Explore Ayurvedat Surgery Aahe Ka and how Maharshi Sushrut revolutionized ancient Indian surgery over thousands of years ago: आयुर्वेद म्हटल्यानंतर केवळ औषधी वनस्पती, पंचकर्म आणि काढेच डोळ्यांसमोर येतात; मात्र ‘आयुर्वेदात सर्जरीसुद्धा आहे का?’ असा प्रश्न विचारल्यास अनेकांच्या भुवया उंचावतात. प्रत्यक्षात प्राचीन भारतात महर्षी सुश्रुतांनी शल्यचिकित्सेची भक्कम पायाभरणी केली होती, ज्याचा गौरव आता जागतिक स्तरावर झाला आहे.
प्राचीन भारतामध्ये खरंच सर्जरी अस्तित्वात होती का?
आयुर्वेद म्हटल्यानंतर औषधी वनस्पती, विविध औषधे, पंचकर्म वगैरे गोष्टी मनात येतात, मात्र “आयुर्वेदात सर्जरी सुद्धा आहे”, असे म्हटल्यावर लोकांच्या भुवया उंचावतात. प्रत्यक्षात आयुर्वेद शास्त्र हे आठ वैद्यक-शाखांमध्ये विभागलेले असून, त्यामधील एक शाखा म्हणजे शल्यतंत्र अर्थात सर्जरी. पण तरीही मनात प्रश्न उभा राहतो की, आयुर्वेदामध्ये म्हणजे प्राचीन भारतामध्ये खरंच सर्जरी अस्तित्वात होती का?
भारतामध्ये सर्जरीचा विकास कधी झाला असावा? तर,आदीम भारतामध्ये असलेल्या टोळ्या आणि त्यानंतरच्या प्राचीन भारतामध्ये लहानमोठी अनेक राज्ये, यांच्यामध्ये आपापसांत होणार्या युद्धांमधुन, युद्धांमधील विविध अंगांना होणार्या इजा आणि जखमा यांचा उपचार करण्यासाठी आणि तेव्हाच्या निसर्गाशी जुळलेल्या नित्य जीवनामधील दुखापतींमधूनसुद्धा सर्जरीची आवश्यकता निर्माण झाली असावी. ‘गरजेतून शोध’ या नियमानुसार अगदी जुन्या काळातच भारतामध्ये सर्जरीचा उगम झाला, ज्याचे दर्शन केवळ आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये नाही तर, ऋग्वेदासारख्या आद्य ग्रंथापासून ते व्याकरण, अर्थशास्त्र वगैरे प्राचीन शास्त्रांच्या ग्रंथांमध्ये आणि रामायण, महाभारतासारख्या महाकाव्यांपासून ते हस्तिआयुर्वेदा सारख्या प्राणी-चिकित्सेवरील ग्रंथांमध्येसुद्धा घडते. भारतामधील शल्यतंत्राच्या शाखेचे (सर्जरी-स्कूलचे) प्रवर्तक धन्वन्तरी (काशिराज दिवोदास) असून त्यांचे विद्यार्थी असलेले सुश्रुत हे गुरु धन्वन्तरींच्या अमोघ मार्गदर्शनाने नंतर ‘कुशल शल्यतज्ज्ञ’ (सर्जन) म्हणून जगभर प्रसिद्ध झाले, त्यांनी सर्जरीला आखीव-रेखीव, शास्त्रीय चौकटीत बसवून, नियमबद्ध करुन, एका वैद्यक-शाखेचे रूप देऊन ’सुश्रुतसंहिता’ हा सर्जरीवरील जगातला आद्य ग्रंथ रचला.
सुश्रुतसंहितेचा काळ
इतिहास-संशोधक व भारतीय शास्त्र-अभ्यासक असलेल्या पाश्चात्त्यांनी महर्षी सुश्रुतांच्या काळाविषयी त्यांना मिळालेल्या संदर्भांवरुन वेगवेगळे अंदाज बांधले. त्यातले काही तर पोकळ तर्कावर आधारलेले (आणि कदाचित भारतीय संस्कृतीला प्राचीन व प्रगत मानण्यास विरोध करणारे) असे होते. सुश्रुत नावाच्या एका आचार्यांनी सुश्रुतसंहितेवर इसवी सनाच्या दुसर्या शतकात भाष्य लिहिले त्यावरुन सुश्रुत हे दुसर्या शतकातले असे काही जण मानतात. तर याज्ज्ञ्यवल्क्य स्मृतिमधील मर्मांचे सुश्रुतसंहितेमधील १०७ मर्मांशी असलेल्या साधर्म्यावरुन सुश्रुत हे दुसर्या ते सातव्या शतकातले असे एक गट मानतो. बॉवर मॅन्युस्क्रिप्ट गुप्त ब्राह्मी लिपीमध्ये असल्याने सुश्रुत हे गुप्त सम्राटांच्या काळातले म्हणजे चवथ्या ते पाचव्या शतकातले अशे काहींना वाटते तर, सुश्रुतांनी सांगितलेल्या तंत्रयुक्ती अध्यायाचे कौटिल्याच्या तंत्रयुक्तींशी साधर्म्य म्हणुन सुश्रुत हे कौटिल्य काळातले म्हणजे इसवी सनपूर्व तिसर्या ते दुसर्या शतकातले असे एका गटाला वाटते.

कालखंडाबाबत अनेक गृहितके
कात्यायनाच्या वार्तिक सूत्रांमध्ये सुश्रुतांचा उल्लेख असल्याने सुश्रुत हे इसवीसनपूर्व तिसर्या शतकातले, तर बुद्धांचा सुश्रुतसंहितेमध्ये उल्लेख नसल्याने सुश्रुत बौद्धपूर्व म्हणजे इसवी सनपूर्व सहाव्या ते पाचव्या शतकातले, आणि शतपथ ब्राह्मणामधील अस्थीवर्णनावरुन सुश्रुत हे शतपथ ब्राह्मण काळातले म्हणजे इसवी सनपूर्व सहाव्या शतकातले (वास्तवात शतपथ ब्राह्मणाचा काळ इसवी सनपूर्व ३००० आहे) अशी विविध कालखंडांची गृहिचके आहेत. अथर्ववेदामधील मानवाच्या अस्थी-सांगाड्याचे वर्णन सुश्रुतांच्या अस्थीवर्णनाशी जुळणारे असल्याने सुश्रुतांचा काळ अथर्व वेदाचा म्हणजे इसवीसनपूर्व १००० असल्याचे आणि पाणिनीकृत् व्याकरणाचा आद्य ग्रंथ असलेल्या अष्टाध्यायीमध्ये सुश्रुत-शिष्यांचा उल्लेख असल्याने आणि पाणिनींचा काळ महाभारतपूर्व दोनशे ते तीनशे वर्षे असल्याने तोच काळ सुश्रुतांचा असल्याचे काहींना वाटते.
हस्ति-आयुर्वेद या हत्तींची चिकित्सा करणार्या ग्रंथामधील सर्जरीची शस्त्रे ही सुश्रुतसंहितेनुसार असल्याने व त्याचा लेखक पालकाप्य हा श्रीराम पिता राजा दशरथाचा समकालीन असल्याने आणि रामायणामध्ये सीतेच्या तोंडी मृतगर्भाच्या विच्छेद शस्त्रक्रियेचा संदर्भ असल्यावरुन सुश्रुत रामायणकालीन असल्याचे… असे अनेक दावे संशोधकांनी केले आहेत. यावरुन एक तर निश्चित आहे की, एकंदरच सुश्रुत (किंवा भारतीय सर्जरी) खूप प्राचीन, निदान इसवीसन पूर्व सहाशे वर्षे इतकी जुनी आहे.
सुश्रुतसंहितेविषयी…
सुश्रुतसंहिता एकूण सहा भागांमध्ये विभागलेली असून, आयुर्वेद-शास्त्रामधील विविध विषय १८६ अध्यायांमध्ये आणि ८३०० श्लोकांमध्ये वर्णिलेले आहेत. शल्यतंत्र (सर्जरी) शिकू इच्छिणार्या विद्यार्थ्याचे पात्रता-निकष, सर्जन होण्यासाठी ‘शास्त्राचा अभ्यास आणि शस्त्रकर्मांचा प्रत्यक्ष अनुभव’ या उभय गोष्टींचे महत्त्व, प्रत्यक्ष सर्जरी करण्यापूर्वी शस्त्रकर्मांचा नैसर्गिक घटकांवर सराव, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी शासकाची परवानगी, सर्जिकल एथिक्स (शल्यतंत्रीय नीतिमत्ता) असे काळाच्या कित्येक शतके पुढे असणारे मूलगामी विचार महर्षी सुश्रुतांनी मांडले.
शवविच्छेदनाची पद्धतही सांगितली होती सुश्रुतांनी
सुश्रुत संहितेमध्ये शरीररचनेच्या अभ्यासाचे महत्त्व विशद करुन शवविच्छेदनाची पद्धत सुद्धा सांगितलेली आहे. मानवी शरीराच्या बहुतांश अवयवांशी संबंधित अशा ३०० शस्त्रक्रिया त्यात दिलेल्या आहेत, त्यामध्ये नैसर्गिक प्रसुती करण्याचे उपाय, प्रसुती होत नसल्यास करायचे उदरपाटन कर्म (सिझेरियन सर्जरी), गर्भ मृत झाल्यास करायची शस्त्रक्रिया, मोतिंबिंदू (कॅटरॅक्ट) सकट डोळ्यांच्या अनेक रोगांशी संबंधित विविध शस्त्रकर्मे, दातांसंबंधित शस्त्रकर्मे, मूतखडा काढण्याचे व पोटामध्ये जमलेले पाणी बाहेर काढण्याचे शस्त्रकर्म, कापलेले नाक, कापलेला ओठ जोडण्याची शस्त्रकर्मे, कापलेला कान जोडण्याच्या १३ प्रकारच्या शस्त्रक्रिया, तुटलेले हाड जोडण्याचे उपाय वगैरे शस्त्रकर्मे येतात.
७०० वनस्पतींची ओळख
शस्त्रक्रिया करण्यापूर्वी घ्यायची काळजी, प्रत्यक्ष शस्त्रकर्म कसे करावे आणि शस्त्र कर्मापश्चात घ्यायची दक्षता यांचे साद्यन्त वर्णन आहे.शस्त्रक्रियेमध्ये उपयुक्त अशा १२१ यंत्र व शस्त्रांचे संपूर्ण वर्णन व उपयोग, मानवी आरोग्य बाधित करणार्या ११२० रोगांची नावे, नावांचे अर्थ, रोगांची कारणे- लक्षणे- वर्गीकरण, चिकित्सा- पथ्य-अपथ्य वगैरेचे व्यापक वर्णन, रुग्णतपासणीची शास्त्रीय पद्धत, रोग-चिकित्सेचे सहा टप्पे, चिकित्सेचे प्रकार, विविध रोगांवर उपयुक्त अशा ७०० औषधी वनस्पतींची ओळख- गुण- दोष- रोगनाशकत्व, विषनाशक-चिकित्सा, प्रजनन-चिकित्सा, शरीर-शोधन (पंचकर्म) वगैरे विषयांचे नेमक्या शब्दांत वर्णन केले आहे. एकंदरच मानवी जीवनाशी संबंधित जन्मापासून मृत्युपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर उपयुक्त आणि मानवी आरोग्याशी संबंधित अशा प्रत्येक पैलूचे मार्गदर्शन सुश्रुतसंहितेने केलेले आहे.
सुश्रुतांचा जनमानसावर शतकानुशतके पगडा
सुश्रुतसंहितेचे व महर्षी सुश्रुतांच्या कार्याचे महत्त्व प्राचीन काळापासून भारतीय समाजामध्ये रुजलेले होते. त्याचा पुरावा इसवी सनाच्या पाचव्या शतकामध्ये महर्षी वाग्भटांनी काश्मीरमध्ये रचलेल्या ’अष्टांगहृदय’ या ग्रंथामध्ये या शब्दात आढळतो की “इतर ऋषिंनी लिहिलेले आयुर्वेदाचे ग्रंथ उपलब्ध असूनही लोक चरक आणि सुश्रुत यांचाच अभ्यास का करतात, कारण चरक आणि सुश्रुत हे उत्तम ग्रंथ आहेत.” असाच संदर्भ हर्ष या कवीने १२व्या शतकामध्ये लिहिलेल्या नैषधचरित या महाकाव्यामध्ये सुद्धा आढळतो. सुश्रुत संहिता हा प्राचीन काळापासून भारतामध्येच नव्हे तर जगभरामधील विविध देशांमध्ये सुद्धा सर्जरीवरील प्रमाणग्रंथ म्हणून प्रसिद्ध होता आणि भारतामधील सर्जरीचे ज्ञान इतके विकसित होते की विविध देशांमधील विद्यार्थी ते ज्ञान मिळवण्यासाठी भारतामध्ये येत असत. आद्य ग्रंथ असलेल्या ऋग्वेदामध्येही ज्या नगराचा उल्लेख आहे, ते काशी हे महर्षी सुश्रुतांच्या काळामध्येही (इसवी सनपूर्व सहा हजार वर्षांपूर्वी) विविध विद्यांचे अर्थात सर्जरीचेही केंद्र होते. तक्षशिला (इसवी सनपूर्व दहावे ते सहावे शतक) व नालंदा (इसवी सन पाचवे ते बारावे शतक) ही विद्या केंद्रेसुद्धा जगभर प्रख्यात होती,जिथे भारतीय विद्या व शास्त्रे यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असत. असे असले तरी आधुनिक इतिहास संशोधक व वैद्यक-अभ्यासक ना सुश्रुतांना स्वीकारत होते, ना भारतीय सर्जरीला मान्यता देत होते. मात्र, आयुर्वेद आणि भारतीय शल्यतंत्र (सर्जरी) हे कालातीत सत्य आहे, जे कोणत्या ना कोणत्या मार्गाने जगासमोर येणार होतेच.
चीनच्या वाळूत लपला होता सुश्रुतांचा पुरावा!
१८९० मध्ये प्राचीन रेशीम मार्गावरील (सिल्क रूट) कुचा या चीनमधील क्सिनिजिएन्ग प्रांतामध्ये लेफ्टनंट हॅमिल्टन बॉवर याला एका प्राचीन बौद्ध स्तूपाजवळ वाळूमध्ये दडलेले भूर्जपत्रावरील हस्तलिखित मिळाले. (काही म्हणतात की, त्याने ते रस्त्यावर विकत घेतले.) या हस्तलिखिताचा अभ्यास पुढे कलकत्त्यामध्ये रुडॉल्फ हार्न्ले या संशोधकाने करुन तो ’आयुर्वेदीय औषधे,आयुर्वेदीय चिकित्सा आणि चरक व सुश्रुत यांच्या अस्तित्वाचा ठोस पुरावा’ असल्याचे सिद्ध केले. ’बॉवर मॅन्युस्क्रिप्ट’ हा सुश्रुतांचे अस्तित्व दाखवणारा निश्चित लिखित पुरावा असुनही सुश्रुतांना आपल्याच देशामध्ये तेव्हा राजमान्यता मिळू शकली नाही.
सुश्रुतसंहितेचे जगातल्या विविध भाषांमध्ये भाषांतर
एखाद्या देशामध्ये एखाद्या शास्त्रावरील, त्यातही शल्यतंत्रासारख्या मानवी जीवनामध्ये अत्युपयोगी असा ग्रंथ अतिशय लोकप्रिय होतो, तेव्हा त्याचे जगामधील विविध भाषांमध्ये भाषांतर होणं हे साहजिकच असते. कारण त्या ग्रंथामधील ज्ञान आपल्यालाही मिळावे, उपयोगी पडावे असा प्रयत्न जगभरातील अनेकांचा असतो. ग्रीक सम्राट सिकंदर इसवी सनपूर्व ३२७ ते ३२५ या काळामध्ये काही आयुर्वेदीय चिकित्सक सोबत घेऊन गेल्याचे संदर्भ आढळतात. याशिवाय ग्रीस,अरब वगैरे देशांमधील विविध विद्यार्थी (आणि विद्वानसुद्धा) भारतीय शास्त्रे शिकण्यासाठी अनेक शतके भारतामध्ये येत होते, याचे पुरावे इतिहास- संशोधकांच्या पुस्तकांमध्ये सापडतात. इतकंच नव्हे तर आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जाणारा हिपोक्रेटस सुद्धा भारतामध्ये राहून भारतीय वैद्यकशास्त्र शिकून गेला, असे म्हटले जाते. या विविध मार्गांनी भारतीय सर्जरी इतर देशांमध्ये पसरत गेली. याशिवाय सुश्रुतसंहितेचे थेट भाषांतर करुन ते ज्ञान बाहेर नेण्यात आले.
सहाव्या शतकापासून अनेक भाषांतरे
सुश्रुतसंहितेचे भाषांतर इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून विविध भाषांमध्ये होत आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अरबी भाषेमध्ये भाषांतर सर्वप्रथम इसवीसन ५३१ ते ५७९ मध्ये, त्यानंतर ७५३ ते ७५४ मध्ये आणि त्यानंतर पुन्हा १२०३ ते १२०९ मध्ये असे तीन वेळा करण्यात आले. पर्शियन भाषेमध्ये भाषांतर आठव्या ते दहाव्या शतकामध्ये, लॅटिनमध्ये १२व्या शतकामध्ये आणि १८४४ मध्ये जर्मन भाषेत करण्यात आले. हे निश्चित आहे की सुश्रुतसंहितेची ही भाषांतरेच भारतीय सर्जरीला विविध देशांमध्ये घेऊन गेली. बॉवर मॅन्युस्क्रिप्ट हा तर असा पुरावा आहे, जो भारतामधील विविध विद्या व शास्त्रांप्रमाणेच सुश्रुत आणि भारतीय सर्जरीचा प्रवास भारतामधून सिल्क रूटद्वारे विविध देशांपर्यंत निदान चवथ्या-सहाव्या शतकाआधीपासून होत असावा, हे दाखवतो. एकच ग्रंथ इतक्या भाषांमध्ये अनुवादित होऊन सर्जरीचा प्रसार होण्यास सहाय्यक ठरूनही वैद्यक-जगताने त्याची दखल मात्र घेतली नाही.
सुश्रुतसंहिता:आधुनिक सर्जरीचा पाया
सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमधील भाषांतर अरब राष्ट्रांमधील सर्जरीचा पाया ठरले आणि त्या अरबी ग्रंथांचे पुढे लॅटिनमध्ये झालेले भाषांतर हेच पाश्चिमात्य देशांमध्ये सर्जरीचा विकास होण्यामध्ये पायाभूत ठरले. याविषयी १ मे १९१३ रोजी झालेल्या रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिनच्या सभेमध्ये डॉ. मुथू स्पष्ट म्हणतात की “अरबांनी भारतीयांकडून जे वैद्यकाचे आणि विविध विज्ञानांचे ज्ञान प्राप्त केले, तेच साधारण १७ व्या शतकामध्ये युरोपियन अभ्यासकांकडे मार्गक्रमण करते झाले”. हेसलर या विद्वानाने १८४४ मध्ये सुश्रुतसंहितेचे लॅटीन भाषेमध्ये केलेले भाषांतर हे तर युरोपियन सर्जरीचा पाया ठरले. हे सर्व पुरावे दिसत असुनही सुश्रुतांना, भारतीय सर्जरीला मान्यता का मिळाली नाही?
१२व्या शतकापासुन सुश्रुतसंहितेवरील टीका का बंद झाल्या?
आपल्या देशामध्ये जो ग्रंथ प्रसिद्ध होईल तो मूळ ग्रंथ काळानुरूप लोकांना समजावा, ग्रंथांमधील श्लोकांचे, शब्दांचे नेमके अर्थ समजावे व काळानुरूप त्याचा अर्थ लावता यावा यासाठी विद्वान त्या त्या ग्रंथांवर भाष्य लिहीत असत, ज्याला आयुर्वेदामध्ये ’टीका’ म्हणतात. सुश्रुतसंहिता हा भारतामधील प्राचीन काळापासून अतिशय प्रख्यात ग्रंथ असल्याने त्यावर टीका (भाष्य) लिहिलं जाणं स्वाभाविकच होतं. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते इसवी सनाच्या १२व्या शतकापर्यंत सुश्रुतसंहितेवर लिहिलेल्या १७ टीकांचे संदर्भ आपल्याला आढळतात, ज्या मधील बर्याच टीका काळाच्या ओघात लुप्त झालेल्या आहेत. मात्र, इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की, बाराव्या शतकापासून ते १९ व्या शतकापर्यंत सुश्रुत संहितेवर टीका लिहिलेल्या का आढळत नाहीत?
परकीय आक्रमणांनी भारतीय सर्जरी लुप्त होत गेली
इसवी सन ११९३ च्या मोहम्मद घोरीच्या भारतावरील पहिल्या आक्रमणापासून ते १८५८ मध्ये ब्रिटिशांनी सत्ता बळकावल्यापर्यंतच्या काळातच सुश्रुतसंहितेवर भाष्य लिहिले गेले नाही. हा योगायोग नाही, तर ’परकीय आक्रमणे आणि आक्रमकांचा इथल्या संस्कृतीसह इथल्या शास्त्र-कला-विद्यांचा नाश करण्याचा प्रयत्न’ ही यामागची मुख्य कारणे आहेत. परकीय शासकांच्या काळात भारतीय शास्त्र व विद्या यांना शासनाचा आधार मिळाला नाही, उलट परकियांनी त्यांच्या शास्त्र व विद्यांचा इथे प्रसार करण्याचा प्रयत्न केला; या सगळ्याच्या परिणामी जनमानसामध्येही त्यांचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले. दुसरीकडे सुश्रुतसंहितेवर १२व्या शतकाआधी ज्या टीका लिहिल्या जात होत्या, त्यांचे स्वरूप सुश्रुतांच्या मूळ लेखनावर केलेले भाष्य असेच होते. सर्जरीमध्ये नवीन प्रयोग वा प्रगती होत नव्हती. “मागच्या पानावरुन पुढे चालू” असेच स्वरूप या टीकांचे होते (व आहे).असे का झाले?
भारतीय सर्जरी गायब कशी झाली?
दीर्घ काळापासून (निदान दोन हजार वर्षांपासून) भारतामध्ये सर्जरीमध्ये होणारे संशोधन थांबले होते, ज्याचे महत्त्वाचे कारण अहिंसेचा अतिरेक हे होते. अहिंसा हे तत्त्व कितीही आदर्श वाटले तरी प्रत्यक्ष व्यवहारात त्याला स्थान मिळणे कठीण. अहिंसेच्या अतिरेकाने एकीकडे भारतावर आक्रमणे वाढत गेली आणि दुसरीकडे सर्जरीला तर पायबंदच बसला. ’शस्त्र म्हणजे हिंसा’ असे समीकरण झाल्यावर, त्या तत्त्वाचा इतका अतिरेक झाला की हातात सर्जरीचे शस्त्र धरणे सुद्धा निषिद्ध समजले जाऊ लागले. पुढे समाजाचे नीति-नियम ठरवणाऱ्या स्मृतिग्रंथांनी (साधारण इसवी सनपूर्व ६०० ते इसवी सन १५०० या काळामध्ये) वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून धार्मिक-सामाजिक विषयांना अधिक महत्त्व देऊन शवास स्पर्श करणे सुद्धा पाप समजले. त्यामुळे शवविच्छेदन थांबले. त्यापायी शरीररचनेचा अभ्यास थांबला आणि त्यापरिणामी सर्जरी मागे पडली.
वैचारिक- वैज्ञानिक प्रगती खुंटली
मुळात भारत देश हा वैज्ञानिक वृत्तीचा होता, ज्यामुळे अनेक ज्ञान-विज्ञाने इथे उगमली- बहरली- विकसली. मात्र स्मृति-पुराण काळापासून समाजात वाढत गेलेल्या धार्मिक वर्चस्वामुळे रोगांचा उपचार हा ’औषधे, चिकित्सा, शस्त्रकर्मे वगैरे वैद्यकीय मार्गाने करण्यापेक्षा धर्मगुरुंचे मंत्र व मांत्रिकांचे तंत्र अनुसरण्याकडे समाजाचा कल वाढत गेला. याशिवाय आयुर्वेदातील मूळ ग्रंथ हे देवनिर्मित आहेत, असे समजून त्यांमध्ये बदल करणे, नवीन विचार मांडणे हे निषिद्ध समजले जाऊन वैचारिक- वैज्ञानिक प्रगती खुंटली. याशिवाय भारतीय ज्ञानपरंपरेचे वैशिष्ट्य असलेली गुरु-शिष्य परंपरा ही परकीय आक्रमणे, एतद्देशीय लोकांचा एकीकडे कर्मठपणा आणि दुसरीकडे नाकर्तेपणा यामुळे लोप पावली. परिणामी सुश्रुतसंहितेचे पठन होत राहिले, मात्र गुरुकडून मिळणारे सर्जरीचे प्रत्यक्ष ज्ञान संपुष्टात आले. शासकांच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही शास्त्र-विद्या तग धरु शकत नसल्यानेही बौद्ध काळामध्ये थबकलेली भारतीय सर्जरी, स्मृति-पुराणांच्या काळामध्ये आचके खात, ११व्या शतकानंतर हळुहळू मरणपंथाला लागली. पुढे मुसलमान राजवटीमध्ये युनानीचे आणि ब्रिटिश अमदानीमध्ये ॲलोपॅथिक उपचार पद्धतीचे महत्त्व वाढत गेले आणि आयुर्वेदशास्त्र व भारतीय सर्जरी मृतप्राय झाली.
ब्रिटीश अधिकार्यांचे योगदान
मॅक्समुल्लरने १८८२ मध्ये केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतामध्ये नागरी सेवेमध्ये असलेले विविध इंग्रजी अधिकारी भारतामधील प्राचीन शास्त्र व विद्या यांचा अभ्यास करू लागले. यामध्ये अनेक असे होते, ज्यांनी आयुर्वेदीय ग्रंथांचा अर्थात सुश्रुत संहितेचाही अभ्यास केला. होरेस विल्सन(१८२६-एसेस ऑन संस्कृत लिटरेचर), फ्रॅन्झ हेसलर (१८४४-सुश्रुतसंहितेचा लॅटिनमध्ये अनुवाद), अल्ब्रेक्ट वेबर (१८५२-अकॅडमिक लेक्चर्स ऑन इंडियन लिटरेचर), विलियम जे(१८८४), आर्थर मॅकडोनल (हिस्ट्री ऑफ संस्कृत लिटरेचर-१९००), प्रफुल्लचन्द्र रे (१९०२-हिस्ट्री ऑप्फ़ केमिस्ट्री इन एन्शियन्ट ॲण्ड मेडिएवल इंडिया), रुडॉल्फ हार्न्ले (१९०७-स्टडीज इन द मेडीसीन ऑफ एन्शियन्ट इंडिया), मॅक्स न्यूबर्गर (१९१०-हिस्ट्री ऑफ मेडिसीन), मॅकडोनाल्ड आणि किथ (१९१२-वैदिक इंडेक्स ऑफ नेम्स अँड सब्जेक्ट्स), विलियम ऑसलर (१९१३-द इव्होल्युशन ऑफ मॉडर्न मेडीसीन), गिरिन्द्रनाथ मुखोपाध्याय(१९१३-सर्जिकल इन्स्ट्रुमेन्ट्स ऑफ एन्शियन्ट हिंदूज), सर ब्रजेन्द्रनाथ सील (१९१५-द पॉझिटीव्ह सायन्सेस ऑफ एन्शियन्ट हिंदूज), ए.के.मजुमदार (१९१७-अर्ली हिंदू इंडिया) अशा इंग्लंड, युरोप व भारतामधीलही अनेक संशोधकांनी सुश्रुतांविषयी- सुश्रुतसंहितेविषयी गौरवोद्गार काढून भारतामधील सर्जरीचे महत्व अधोरेखित केले होते. मात्र तेव्हा सुद्धा सुश्रुतांचे महत्त्व वैद्यक-जगताला लक्षात का आले नाही,असा प्रश्न मनात येतो.
सुश्रुतांचे नासा-संधान शस्त्रकर्म बनले र्हायनोप्लास्टी!
७९२ साली पुण्याजवळ टिपू सुलतानाच्या सैनिकांनी नाक कापलेल्या कावसजी नावाच्या घोडागाडी चालकाचे नाक जोडण्याची एका कुंभाराने केलेली यशस्वी शस्त्रक्रिया बघून, थॉमन क्रुसो व जेम्स फिन्ड्ले या इंग्रजी अधिकाऱ्यांनी त्याविषयी लंडनमधील ऑक्टोबर १७९४च्या जेन्टलमेन्स मॅगझिनमध्ये लेख प्रकाशित केला. ज्यामुळे तेव्हा इंग्लंड-युरोपमध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये असलेल्या सर्जरी-जगताला सुश्रुतांच्या प्रगत सर्जरीविषयी माहिती मिळाली. पुढे जोसेप्फ कॉन्स्टन्टीन कार्प या इंग्लिश सर्जनने सुश्रुतांची ही सर्जरी पद्धत भारतामध्ये शिकून १८१४ मध्ये दोन इंग्लिश ऑफिसर्सचे नाक जोडून दाखवले आणि १८१६ मध्ये आपले संशोधन प्रकाशित केले. त्यानंतर सुश्रुतांच्या प्लास्टिक सर्जरी विषयी संपूर्ण जगाला कळले आणि नाकाची ती शस्त्रक्रिया इंडियन र्हायनोप्लास्टी म्हणून ओळखली जाऊ लागली. इथेसुद्धा सुश्रुतांवर अन्याय झालाच. र्हायनोप्लास्टी हा शब्द
र्हायनोस म्हणजे नाक व प्लास्टी म्हणजे जोडणे असा लॅटिन शब्दांनी बनलेला आहे. ज्यामुळे सर्जरीचे विद्यार्थी र्हायनोप्लास्टी शिकताना त्याचा संबंध लॅटीन भाषेशी म्हणजे ग्रीकांशी व पर्यायाने युरोपियन सर्जरीशी जोडणार होते, यामध्ये सुश्रुतांचा कुठे उल्लेखही नव्हता.
असे घडले शवविच्छेदन
सर्जरीमध्ये शरीररचनेचे महत्त्व आणि शरीररचनेच्या अभ्यासामध्ये मध्ये शवविच्छेदनाचे महत्त्व सुश्रुतांनी स्पष्ट शब्दांत मांडले आहे आणि शवविच्छेदनाची पूर्ण पद्धत समजावून सांगितली. मात्र, आजही शवविच्छेदनाचे श्रेय अलेक्झांड्रीयामधील हिरोफिलस (ईसवीसनपूर्व३२५ ते२५५) ला दिले जाते. सुश्रुतांनी केलेल्या शवविच्छेदनाचा कुठे उल्लेखही नाही. भारतामध्ये प्राचीन काळापासून होत असलेल्या मोतिबिंदूच्या ऑपरेशनची पूर्ण पद्धत सुश्रुतसंहितेमध्ये वर्णन केलेली आहे आणि त्याचा संदर्भ एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिका या जगविख्यात ज्ञानकोशाच्या १८७५ ते १८८९ मध्ये प्रकाशित झालेल्या नवव्या आवृत्तीमध्ये आलेला होता. मात्र मागील दिडशे वर्षांत सुश्रुतांच्या त्या ऑपरेशनचा वैद्यक-ग्रंथांमध्ये उल्लेख नाही.
सुश्रुतांच्या सर्जिकल इन्स्ट्रुमेंटवर १९०८ मध्ये शोधनिबंध सादर करणाऱ्या गिरीन्द्रनाथ मुखोपाध्याय यांच्या शोधनिबंधाची प्रशंसा करताना कलकत्ता एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षांनी उद्गार काढले की “हा जो अस्सल भारतीय विषय समोर आला आहे, तो दुर्लक्षित राहणार नाही आणि अभ्यासकांचे लक्ष वेधून घेईल, घ्यायलाच हवे.” सुश्रुत संहितेचे १९१६ मध्ये इंग्रजीमध्ये भाषांतर करणारे कविराज यांनीसुद्धा त्यांच्या मनोगतामध्ये असे म्हटले की “या पानांमुळे आयुर्वेदाच्या प्राचीन प्रतिभेला पुन्हा जागृत करण्यास आणि मानवी विज्ञानाच्या प्रगतीला अंतिम ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी एक पाऊल तरी पुढे नेण्यास हातभार लागावा” या शेकडो वर्षांच्या अपेक्षा स्वातंत्र्यानंतर तरी फलद्रूप होऊन,आयुर्वेदाला आणि भारतीय सर्जरीला शासनाचा आधार मिळेल असे वाटले होते,जे प्रत्यक्षात घडले नाही.त्यामागे काही ज्ञात तर काही अज्ञात अशी अनेक कारणे आहेत.
नाही म्हणायला नेटीव्ह मेडीकल इन्स्टिट्यूट ऑफ कलकत्ता या संस्थेने १८२२ मध्ये आयुर्वेदशास्त्र व पाश्चात्त्य वैद्यकशास्त्र यांचा एकत्रित अभ्यासक्रम १८२२ मध्ये सुरु केला होता, तो १८३५ मध्ये बंद होऊन (किंवा बंद पाडून) केवळ पाश्चात्त्य वैद्यक अभ्यासक्रम शिकवला जाऊ लागला आणि ती संस्था कलकत्ता मेडिकल कॉलेज झाली. असेच देशामध्ये इतरत्र केलेले प्रयत्नसुद्धा हाणून पाडण्यात आले. तसे न होता, ते प्रयत्न यशस्वी होते, तर आज चित्र वेगळे असते. आज भारतीय समाज आधिक्याने आयुर्वेदीय उपचार आणि केवळ आत्ययिक (इमर्जन्सी) स्थितीमध्येच आधुनिक उपचार करत असता, जे चीनमध्ये होत आहे आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी योग्य आहे. १९७० नंतर आयुर्वेदाचा पदवी अभ्यासक्रम सर्वांना उपलब्ध झाल्यावर, विशिष्ट घराण्यांमध्ये व कुटुंबांपर्यंतच मर्यादित राहिलेले आयुर्वेद शास्त्र व आयुर्वेद व्यवसाय,आज २१व्या शतकात विविधांगानी बहरत आहे. तसेच भारतीय सर्जरीबाबत स्वातंत्र्य प्राप्तीनंतर घडले असते, तर सुश्रुतांची सर्जरी आज भारतातच नव्हे तर जगभरात आद्य असुनही प्रचलित अशी सर्जरी असती, दुर्दैवाने तसे घडले नाही.
इंग्रजी भाषांतर
सुश्रुत संहितेचे इंग्रजीमध्ये भाषांतर करून १९६३ मध्ये प्रकाशित करणाऱ्या स्वतः एफआरसीएस सर्जन असलेल्या डॉक्टर जी. डी. सिंगल यांनी त्यांच्या मनोगतामध्ये ही अपेक्षा व्यक्त केली की “सुश्रुत संहितेच्या ज्ञानाच्या अथांग सागरामध्ये आधुनिक सर्जन्सनी बुड्या मारून वैद्यकशास्त्राशी संबंधित रत्न शोधून काढली पाहिजेत”.
५ जानेवारी २०१५ रोजी मुंबई विद्यापीठामध्ये झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये (प्राचीन भारतीय विज्ञान) माझे ‘सुश्रुतांचे आणि प्राचीन भारतीय सर्जरीचे योगदान’ या विषयावर संदर्भासह सादरीकरण झाले होते. दुर्दैवाने त्याचा स्वीकार कमी आणि अव्हेर अधिक झाला आणि टीकाटीप्पणी करुन विषय भलत्याच दिशेने नेण्यात आला.त्या माझ्या व्याख्यानाचेही शेवटचे वाक्य होते,”महर्षि सुश्रुतांना सर्जरीचे जनक म्हणून ओळख देणं, अद्यापही बाकी आहे.”वरील सर्व अभ्यासकांच्या अपेक्षा १९ जून २०२६ रोजी प्रत्यक्षात साकारल्या.
…आणि तो क्षण आला!
१९ जून २०२६ रोजी, एडिनबर्ग येथील ‘द रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’मध्ये एक ऐतिहासिक क्षण साकार झाला; तिथे कॉलेजच्या ऐतिहासिक ‘प्लेफेअर ऑडिटोरियम’मध्ये महर्षी सुश्रुत यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ‘या समारंभास शल्यचिकित्सा, आयुर्वेद, संस्कृत आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ‘सुश्रुता प्रोजेक्ट’ या उपक्रमाचे नेतृत्व करणारे प्रख्यात सर्जन चंद्रा चेरुवू, एडिनबर्गमधील भारताचे राजदूत सिद्धार्थ मलिक; ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ एडिनबर्ग’च्या अध्यक्षा डॉ. क्लेअर मॅकनॉ्ट; कॉलेजचे माजी अध्यक्ष प्राध्यापक रोवन पार्क्स, अनेक आंतरराष्ट्रीय किर्तीचे नामवंत सर्जन्स व आयुर्वेदाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अश्विन सावंत यांचा समावेश होता. भारतीय दूतावासाने या प्रसंगाचे वर्णन “भारताचा प्राचीन वैद्यकीय वारसा, भारत आणि स्कॉटलंड यांच्यातील ऐतिहासिक वैद्यकीय संबंध आणि शल्यचिकित्सा शिक्षणाला चालना देण्यात ‘रॉयल कॉलेज’ची निरंतर भूमिका यांचा उत्सव” अशा शब्दांत केले. अंतिमतः शल्यचिकित्सेचे जनक’ (Father of Surgery) म्हणून मान्यता मिळालेले महर्षी सुश्रुत आता १५०५ मध्ये स्थापन झालेल्या जगातील सर्वात जुन्या शल्यचिकित्सा महाविद्यालयात कायमस्वरूपी विराजमान झाले आहेत.
drashwin15@yahoo.com
