Understanding Diabetes History and the Evolution of Insulin Treatment: “दोन चहा, एक बिमारी!” – टपरीवरचा हा संवाद आज घरोघरी पोहोचला आहे. मधुमेह किंवा ‘डायबिटीज’ हा आजार आज जितका सामान्य वाटतो, तितकाच त्याचा इतिहास प्राचीन आणि रंजक आहे.
“दो चाय, एक बिमारी!” असं चहावाल्या पोऱ्याने टपरीतल्या, कळकट फडक्यातून चहा गाळणाऱ्या बल्लवाला ओरडून सांगितलं. ‘बिमारी’ म्हणजे मधुमेहच आणि तशा पेशंटला बिनसाखरेचाच चहा द्यायचा हे त्या टपरीवाल्याला बरोब्बर समजलं. मधुमेहाने रक्तातली साखर वाढते आणि ती लघवीतून ओसंडते हे आजकालचं सामान्यज्ञान आहे. माणसाची मधुमेहाशी जुनीपुराणी ओळखही तशीच आहे. पण वैद्यकशास्त्रासाठी मात्र ती ओळख कालपरत्वे बदलत गेली.
पेशीपेशींतला वांदा
मधुमेह ही नुसती साखरबाधा नसून तो पेशीपेशीतला वांदा आहे हे समजत गेलं. त्याचा लठ्ठपणाशी असलेला घनिष्ठ संबंध उघडकीला आला. जसजशी त्या साखरशापाची व्याप्ती कळत गेली तसतसे संशोधकांनी नवेनवे उ:शाप शोधले. शापमुक्तीच्या आशेने चाललेल्या त्या प्रदीर्घ वाटचालीतल्या मैलाच्या दगडांची आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत.
मधुमेहपुराणाची सुरुवात
त्या मधुमेहपुराणाची सुरुवात किमान साडेतीन हजार वर्षांपूर्वी झाली.
‘काही लोकांना आजारपणामुळे सारखीसारखी लघवी होत असते,’ असं इजिप्शियनांनी त्यांच्या तृणतंतुपत्रावर (papyrus) लिहून ठेवलं होतं. ‘मधुमेह झालेल्या रोग्यांची लघवी मधासारखी गोड असते आणि तिच्या ओघळाला मुंग्या लागतात,’ असं सुश्रुत आणि चरक या दोघां भारतीय वैद्यकतज्ज्ञांनी अडीच हजार वर्षांपूर्वी सांगितलं. ‘सडपातळ लोकांना लहान वयात होणारा मधुमेह गंभीर असतो आणि मध्यमवयाच्या, बैठकीत बसून राहणाऱ्या, लठ्ठ लोकांना सौम्य आजार होतो,’ हेही त्यांना ठाऊक होतं. ‘गोड वर्ज्य करावं, मिताहारी राहावं आणि भरपूर व्यायाम करावा,’ असा सल्लाही त्यांनी दिला होता.

लघवीतला मधाळपणा
सतराव्या शतकात इंग्रज डॉक्टरांनीही रुग्णांच्या लघवीची गोडी चाखून त्या आजाराचं, ‘diabetes mellitus’ म्हणजे ‘(रक्तातून लघवीत) ओसंडणारा मधाळपणा’ असं बारसं केलं. ‘लघवीतला तो गोड पदार्थ म्हणजे ग्लुकोज असतो आणि मधुमेह्यांच्या शरीरांना पिष्टमय पदार्थांचं वावडं असतं,’ हे समजायला अठरावं शतक उजाडलं. पथ्य म्हणून रुग्णांच्या आहारातून पिष्टमय पदार्थ वर्ज्य झाले. जगभरातच मधुमेह्यांना गोड पदार्थ बाधक म्हणून वर्ज्य झाले तर ऍकी फळ, मेथी, कारलं वगैरे कडू पदार्थांना औषधांचा मान लाभला.
लँगरहान्सची छोटी बेटं
आजारांच्या अभ्यासासोबत शरीरशास्त्राचाही अभ्यास चालूच होता. पँक्रियासचा पाचकरस बनवणाऱ्या बटवा-पेशींची (acinar cells) ओळख पटली होती. त्या बटवा-पेशींच्या पसाऱ्यात अधेमधे विखुरलेले काही खास पेशींचे पुंजके एकोणिसाव्या शतकात लँगरहान्स नावाच्या एका जर्मन विद्यार्थ्याला दिसले. त्यांना लँगरहान्सची छोटी बेटं (Islets of Langerhans) असं नाव पडलं. पण ते बेटे काय काम करतात याचा कुणाला गंध नव्हता.
पँक्रियास आणि मधुमेह संबंध लक्षात आला
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला दोन शास्त्रज्ञांनी एका कुत्र्याचा पँक्रियास काढून टाकला. त्यानंतर तो कुत्रा फार आजारी झाला आणि त्याच्या लघवीला मुंग्या आल्या. म्हणजेच त्याला मधुमेह झाला. पराकोटीच्या मधुमेहामुळे शरीरात साठलेली विषं, रक्तात वाढलेली साखर आणि त्या साखरेबरोबर लघवीवाटे झालेला पाण्याचा अतोनात ऱ्हास यांनी तो कुत्रा तीन-चार दिवसांत मेला. त्यावरून पँक्रियासच्या नसण्याचा मधुमेहाच्या असण्याशी असलेला संबंध शास्त्रज्ञांच्या ध्यानात आला आणि त्यांना ती किंकर्तव्यगूढ अशी लँगरहान्सची बेटं आठवली.
आणि इन्सुलिनचा शोध लागला
ती लँगरहान्सची छोटी बेटं काहीतरी रसायन बनवून रक्तात ओतत असावी आणि ते रसायन रक्तातल्या साखरेला आटोक्यात ठेवत असावं अशी अटकळ त्यांनी बांधली. त्यांची अटकळ खरी ठरली. त्या बेटांनी बनवलेल्या रसायनाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो हा उलगडा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाला. लॅटिन भाषेत बेटाला insula असा शब्द आहे. म्हणून त्याने त्या हॉर्मोनचं नाव insulin(इन्सुलिन) ठेवलं.
मधुमेहाचं रहस्य उलगडणारा धागा
ते नुसतं बारसं होतं. मधुमेहाचं रहस्य उलगडणारा महत्त्वाचा धागा हाती लागला होता. तरीही मधुमेहावर उपचार करायला सगळे तीर अंधारातच मारले जात होते. मधुमेहाचे बहुसंख्य रुग्ण मध्यमवयीन, लठ्ठ असतात आणि त्यांचा आजार तसा सौम्य असतो हे आत्ता कुठे पाश्चात्यांच्या लक्षात यायला लागलं होतं. अगदी माफक आहार घेतला, वजन घटवलं तर लघवीतली साखर कमी होते हे दिसून आल्यावर अॅलन नावाच्या डॉक्टरने रुग्णांना जवळ जवळ उपाशीपोटी ठेवायची टूम काढली. लोक कुपोषणाने मेले!
अन् रक्तातली साखर घटली!
सुदैवाने काही संशोधकांनी पँक्रियासवरचे प्रयोग चालू ठेवले होते. ‘इन्सुलिन शोधायचं,’ हा बँटिंग या कॅनेडियन संशोधकाचा अट्टाहास होता. त्याने आणि त्याच्या बेस्ट या सहकाऱ्याने १९२१मध्ये कुत्र्यांवर प्रयोग केले. त्यांनी मार्जरी नावाच्या कुत्रीचा पँक्रियास काढून टाकला. तिला मधुमेह झाला. तिला पँक्रियासच्या अर्काची इंजेक्शनं दिल्यावर तिच्या रक्तातली साखर घटली.
शुद्ध इन्सिलिन तयार झालं
त्या इंजेक्शनांमुळे मार्जरी तब्बल सत्तर दिवस जिवंत राहिली. त्या अर्कातून कॉलिप या जैवरसायनशास्त्रज्ञाने (biochemist) माणसांमध्ये वापरण्याजोगं शुध्द इन्सुलिन बनवलं. पुढच्या वर्षभरातच मधुमेहाच्या पहिल्या रुग्णाला त्या नव्या औषधाचा फायदा झाला. ‘काही तरुण रुग्णांना जगण्यासाठी इन्सुलिन घेणं अत्यावश्यक असतं (मधुमेह प्रकार १) तर बहुतेक मध्यमवयीन रुग्णांचं इन्सुलिनशिवाय चालू शकतं (मधुमेह प्रकार २),’ हे पुढच्या काही वर्षांतल्या अनुभवाने सिध्द झालं. मधुमेहाच्या दोन वेगळ्या प्रकारांची कुणकुण लागली. एका जीवघेण्या आजाराचं एका जन्मभर सोबत करणाऱ्या पण कह्यात ठेवता येणाऱ्या आजारात परिवर्तन झालं.
इन्सुलिनची कार्यक्षमताही वाढत गेली
इन्सुलिन जसजसं अधिक शुध्द होत गेलं तसतशी त्याची कार्यक्षमता वाढत गेली आणि त्याच्या कामाचा वेळ घटत गेला. इंजेक्शन घेतल्याबरोबर ते ताबडतोब उतावीळपणे, जोमाने कामाला लागे. रक्तातली साखर एकदम खाली येई. चक्कर येई. कधी कधी आकडीही येई. म्हणून कोसळलेल्या साखरपातळीची घाम येणं, डबल दिसणं वगैरे लक्षणं जाणवली की काहीतरी खावं लागे. तोवर उतावळ्या इन्सुलिनचा उत्साह ओसरलेला असे. खाल्ल्यावर साखर पुन्हा वर उसळे. साखरेची पातळी समतल ठेवण्यासाठी इन्सुलिनचे छोटे छोटे डोस पुन्हा पुन्हा घ्यावे लागत. इंजेक्शन, आहार आणि बाकीचे दैनंदिन व्यवहार यांची सांगड घालताना रुग्णांची तारांबळ उडे. म्हणून इन्सुलिनचा उतावळेपणा आणि झटकन ओसरणारा आवेश हे दोन दुर्गुण कमी करायचे प्रयत्न झाले. त्याचं काम संयत, संतत, समगतीने चालू राहावं म्हणून डिंक, जिलेटीन, तेल वगैरे अनेक पुष्टरेणू पदार्थांत त्याला जखडून टाकायची निष्फळ धडपड झाली.
