Excess Sugar Effects on Skin Collagen : आरशात स्वतःकडे पाहताना चेहऱ्यावरच्या बारीक सुरकुत्या किंवा कमी झालेली चमक अनेकांच्या लक्षात येते. त्यावर उपाय म्हणून महागडी कॉस्मेटिक उत्पादने वापरली जातात; पण त्वचेशी संबंधित सर्वांत मोठा धोका कदाचित तुमच्या रोजच्या आहारातच दडलेला असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, अतिरिक्त साखर त्वचेतील कोलेजनचे नुकसान करून, तुमची त्वचा निस्तेज दिसण्यास कारणीभूत ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, रक्तातील अतिरिक्त साखर त्वचेला घट्ट, लवचिक आणि तरुण ठेवणाऱ्या कोलेजन या महत्त्वाच्या प्रथिनाचे हळूहळू नुकसान करते. ही प्रक्रिया एका दिवसात होत नाही, तर अनेक वर्षे सुरू राहते. त्यामुळे सुरुवातीला त्याचे परिणाम जाणवत नाहीत. मात्र, तिशी-चाळिशीनंतर त्वचेची चमक कमी होणे, त्वचा सैल पडणे आणि तिचा नैसर्गिक टवटवीतपणा हरवणे, अशी लक्षणे दिसू लागतात.
मात्र, याचा अर्थ अधूनमधून एखादी मिठाई खाल्ल्याने त्वचेचे नुकसान होते, असा नाही. तज्ज्ञांच्या मते, अनेक वर्षे साखरयुक्त पेये, मैद्याचे पदार्थ आणि प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) अन्न वारंवार खाण्याच्या सवयीमुळे साखरेचे प्रमाण अनियंत्रित होते, जे हळूहळू त्वचेतील कोलेजनवर परिणाम करते. त्यामुळे रोजच्या आहारात छोटे छोटे बदल केल्यास त्वचा अधिक काळ ताजीतवानी आणि टवटवीत ठेवण्यास मदत होऊ शकते.
कोलेजन म्हणजे काय? ते त्वचेसाठी का महत्त्वाचे?
कोलेजन हे आपल्या शरीरात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे प्रथिन (Protein) आहे. ते त्वचेला घट्टपणा, लवचिकता आणि नैसर्गिक चमक देण्याचे काम करते. त्यामुळे त्वचा टवटवीत आणि तरुण दिसते.
जसजसे वय वाढते, तसतसे शरीरात नैसर्गिकरीत्या कोलेजन तयार होण्याचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे हळूहळू त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात आणि त्वचा सैल पडू लागते. मात्र, तज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात साखर खाण्याच्या सवयीमुळे कोलेजन निर्मितीची प्रक्रिया आणखी वेगाने खालावू शकते. तर, शरीरात आधीपासूनच असलेल्या कोलेजनचेही नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतात.
साखरेमुळे कोलेजनचे नुकसान कसे होते?
मुंबईतील द स्किन टॉक क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. पूजा चोप्रा सांगतात की, आपण जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यानंतर शरीर तिचा छोटा भागच ऊर्जा म्हणून वापरते. मात्र, उरलेली साखर शरीरातील प्रथिनांना चिकटून राहते. या प्रक्रियेला ग्लायकेशन (Glycation) असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे एजीईज (Advanced Glycation End Products – AGEs) नावाचे हानिकारक घटक तयार होतात.
या घटकांचा सर्वाधिक परिणाम कोलेजनवर होत असतो. कारण- त्वचेतील कोलेजन विशेषत: नाजूक असते आणि त्याची त्वचेतील पुनर्निमिती हळूहळू होत असते. मानवी त्वचेत कोलेजन तरुणपणीच तयार झालेले असते आणि ते अनेक वर्षे त्वचेत टिकून राहते. त्यामुळे एकदा त्याचे नुकसान झाले की, त्याची कमतरता सहजपणे भरून निघू शकत नाही.
डॉ. चोप्रा यांच्या मते, अति साखरेमुळे कोलेजन लवचिक राहण्याऐवजी कडक आणि ठिसूळ बनते. त्यामुळे त्वचेला आधार देण्याची त्याची क्षमता कमी होते. त्याचबरोबर हे हानिकारक घटक शरीरात सौम्य स्वरूपाची दाहक प्रक्रिया (Inflammation) सुरू करतात, ज्यामुळे चांगल्या कोलेजनचेही नुकसान होते. परिणामी कालांतराने त्वचेचा नैसर्गिक घट्टपणा, लवचिकता व टवटवीतपणा कमी होऊ लागतो.
सुरकुत्या दिसण्याआधी त्वचेची चमक का कमी होते?
अनेकांना वाटते की, वाढत्या वयाची पहिली खूण म्हणजे सुरकुत्या. मात्र, डॉ. पूजा चोप्रा सांगतात की, त्याआधीच त्वचेत बदल सुरू झालेले असतात. विशेषतः तिशीच्या मध्यात अनेकांच्या गाल आणि जबड्याचा भाग पूर्वीसारखा उठावदार दिसत नाही. चेहऱ्यावरील त्वचा थकलेली, निस्तेज आणि सैल झाल्यासारखी वाटू लागते. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्वचेतील कोलेजन कमकुवत होणे होय. कोलेजन कमी झाल्यामुळे त्वचेची स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता हळूहळू कमी होते. त्यामुळे वाढत्या वयाच्या सुरुवातीची लक्षणे सुरकुत्या येण्याआधीच दिसू लागतात.
रोज साखरयुक्त पदार्थ खाण्याचा परिणाम काय?
ठाण्यातील द स्किन क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. वंदिता हेडे यांनी सांगितले की, अनेकांना वाटते की, साखर म्हणजे फक्त मिठाई किंवा गोड पदार्थ. मात्र, हा मोठा गैरसमज आहे. आपल्या रोजच्या आहारातील अनेक पदार्थ नकळतपणे शरीरात मोठ्या प्रमाणात साखर पोहोचवत असतात. गोड चहा किंवा कॉफी, पॅकबंद फळांचे ज्यूस, बिस्किटे, पॅकबंद पदार्थ, पांढरा ब्रेड, पाव आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ शरीरात गेल्यानंतर लवकर साखरेमध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे दिवसभर रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असते.
डॉ. हेडेंनी असेही नमूद केले की, अनेक रुग्ण मिठाई खाणे बंद केल्याचे सांगतात; पण त्याच वेळी ते दिवसातून अनेक वेळा गोड पेये किंवा प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) पदार्थ खात असतात. त्यामुळे साखरेचे प्रमाण कमी झाले, असा त्यांचा समज चुकीचा ठरतो.
मधुमेह असलेल्या लोकांमध्ये परिणाम लवकर का दिसतो?
डॉ. वंदिता हेडे यांच्या मते, ज्यांचा मधुमेह नियंत्रणात नसतो, अशा लोकांमध्ये साखरेमुळे होणारे त्वचेचे नुकसान अधिक स्पष्टपणे दिसून येते. अशा व्यक्तींच्या जखमा भरून येण्यास जास्त वेळ लागतो आणि वाढत्या वयाची लक्षणे अपेक्षेपेक्षा लवकर दिसू लागतात. मधुमेह नसलेल्या व्यक्तींमध्येही ही प्रक्रिया घडते; मात्र ती अनेक वर्षे हळूहळू सुरू राहते.
स्किनकेअर प्रॉडक्ट्स हे नुकसान भरून काढू शकतात का?
त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, स्किनकेअर प्रॉडक्ट्सचीही मर्यादा असते. डॉ. पूजा चोप्रा सांगतात की, रेटिनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्स असलेली उत्पादने त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि पुढील नुकसान कमी करण्यास मदत करतात. मात्र, कोणत्याही कॉस्मेटिक उपचारामुळे साखरेमुळे आधीच खराब झालेल्या कोलेजनची पूर्णपणे भरपाई होऊ शकत नाही.
केवळ फेशियल करून उपयोग होणार नाही
डॉ. हेडे यांच्या मते, महागडे फेशियल किंवा अत्याधुनिक स्किन ट्रीटमेंट्स करूनही चुकीच्या आहाराचे परिणाम लपवता येत नाहीत. त्वचेचे आरोग्य हे एखाद्या दिवसाच्या उपचारांवर नव्हे, तर रोजच्या आहार आणि जीवनशैलीच्या सवयींवर अवलंबून असते.
कोलेजन सुरक्षित ठेवण्यासाठी ७ सोपे उपाय
- साखरयुक्त आणि पॅकबंद पेयांचे प्रमाण कमी करावे
- मैद्याचे आणि जास्त प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) पदार्थ कमी खावे
- दिवसभर सतत काही ना काही खाण्याची सवय टाळावी
- कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांसोबत प्रथिने आणि फायबरयुक्त अन्न खावे
- व्हिटॅमिन ‘सी’युक्त फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा
- दररोज सनस्क्रीनचा वापर करावा. कारण- सूर्याची किरणेही कोलेजनचे नुकसान करतात
- पॅकबंद पदार्थांवरील पोषणमूल्यांचे लेबल वाचावे. त्यात साखर लपलेली असेल, तर त्यांचे सेवन कमी करावे
