Will Price of Silver Fall or Rise Further : काही दिवसांपासून सुसाट तेजीत असलेल्या चांदीच्या दराला शुक्रवारी अचानक ब्रेक लागला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी चांदीचा भाव झपाट्याने खाली आला. गेल्या चार आठवड्यांत चांदीने तब्बल ३० टक्क्यांनी अफाट झेप घेतली होती. फेडरल रिझर्व्हची अनिश्चितता आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढल्याने चांदीचा भाव गगनाला भिडला होता. यादरम्यान ३० जानेवारीपासून चांदीत सातत्याने घट होताना दिसून येत आहे, त्यामुळे खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून येत असून गुंतवणूकदार धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर चांदीचा भाव आणखीनच घसरणार की घोडदौड कायम राहणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

चांदीच्या दरात ऐतिहासिक पडझड

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारीच्या सुरुवातीलाच चांदीने मोठी उसळली घेतली होती. जागतिक बाजारात नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मौल्यवान धातूने प्रति औंस १२१ डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला होता. यादरम्यान जानेवारी अखेरीस त्यात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. फेब्रुवारीच्या सुरुवातीला जागतिक बाजारात स्पॉट चांदीचा भाव प्रति औंस ८८ डॉलर्सपर्यंत घसरला. या आठवड्यात सुवर्ण बाजारपेठेत चांदीचे दर तुलनेने जास्त असले तरीही जानेवारीतील उच्चांकापेक्षा ते खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे.

चांदीचा भाव २०० डॉलर्सपर्यंत वाढणार?

मोठ्या घसरणीनंतरही चांदीने शेअर बाजारापेक्षाही गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. यावर्षीच्या सुरुवातीपासूनच चांदीच्या दरात तब्बल १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्या तुलनेत शेअर बाजारात अधिकच पडझड झाल्याने गुंतवणूकदारांनी चांदीवरच विश्वास दर्शवला आहे. यादरम्यान वर्षाच्या अखेरीस चांदीचा भाव प्रति औंस २०० डॉलर्सपर्यंत पोहोचणार अशी आवई अनेकांनी उठवली आहे. मात्र, तज्ज्ञांनी या चर्चेला कुठलाही आधार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जागतिक बाजारात चांदीचा सध्याचा भाव प्रति औस ८८ ते ९२ डॉलर इतका आहे. महाराष्ट्रातील जळगाव शहरातील प्रमुख सुवर्ण बाजारात शुक्रवारी चांदीचे दर जीएसटीसह दोन लाख ५७ हजार ५०० रुपये इतके होते, त्यामुळे चांदीला २०२६ मध्ये प्रति औंस २०० डॉलर्सचा टप्पा गाठण्यासाठी दुप्पटीने वाढावे लागणार आहे. इतकी मोठी उसळी घेण्यासाठी सोने–चांदीचे गुणोत्तर सुमारे ३०:१ पर्यंत खाली यावे लागेल. याआधी अशी परिस्थिती १९८० मध्ये पाहायला मिळाली होती.

आणखी वाचा : बांगलादेशात नव्या पर्वाची सुरुवात; चीन-पाकिस्तानसाठी आनंदाची बातमी की धोक्याची घंटा?

विक्रमी उच्चांकानंतर दर का कोसळले?

  • जागतिक पातळीवरील अस्थिरतेमुळे काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर झपाट्याने वाढले होते.
  • फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह काही देशांवरील आकारलेले टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला.
  • त्यामुळे सोन्या-चांदीची सुरक्षित मालमत्ता म्हणून असलेली मागणी तत्काळ घटली आणि गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातूंच्या खरेदीला प्राधान्य न देता त्यातून नफावसुली केली.
  • परिणामी जागतिक बाजारातील सोन्याचे दर ०.९ टक्क्याने कमी होऊन ४,८१० डॉलर्सवर आले.
  • याच कालावधीत चांदीचा भावही ०.५ टक्क्याने कमी होऊन प्रति औस ९३ डॉलर या पातळीवर स्थिरावला.
  • त्याशिवाय ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी लष्करी शक्तीचा वापर करणार नसल्याचे दावोस येथील भाषणात स्पष्ट केले.
  • त्यांच्या या निर्णयामुळे जागतिक व्यापार युद्धाची भीती निवळली असून सोने-चांदीकडे वळलेला गुंतवणूकदारांचा ओढा आता हळूहळू कमी होत आहे.

गुंतवणूकदारांनी सध्या काय करावे?

चांदीच्या दरातील सध्याची घसरण तीव्र असली तरीही येत्या काही दिवसांत बाजाराची दिशा आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून राहणार आहे. गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय न घेता बाजारातील हालचालींचा अभ्यास करूनच पुढील पावले उचलावीत, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. चांदीच्या किमतींवर परिणाम करणारे घटक आता अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत. त्यामागचे कारण म्हणजे- सोन्याप्रमाणे चांदीला केंद्रीय बँकांची थेट मागणी नाही. सध्या चांदीसाठी ७५ ते ८० डॉलर्स प्रति औंस ही एक स्थिर पातळी मानली जात असल्याचे दलाल संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे- सोन्यातील सद्यस्थितीतील घसरण तात्पुरती असून मध्यम आणि दीर्घ मुदतीत सोने तेजीतच राहणार असल्याचा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : Pulwama Attack : बालाकोट एअर स्ट्राइकने दहशतवादी आजही थरथरतात; ‘ऑपरेशन बंदर’ काय होतं? 

चांदीचा वापर नेमका कशासाठी होतो?

गुरुवारी चांदीच्या भावात घसरण झाली असली तरीही अलीकडच्या काळात जागतिक बाजारात या मौल्यवान धातूने झपाट्याने उसळी घेतली आहे. या वाढीमागे केवळ गुंतवणुकीची सुरक्षितता नव्हे, तर वाढती औद्योगिक गरज हेही महत्त्वाचे कारण आहे. सोन्याच्या तुलनेत स्वस्त आणि बहु-उपयोगी असलेली चांदी आता ‘औद्योगिक धातू आणि मौल्यवान धातू’ अशी दुहेरी भूमिका बजावत आहे. सध्या हरित ऊर्जेकडे जगाचा वेगाने होत असलेला कल चांदीसाठी निर्णायक ठरत आहे. सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फोटोव्होल्टेईक पॅनेल्समध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहने, चार्जिंग यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सेमीकंडक्टर उद्योगातही चांदी हा अपरिहार्य घटक ठरला आहे. परिणामी, औद्योगिक क्षेत्रातून चांदीची मागणी झपाट्याने वाढत आहे.

सोन्या-चांदीचे सध्याचे भाव काय?

सध्या सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे, त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत चांदीच्या भावात तब्बल १५ हजार ४५० रुपयांची घट नोंदवली गेली, त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ५७ हजार ५०० रुपयांपर्यंत घसरले. चांदीपाठोपाठ सोन्याच्या दरातही घसरण दिसून आली. शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याचा भाव प्रतितोळा दोन हजार ५७५ रुपयांनी घसरला, त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५८ हजार ६२० रुपये इतका आहे.