जैन धर्म हा अहिंसा या तत्त्वाचे काटेकोर पालन करतो. इसवी सनपूर्व सहाव्या शतकात बौद्ध धर्माप्रमाणे जैन धर्माचे प्राबल्य वाढीस लागले होते. या दोन्ही धर्मांची जडणघडण उत्तर भारतातच झाली असावी, अशी आपली समजूत असते. परंतु या दोन्ही धर्मांचा दख्खन आणि दक्षिण भारतातील इतिहासदेखील तितकाच रोचक आहे. दख्खनच्या राजकीय, सामाजिक इतिहासातही या दोन्ही धर्मांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दख्खनचा प्रदेश युद्ध आणि वीरांच्या पराक्रमासाठी ओळखला जातो. त्यामुळे या परिसरात जैन धर्माचे प्राबल्य असू शकते यावर फारसा कुणाचा विश्वास बसत नाही. परंतु मध्ययुगीन कालखंडात ५०० हून अधिक वर्षांसाठी या धर्माचे वर्चस्व राहिल्याचे ऐतिहासिक पुराव्यांच्या माध्यमातून सिद्ध होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक उल्लेख केलेल्या ऐतिहासिक चोल साम्राज्याचा इतिहास काय?

का जाणून घ्यावा, दख्खनमधील जैन धर्माचा इतिहास?

एका कन्नड भाषक राजाने इसवी सन ९७५ मध्ये उपवास करून आपल्या गुरूच्या मठात प्राणत्याग केला, त्याचे नाव मारसिंह द्वितीय असे होते. त्याचे राज्य सध्याच्या बंगळुरूजवळ होते. त्याच्या विषयीची माहिती त्याच्या दरबारातील कवीने रचनाबद्ध केलेल्या साहित्यातून मिळते. त्याचे संपूर्ण आयुष्य रणांगणावर गेले. मारसिंहाच्या विस्तारवादी मोहीमा मध्यप्रदेशापर्यंत पोहोचल्या होत्या. आपल्या शत्रूच्या संपूर्ण कुटुंबाला क्रूरतेने संपुष्टात आणण्याचे काम या राजाने केले. इतकेच नाही तर शत्रूच्या मृत्यूनंतर त्यांच्या कवट्या तो गोळा करत असे. इतका रक्तरंजित इतिहास असूनही आयुष्याच्या शेवटी त्याने एक जैन मंदिर उभारले आणि एका जैन मठात स्वेच्छेने प्राणत्यागाचा विधीही केला. मारसिंहाचे राज्य त्याच्या प्राणत्यागानंतर काही दशकांतच संपुष्टात आले. परंतु दख्खनमधील जैन धर्माची परंपरा त्यानंतरही तब्बल ५०० वर्ष तग धरून होती हे विशेष. त्याच निमित्ताने दख्खनमधील जैन परंपरेबद्दल जाणून घेणे माहितीपूर्ण ठरणारे आहे.

या भागात जैन धर्माचा प्रसार का झाला?

मारसिंहाच्या प्राणत्यागापर्यंत जैन धर्माने या भूमीत आपला विस्तार केला होता. किंबहुना हा या भागातील प्राचीन धर्म म्हणूनच तो नावारूपाला आला होता. या प्रदेशातील सर्वात प्रभावी धर्मांपैकी एक अशी या धर्माची ओळख होती. इतिहासकार आर. एन. नंदी हे दख्खनमध्ये प्रसिद्ध असलेल्या धार्मिक पंथांच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत, या भागात इसवी सनाच्या चौथ्या- पाचव्या शतकापासून जैन धर्म अस्तित्त्वात असल्याचे अभिलेखीय पुरावे आहेत, असे नंदी नमूद करतात. तर काही अभ्यासक त्यापूर्वीचे दाखलेही देतात. उत्तरेप्रमाणे दगडात मंदिरे उभारणे, संस्कृतचा वापर करणे यासारख्या प्रथा जैन धर्मात येथेही रूढ झाल्या. या सर्व गोष्टींनी तत्कालीन वनवासींचे कदंब आणि बादामीचे पश्चिम चालुक्य यांसारख्या राजसत्ताना राज्यविस्ताराचे प्रभावी साधन दिले.

अगदी प्रारंभिक कालखंडापासून जैन धर्म हा दक्षिण भारतीय राजवटीचा अविभाज्य भाग होता. बाहुबली, बदामी चालुक्य यांच्या कालखंडात घडवलेल्या वास्तू या जैन स्थापत्याचा अद्वितीय नमुना असल्याचे हंपा नागराजय्या (जैन धर्माचे विद्वान) यांनी नमूद केले आहे. ऐहोळे येथील मेगुती टेकडीवरील जैन मंदिर इसवी सनाच्या सातव्या शतकात पुलकेशी दुसरा याच्या कालखंडात बांधले गेले. याविषयीची माहिती या मंदिराच्या आवारात कोरल्या गेलेल्या अभिलेखातून मिळते. या अभिलेखाचे लेखन पुलकेशी दुसरा याच्या दरबारातील रविकीर्तीने केले आहे. या शिलालेखावरून पुलकेशीच्या राज्यविस्ताराची कल्पना येते.

अधिक वाचा: युनेस्को: जागतिक वारसा यादीत ‘या’ हिंदू मंदिरांचा समावेश… का महत्त्वाची आहेत ही मंदिरे ?

मेगुती टेकडी ही ऐहोळे शहराचा अविभाज्य भाग होती. या भागाला त्यापूर्वीचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. याच ठिकाणी भारतीय इतिहासातील लोहयुगाविषयी माहिती देणारे स्थळही आहे. मेगुती येथील जैन मंदिरातील शिलालेखामुळे जैन धर्म हा तत्कालीन शक्तिशाली राजवंशांशी जोडला गेला होता याची प्रचिती येते. याशिवाय कर्नाटकप्रांती असणारे इतर शिलालेख जैन धर्मियांचे वाराणसी, बंगाल, गुजरात येथून झालेले स्थलांतर दर्शवितात. हे जैनधर्मीयांमधील परस्पर संबंध तत्कालीन राजांना उपयुक्त ठरले होते. एकूणच दख्खन मधील जैन धर्माच्या प्रसारात तत्कालीन राजसत्तांचा हातभार महत्त्वाचा होता.

राजा, युद्ध, हिंसा आणि जैन धर्म

दख्खनच्या जैनांना त्यांची अहिंसक तत्त्वे आणि त्यांना संरक्षण देणारी लष्करी राजकीय व्यवस्था यांच्यातील विरोधाभासाची जाणीव होती, हेच त्यांच्या लिखित साहित्यातून ही समजते. दिगंबर जैन साधू जिनसेन याने लिहिलेले आदिपुराण हे यासाठीचे उदाहरण म्हणून उत्तम ठरू शकते. आपल्या साहित्यातून जैन मुनींनी ही तफावत संतुलित करण्याचा प्रयत्न केला आहे. आदिपुराणाचा अभ्यास इतिहासकार पॉल डंडास याने आपल्या, ‘द दिगंबरा जैन वॉरिअर’ या अध्यायात केले आहे. हा अध्याय ‘द असेम्ब्ली ऑफ लिसनर्स: जैन्स इन सोसायटी’ या ग्रंथाचा भाग आहे.

आदिपुराण हा पौराणिक ग्रंथ भरत आणि बाहुबली (ऋषभनाथांचे पुत्र) यांच्यातील संघर्षाविषयीची माहिती देतो. या ग्रंथात भरत हा विश्वविजेत्याच्या भूमिकेत दर्शवला आहे. तरीही भरताचा विजय त्याच्या वडिलांच्या उत्कटता आणि लोभ यांसारख्या आध्यात्मिक अडथळ्यांवर मात करण्यापेक्षा निकृष्ट असल्याचे दिसून येते. कथेनुसार राज्य करण्याच्या भुकेने ग्रासलेला, भरत बाहुबलीला द्वंद्वयुद्धासाठी आव्हान देतो, परंतु त्याची फसवणूक करतो. तरीही बाहुबली जिंकतो, परंतु त्याच्या विजयाच्या क्षणी त्याला राजसत्तेच्या क्षणभंगुरतेची जाणीव होते आणि तो आपल्या राज्यमोहाचा त्याग करतो. याप्रसंगानंतर शांत झालेला भरत त्याच्या दरबारात येतो आणि आपल्या योद्ध्यांना राज्याच्या कर्तव्यांबद्दल समज देतो.

जिनसेनाने खरा योद्धा कोण याविषयी व्याख्या भरताच्या मुखी दिली आहे. तीर्थंकर ऋषभनाथ यांनी अध्यात्मात येणाऱ्या अडथळ्यांना, शत्रुंना हरवले त्यांचे वंशज हे खरे योध्ये आहेत. या योध्यांनी जैन मुनी, साधक, जैन समाज तसेच इतर प्रजाजनांचे नेहमीच रक्षण करावे. त्यांनी अधिक शक्तिशाली शेजाऱ्यांचा प्रतिकार करू नये परंतु शरण जावे, “कारण युद्ध लोकांसाठी वाईट आहे. याशिवाय जिनसेन हा राजाला आपल्या लेखणीतून सावध करतो. तो सांगतो अक्षर म्लेंछांपासून (अक्षराची ओळख नसलेल्यांपासून) दूर राहावे, जे वैदिक ब्राह्मण वेदापासून दूर आहेत, अधर्माचे वचन सांगून लोकांना फसवतात, हिंसा आणि मांसाहारात करण्यात आनंद मानतात, त्यांच्यापासून दूर राहावे. याउलट, “जैन ब्राह्मण” जे जन्मापेक्षा त्यांच्या चांगल्या गुणांमुळे उत्कृष्ट आहेत, त्यांचा आदर केला पाहिजे. हे विधान किती वादग्रस्त होते? हे आता निश्चितपणे सांगणे कठीण आहे, परंतु स्पष्टपणे, जैन विद्वानांनी हिंदू ब्राह्मणांना प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले, असे इतिहासकारांचे मत आहे.

अधिक वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या राजदंडावर नंदीसोबत लक्ष्मी कशासाठी?

साधू आणि योद्धा

जिनसेनाला राष्ट्रकूट सम्राट अमोघवर्ष पहिला (इसवी सन ८००-८७८) याने राजश्रय दिला होता. राष्ट्रकूटांनी वेरूळ येथील जैन लेणींना देणगी दिली होती. इ.स. ९७५ मध्ये मारसिंह याचे प्राणाचा त्याग केला, मारसिंह दुसरा हा राष्ट्रकूट सम्राटांचा मित्र आणि नातेवाईक होता. युद्ध आणि हिंसेच्या प्रदीर्घ कालखंडानंतर जैन पद्धतीने उपवास करून प्राणत्याग करणारा तो एकमेव राजा नव्हता. या परिसरात आढळणाऱ्या अनेक शिलालेखांवरून तत्कालीन योध्ये, महिला, सामान्य जनांनी जैन पद्धतीने साधना केली. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मुक्तीसाठी इतर श्रद्धांसह जैन साधनाविधी आत्मसात केला जात होता. दख्खनच्या अभिजात लोकांचा असा विश्वास होता की, शूर योद्ध्यांना मृत्यूनंतर अप्सरा स्वर्गात घेऊन जातात. जैन पद्धतीच्या प्राणत्यागाचा संदर्भ १२ व्या शतकातील हरिवंशातून मिळतो. याचे विश्लेषण इतिहासकार षडाक्षरी सेत्तर यांनी ‘पर्स्युइंग डेथ: फिलॉसॉफी आणि प्रॅक्टिस ऑफ व्हॉलंटरी टर्मिनेशन ऑफ लाइफ’ या ग्रंथामध्ये केले आहे. यात महाभारतातील पांडू राजाचा उल्लेख आहे. त्यांनी माद्री बरोबर जैन उपवासाच्या विधींचे आचरण करून प्राणत्याग केला होता. सेत्तर यांनी नमूद केल्याप्रमाणे उपवासाच्या विधींपूर्वी आपल्या आयुष्यात केलेल्या पापांची कबुली द्यावी लागत असे, त्याच कारणामुळे दख्खन प्रांती असणाऱ्या योध्यांना आयुष्यभर केलेल्या रणांगणावरील रक्तपातानंतर जैन धर्मातील मुक्तीचा मार्ग जवळचा वाटत असे. दख्खनमधील जैन परंपरांवर हिंदू धर्माचा प्रभाव आढळतो. तत्कालीन जैन मंदिरामध्ये प्रदक्षिणा पथ आढळतो, काही ठिकाणी मूळ गाभाऱ्यात शिवलिंग तर जैन मूर्तींचे विसर्जन हिंदू देवतांप्रमाणे होत असल्याचे अभिलेखीयदेखील पुरावे आहेत.

एकूणच मध्ययुगीन कालखंडात दख्खनच्या परिसरात जैन धर्माचे प्राबल्य आढळते. यासाठी मुख्यत्त्वे राजसत्ता कारणीभूत असल्याचे दिसते. सततची युद्धे, रक्तपात यांच्या पार्श्वभूमीवर जैन धर्माचा आधार वाटणे साहजिकच होते, असे इतिहासकारांचे मत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of medieval deccan jainism how was the king who killed the enemy and collected his skulls converted what was the nature of medieval jainism svs
Show comments