी स्पष्ट करतात.
जास्त प्रोटीनमुळे किडनी खराब होते का?
निरोगी व्यक्तींनी आहारात मर्यादित स्वरूपात प्रोटीनचं प्रमाण वाढवल्यास ते सामान्यतः शरीराला झेपू शकतं. मात्र, आधीपासून किडनीचा आजार असलेल्या व्यक्तींनी प्रोटीन आहार घेताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. दीर्घकाळ अतिरिक्त प्रोटीन घेतल्यास किडनीवर ताण येऊ शकतो, त्यामुळे अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आहारातील प्रोटीनचं प्रमाण ठरवावं असं डॉ. साळवी नमूद करतात.
भरपूर प्रोटीन खाऊनही वजन का कमी होत नाही?
प्रोटीन वाढवलं म्हणजे वजन आपोआप कमी होईलच असं नाही, यावर भर देत डॉ. साळवी पुढे म्हणाले की, प्रोटीनमध्येही कॅलरीज असतात. दिवसभरात शरीर जितक्या कॅलरीज खर्च करतं म्हणजेच ऊर्जेसाठी जितक्या कॅलरीज वापरतं त्यापेक्षा जास्त कॅलरीज आहारात घेतल्या तर शरीरातील चरबी कमी होत नाही.
प्रोटीनच्या गरजेचा स्वत:च अंदाज लावून जास्त प्रमाणात प्रोटीन सेवन केल्याने वजन कमी होण्याची प्रक्रिया थांबू शकते, असंही डॉ. साळवी सूचित करतात, म्हणूनच आहारात प्रोटीनसोबत फायबरयुक्त भाज्या, पुरेसे पाणी, हेल्दी फॅट्स आणि योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असणं गरजेचं आहे. वय, शारीरिक हालचाली आणि वैद्यकीय स्थितीनुसार प्रत्येकाची प्रोटीनची गरज वेगळी असते, त्यामुळे “जास्त प्रोटीन म्हणजे जास्त फायदा” या विचाराऐवजी संतुलित आहार घेणं अधिक उपयुक्त ठरतं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आहारातील पोषक घटकांचं प्रमाण ठरवणं अधिक शहाणपणांचं आहे, असंही डॉ. साळवी सांगतात.
