डॉ. देवदत्त पोखरकर
Hing Health Benefits Asafoetida Cultivation Uses Marathi News Explainer. हिंग (Ferula asafoetida) ही मानवाला प्राचीन काळापासून ठाऊक असलेली एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. मसाल्यांच्या गर्दीत हिंग स्वतःचं अस्तित्व कधीच मिरवत नाही, पण त्याच्या उपस्थितीशिवाय भारतीय स्वयंपाक नेहमी अपूर्ण राहतो. केवळ अन्नाला स्वाद देणेच नव्हे, तर पोटाच्या विविध आजारांवर गुणकारी असणाऱ्या हिंगाचे शरीरासाठी प्रचंड आरोग्यदायी फायदे आहेत. भारतीय स्वयंपाकात हिंगाचा मसाल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असला तरी भारतात त्याची लागवड फार मर्यादित आहे. जगातील बहुतेक हिंग अफगाणिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान आणि मध्य आशियातील इतर कोरड्या प्रदेशांतून प्राप्त होतो.

जळले तरी वास जात नाही!

हिंग ही ॲपिएसी (Apiaceae) अर्थात गाजर किंवा धने कुळातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव Ferula asafoetida आहे. Ferula हा लॅटिन शब्द काठी किंवा दांडा या अर्थाने वापरला जातो, तर asafoetida हा शब्द पर्शियन भाषेतील aza म्हणजे राळ आणि लॅटिनमधील foetida म्हणजे तीव्र वास असलेली या शब्दांपासून तयार झाला आहे. त्यामुळे तिच्या नावावरूनच तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तीव्र गंधाची कल्पना येते. म्हणूनच म्हणतात… “हिंग जळले तरी वास जात नाही”

बाह्यरूप शेपू किंवा बडि‍शेपेसारखे

हिंग ही बहुवर्षायू वनस्पती असून ती साधारणतः १.५ ते २.५ मीटर उंच वाढते. जमिनीखाली मोठे, मांसल आणि गाजरासारखे मुख्य मूळ विकसित होते. याच मुळामध्ये अन्नसाठा केला जातो. खोड जाड, पोकळ आणि सरळ वाढणारे असते. पाने मोठी, विभाजित, पिसांसारखी आणि गर्द हिरव्या रंगाची असतात. या वनस्पतीचा बाह्य रुपरंग बडीशेप किंवा शेपूच्या वनस्पतीसारखा दिसतो.

Hing Health Benefits Asafoetida Plant | Asafoetida Cultivation Uses Marathi News | हिंगाचे आरोग्यदायी फायदे आणि उपयोग | हिंग वनस्पती लागवड औषधी गुणधर्म
हिंगाचे आरोग्यदायी फायदे आणि वनस्पती लागवडीची माहिती (Image- Gemini)

पंखयुक्त बिया

पूर्ण वाढ झाल्यानंतर वनस्पतीच्या शेंड्यावर मोठ्या छत्राकृती (Umbel) फुलोऱ्यांमध्ये असंख्य लहान पिवळसर फुले येतात. ॲपिएसी कुलातील इतर वनस्पतींप्रमाणेच या फुलोऱ्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. फुलांमध्ये कीटकांद्वारे परागीभवन होते. फलनानंतर सपाट, पंखयुक्त बिया तयार होतात आणि त्यांद्वारे वनस्पतीचा प्रसार होतो.

दुधाळ चीक आणि हिंग

मसाल्यात वापरले जाणारे हिंग वनस्पतीच्या मुळांपासून आणि खोडाच्या तळभागातून मिळणाऱ्या दुधाळ चीकापासून तयार केले जाते. वनस्पती साधारणतः चार ते पाच वर्षांची झाल्यावर तिच्या मुळाच्या वरच्या भागावर विशिष्ट प्रकारचा छेद दिला जातो. या जखमेतून पांढऱ्या रंगाचा दुधाळ चीक बाहेर येतो. हवेशी संपर्क आल्यावर हा चीक हळूहळू तपकिरी किंवा गडद पिवळसर रंगाचा होतो आणि कठीण राळेमध्ये रूपांतरित होतो. हा चीक अनेक वेळा गोळा करून वाळवला जातो. त्यानंतर त्याचे शुद्ध किंवा मिश्रित हिंग म्हणून व्यापारी उत्पादन केले जाते.

म्हणून अत्यंत तीव्र वास येतो

हिंगाचा तीव्र वास त्याच्यातील गंधकयुक्त रासायनिक संयुगांमुळे निर्माण होतो. हिंगामध्ये मुख्यतः रेझिन (४०–६४%), गम (सुमारे २५%) आणि बाष्पशील तेल (१०–१७%) असते. रेझिनमध्ये फेरुलिक आम्ल व कुमरिन्स, तर वाष्पशील तेलात गंधकयुक्त संयुगे असल्यामुळे हिंगाला तीव्र वास आणि औषधी गुणधर्म प्राप्त होतात. शुद्ध हिंग अत्यंत तीव्र वासाचा असतो, म्हणून बाजारात व्यापारी त्यात गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, स्टार्च किंवा गम अरेबिक यांसारख्या पदार्थ मिसळून मिश्र स्वरूपात विकतात.

कांदा -लसूण न वापणारेही हिंग वापरतात

स्वयंपाकात अत्यंत अल्प प्रमाणात वापरूनही अन्नाला वैशिष्ट्यपूर्ण सुगंध आणि चव प्राप्त होते. विशेषतः डाळी, कडधान्ये, भाज्या, लोणची, सांबार, आमटी आणि कढी यांसारख्या पदार्थांमध्ये हिंग मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. कांदा आणि लसूण न वापरणाऱ्या अनेक भारतीय खाद्यपद्धतींमध्ये हिंग ही त्यांचा पर्याय म्हणून वापरली जाते.

अँटिऑक्सिडंट, सूक्ष्मजीवरोधी…

आयुर्वेद, युनानी आणि पारंपरिक औषध क्षेत्रात हिंगाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आयुर्वेदात तिला “हिङ्गु” असे नाव असून ती दीपनीय, पचनास चालना देणारी, वातनाशक, कृमिघ्न आणि शूलहर मानली जाते. अपचन, पोटदुखी, वायूचा त्रास, अजीर्ण, पोटफुगी, मुरडा आणि भूक मंदावणे यांसारख्या विकारांमध्ये हिंगाचा पारंपरिक वापर केला जातो. काही ठिकाणी सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या किरकोळ तक्रारींमध्येही तिचा उपयोग केला जातो. आधुनिक संशोधनांमध्ये हिंगामध्ये अँटिऑक्सिडंट, सूक्ष्मजीवरोधी, दाहशामक आणि वातनाशक गुणधर्म असलेल्या जैवरासायनिक संयुगांची नोंद करण्यात आली आहे. तथापि, औषध म्हणून तिचा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.

भारतात उत्पादन वाढण्याची शक्यता

हिंगाला कोरडे, थंड हवामान आणि पाण्याचा निचरा होणारी, रेताड किंवा मुरमाड जमीन मानवते.
मध्य आशियातील पर्वतीय प्रदेश तिच्या वाढीसाठी विशेष अनुकूल आहेत. भारतात पारंपरिकरीत्या हिंगाची लागवड होत नव्हती आणि देशाला मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र अलीकडील काळात हिमाचल प्रदेश, लडाख आणि उत्तराखंडातील काही भागांमध्ये हिंग लागवडीचे यशस्वी प्रयोग सुरू झाले आहेत. या प्रयत्नांमुळे भविष्यात भारतात हिंगाचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.

भारतीय पाककलेत विशेष स्थान

भारतीय संस्कृतीत हिंगाला केवळ मसाला म्हणून नव्हे तर औषधी आणि धार्मिकदृष्ट्याही महत्त्व आहे. अनेक पारंपरिक घरगुती उपायांमध्ये त्याचा समावेश केला जातो. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण तीव्र सुगंधामुळे काही ठिकाणी कीटकांना दूर ठेवण्यासाठीही वापर केला जात असे. स्वयंपाकातील फोडणीमध्ये टाकलेला चिमूटभर हिंग पदार्थाची चव, सुगंध आणि पचनक्षमता वाढवतो , त्यामुळे भारतीय पाककलेत हिंगाला विशेष स्थान प्राप्त झाले आहे.

मौल्यवान नैसर्गिक द्रव्य

एकूणच, हिंग (Ferula asafoetida) ही वनस्पती मसाला म्हणून औषधी वापरात आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. तिच्यापासून मिळणारा हिंग हा केवळ भारतीय स्वयंपाकाचा अविभाज्य भाग नसून पारंपरिक वैद्यकशास्त्रातीलही एक मौल्यवान नैसर्गिक द्रव्य आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्मांमुळे, औषधी उपयोगांमुळे आणि पाककलेतील वापरामुळे या वनस्पतीला विशेष ओळख प्राप्त झाली आहे.