Hindu Kush Himalaya Snow Cover Decline Report 2026 : आशियाचा ‘वॉटर टॉवर’ (पाण्याची टाकी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदूकुश हिमालय प्रदेशातील बर्फाचे आच्छादन वेगाने कमी होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रदेशातील बर्फ टिकून राहण्याचे प्रमाण गेल्या दोन दशकांतील निचांकी पातळीवर घसरल्याचे एका ताज्या अहवालातून समोर आले आहे. अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत पसरलेल्या या पर्वतरांगेत सलग चौथ्या वर्षी हिमाच्छादनात मोठी घट झाली आहे. या घडामोडींमुळे भारत, पाकिस्तानसह ८ देशांतील २०० कोटी लोकांवर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे, त्याविषयीचा हा आढावा…
बर्फाचे प्रमाण नीचांकी स्तरावर
हिंदूकुश हिमालय प्रदेशातील बर्फाचे आच्छादन सरासरीपेक्षा २७.८ टक्क्यांनी कमी झाल्याचे इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंटच्या (आयसीआयएमओडी) ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सलग चौथ्या वर्षी या प्रदेशातील ‘स्नो पर्सिस्टन्स’ (जमिनीवर बर्फ टिकून राहण्याचा कालावधी) सामान्य पातळीपेक्षा कमी राहिल्याचे अहवालातून समोर आले आहे. आयसीआयएमओडीच्या शास्त्रज्ञांच्या मते, गेल्या २४ वर्षांतील हा सर्वात नीचांकी स्तर आहे. हिवाळ्यातील बर्फ हा निसर्गाचा ‘वॉटर बँक’ असतो; पण आता तो जमिनीवर पुरेसा काळ टिकत नसल्याने ही चिंतेची बाब आहे. काठमांडूस्थित या संशोधन संस्थेने हिमालयातून उगम पावणाऱ्या १२ प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांचा अभ्यास केला आहे, त्यामध्ये केवळ गंगा (१६.३ टक्के) आणि इरावती (२१.८ टक्के) या दोनच नद्यांच्या खोऱ्यात सरासरीपेक्षा जास्त बर्फ टिकून राहिल्याचे दिसून आले आहे.
पाणी टंचाईचे संकट गडद
मेकाँग खोऱ्यात सर्वाधिक ५९.५ टक्के बर्फ कमी झाला आहे. त्यापाठोपाठ तिबेटचे पठार (४७.४ टक्के) आणि साल्विन खोऱ्याचा (४१.८ टक्के) क्रमांक लागतो. त्याशिवाय सिंधू नदी आणि हेलमंड नदीच्या खोऱ्यात बर्फाच्या आच्छादनात सुमारे १८ टक्के इतकी घट नोंदवण्यात आली आहे. हिंदूकुश हिमालय हा ३,५०० किमी क्षेत्रात अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, भारत, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तान या आठ देशांमध्ये पसरलेला आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवानंतर पृथ्वीवर सर्वाधिक बर्फ येथेच असल्याने याला ‘तिसरा ध्रुव’ म्हटले जाते. या प्रदेशात ६०,००० हून अधिक हिमनद्या आहेत. हवामान बदलामुळे हिवाळ्यातील बर्फ वेगाने वितळत आहे. वास्तविक हा बर्फ उन्हाळ्यात हळूहळू वितळणे आवश्यक असते, जेणेकरून दक्षिण आणि मध्य आशियातील शेती, जलविद्युत प्रकल्प आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहू शकेल. बर्फाचे प्रमाण घटल्याने आगामी काळात भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नद्यांच्या खोऱ्यांची स्थिती
२००० सालापासून या प्रदेशातील बर्फ वितळण्याचा वेग दुप्पट झाला असल्याचे यापूर्वीच्या अहवालात नमूद करण्यात आले होते, त्यामुळे आतापासूनच पाणी व्यवस्थापन आणि दुष्काळ निवारण सज्जतेसाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. हिंदूकुश हिमालय प्रदेशातील बर्फाचे प्रमाण आणि तो टिकून राहण्याचा कालावधी कमी झाल्यामुळे आशिया खंडातील १० मोठ्या नद्यांच्या खोऱ्यात भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अहवालानुसार, या प्रदेशातून उगम पावणाऱ्या दहा प्रमुख नदीप्रणाली जवळपास दोन अब्ज लोकांच्या जीवनाला आधार देतात. या नद्यांच्या खालच्या प्रवाहातील भागात राहणाऱ्यांसाठी हिमाच्छादनात घट झाल्यास उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाण्याची उपलब्धता कमी होऊ शकते. बर्फ वितळण्याचे प्रमाण कमी झाल्यास सुरुवातीच्या काळात नदीप्रवाहात घट होते. याचा परिणाम पाणीपुरवठा, शेती, जलविद्युत निर्मिती आणि संबंधित उपजीविकांवर होऊ शकतो.
आशियात दुष्काळाची घंटा?
सरासरी पाहता, या प्रमुख नद्यांना मिळणाऱ्या पाण्यापैकी सुमारे २३ टक्के पाणी बर्फ वितळल्यामुळे मिळते. विशेषतः पश्चिमेकडील नदीखोऱ्यांमध्ये ७० ते ८० टक्के पाणी हिवाळ्यातील बर्फ वितळल्यामुळेच येते. सिंधू नदीच्या प्रवाहात जवळपास ४० टक्के वाटा बर्फ वितळण्याचा आहे. बर्फ वितळून नद्यांना मिळणारे पाणी कमी होत असल्याने भारत, पाकिस्तानसह आठ देशांतील २०० कोटी लोकांवर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच मान्सून उशिरा आल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अहवालानुसार, सलग अनेक वर्षे बर्फाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे जमिनीतील ओलावा आणि भूजल साठा पुनरुज्जीवित होऊ शकलेला नाही. आता येणारा प्रत्येक कोरडा काळ हा पूर्वीपेक्षा अधिक तीव्र आणि भयानक असेल. जर पावसाळा (मान्सून) उशिरा आला किंवा कमी झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. केवळ आपत्ती आल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा ‘विज्ञान-आधारित प्रशासन’ आणि ‘प्रादेशिक सहकार्य’ काळाची गरज झाली आहे.
दुष्काळाची तीव्रता वाढणार?
वसंत ऋतू आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला हवामान कसे राहते, यावर पाणीटंचाईची तीव्रता अवलंबून असणार आहे. प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे नियोजन आणि दुष्काळ निवारण सज्जतेसाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हिमालयातील हा बदल केवळ निसर्गाचा इशारा नसून मानवी अस्तित्वासाठी धोक्याची घंटा आहे, असा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. वसंत आणि सुरुवातीच्या उन्हाळ्यातील परिस्थिती- जसे तापमानवाढ, कोरडे कालखंड, पर्जन्यमान आणि अतिरेकी हवामान घटनांची तीव्रता यावर या प्रदेशातील बर्फ टिकून राहण्याचे प्रमाण अवलंबून असेल. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलसंपत्ती व्यवस्थापनात तातडीने सुधारणा करण्याचे आवाहन अहवालात करण्यात आले आहे.
