Himalayan disaster: सध्या नेपाळमध्ये घडणाऱ्या घडामोडी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतात : हिमालयात आपत्ती ओढवल्यानंतर मदतीसाठी धावण्यापेक्षा, त्या संकटाची आधीच चाहूल घेऊन सज्ज राहण्याची तातडीची गरज आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ॲबरडीनच्या ‘स्कूल ऑफ जिओसायन्सेस’मधील प्लॅनेटरी सायन्सेस विभागाचे प्रमुख व पदव्युत्तर अभ्यासक्रम संचालक अंशुमन भारद्वाज यांनी हे (वरील) मत स्पष्टपणे मांडलं आहे.

वाढत्या तापमानामुळे हिमालयातील बर्फ आणि खडक निखळण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं असून, पूर्वतयारी अधिक निकडीची ठरत आहे. मार्च महिन्यात ‘नेचर सस्टेनेबिलिटी’ या नामांकित नियतकालिकात भारद्वाज आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ‘रॉक-आइस ॲव्हलाँचेस इन अ वॉर्मिंग हिमालया इंडिकेट पाथवेज टुवर्ड इफेक्टिव्ह प्रीपेअर्डनेस’ (Rock-ice avalanches in a warming Himalaya indicate pathways toward effective preparedness) हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला होता. या अभ्यासात त्यांनी पूर्वतयारीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दोन मोठ्या घटनांची तुलना केली.

२०२१ मध्ये जेव्हा उत्तर भारतातील चमोली (भारत) येथील ऋषिगंगा खोऱ्यात बर्फ आणि खडकाची मोठी भिंत कोसळली, तेव्हा जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाले, पूल वाहून गेले आणि २०० हून अधिक निष्पाप लोकांचा बळी गेला. त्याउलट चार वर्षांनंतर जेव्हा स्वित्झर्लंडमधील ब्लॅटन गावात असाच महाकाय बर्फ-खडक कडा कोसळून संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गेलं, तेव्हा उत्तम पूर्वतयारीमुळे केवळ एकाच व्यक्तीचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर अनिल ससी यांनी घेतलेल्या मुलाखतीतील हा अंश महत्त्वाचा ठरतो:

नेपाळच्या दुर्घटनेविषयी…

नेपाळ-तिबेट सीमेवरील या घटनेचा नेमका क्रम आणि कारण सखोल तपासणीनंतरच स्पष्ट होईल. मात्र, विविध माध्यमांतून समोर आलेल्या माहितीनुसार, ही बर्फ आणि खडक एकत्र कोसळल्यामुळे घडलेली मोठी दुर्घटना आहे यात शंका नाही. अनेक वैज्ञानिक गट सध्या याबाबत अभ्यास करीत आहेत.

पहिली बाब म्हणजे, आपण अशा घटनांकडे एक स्वतंत्र आपत्ती म्हणून न पाहता, एकामागोमाग एक कोसळणाऱ्या ‘आपत्तींची साखळी’ (कॅस्केडिंग हॅझार्ड्स) म्हणून पाहिलं पाहिजे. डोंगरमाथ्यावरून बर्फ आणि खडक प्रचंड वेगानं कोसळतात, तेव्हा ते वाटेतील पाणी, माती आणि मोठमोठे खडक  सोबत ओढून नेतात आणि बघता बघता त्याचं रूपांतर  अत्यंत विध्वंसक अशा महापुरात होतं.  त्याचे भीषण परिणाम कित्येक किलोमीटर दूरपर्यंतच्या भागात जाणवतात.

त्यामुळे धोका केवळ तो कडा कोसळण्यापुरता नसून, संपूर्ण खोऱ्याला आणि नदीकाठच्या वस्त्यांना असतो. हिमनदीच्या खोऱ्यांमध्ये जिथे रस्ते, गावं आणि जलविद्युत प्रकल्प थेट या प्रवाहमार्गात येतात, तिथे भविष्यातील नियोजन करताना हा धोका गांभीर्याने लक्षात घेतला पाहिजे. ‘यूके रिसर्च अँड इनोव्हेशन’ आणि भारताच्या ‘पृथ्वी विज्ञान मंत्रालया’च्या संयुक्त निधीतून मी हिमालयातील अशा साखळीबद्ध संकटांवर संशोधन करीत असून, अशा धोकादायक परिसराचे पद्धतशीर नकाशे, निरीक्षण आणि प्रारूपे तयार करण्यासाठी आणखी मोठ्या उपक्रमांची गरज आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आगाऊ देखरेख आणि पूर्वतयारी. उपग्रहांद्वारे मिळणारा अनेक वर्षांचा डेटा अस्थिर डोंगरउतारांवरील सूक्ष्म हालचाली आणि बदल टिपण्यास मदत करतो. उपग्रह दरड कोसळण्याची अचूक वेळ सांगू शकत नाहीत; मात्र ते अतिसंवेदनशील ठिकाणांची वेळेवर ओळख पटवून देऊ शकतात, जेणेकरून तिथे बारकाईने लक्ष ठेवता येईल. २०२१ च्या चमोली घटनेच्या आमच्या विश्लेषणाने ही पद्धत किती उपयुक्त ठरू शकते हे सिद्ध केलं आहे. मात्र, केवळ निरीक्षण करून उपयोग नाही; ते तत्काळ कृतीशी जोडलेलं असावं. चमोली आणि स्वित्झर्लंडमधील ब्लॅटनच्या तुलनेतून मिळालेला सर्वांत मोठा धडा हाच आहे : उपग्रहांची नजर आणि जमिनीवरील यंत्रणांसोबतच धोक्याची स्पष्ट पातळी ठरलेली असावी, वैज्ञानिकांनी वेगाने निष्कर्ष काढावेत, निर्णय घेणाऱ्यांची जबाबदारी निश्चित असावी, संपर्काची खात्रीशीर व्यवस्था असावी आणि लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची योजना आधीच ठरलेली असावी.

संपूर्ण हिमालय पर्वतरांगेवर एकाच वेळी २४ तास प्रत्यक्ष नजर ठेवणं कोणालाही शक्य नाही. म्हणूनच टप्प्याटप्प्याने काम करणं गरजेचं आहे. आधी उपग्रहांद्वारे संशयित भाग शोधणं, संवेदनशील ठिकाणं निश्चित करणं, तिथे जमिनीवर यंत्रणा बसवून देखरेख करणं आणि संकट येण्याआधीच धोक्याचा इशारा देणं.

सीमापार आपत्तींविषयी

हा आंतरराष्ट्रीय सीमांपलीकडील जोखीम व्यवस्थापनाचाही विषय आहे. निसर्गातील बर्फ आणि पाण्याचे धोके देशांच्या राजकीय सीमा मानत नाहीत; पर्वताच्या वरच्या भागात एका देशात घडलेली घटना काही क्षणांत खालच्या दुसऱ्या देशात महाप्रलय आणू शकते. नेपाळ-तिबेटची घटना ही नदीखोऱ्यातील देशांनी वेळेवर डेटा सामायिक करणं, सगळ्यांनी मिळून आपापल्या परीनं निरीक्षणं नोंदवणं आणि आणीबाणीच्या काळात वेगवान संपर्क यंत्रणा उभारणं किती गरजेचं आहे, याची जाणीव करून देते.

तातडीनं मदतकार्य करताना घटनेच्या मूळ कारणाबद्दल घाईघाईनं चुकीचा निष्कर्ष काढणं टाळलं पाहिजे. पुढील धोका टाळण्यासाठी प्राथमिक अंदाज हवाच;  पण नेमकी प्रक्रिया समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. आमच्या धराली घटनेवरील अभ्यासात हेच स्पष्ट झालं. वरवर पाहता, सारख्या दिसणाऱ्या दोन घटनांची मूळ कारणं पूर्णपणे वेगळी असू शकतात, ज्यामुळे त्यांच्या धोक्याचं मूल्यांकन आणि निवारणाचे उपायही बदलतात.

आपत्तीनंतर धावण्याऐवजी आधीच सज्ज राहण्याकडे

जर संकटाच्या कारणांचं चुकीचं निदान झालं, तर वैज्ञानिक तपास आणि सरकारी उपाययोजना भरकटतात. नेपाळच्या प्रलयानं हेच वास्तव पुन्हा समोर आणलं आहे : आपत्तीनंतरच्या मदतीपेक्षा आपत्तीपूर्व सतर्कतेकडे आपल्याला तातडीने पाऊलं उचलावी लागतील. वाढत्या उष्णतेमुळे बर्फ आणि खडक ढासळण्याचा वेग वाढला असून, खबरदारी घेणं अपरिहार्य बनलं आहे. प्रत्येक घटनेची अचूक भविष्यवाणी करणं हा मूळ हेतू नाही; तर ज्या धोक्यांचा अंदाज आधीच बांधता येतो, त्या आपत्तीनमुळे निष्पाप माणसांचे बळी जाऊ नयेत, एवढी दक्षता घेणं हाच आमचा मूळ उद्देश आहे.