डॉ. देवदत्त पोखरकर
Medical Cadaver History Body Donation Importance Intent: वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानवी शरीररचनेचा (Anatomy) अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. शरीरातील हाडे, स्नायू, रक्तवाहिन्या, नसा, अवयव आणि त्यांची रचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मानवी शरीराचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे शवविच्छेदन हा वैद्यकीय शिक्षणाचा अविभाज्य भाग मानला जातो. मात्र काही शतकांपूर्वी वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसमोर एक मोठी समस्या होती. मानवी शरीराच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करायचा, पण त्यासाठी मृतदेहच मिळत नव्हते.
प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र
मानवी शरीरात चालणारे कार्य समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष शरीराची रचना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, याची जाणीव प्राचीन काळापासूनच होती. याचे उत्तम उदाहरण भारतीय आयुर्वेद परंपरेत सुश्रुतसंहितेत आढळते. महर्षी सुश्रुत हे प्राचीन भारतातील प्रसिद्ध शल्यचिकित्सक मानले जातात. त्यांच्या नावाशी जोडल्या जाणाऱ्या सुश्रुतसंहितेत शरीररचना समजून घेण्यासाठी मृतदेहाचे परीक्षण करण्याची पद्धत वर्णन केलेली आहे. मृतदेहाची निवड, त्याची विशिष्ट पद्धतीने तयारी आणि शरीरातील थरांचे निरीक्षण करण्याबाबत उल्लेख आढळतो. म्हणजेच शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय ज्ञानासाठी मानवी शरीराची प्रत्यक्ष रचना समजून घेणे आवश्यक आहे, ही जाणीव प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्रात होती.
वैद्यकीय शिक्षणात चुकीच्या समजुती
मात्र जगाच्या इतर भागांत, विशेषतः युरोपमध्ये अनेक शतके परिस्थिती पूर्णतः वेगळी होती. ग्रीक वैद्य गॅलेन यांच्या वैद्यकीय विचारांचा युरोपवर प्रचंड प्रभाव होता. त्यांचे ग्रंथ शतकानुशतके वैद्यकीय शिक्षणाचा आधार होते. परंतु गॅलेनने मानवी शरीराचा मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष अभ्यास करण्याऐवजी प्रामुख्याने प्राण्यांच्या शरीरावर केलेल्या निरीक्षणांवरून मानवी शरीररचनेबाबत निष्कर्ष काढले होते. त्यामुळे मानवी शरीराच्या रचनेबाबत अनेक चुकीच्या समजुती वैद्यकीय शिक्षणात दीर्घकाळ टिकून राहिल्या.
पुस्तकातील मजकुराला अधिक महत्त्व
मध्ययुगीन युरोपमध्ये मानवी मृतदेहाचे विच्छेदन करणे सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील विषय होता. त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मानवी शरीराचा अभ्यास करण्याच्या संधी अत्यंत मर्यादित होत्या. अनेकदा शिक्षक जुन्या ग्रंथांतील वर्णनावर भर देत आणि प्रत्यक्ष शरीरावर दाखवला जाणारा भाग त्यानुसार समजावून सांगत. त्यामुळे डोळ्यांसमोर असलेल्या शरीरापेक्षा अनेकदा पुस्तकातील मजकुराला अधिक महत्त्व मिळत असे.
शरीररचनाशास्त्राच्या जुन्या समजुतींना आव्हान
१६व्या शतकात या परिस्थितीत मोठा बदल झाला. बेल्जियन शरीररचनाशास्त्रज्ञ आंद्रेयास व्हेसालियसने मानवी शरीराचा प्रत्यक्ष अभ्यास करून जुन्या समजुतींना आव्हान दिले. १५४३ मध्ये त्याने De Humani Corporis Fabrica हा प्रसिद्ध ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथातील चित्रे आणि वर्णने मानवी मृतदेहांच्या प्रत्यक्ष विच्छेदनावर आधारित होती. व्हेसालियसने गॅलेनच्या शरीररचनेतील अनेक चुका दाखवून दिल्या. त्याच्या कार्यामुळे वैद्यकीय शिक्षणात एक महत्त्वाचा बदल झाला.
अभ्यासासाठी मृतहेदच उपलब्ध नव्हते
ग्रंथात काय लिहिले आहे यापेक्षा प्रत्यक्ष शरीर पाहणे, तपासणे आणि त्यावरून निष्कर्ष काढणे अधिक महत्त्वाचे ठरू लागले. पण प्रत्यक्ष शरीराचा अभ्यास करायचा असेल तर शरीर उपलब्ध असणे आवश्यक होते. हीच अडचण पुढील अनेक शतकांपर्यंत कायम राहिली. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढत होती, शरीररचनाशास्त्र / anatomy शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती आणि शरीररचनाशास्त्राचे महत्त्वही वाढत होते. पण शवविच्छेदनासाठी कायदेशीर मार्गाने उपलब्ध होणारे मृतदेह पुरेसे नव्हते.

कबरीतील मृतदेहांची विक्री
मृतदेहांच्या कमतरतेमुळे एका बेकायदेशीर काळ्याकुट्ट व्यवसायाचा जन्म झाला. वैद्यकीय महाविद्यालयांना मृतदेह पुरवण्यासाठी इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये काही टोळ्या निर्माण झाल्या. या टोळ्या कबरी उकरून मृतदेह चोरायच्या व वैद्यकीय महाविद्यालयांना विकायच्या या लोकांना प्रेत चोर/ ‘Resurrectionists’ असे म्हटले जाऊ लागले. हे लोक रात्रीच्या वेळी नुकत्याच दफन केलेल्या व्यक्तींच्या कबरी उकरत आणि मृतदेह वैद्यकीय अभ्यासकांना विकत. वैद्यकीय संस्थांमध्ये या मृतदेहांना मागणी असल्यामुळे त्यातून चांगले पैसे मिळत.
मृतदेहाच्या संरक्षणासाठी पहारेकरी
मृतदेह चोरीच्या घटना वाढू लागल्यावर सामान्य लोकांमध्ये भीती निर्माण झाली. आपल्या नातेवाईकाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याचे शरीर कबरीत सुरक्षित राहील की नाही, याचीही खात्री राहिली नाही. काही कुटुंबांनी आपल्या मृतांची कबर सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष उपाय सुरू केले. स्कॉटलंडमध्ये तर ‘mortsafe’ नावाच्या जड लोखंडी संरचना वापरल्या जात. या संरचना कबरीवर ठेवून मृतदेह चोरीला जाऊ नये यासाठी संरक्षण केले जात असे. काही ठिकाणी कब्रस्तानात रात्री पहारेकरी ठेवले जात.
हत्या करून मृतदेहांची विक्री
या काळातील परिस्थिती किती गंभीर झाली होती, याचे सर्वात भयानक उदाहरण १८२७-२८ मध्ये स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथे घडले. विल्यम बर्क आणि विल्यम हेअर या दोघांनी सुरुवातीला त्यांच्या ओळखीतील एका मृत व्यक्तीचा मृतदेह वैद्यकीय अभ्यासासाठी विकला. त्यातून त्यांना चांगले पैसे मिळाले. त्यांची हाव वाढली मृतदेह मिळवण्यासाठी कबरी उकरणे किंवा चोरी करणे हे काम कठीण होते मग त्यांनी यापेक्षा आणखी भयानक मार्ग अवलंबिला. ते लोकांची हत्या करुन त्यांचे मृतदेह वैद्यकीय अभ्यासासाठी विकू लागले.
फाशी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी शवविच्छेदन
या सर्व प्रकारात त्यांनी किमान १६ जणांची हत्या केल्याचे ऐतिहासिक नोंदी आढळते. हे सर्व मृतदेह एडिनबर्गमधील प्रसिद्ध शरीररचनाशास्त्र / anatomy शिक्षक डॉ. रॉबर्ट नॉक्स यांच्या संस्थेत विकले जात होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर ब्रिटनमध्ये मोठी खळबळ उडाली. वैद्यकीय शिक्षणासाठी मृतदेहांची असलेली मागणी आणि त्यातून निर्माण झालेला बेकायदेशीर बाजार किती भयानक पातळीवर पोहोचला होता, हे जगासमोर आले. बर्कला अटक करण्यात आली. त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि १८२९ मध्ये त्याला फाशी देण्यात आली. या प्रकरणातील सर्वात विचित्र आणि इतिहासाला अस्वस्थ करणारा भाग म्हणजे फाशीनंतर बर्कचा मृतदेह शरीररचनाशास्त्र/ anatomy च्या अभ्यासासाठी वापरण्यात आला आणि त्याचा सांगाडा जतन करण्यात आला. म्हणजे ज्याने इतरांचे मृतदेह वैद्यकीय शिक्षणासाठी विकले, त्याच्या मृत्यूनंतर त्याचे शरीरही वैद्यकीय शिक्षणासाठी शवविच्छेदन टेबलावर पोहोचले.
मृतदेहांचा काळाबाजार
बर्क आणि हेअरचे प्रकरण एकमेव नव्हते. लंडनमध्येही मृतदेह मिळवण्यासाठी खून करणाऱ्या लोकांचे प्रकरण पुढे आले. १८३१ मध्ये जॉन बिशप आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित ‘London Burkers’ प्रकरणाने ब्रिटिश समाजाला हादरवून सोडले. मृतदेहांचा हा काळाबाजार आता केवळ कबरी उकरणे किंवा प्रेतचोरी पुरता मर्यादित राहिला नव्हता तर तो थेट खुनापर्यंत पोहोचला होता.
वैद्यकीय शिक्षणासाी मृतदेह मिळावा म्हणून कायदा
या घटनांमुळे सरकारवर दबाव वाढला आणि वैद्यकीय शिक्षणासाठी मृतदेह मिळवण्याची कायदेशीर व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली. अखेर १८३२ मध्ये ब्रिटनमध्ये Anatomy Act लागू करण्यात आला. या कायद्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी मृतदेह उपलब्ध करून देण्याची कायदेशीर चौकट निर्माण झाली. काही परिस्थितींमध्ये आप्तेष्टानी दावा न केलेले मृतदेह वैद्यकीय शिक्षणासाठी वापरण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे कबरी उकरणाऱ्या आणि मृतदेह चोरणाऱ्या लोकांच्या व्यवसायाला मोठा धक्का बसला.
मृतदेहाची प्रतिष्ठा आणि सन्मान
मात्र या कायद्याचीही एक वेगळी आणि अस्वस्थ करणारी बाजू होती. वैद्यकीय शिक्षणासाठी उपलब्ध होणाऱ्या मृतदेहांमध्ये गरीब, बेघर किंवा समाजातील दुर्बल घटकांतील लोकांचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे ज्यांच्या जिवंतपणी समाजाने फारशी दखल घेतली नाही, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचा निर्णय कोण घेणार? हा प्रश्न विचारला जाऊ लागला. वैद्यकीय विज्ञानाच्या प्रगतीसाठी मृतदेह आवश्यक होते, पण त्या शरीरांनाही मानवी प्रतिष्ठा आणि सन्मानाचा अधिकार होता.
अभ्यासासाठी देहदान
भारताचा इतिहास पाहिला तर मानवी शरीराच्या प्रत्यक्ष अभ्यासाची परंपरा प्राचीन काळापासून दिसते. सुश्रुतसंहितेतील मृतदेहाच्या परीक्षणाचा उल्लेख याचा महत्त्वाचा पुरावा आहे. पुढे आधुनिक वैद्यकीय शिक्षण भारतात रुजले आणि anatomy शिकवण्यासाठी मृतदेहांची गरज निर्माण झाली. आज या प्रक्रियेसाठी कायदेशीर व्यवस्था अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात १९४९ च्या Maharashtra Anatomy Act अंतर्गत दावा न केलेले मृतदेह वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी वापरण्याची तरतूद आहे. तसेच व्यक्तीला स्वतःचे शरीर मृत्यूनंतर वैद्यकीय उपयोगासाठी दान करण्याचीही कायदेशीर व्यवस्था आहे.
मृतदेह पहिला शिक्षक
मात्र मृतदेहांची उपलब्धता ही समस्या आज पूर्णपणे संपलेली नाही. महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांवर झालेल्या एका अभ्यासात अनेक महाविद्यालयांनी शरीररचनाशास्त्र विच्छेदनासाठी / anatomical dissection साठी मृतदेह पुरेसे नसल्याचे निरीक्षण नोंदवले होते. त्यामुळे आजही शरीरदानाचे महत्त्व कायम आहे. एखादी व्यक्ती मृत्यूपूर्वी स्वेच्छेने आपले शरीर वैद्यकीय शिक्षणासाठी दान करू शकते. तिच्या मृत्यूनंतर तिचे शरीर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे साधन होते. त्या शरीरातून शिकलेले विद्यार्थी पुढे डॉक्टर होतात, शस्त्रक्रिया करतात, रुग्णांचे प्राण वाचवतात आणि पुढील पिढीला वैद्यकीय ज्ञान देतात म्हणूनच वैद्यकीय शिक्षणात विद्यार्थी ज्या मृतदेहाला ( cadaver ) विच्छेदित करतात त्याला ‘पहिला शिक्षक’ मानतात.
देहदान काळाची गरज
पूर्वी वैद्यकीय विद्यार्थ्यांसमोर प्रश्न होता “शरीररचना शिकायची, पण मृतदेह कुठून आणायचा?” आज त्याच प्रश्नाचे उत्तर अधिक सन्मानाने दिले जाऊ शकते “मृत्यूनंतरही माझे शरीर भावी डॉक्टरांचे शिक्षक होऊ शकते.” त्यामुळे देहादान ही काळाची गरज आहे.
