Hindu Minister In Bangladesh PM Tarique Rahman’s Cabinet: बांगलादेश नॅशलनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधीमुळे ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या अंतरिम सरकारचा १८ महिन्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळात निताई रॉय चौधरी या एकमेव हिंदू खासदाराचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर दीपेन देवान या अल्पसंख्याक समुदायातील नेत्यालाही मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यापार्श्वभूमीवर रहमान यांच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे हिंदू खासदार कोण? अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगली आहे. त्याविषयीचा हा आढावा…

बांगलादेशातील सर्वात मोठा पक्ष कोणता?

बांगलादेशमध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथून लावण्यात आले होते. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारने देशाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. या राजकीय उलाढालीनंतर देशात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अभूतपूर्व अशा बंदोबस्तात पार पडलेल्या या निवडणुकीत ‘बीएनपी’ मोठ्या बहुमताने निवडून आली आहे. निवडणूक निकालांनुसार २९९ जागांपैकी बीएनपीला २०० हून जागांवर यश मिळाले; तर ‘जमात-ए-इस्लामी’ या धर्मवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला केवळ ७० जागांवरच समाधान मानावे लागले. त्याशिवाय इतर १० जागा छोटेखानी पक्षांनी आपल्या पदरात पाडून घेतल्या. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग पक्षावर यंदाची निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर बांगलादेशमध्ये बीएनपीचे सरकार स्थापन झाले आहे.

रहमान यांच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान?

पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात २५ मंत्र्यांसह २४ राज्यमंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामध्ये बीएनपीचे उपाध्यक्ष निताई रॉय चौधरी (हिंदू) आणि दीपेन देवान (बौद्ध) या दोन अल्पसंख्याक समुदायांतील खासदारांचाही समावेश आहे. या मंत्रिमंडळात मिरझा फखरुल इस्लाम आलमगीर, सलाहुद्दीन अहमद, अमीर खसरू महमुद चौधरी, इक्बाल हसन महमुद तुकू आणि मेजर (निवृत्त) हाफिज उद्दिन अहमद यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची वर्णी लागली आहे. त्याशिवाय डॉ. जाहिद हुसेन, डॉ. खलिउर रहमान, अब्दुल अवल मिंटू, मोफज्जल हुसेन कैकोबाद, मिझानुर रहमान मिनू यांच्यासह फकीर महबूब इनाम आणि शेख रबिउल आलम यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.

आणखी वाचा : अरुणाचल प्रदेशाजवळ चीनचा अण्वस्त्र कार्यक्रम विस्तार; भारतासाठी किती मोठा धोका?

बांगलादेशचे नवीन राज्यमंत्री कोण?

तारिक रहमान यांनी कॅबिनेट मंत्र्यांबरोबर २४ राज्यमंत्र्यांचीही नियुक्ती केली आहे. त्यामध्ये एम. रशिदुझमान मिल्लत, अनिंद्य इस्लाम अमित, मो. शरीफुल आलम, शमा ओबेद इस्लाम, सुलतान सलाहुद्दीन तुकू, बॅरिस्टर कैसर कमाल, फरहाद हुसेन आझाद, अमीनुल हक, मीर मोहम्मद हलाल उद्दिन, हबीबुर रशीद, राजिब अहसान, अब्दुल बारी, मीर शाहे आलम, जुनैद साकी, इशराक हुसेन, फरझाना शर्मिन, शेख फरिदुल इस्लाम, मो. नुरुल हक नूर, यासेर खान चौधरी, एम. इक्बाल हुसेन, एम. ए. मुहित, अहमद सोहेल मंजूर, बॉबी हज्जज आणि अली नेवाज महमुद खयम यांचा समावेश आहे.

कोण आहेत निताई रॉय चौधरी?

पंतप्रधान तारिक रहमान यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे निताई रॉय चौधरी हे एक अनुभवी राजकारणी आणि वकील आहेत. त्यांच्याकडे बांगलादेश नॅशनल पार्टीच्या उपाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. या निवडणुकीत बीएनपीच्या तिकीटावर निवडून आलेले गयेश्वर चंद्र रॉय आणि निताई रॉय चौधरी हे दोनच हिंदू उमेदवार आहेत. बीएनपीचे ज्येष्ठ नेते गयेश्वर चंद्र रॉय यांनी ढाका मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी ‘जमात-ए-इस्लामी पार्टीचे उमेदवार मोहम्मद शाहीनूर इस्लाम यांचा पराभव केला. गयेश्वर चंद्र रॉय यांचे नातेवाईक असलेले निताई रॉय चौधरी हे बीएनपीमधील अल्पसंख्याकांचे एक प्रभावशाली नेते मानले जातात. त्यांनी मागुरा-२ या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जमात-ए-इस्लामीच्या उमेदवाराचा पराभव करून ते खासदार म्हणून निवडून आले. निवडणुकीत चौधरी यांना १,४७,८९६ मते मिळाली; तर मुस्तारशिद बिल्लाह यांना १,१७,०१८ मतांवरच समाधान मानावे लागले.

चौधरी यांच्याकडे कोणती जबाबदारी?

नवीन मंत्रिमंडळात चौधरी यांना कोणते खाते मिळणार हे अद्याप निश्चित नसले तरीही त्यांच्याकडे सांस्कृतिक व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. याआधी त्यांनी १९९० मध्ये हुसैन मोहम्मद इर्शाद यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये युवक व क्रीडा मंत्री म्हणून काम पाहिले होते. याशिवाय शिक्षण आणि कायदा विभागात राज्यमंत्रीपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळलेली आहे. ७ जानेवारी १९४९ रोजी मागुरा जिल्ह्यातील हातबारिया गावात जन्मलेले निताई रॉय चौधरी यांनी ढाका विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांच्या कन्या निपुण रॉय चौधरी यादेखील बीएनपीच्या एक प्रमुख नेत्या असून त्यांनीही वकिलीचे शिक्षण घेतले आहे. देशात अल्पसंख्याक समुदायावरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर निताई रॉय चौधरी यांना मंत्रिपद मिळाल्याने तेथील हिंदू मतदार समाधान व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाचा ईडीला दणका; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयाला स्थिगिती, कारण काय?

दीपेन देवान कोण आहेत?

अनुसूचित जाती समुदायाचे प्रतिनिधीत्व करणारे दीपेन देवान यांनाही नवीन मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. देवान यांनी रांगमती लोकसभा मतदारसंघातून बीएनपीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात एका अपक्ष अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला होता. या निवडणुकीत देवान यांना ३१ हजार २२२ मते मिळाली; तर अपक्ष उमेदवार पहेल चकमा यांना केवळ २१ हजार ५४४ मतांवरच समाधान मानावे लागले आहे. दीपेन यांची राजकीय कारकीर्द प्रामुख्याने बीएनपीशी जोडलेली आहे. त्यांचे वडील सुबिमल देवान हे माजी पंतप्रधान जियाउर रहमान यांचे सल्लागार होते. दीपेन व्यवसायाने वकील असून त्यांनी ढाका विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. यादरम्यान निताई रॉय चौधरी आणि दीपेन देवान यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर बांगलादेशमधील अल्पसंख्याक समुदायावरील हल्ले थांबणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.