पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेला लागून असलेल्या हिंजवडीसह सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव गेल्या १२ वर्षांपासून रखडला आहे. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडीचा पिंपरी महापालिकेत समावेश केला जाणार असल्याची घोषणा केल्यावर तेथील नागरिकांनी महापालिकेतील समावेशाला विरोध केला. त्यांची स्वतंत्र महापालिकेची मागणी आहे. या सगळ्यात राजीव गांधी आयटी पार्कचा समावेश असलेल्या हिंजवडीचे प्रश्न सुटणार का?
हिंजवडीतील समस्या काय?
आयटी पार्कमुळे हिंजवडीची जगाच्या नकाशावर स्वतंत्र ओळख निर्माण झाली. परंतु, हीच हिंजवडी आता समस्यांच्या गर्तेत आहे. अरुंद रस्ते, त्यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, कचरा, पाणी, सांडपाणी वाहिन्यांसह विविध पायाभूत सुविधांचा हिंजवडीत अभाव आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह हिंजवडीत कामासाठी प्रवास करणारे अभियंते त्रस्त असून, त्यांच्यावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात हिंजवडी तुंबली. यंदा खड्ड्यांची मोठी समस्या निर्माण झाली. याविरोधात अभियंत्यांकडून सातत्याने आवाज उठविला गेला.
पिंपरी महापालिकेत समावेश झाल्यास काय होणार?
हिंजवडी आयटी पार्क परिसरात ग्रामपंचायत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), सार्वजनिक बांधकाम विभाग असे शासनाचे वेगवेगळे विभाग काम करतात. समन्वयाअभावी तेथील नागरी सुविधांचा प्रश्न गंभीर झाला आहे. समन्वयाच्या अभावामुळे विकासकामांना विलंब होतो. आर्थिक क्षमता मर्यादित असून, मनुष्यबळही कमी असल्याने विकासकामांसह नागरी सुविधा पुरविण्यात अनेक अडचणी येतात. परिणामी, अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांत वाढ होऊन हा भाग विद्रूप झाला आहे. नागरी वसाहती अस्ताव्यस्त विस्तारल्या असून, बकालपणा वाढला आहे. महापालिकेत हा भाग समाविष्ट झाल्यानंतर एकहाती नियंत्रण व देखरेख राहील. परिणामी, विकासकामांना चालना मिळू शकेल.
रस्ते, उड्डाणपूल, समतल विलगक, भुयारी मार्ग, उद्याने, जलनिस्सारण वाहिन्या, सुशोभीकरण, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी अत्याश्यक विकासकामे वेगात केली जातील. त्यासाठी इतर विभागांना तेथे लक्ष देण्याची गरज राहणार नाही. तेथील समस्या, अडचणींवर महापालिकेकडून तोडगा निघून सर्वोत्तम सुविधा व सेवा प्रदान केल्या जातील. प्रशस्त रस्ते विकसित होऊन वाहतूक कोंडीची मुख्य समस्या सुटण्यास मदत होईल. अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांना आळा बसून या भागांचा नियोजनबद्ध विकास होईल. घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा निचरा, योग्य प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी बीआरटीएस, मेट्रो आदींच्या पर्यायांसह प्रशस्त रस्ते आणि उड्डाणपुलांच्या सोयी उपलब्ध होतील. महापालिकेकडून चांगल्या प्रकारे नागरी सुविधा उपलब्ध झाल्यास आयटी पार्कमधील अभियंते त्या परिसरात राहण्यास प्राधान्य देतील. परिणामी, आजूबाजूच्या परिसरातून या भागांवर येणारा ताण कमी होऊन, रहदारी सुरळीत होण्यास बळ मिळेल. हिंजवडीसह इतर गावांचा अधिक चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध विकास साधता येईल, असा विश्वास महापालिकेचे अधिकारी व्यक्त करतात.
नियोजनबद्ध विकास
शहराची तिसऱ्यांदा हद्दवाढ
पिंपरी-चिंचवड शहराचे क्षेत्रफळ १८१ चौरस किलोमीटर आहे. सध्याची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे आहे. या गावांचे क्षेत्रफळ – गहुंजे ५.०५ चौरस किलोमीटर, जांबे ६.३७ चौरस किमी, मारुंजी ६.५५ चौरस किमी, हिंजवडी ८.३३ चौरस किमी, माण १९.०५ चौरस किमी, नेरे ५.३२ चौरस किमी आणि सांगवडे ३.४४ चौरस किमी असे एकूण ५१.११ चौरस किलोमीटर इतके आहे. या गावांचा समावेश झाल्यानंतर शहराचे क्षेत्रफळ २३२.११ चौरस किलोमीटर होईल आणि शहराची तिसऱ्यांदा हद्दवाढ होईल.
महापालिकेने प्रस्ताव कधी पाठविला होता?
हिंजवडीसह सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत फेब्रुवारी २०१५मध्ये मंजूर करण्यात आला. त्यानंतर तो मंजुरीसाठी जून २०१५मध्ये शासनाकडे पाठविण्यात आला. याबाबत महापालिकेने सातत्याने स्मरणपत्रेही पाठविली. या भागाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी राज्य शासनाने तत्काळ निर्णय घेण्याची महापालिकेची मागणी आहे. मात्र, आत्तापर्यंत त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
समावेशाला विलंब कशामुळे?
हिंजवडीचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याबाबत शहरातील लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. महापालिकेच्या प्रस्तावाबाबत राज्य शासनाने पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडून अभिप्राय मागविला होता. त्या वेळी हिंजवडीचा महापालिकेत समावेश करण्यास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नकार दिला होता. ऑगस्ट २०२५मध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीला स्वतंत्र महापालिका करण्याची घोषणा केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्याचे खंडन करण्यात आले. स्थानिकांचा विरोध, लोकप्रतिनिधींचे होत नसलेले एकमत यामुळे समावेश रखडल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते.
हिंजवडीकरांचा विरोध कशामुळे?
हिंजवडीसह सात गावांमधील नागरिकांचे महापालिकेत समाविष्ट होण्यावरून एकमत होत नाही. काही गावांचा महापालिकेतील समावेशाला विरोध असून, त्या समर्थनार्थ वाकड, ताथवडे, पुनावळे महापालिकेत असूनही त्याचा काय विकास झाला, असा दाखला दिला जातो. महापालिकेतील समावेशामुळे मिळकत करात वाढ होईल, गावाची स्वतंत्र ओळख पुसली जाईल, प्रतिनिधित्वामध्ये घट होईल, अशा शंकांमुळे येथील नागरिकांचा महापालिकेत समाविष्ट होण्यास विरोध असल्याचे सांगण्यात येते. त्याऐवजी स्वतंत्र नगरपरिषद किंवा ‘क’ दर्जाची महापालिका करण्याची नागरिकांची मागणी आहे. तर, येथील प्रश्न सुटण्यासाठी हिंजवडीचा पिंपरी महापालिकेत समावेश व्हावा, अशी आटी पार्कमध्ये काम करणाऱ्या, येथे राहणाऱ्या अभियंत्यांची भूमिका आहे.
ganesh.yadav@expressindia.com
