कंगना राणौत सध्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवार आहे. अलीकडेच तिने हिमाचल प्रदेशातील चंबा या शहराला भेट दिली. भरमौर येथील प्रसिद्ध लक्ष्मी नारायण मंदिरात (लच्छमी नाथ का डेरा) जाऊन आशीर्वाद घेतला. या मंदिर संकुलात ८४ मंदिरे असून धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या या मंदिर संकुलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच वेळी तिने धर्मराज मंदिरातही दर्शन घेतले. या मंदिराचे महत्त्व आगळे वेगळे आहे. स्थानिक मान्यतेनुसार मृत्यूनंतर आत्म्यांच्या कर्माचा हिशोब या मंदिरात केला जातो. मंदिराच्या संकुलात धर्मेश्वर महादेव मंदिरदेखील आहे. तसेच त्याच्या शेजारी एक लहानसे चौरसाकृती मंदिर आहे. मृत्यूनंतर आत्मे या मंदिरात न्यायाच्या प्रतीक्षेत एका रांगेत उभे राहतात अशी धारणा आहे. एकूणच या संपूर्ण परिसरात वेगवेगळ्या हिंदू देवी- देवतांना समर्पित ८४ मंदिरे आहे. पौराणिक संदर्भांनुसार जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती देण्याची शक्ती या धार्मिक स्थळात आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. इसवी सनाच्या सातव्या शतकात राजा मेरू वर्माच्या कालखंडात ही मंदिरे बांधण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विषयी जाणून घेणे रंजक ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

प्राचीन भरमौर आणि ८४ योगी

भरमौर हे ठिकाण ब्रह्मपुरा म्हणूनही ओळखले जाते. हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्य आणि प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. भरमौरच्या सभोवतालचा परिसर भगवान शिवांचे निवासस्थान म्हणून ओळखला जातो. इसवी सनाच्या सहाव्या शतकात ब्रह्मपुरा या शहराची स्थापना झाली. परंतु त्यापूर्वी पासूनच या परिसराचे नाव ब्रह्मपुरा असल्याचे मानले जाते. स्थानिक आख्यायिकेनुसार या ठिकाणी ब्राह्मणी (मातृका) देवीचे स्थान होते. देवी आपल्या मुलासह या ठिकाणी एका उद्यानात वास्तव्यास होती. देवीच्या मुलाचा एक पाळीव चकोर होता. एकदा एका शेतकऱ्याने त्या चकोराला मारून टाकले. त्यामुळे तो मुलगा प्रचंड अस्वस्थ झाला आणि त्यातच त्याचाही मृत्यू झाला. यानंतर शोकाकुल देवीने स्वतःला जिवंत गाडून घेतले. परिणामी या तिन्ही आत्म्यांचा या परिसराला त्रास होऊ लागला. त्यामुळे स्थानिकांनी ब्राह्मणी देवीचे मंदिर बांधण्यात आले आणि याच देवीच्या नावावरून या परिसराला ब्रह्मपुरा म्हटले जाते, अशी आख्यायिका आहे.

तर दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार या परिसराचा संबंध ८४ योगींशी आहे. साहिल वर्मनने या प्रदेशात आपली सत्ता स्थापन केल्यानंतर ८४ योगीनीं या परिसराला भेट दिली होती. या भेटीदरम्यान राजाने केलेल्या पाहुणचाराने प्रसन्न होऊन निपुत्रिक राजाला दहा पुत्र देण्याचे वचन दिले. राजाने त्या योगींना भविष्यवाणी पूर्ण होईपर्यंत ब्रह्मपुरात राहण्याची विनंती केली. कालांतराने राजाला दहा मुलगे आणि एक कन्या झाली. कन्येचे नाव चंपावती ठेवण्यात आले आणि चंपावतीच्या नावावरून चंबा नावाचे नव्या राजधानीचे ठिकाण स्थापन करण्यात आले. भरमौरमधील चौरासी मंदिर परिसर याच ८४ योगींच्या सन्मानार्थ बांधला गेल्याचे मानले जाते. या परिसरात लहान-मोठी ८४ मंदिरे आहेत.

शिवाशी असलेला संबंध

या मंदिर संकुलातील एक मंदिर भगवान शिवाला समर्पित केलेले आहे, हे मंदिर मणिमहेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. प्रचलित आख्ययिकेनुसार भगवान शिव या जागेच्या निसर्गसौंदर्याने मंत्रमुग्ध झाले होते. म्हणूनच त्यांनी आपल्या निवासाचे स्थळ म्हणून या जागेची निवड केली. याशिवाय येथील नरसिंह मंदिर देखील विशेष प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या आवारात खोटे बोलणे निषिद्ध आहे. धर्मेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्या बाजूला उभे असलेल्या छोटेखानी मंदिरात आत्म्यांच्या कर्माचा हिशोब होतो अशी आख्यायिका आहे. धर्मेश्वर मंदिरातील एक दरवाजा गुप्त गुहेकडे जातो. पूर्वी या गुहेत गेलेल्या व्यक्ती परत आलेल्या नाहीत, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे आता मंदिर प्रशासनाने गुहेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले आहे. या मंदिर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गूढ आवाज ऐकू येत असल्याचा स्थानिकांचा दावा आहे.

अधिक वाचा: तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निर्णयामुळे भारताने कोको बेटांवरील आपला हक्क गमावला होता का? भाजपाचा दावा किती खरा, किती खोटा?

यमाचे न्यायदान

यम हा काळ, कृतांत, अंतक, प्रेतराज, श्राद्धदेव, पितृपती, यमधर्म, धर्म इ. नावांनी ओळखला जातो. त्याचा एक पाय अधू असतो तर त्याचा रंग हिरवा आणि त्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान केलेली असतात. त्याच्या एका हातात गदा तर दुसऱ्या हातात कालसूत्र नावाचा पाश असतो. रेडा हे त्याचे वाहन आहे. कबूतर व घुबड हे पक्षिदूत आणि प्रत्येकी चार डोळे असलेले दोन कुत्रे हे रक्षक आहेत. त्याची मूर्ती चतुर्भुज असून त्याच्या हातात लेखणी, पुस्तक, कोंबडा व दंड असतो असे वर्णन आ. ह. साळुंखे यांनी मराठी विश्वकोशात केले आहे.

एकूणच हिंदू धर्मात मृत्यूची देवता म्हणून यम ओळखला जातो. अशा या यमाचे देऊळ भरमौर येथे आहे. हे मंदिर धर्मराज किंवा यमराज मंदिर धर्मेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. या मंदिराची ख्याती गूढ यमराज मंदिर अशीही आहे. भरमौर येथील हे मंदिर जगातील न्यायदान करणारे एकमेव मंदिर मानले जाते. हिंदू पौराणिक कथांमध्ये धर्मराज आत्म्यांच्या भवितव्याचा निर्णय घेतात. त्यांच्या कर्मानुसार त्यांचे स्वर्गातील किंवा नरकातील स्थान ठरते. या मंदिरासमोर चित्रगुप्ताचे आसन आणि एक रिकामी खोली आहे, जी चित्रगुप्ताची खोली आहे, असे मानले जाते. चित्रगुप्त मानवाच्या कर्मांची संपूर्ण नोंद ठेवतो आणि कोण स्वर्गात किंवा कोण नरकात जाणार हे ठरवण्यासाठी धर्मराजाला मदत करतो. धर्मराजाच्या मंदिराला लागून असलेल्या छोटेखानी मंदिराला यमाचा दरबार मानले जाते. स्थानिक भाषेत त्याला ‘धाई-पोडी’ म्हणतात. मंदिराच्या खाली मोठी गुहा आहे (उघडलेली नाही) आणि भगवान धर्मराजांनी आत्म्याचे भाग्य ठरवल्यानंतर प्रत्येक मनुष्याचा आत्मा त्या गुहेतून प्रवास करतो अशी स्थानिकांची धारणा आहे. असे मानले जाते की, प्रत्येक आत्मा पुढे जाण्यासाठी धर्मराजाची अंतिम परवानगी घेण्यासाठी येथे उभा असतो, यमराजाने परवानगी दिली की त्याचा पुढला प्रवास सुरु होतो, अशी श्रद्धा आहे. परिसरात लोकप्रिय असलेले हे मंदिर आता कंगणा रणौतच्या भेटीनंतर पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात चर्चेत आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of the famous yamraj temple that the bjp candidate for the mandi lok sabha kangana ranaut visited svs
First published on: 20-04-2024 at 11:52 IST