सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या वार्षिक मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय तेथील संसदेने घेतला. याशिवाय उपपंतप्रधान आणि मंत्र्यांच्या मानधनातही जवळपास ६० टक्क्यांनी वाढ केली जाणार असल्याचे संसदेने मंगळवारी सांगितले. येत्या १५ ऑक्टोबरपासून ही वाढ लागू करण्यात येणार असल्याचे समजते. या निर्णयामुळे सिंगापूरचे पंतप्रधान हे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या नेत्यांच्या यादीत शीर्षस्थानी पोहोचणार असल्याचे सांगितले जाते. यानिमित्ताने जगातील प्रमुख देशांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना नेमके किती मानधन मिळते? या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान कितव्या स्थानी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे, त्याविषयी…

सिंगापूरच्या पंतप्रधानांना किती मानधन?

सिंगापूर सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांचे वार्षिक मानधन २२ लाख डॉलवरून ३६ लाख सिंगापूर डॉलर इतके होणार आहे. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे २७ कोटी १० लाख इतकी आहे. सिंगापूरच्या संसदेने आपल्या राजकीय नेत्यांना दिल्या जाणाऱ्या उच्च मानधनाचे समर्थन केले आहे. सक्षम आणि गुणवंत व्यक्तींना सार्वजनिक सेवेकडे आकर्षित करणे तसेच देशातील सुशासन कायम राखण्यासाठी उच्च मानधन मिळणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी या सरकारने केलेल्या या वेतनवाढीचा आपण वैयक्तिक लाभ घेणार नसल्याचे पंतप्रधान वोंग यांनी सांगितले. पंतप्रधानपदी कायम राहिल्यास वाढीव रक्कम पुढील पाच वर्षे योग्य सामाजिक आणि सेवाभावी कार्यांसाठी दान केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या मानधनवाढीनंतर पंतप्रधान वोंग हे जगातील सर्वाधिक मानधन घेणारे राजकीय नेते ठरणार असल्याचे रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे.

हाँगकाँगच्या नेत्यांना किती मिळते मानधन?

हाँगकाँगचे मुख्य प्रशासकीय अधिकारी जॉन ली हे आजही जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये गणले जातात. मात्र, सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वँग यांच्या सुधारित वेतनाच्या तुलनेत त्यांचे मानधन बरेच कमी आहे. जॉन ली यांचे वार्षिक वेतन सुमारे ७ लाख १९ हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनातील अंदाजे ६ कोटी ८४ लाख रुपये इतके आहे. विशेष बाब म्हणजे- हाँगकाँग हा सार्वभौम देश नसून चीनचा विशेष प्रशासकीय प्रदेश आहे, त्यामुळे ही तुलना इतर देशांच्या तुलनेत थोडी वेगळी ठरते. मात्र तरीही राजकीय नेत्यांच्या जागतिक मानधनाची तुलना करताना हाँगकाँगच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो.

स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षांना किती मानधन?

स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष निवडण्याची कार्यपद्धती अमेरिका किंवा इतर देशांपेक्षा पूर्णत: वेगळी आहे. तेथील फेडरल कौन्सिलच्या सात सदस्यांमधून एक वर्षाच्या कालावधीसाठी राष्ट्राध्यक्षांची निवड केली जाते. सध्या या पदावर गाय पार्मेलिन हे विराजमान असून त्यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२६ मध्ये संपण्याची शक्यता आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पार्मेलिन यांना वर्षाला सुमारे ६.०६ लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सुमारे पाच कोटी ५६ लाख रुपये मानधन मिळते. याबाबतीत ते हाँगकाँगच्या प्रमुखांच्या मागे असले, तरी जगातील इतर बहुतांश देशांच्या नेत्यांच्या तुलनेत त्यांचे मानधन बरेच जास्त आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना किती मानधन मिळते?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वार्षिक चार लाख अमेरिकन डॉलर्स इतके वार्षिक मानधन मिळते. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे तीन कोटी ३० लाख डॉलर इतकी आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांचे हे मानधन १९९९ सालापासून कायम आहे. याहू फायनान्सच्या अहवालानुसार, या मानधनाव्यतिरिक्त डोनाल्ड ट्रम्प यांना खर्चासाठी ५०,००० डॉलर्सचे विशेष खाते, तसेच प्रवास आणि मनोरंजनासाठी स्वतंत्र भत्ते मिळतात. मात्र, गेल्या दोन दशकांत त्यांच्या मूळ वेतनात कोणताही बदल झालेला नाही. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वँग यांचे नवे मानधन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या वेतनाच्या जवळपास सात पट अधिक असल्याचे समजते.

चीनच्या अध्यक्षांना किती मानधन मिळते?

बीबीसीच्या वृत्तानुसार, २०१५ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मानधनात तब्बल ६२ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे मासिक वेतन ७,०२० युआनवरून ११,३८५ युआन करण्यात आले. यानंतर त्यांचे वार्षिक मानधन सुमारे २२ हजार अमेरिकन डॉलर्स इतके झाले होते. ही वाढ कम्युनिस्ट पक्षाच्या इतर सहा वरिष्ठ नेत्यांसह देशभरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही लागू झाली होती. २००६ नंतर चीनमध्ये झालेली ही पहिलीच मानधनवाढ होती. त्यावेळी चिनी सरकारने भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला गती देणे आणि प्रशासकीय उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला होता.

ब्रिटनच्या पंतप्रधानांना किती मानधन मिळते?

ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांचे वार्षिक मानधन सुमारे दोन लाख ३० हजार अमेरिकन डॉलर्स इतके आहे. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे एक कोटी ९० लाख रुपये इतकी आहे. या तुलनेत ब्रिटीश पंतप्रधानांचे मानधन सिंगापूरच्या पंतप्रधानांपेक्षा बरेच कमी असून, हाँगकाँग आणि स्वित्झर्लंडच्या प्रमुखांच्या वेतनाच्या तुलनेतही ते लक्षणीयरीत्या मागे असल्याचे दिसून येते.

पंतप्रधान मोदींना किती मानधन मिळते?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरमहा सुमारे एक लाख ६६ हजार रुपये म्हणजेच वर्षाला अंदाजे २० लाख रुपये मानधन मिळते. त्यामध्ये ५०,००० रुपये मूळ वेतन, ३,००० रुपये सरकारी भत्ता, ४५,००० रुपये संसदीय भत्ता आणि दररोज २,००० रुपये दैनिक भत्ता यांचा समावेश असतो. याशिवाय निवृत्तीनंतर पेन्शन, मोफत निवासस्थान, प्रवास सुविधा, सुरक्षा आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची टीम सरकारकडून पुरवली जाते. तसेच भारतीय पंतप्रधानांना नवी दिल्लीतील ७, लोक कल्याण मार्ग येथे अधिकृत निवासस्थान तसेच सुरक्षा व्यवस्थेसह इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. सिंगापूरच्या पंतप्रधानांना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत भारतीय पंतप्रधानांचे मानधन अत्यंत कमी असल्याचे दिसून येते.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांना किती मानधन?

एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे मासिक मानधन वाढून सुमारे पाच लाख ५० हजार पाकिस्तानी रुपये करण्यात आले आहे. या वृत्तात पंतप्रधानांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये अधिकृत निवासस्थान, वाहने, सुरक्षा व्यवस्था तसेच पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाशी संबंधित खर्चाचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्रस सध्या पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटातून जात असल्याने पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आपले वेतन व भत्ते न घेण्याचा (त्याग करण्याचा) निर्णय घेतला आहे.