Advance Maritime Culture 35000 Years Ago: मानवी इतिहास हा केवळ भूतलाशीच संबंधित आहे, असा आजवरचा समज होता. मात्र नव्या संशोधनाने या समजाला यशस्वी छेद दिला आहे. आदिमानव हा केवळ किनाऱ्यालगत स्थलांतर करत होता, या गृहितकाचा आता जगभरच्या संशोधकांना नव्याने विचार करावा लागणार आहे. कारण फिलिपिन्समधील मिंडोरो बेटावरील उत्खननाने हे पुरते स्पष्ट केले आहे की, ३५ हजार वर्षांपूर्वीच मानवाने महासागरावर यशस्वी मात केली होती, ती देखील प्रगत तंत्रज्ञान आणि सागरी लाटांवर स्वार होण्यासाठी आवश्यक कौशल्यांच्यामदतीने! ही मानवी बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि धाडसाची अनोखी कथा आहे. ती केवळ प्राचीन मानवी स्थलांतराची कथा नाही!
माणूस त्या बेटांवर पोहोचलाच कसा?
मिंडोरो बेट ही बाबच पारंपरिक सिद्धांताला आव्हान देणारी आहे. हिमयुगात समुद्राची पातळी खाली असतानाही हे बेट कधीही मुख्य भूमीला जोडले गेले नव्हते. म्हणजेच, येथे पोहोचण्यासाठी माणसाला जाणीवपूर्वक समुद्र पार करावा लागला होता… अनेकदा एखाद्या चित्रपटात दिसते त्याप्रमाणे
अपघाताने वाहत जाणारी होडी किंवा भरकटलेली होडी इथे पोहोचली असावी, हे गृहितक इथे फोल ठरते. कारण सापडलेले पुरावे केवळ येथीलच नव्हे तर जगभरातील मानवाचा सागरी प्रवास स्पष्ट करतात. हा प्रवास अपघाताने झालेला नव्ह तर नियोजनबद्ध होता, असे हे पुरावे दाखवून देतात.
१५ वर्षांचा शोध… मिंडोरो पुरातत्त्व प्रकल्प
फिलिपिन्समधील Ateneo de Manila University आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांनी मिळून राबवलेल्या Mindoro Archaeology Project ने गेल्या १५ वर्षांत Ilin Island, San Jose आणि Sta. Teresa येथे उत्खनने केली. या उत्खननांत खालील बाबी सापडल्या…
- मानवी अवशेष
- प्राण्यांची हाडे
- शंख-शिंपल्यांपासून बनवलेली अवजारे/ हत्यारे
- मासेमारीची साधने
- या सर्वांचे वय ३५ हजार वर्षांपेक्षा अधिक असल्याचे कार्बन डेटिंगने सिद्ध केले आहे.
खोल समुद्रातील मासेमारी… खरी गेम-चेंजर!
या संशोधनातील सर्वात थक्क करणारा पुरावा म्हणजे केवळ खोल समुद्रात सापडणाऱ्या माशांचे अवशेष.
- संशोधकांना सापडलेल्या गोष्टी
- बोनिटो (खुल्या समुद्रातील वेगवान मासा)
- शार्कसारख्या मोठ्या शिकारी माशांचे अवशेष

अशा माशांची शिकार किनाऱ्याजवळू शक्यच नसते. याचाच अर्थ, त्या काळातील मानवाकडे पुढील गोष्टी नक्कीच होत्या…
- समुद्रात दूर जाणारी नौका
- दिशाज्ञान
- सामूहिक मासेमारीचे तंत्र
या साऱ्या बाबी तत्कालीन आदिमानवाकडे नव्हत्या, असे आजवर मानले जात होते. मात्र या संशोधनाने त्यास छेद दिला आहे.
शिंपल्यांपासून अवजारे आणि हजारो किलोमीटरचे जाळे
मिंडोरोतील उत्खननांत महाकाय शिंपल्यांपासून (Tridacna) बनवलेली कुर्हाडी आणि अॅडझेस सापडल्या. विशेष बाब म्हणजे अशीच अवजारे इंडोनेशिया, पापुआ न्यू गिनीतील Manus बेट इथेही सापडली आहेत… तीदेखील तब्बल ३,००० किलोमीटर अंतरावर…
याचा अर्थ काय?
- ही केवळ स्थानिक संस्कृती नव्हती
- तर प्राचीन सागरी संपर्कांचे जाळेच (नेटवर्क) अस्तित्वात होते
- ज्ञान, तंत्रज्ञान आणि कल्पनांची देवाणघेवाण समुद्रामार्गे होत होती
मृतदेह पुरण्याची पद्धत आणि एकसमान संस्कृती
Ilin Island येथे सापडलेले सुमारे ५,००० वर्षे जुने दफनस्थळही महत्त्वाची ठरते. गर्भावस्थेतील स्थितीत मृतदेह पुरण्यात आले होते. मृतदेह चुनखडीच्या स्लॅबखाली पुरलेला होता. ही पद्धत आग्नेय आशियातील इतर बेटांवरील संस्कृतींशी जुळणारी आहे. याचा अर्थ असा की, हे लोक केवळ प्रवासी नव्हते; तर ते सांस्कृतिकदृष्ट्याही एकमेकांशी जोडलेला समाज होते.
मानव इतिहासाची नवी मांडणी
आजवर सागरी तंत्रज्ञानाचा विकास हा शेतीनंतर किंवा नवपाषाण युगात (निओलिथिक) काळात झाला, असे मानले जात होते. मिंडोरोचा पुरावा मात्र सांगतो की:
- मानवाने अवगत केलेली सागरी कौशल्ये फारच प्राचीन आहेत
- मानव केवळ जमिनीवरचाच नाही, तर समुद्रावरही कार्यरत असलेला प्राणी होता
- स्थलांतर ही नियोजित, विचारपूर्वक प्रक्रिया होती
यामुळे दक्षिण-पूर्व आशियातील मानवी स्थलांतराचे संपूर्ण मॉडेल नव्याने मांडावे लागणार आहे.
आजच्या काळासाठी याचा अर्थ काय?
हवामान बदल, सागरीपातळी वाढ, वाढते स्थलांतर हे सर्व आज जगाला भेडसावणारे प्रश्न पाहता नव्याने उकल झालेला हा इतिहास अधिक महत्त्वाचा ठरतो. तो हे सिद्ध करतो की,
- मानवाने पर्यावरण बदलाशी जुळवून घेतले
- तंत्रज्ञानाच्या मदतीने सीमांवर मात केली
- सहकार्य आणि नेटवर्किंग हे प्राचीन काळातही टिकून राहण्याचे मानवाचे मुख्य सूत्र होते
- समुद्रकडे माणसाने अडथळा नव्हे तर पर्याय म्हणून पाहिले.
मिंडोरोतील शोध मानवाच्या इतिहासात एक निर्णायक वळण दाखवण्याचा प्रयत्न करतो. ३५ हजार वर्षांपूर्वीच मानवाने समुद्राचा उपयोग केला, तो केवळ पार करण्यासाठी नव्हे, तर त्याचा वापर करत जीवन जगण्यासाठी.
- समुद्र हा अडथळा नव्हता
- तर तो मानवाच्या प्रगतीचा मार्ग होता.
भारताशी काय संबंध?
मिंडोरातील उत्खनन आणि संशोधनाचा भारताशी काही संबंध आहे का, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. कारण भारतीय माणूस देखील सागरी सफरीसाठी प्राचीन काळापासून ओळखला जातो. मिंडोरोतील या शोधाचे महत्त्व केवळ आग्नेय आशियापुरते मर्यादित नाही. त्याचा थेट संदर्भ भारतीय उपखंडाच्या प्राचीन सागरी परंपरेशी जोडता येतो. भारतीय माणूस हा प्राचीन काळापासूनच समुद्राशी नातं जपणारा आणि समुद्र पार करणारा समाज राहिला आहे. सिंधू संस्कृतीतील लोथलचे बंदर, तेथील गोदी, नौवहनाच्या माध्यमातून वापरली गेलेली प्रमाणित वजनमापे आणि जलमार्ग व्यवस्थापन हे सारे सुमारे ४,५०० वर्षांपूर्वीच भारतातही अस्तित्वात होते. त्याचे पुरावेही आपल्याला वेळोवेळी सापडले आहेत.
भारतीय ज्ञानपरंपरेचा भाग?
इतकेच नव्हे, तर दख्खनच्या किनाऱ्यांपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत भारतीय समाजाने मान्सून वाऱ्यांचा वापर करून सागरी प्रवासाचे शास्त्रही आत्मसात केले होते, असे पुरावे ग्रीक- रोमन ग्रंथांपासून ते Periplus of the Erythraean Sea मध्ये सापडतात. मिंडोरोचा शोध सांगतो की, ही सागरी बुद्धिमत्ता अचानक निर्माण झालेली नव्हती; तर ती आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात हजारो वर्षांपूर्वीपासून विकसित होत असलेल्या ज्ञानपरंपरेचा भाग असू शकते.
भारत- मिंडोरा संबंध?
विशेष म्हणजे, भारतातून आग्नेय आशियात गेलेल्या संस्कृती, भाषा आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह हा केवळ ऐतिहासिक काळापुरता मर्यादित नसून, त्याची मुळे अतिप्राचीन सागरी संपर्कांमध्ये दडलेली असण्याची शक्यता आता अधिक ठळकपणे समोर येते आहे. त्यामुळे मिंडोरोतील हा शोध भारताच्या सागरी इतिहासाकडे केवळ अभिमानाने नव्हे, तर नव्या वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची गरज अधोरेखित करतो.
- संदर्भ–
- Ateneo de Manila University – Official Research Release
Mindoro Archaeology Project findings on early seafaring and maritime adaptation - Journal: Archaeological Research in Asia, Pawlik, A. F. et al.
Shell adzes and maritime networks in Island Southeast Asia
Elsevier (Background peer-reviewed literature supporting shell-tool diffusion) - Nature Ecology & Evolution, Bird, M. I. et al., Pleistocene island colonisation and seafaring capabilities https://www.nature.com
