आज आपण ज्याला हिंदू मंदिर म्हणतो, ते पाच हजार वर्षांपेक्षा जुनं नाही. प्राचीन काळात लोक देवतांची पूजा बंदिस्त देवालयांमध्ये किंवा कोरलेल्या मूर्तींसमोर करत नसतं. त्याऐवजी दैवी अनुभव थेट निसर्गातच घेतला जात होता. वृक्ष, प्राणी, नद्या, पर्वत आणि शिळा यांना पवित्र मानलं जात होतं.
निसर्गपूजेपासून प्रतिमापूजेपर्यंत
सुमारे १,८०० वर्षांपूर्वी, म्हणजे इ.स. २०० च्या आसपास, मथुरेतील वालुकाश्म दगडावर कोरलेल्या शिल्पांमध्ये हिंदू देवतांची स्पष्ट रूपं दिसू लागली. येथे आपल्याला शिवलिंग दिसतात, त्यांपैकी काहींवर चेहरे कोरलेले (मुखलिंग) आढळतात. तसेच विष्णू, कृष्ण आणि बलराम यांच्या प्रतिमाही दिसतात. मात्र, ही शिल्पं आज आपल्याला माहीत असलेल्या मंदिरांत ठेवलेली नव्हती. त्याऐवजी पवित्र वनक्षेत्रांमध्ये, बहुतांश वेळा नद्यांच्या काठी, मोकळ्या जागेत त्यांची प्रतिष्ठापना केली जात होती आणि नंतर पूजादेखील केली जात असे. यातूनच आपल्याला निसर्गपूजेपासून ते प्रतिमापूजेपर्यंत क्रमाक्रमाने झालेला बदल दिसून येतो.
पुढील टप्पा म्हणजे या प्रतिमा वास्तूरचनांच्या आत बंदिस्त करण्यात आल्या. उत्तर प्रदेशातील भीतरगाव येथे सुमारे इ.स. ५०० च्या आसपास बांधलेलं एक विटांचं मंदिर आढळतं, या मंदिरात देवप्रतिमा गर्भगृहात ठेवण्यात आल्या. मध्य प्रदेशातील नाचना येथे शिवमंदिर उभारलं गेलं, त्यामध्ये हिमालयाच्या परिसंस्थेची प्रतिकृती निर्माण करण्यात आल्याचा प्रयत्न दिसतो. छपराला पर्वताचा आकार देण्यात आला होता आणि प्रवेशद्वारावर गंगा व यमुना नद्यांच्या देवतांच्या रूपात कोरीव प्रतिमाही साकारल्या गेल्या.
झाशी जवळील देवगड येथे आपल्याला संपूर्ण दगडातून बांधलेलं सर्वात प्राचीन विष्णू मंदिर आढळतं. या मंदिरात विष्णूची शेषशायी (अनंतनागावर विसावलेली) प्रतिमा, चार भुजांसह गरुडावर आरूढ विष्णूची मूर्ती, तसेच राम आणि कृष्ण यांच्या जीवनातील प्रसंग दर्शवणारे शिल्पपट आढळतात. याच काळापासून शास्त्रीय मंदिर स्थापत्यकलेची सुरुवात होते.
खडकात कोरलेली आणि स्वतंत्र उभी केलेली मंदिरं
या पुढे इ.स. ६०० नंतर भव्य खडकात कोरलेल्या मंदिरांचा काळ सुरू झाला. येथे कलेने खरोखरच विराट रूप धारण केलं. वेरूळ (एलोरा) आणि घारापुरी (एलिफंटा) येथील गुंफा, कर्नाटकातील पट्टडक्कलची मंदिरं, तसेच चेन्नईजवळील मामल्लपुरममधील शोर मंदिरावरील खडकात कोरलेली शिल्पं, या सर्व ठिकाणी शिव आणि विष्णू यांच्या भव्य प्रतिमा दिसतात. ही केवळ उपासनेसाठीची ठिकाणं नव्हती, तर राजसत्तेच्या सामर्थ्याची ती घोषणाही होती. डोंगर आणि कड्यांमध्ये थेट कोरीवकाम करून जणू राजेच पृथ्वीचं रूप घडवू शकतात, हे दाखवून देणारी ही घोषणा होती.
आठव्या शतकापर्यंत आपण आणखी भव्य उपक्रम पाहतो.
वेरूळ येथे कैलासनाथ मंदिर एका अखंड खडकात कोरून उभारलं गेलं, शिवालयासाठी मोठ्या खडकाला पर्वतासारख्या राजवाड्याचा आकार देण्यात आला. याच काळात स्वतंत्र उभी केलेली मंदिरंही प्रचलित झाली. ही खडकातून कोरलेली नसून दगडावर दगड रचून बांधलेली होती. अशा मंदिरांची उदाहरणं कर्नाटकातील हम्पी आणि पट्टडक्कल येथे दिसतात, तसेच कांचीपुरममध्येही आढळतात. कांचीपुरममध्ये प्रसिद्ध कैलासनाथ मंदिर उभं आहे. स्वतंत्र उभी केलेली मंदिरं ही प्रयोगात्मक स्वरूपातून स्थिर आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वास्तुशैलींकडे झालेल्या बदलाची खूण आहे.
दहाव्या शतकापर्यंत मंदिर स्थापत्यकलेत अभूतपूर्व गुंतागुंत दिसू लागली. उत्तर भारतात वक्ररेषीय नागर शैली, तर दक्षिणेत पिरॅमिडाकार विमान शैली विकसित झाली. मंदिरे तांत्रिक मंडलांच्या आधारावर बांधली जाऊ लागली. ती केवळ देवतांची निवासस्थाने नसून धार्मिक विधींच्या सामर्थ्याची केंद्रेही ठरली. या मंदिरांच्या गर्भगृहात पुजारी तांत्रिक विधी पार पाडत, त्यासाठी संपत्ती, रक्षण आणि सौभाग्य मिळवले जाई.
ही प्राचीन मंदिरे आज आपण पाहतो त्या भक्तीमय देवालयांपेक्षा खूप वेगळी होती. ती जणू एका विधी प्रयोगशाळेसारखी होती, तिथे भूमिती, कला आणि मंत्र यांचा संगम होऊन विश्वऊर्जेची केंद्रं निर्माण केली जात. नंतर, भक्ती आंदोलनाच्या उदयानंतर मंदिरांचं पुन्हा एकदा रूप पालटलं. गुप्त तांत्रिक विधींवरून मंदिरांचा कल लोकसहभागाकडे वळला. लोकांना गाणं, नृत्य करणं आणि सक्रियपणे पूजा-अर्चेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं जाऊ लागलं. याच काळात पुरीचं जगन्नाथ मंदिर आणि तामिळनाडूमधील श्रीरंगम यांसारखी महान वैष्णव मंदिरे लोकप्रिय झाली. येथे मंदिर म्हणजे लोकांचं देवघर ठरलं होतं. लोकप्रिय समजुतीच्या विपरीत, इ.स. ११ व्या शतकात महमूद गझनीने सोमनाथ मंदिरावर हल्ला केल्यानंतर लगेचच अनेक मंदिरे भारतात बांधली गेली.
उदाहरणार्थ, खजुराहोचा प्रसिद्ध मंदिरसमूह ११ व्या शतकात उभारला गेला. मात्र, नंतर व्यापारी मार्ग बदलल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झालं. भुवनेश्वरमधील लिंगराज मंदिरसमूहही याच काळात बांधला गेला. पुढे, अकबराचा राजपूत सेनानी मानसिंह याने १६व्या शतकात वृंदावन येथे गोविंदराज मंदिर उभारलं. पण नंतर १७ व्या शतकात औरंगजेबाने ते उध्वस्त केलं.
ज्यावेळी मुस्लिम सरदारांनी मंदिरांवर हल्ले केले, तेव्हा लोकांनी बहुधा देवतांच्या लहान, सहज ने-आण करता येणाऱ्या प्रतिमा स्वीकारल्या, या प्रतिमांना खासगी घरांत ठेवता येत असे किंवा राजस्थानातील हवेली-शैलीतील सुरक्षित निवासांमध्ये स्थलांतरित केलं जात असे. बंगालमध्ये, १७ व्या शतकात, कृष्णाला अर्पण केलेली नवीन टेराकोटा मंदिरे उभारली गेली. त्यामध्ये स्थानिक कलाशैली आणि भक्तीभाव या दोन्हींचं प्रतिबिंब दिसून येतं.
मुघल साम्राज्याचा ऱ्हास आणि मराठ्यांचा उदय यानंतर मंदिरनिर्मितीची नवी लाट आली.
भोसले आणि होळकर यांसारख्या घराण्यांनी विशेषतः रामाला समर्पित असलेली हिंदू मंदिरे उभारली. नाशिक, ग्वाल्हेर आणि काशी यांसारख्या ठिकाणी ही मंदिरे उभारण्यात आली. म्हणूनच, हिंदू मंदिरे हजारो वर्षे कधीच स्थिर राहिली नाहीत, ती सतत बदलत राहिली. काळानुरूप तत्त्वज्ञानाचा प्रवाह आणि विविध आव्हानांना सामोरं जात उत्क्रांत होत राहिली आणि टिकून राहिली.
विषयाशी संबंधित प्रश्न
- प्राचीन काळात, बंदिस्त देवालयं आणि कोरलेल्या मूर्ती उदयास येण्याआधी दैवी अनुभव लोकांना कसा मिळत होता?
- निसर्गपूजेपासून प्रतिमापूजेकडे झालेल्या संक्रमणानं आरंभीच्या हिंदू धार्मिक आचरणावर कोणता प्रभाव टाकला?
- भक्ती आंदोलनाच्या उदयानंतर मंदिरांचं स्वरूप कसं बदललं?
- स्वतंत्र उभ्या केलेल्या मंदिरांनी प्रयोगात्मक स्वरूपातून टिकाऊ वास्तुशैलीत झालेला बदल कसा घडवून आणला; त्यानंतरच्या शतकांत आणखी कोणत्या प्रमुख मंदिर स्थापत्यशैली उदयास आल्या?
- हजारो वर्षांपासून हिंदू मंदिरं स्थिर राहिली नाहीत, तर सतत बदलत, उत्क्रांत होत आणि विविध आव्हानं व तत्त्वज्ञानाच्या प्रवाहांना तोंड देत टिकून राहिली आहेत. या विधानाचं स्पष्टीकरण करा.
