Israeli weapon vaporised 2842 Palestinians इस्रायल सातत्याने गाझावर हल्ले करत आहे. पॅलेस्टिनी नागरी संरक्षण आणि आरोग्य अधिकार्यांच्या मते, रविवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी गाझावर झालेल्या इस्रायली हल्ल्यात ११ लोक मारले गेले. पॅलेस्टिनी रेड क्रेसेंटने सांगितले की, उत्तर गाझामधील छावणीवर झालेल्या हल्ल्यात किमान सहा जण ठार झाले; तर दक्षिणेकडील दुसऱ्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) सांगितले की, हमासकडून युद्धविरामाचे उल्लंघन झाल्यामुळे त्यांनी दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले केले आणि इस्रायली सैन्याच्या नियंत्रणाखालील भागातील बोगद्यातून अतिरेकी बाहेर पडल्यानंतर मारले गेले.
१० ऑक्टोबर रोजी युद्धविराम लागू झाल्यापासून इस्रायल आणि हमास या दोघांनीही एकमेकांवर दररोज युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. अल् जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, एका तपासणीत असा दावा करण्यात आला आहे की, २०२३ पासून इस्रायलने प्रतिबंधित उच्च तापमानाचे ‘थर्मोबॅरिक बॉम्ब’ वापरल्यामुळे गाझामधील २,८४२ पॅलेस्टिनी नागरिकांचे मृतदेह सापडले नाहीत. गाझा सिव्हिल डिफेन्स टीम्सनी अल् जझीराला सांगितले की, इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून हे लोक बेपत्ता आहेत आणि त्यांचे अवशेषही सापडलेले नाहीत. काय आहे ‘थर्मोबॅरिक बॉम्ब’? हा बॉम्ब क्षणार्धात माणसाची वाफ कसा करतो? त्यामुळे किती विध्वंस होतो? जाणून घेऊयात…
‘थर्मोबॅरिक बॉम्ब’ काय आहे?
थर्मोबॅरिक किंवा थर्मल बॉम्ब याला ‘व्हॅक्यूम’ किंवा ‘एरोसोल बॉम्ब’, असेही म्हणतात. त्यात इंधन-हवायुक्त स्फोटक गुणधर्म असतात, जे अत्यंत उच्च तापमान आणि दाबाच्या लहरी निर्माण करतात. अल्-जझीराशी बोलताना रशियन लष्करी तज्ज्ञ वासिली फातिगारोव्ह म्हणाले की, हे बॉम्ब केवळ मारत नाहीत, तर त्यामुळे माणसांचे अस्तित्वच मिटवले जाते. हा परिणाम दोन टप्प्यांतील स्फोटामुळे होतो. पहिल्यांदा ही शस्त्रे हवेत इंधनाचा ढग तयार करतात किंवा सूक्ष्म कण वातावरणात पसरतात.
वातावरणातील ऑक्सिजन शोषून घेऊन जमिनीवर या शस्त्रामुळे मोठा स्फोट घडतो आणि तापमान ३,५०० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. यावेळी आजूबाजूची हवा खेचली जाऊन एक प्रकारची पोकळी (व्हॅक्यूम) निर्माण होते. परिणामी काही सेकंदांत मानवी शरीराचे वाफेत रूपांतर होते आणि अखेर शरीराची राख होते. फातिगारोव्ह म्हणाले, “याची क्षमता वाढवण्यासाठी रासायनिक मिश्रणात ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम व टायटॅनियमची पावडर मिसळली जाते.” ही शस्त्रे विस्तीर्ण भागात स्फोटाचा प्रभाव वाढवण्यासाठी तयार केली गेली आहेत. प्राप्त अहवालानुसार, इस्रायलने या बॉम्बचा वापर केल्याने अनेक लोकांचे मृतदेह सापडले नाहीत.
क्षणार्धात माणसाची राख
अल् जझीराने गाझामधील अल-ताबिन शाळेचा एक उदाहरण म्हणून उल्लेख केला आहे. इस्रायली हल्ल्यापूर्वी तेथे उपस्थित असलेल्या लोकांचे मृतदेह कुटुंबांना सापडले नाहीत. गाझा येथील पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक डॉ. मुनीर अल-बर्श म्हणाले, “पाण्याचा उत्कलन बिंदू १०० अंश सेल्सियस असतो. जेव्हा एखादे शरीर ३,००० अंशांपेक्षा जास्त उष्णता, प्रचंड दाब व ऑक्सिडीकरण यांच्या संपर्कात येते, तेव्हा शरीरातील द्रव पदार्थ लगेच उकळू लागतात. ऊतींचे बाष्पीभवन होऊन, त्याची राख होते.”
थर्मोबॅरिक शस्त्रांचा वापर आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांद्वारे नियंत्रित केला जातो. या कायद्यानुसार संघर्ष सुरू असलेल्या देशांनी सामान्य नागरिकांवर हल्ले करणे टाळले पाहिजे. दाट लोकवस्तीच्या शहरी भागात या शस्त्रांच्या वापराबद्दल मानवाधिकार संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रवक्ते महमूद बासल सांगतात, “जर एखाद्या कुटुंबानं आम्हाला सांगितलं की, पाच लोक होते आणि आम्हाला फक्त तीनच मृतदेह सापडले, तर शोधानंतरही काहीही न सापडल्यास आम्ही उर्वरित दोघांच्या शरीराची वाफ झाली, असे गृहीत धरतो. अशा वेळी फक्त जैविक खुणा, भिंतींवरील रक्ताचे थेंब किंवा कातडीसारखे लहान तुकडेच शिल्लक उरतात.”
इस्रायलचा गाझावर आणखी एक हल्ला
गाझाच्या नागरी संरक्षणाने सांगितले की, रविवारी झालेल्या हल्ल्यात ११ लोक मारले गेले आहेत. हमास संचालित गाझा आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, युद्धविराम लागू झाल्यापासून किमान ६०० लोक मारले गेले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, या महिन्याच्या सुरुवातीला गाझामध्ये झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये किमान ३२ लोक मारले गेले. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धविराम कराराच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीची तयारी सुरू असतानाच हे हल्ले झाले आहेत.
गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘बोर्ड ऑफ पीस’ नावाच्या नवीन संस्थेची घोषणा केली. या संस्थेला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून गाझामधील सीमावर्ती भागांची सुरक्षा करण्यासाठी आणि हमासच्या नि:शस्त्रीकरणावर देखरेख ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दल स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्याविषयी अमेरिकेमध्ये १९ फेब्रुवारी रोजी पहिली बैठक होणार आहे. या बोर्डाकडून गाझामध्ये नवीन तंत्रज्ञ पॅलेस्टिनी सरकारची स्थापना आणि युद्धानंतरच्या पुनर्रचनेवर देखरेख ठेवली जाईल. चर्चेपूर्वी ट्रम्प यांनी सांगितले की, बोर्डाच्या सदस्यांनी पॅलेस्टिनी प्रदेशाच्या पुनर्रचनेसाठी पाच अब्ज डॉलर्स देण्याचे आश्वासन दिले आहे.
गेल्या आठवड्यात अशी घोषणा करण्यात आली होती की, ‘बोर्ड ऑफ पीस’चा सदस्य असलेला इंडोनेशिया युद्धविराम कराराचा दुसरा टप्पा सुलभ करण्यासाठी ८,००० सैनिक गाझामध्ये तैनात करील. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी दक्षिण इस्रायलवर हमासच्या नेतृत्वाखाली झालेल्या हल्ल्यामुळे हे युद्ध पेटले होते. त्यामध्ये सुमारे १,२०० लोक मारले गेले आणि २५१ जणांना ओलीस ठेवण्यात आले होते.
इस्रायलने या हल्ल्याला उत्तर म्हणून गाझामध्ये लष्करी मोहीम सुरू केली. या लष्करी मोहिमेत ७१,८२० हून अधिक लोक मारले गेले आहेत, असा दावा गाझातील आरोग्य मंत्रालयाने केला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी इराणचा अणू कार्यक्रम रोखण्याच्या मार्गांवर चर्चा केली.

