सायली नाईक
Healthy Home Food Diet : “मी बाहेरचं काहीच खात नाही, फक्त घरचंच जेवतो,” असं सांगून तुम्ही स्वतःला पूर्णपणे निरोगी समजताय का? मुळात, घरचं जेवण म्हणजे ताजं, स्वच्छ आणि आरोग्यदायी, अशीच आपली सर्वसाधारण समजूत असते. त्यामुळे फास्ट फूड किंवा पॅकेज्ड फूड टाळलं की, आपला आहार आपोआप योग्य झाला, असं अनेकांना वाटतं. पण खरंच तसं ते असतं का?

जेवण घरचं, पण संतुलित किती?

मला विचाराल तर ‘घरचं’ आणि ‘संतुलित’ हे दोन समानार्थी शब्द नाहीत. हे खरं की, घरचं जेवण हा नक्कीच उत्तम आहाराचा पाया असू शकतो. मात्र त्यात कोणते पदार्थ आहेत, त्यांचं प्रमाण किती आहे, ते कशा पद्धतीनं तयार केलेले आहेत आणि दिवसभरात शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत आहेत का, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

घरचे जेवण कुठे चुकू शकतं?

आपल्या पारंपरिक ताटात पोळी, भात, भाजी, आमटी किंवा डाळ असते. हे पदार्थ चुकीचे नाहीत. किंवा शरीराला अपायकारकही नाहीत. खरी समस्या अनेकदा ताटातील संतुलनाची, समतोलाची असते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या ताटात दोन-तीन पोळ्या, भरपूर भात, थोडी भाजी आणि अगदी कमी प्रमाणात डाळ असेल, तर ते जेवण पूर्णपणे घरचं असूनही त्यातून प्रथिनं अपेक्षेइतकी मिळणार नाहीत. याचाच अर्थ, घरचं असूनही हे जेवण उपकारक नाही. विशेषतः नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्ती, शारीरिक-मानसिक श्रम घेणारे खेळाडू, वाढत्या वयातील मुलं आणि स्नायूंचे आरोग्य टिकवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी जेवणात प्रथिनांचं योग्य प्रमाण असणं खूप महत्त्वाचं आहे. ते नसेल तर घरचं काय बाहेरचं काय? ती गोळाबेरीज नव्हे, आरोग्याची वजाबाकीच समजावी!

Healthy Home Food balanced diet nutrition plate Marathi | Nutritious home cooked Indian thali health tips | घरचे जेवण संतुलित आहार पोषणमूल्ये | निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहार पद्धती
फक्त सलाड खाण्याचे प्रयोगही काही जण करतात

भाजी खाल्ली, म्हणजे हेल्दी जेवण झालं?

आपल्या काही समजुती असतात. काही गैरसमजसुद्धा. आपण अनेकदा “आज मी भाजी खाल्ली, म्हणजे हेल्दी जेवण झालं” असे मानतो. मात्र शरीराला केवळ एकच पोषक घटक पुरेसा असतो का ? तर नाही. प्रथिनं, कार्बोहायड्रेट्स, पोषक फॅट्स, जीवनसत्त्वं, खनिजं आणि फायबर यांचं योग्य संतुलन शरीराला आवश्यक असतं.

घरचं जेवण आहे, पण तेल किती?

“भाजी घरची आहे” हे चांगले आहे; पण ती किती तेलात बनवली आहे, हा पुढचा प्रश्न आहे. मी तर म्हणेन, तूप किंवा तेल हे आहाराचे शत्रू नाहीत. शरीराला फॅट्सचीही गरज असतेच. मात्र त्याचं प्रमाणही महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे चहामध्ये साखर, रोजची बिस्किटं, फरसाण, नमकीन किंवा गोड पदार्थ हे ‘घरातले’ असले तरी त्यांचा आहारातला वाटा लक्षात घेणं आवश्यक असतं. होत काय की, अनेकदा बाहेरचे खाद्यपदार्थ टाळताना घरात उपलब्ध असलेल्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांचं आपलं सेवन मात्र नियमित सुरू असतं. त्यामुळे फक्त पदार्थ कुठं तयार झालेला आहे यापेक्षा त्याची गुणवत्ता, प्रमाण आणि खाण्याची वारंवारता महत्त्वाची ठरते.

‘हेल्दी’ पदार्थही जास्त प्रमाणात खाल्ले तर?

पोषक आहे म्हणून कोणी हेल्दी पदार्थ भरपेट खात सुटलं तर काय, हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या संदर्भात विचारात घेणं गरजेचं आहे. भात, पोळी, पोहे, उपमा, बटाटा, फळं, सुकामेवा यांसारखे पदार्थ आहाराचा भाग असू शकतात. पण एखादा पदार्थ आरोग्यदायी आहे म्हणून तो कितीही प्रमाणात खाता येईल, असं नाही. आपण नेमकं हेच विसरतो.

भात बंद, पोळी नाही… हा काय प्रकार?

रोजच्या जगण्यात समतोल असेल, तर आयुष्याची गाडी स्मूथली चालत राहते. पण तोल बिघडला की, गाडी बसकण मारते. जनरली अनेकांना टोकाला जाऊन कृती करण्याची खोड असते. पोषक खाण्याबाबतही हे दिसून येतं. म्हणजे, घडतं असं की, डाएटिंगच्या नावाखाली वजन कमी करण्याच्या प्रयत्नात काही जण घरचं जेवण असूनही गरजेपेक्षा खूप कमी खायला लागतात. त्यात भात पूर्ण बंद करणं, पोळी कमी करत करत जवळजवळ बंद करणं किंवा फक्त सॅलड आणि भाजी खाणं असले प्रयोग सुरु होतात. पण आरोग्यदायी आहारावरचे हे योग्य उपाय नव्हेत. मुळात, वजन कमी करणं म्हणजे फक्त कमी खाणं नव्हे; तर शरीराच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात आणि योग्य पोषक घटकांसह खाणं आहे.

व्यक्ती तितक्या खाद्य प्रकृती

प्रत्येकासाठी एकच ताट योग्य नसतं. एका कुटुंबात चार व्यक्ती असतील तर त्यांची पोषणाची गरज एकसारखी असेलच असं नाही. दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या व्यक्तीची ऊर्जा गरज आणि दररोज दोन-तीन तास प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूची गरज नक्कीच वेगळी असते. वाढत्या वयातील मुलाची गरज वेगळी, ज्येष्ठ व्यक्तीची वेगळी आणि गर्भावस्थेतील महिलेची वेगळी असते. म्हणूनच “आमच्या घरात सगळे हेच खातात” हा काही आहार योग्य असल्याचा पुरावा नाही.

खेळाडूंचा आहार प्रशिक्षणानुसार बदलतो

खेळाडूंच्या बाबतीत तर हा मुद्दा आणखी महत्त्वाचा ठरतो. खडतर प्रशिक्षण, शारीरिक- मानसिक- भावनिक क्षमता जोखणारे सामने, सततचे प्रवास, रिकव्हरी आणि शरीराची रचना यानुसार त्यांची ऊर्जा आणि प्रथिनांची गरज बदलू शकते. त्यामुळे सामान्यपणे घरगुती जेवण योग्य असलं तरी त्याचं प्रमाण आणि वेळ त्यांच्या प्रशिक्षणानुसार बदलावं लागू शकतं. इथे अमूक एकच खाण्याचा आग्रह, हट्टाग्रह खेळाडूंच्या खेळावर बेतू शकतो.

मग आपलं ताट कसं असावं?

योग्य प्रमाणात पोषणमूल्य असलेल्या पदार्थांचं ताट हा सर्वात उत्तम पर्याय असतो. ते विसरून मोजक्या काहीच पदार्थांमधल्या कॅलरीज मोजण्याची सवय अनेकांना जडलेली असते. म्हणजे, प्रत्येक वेळी इतकी ग्रॅम आवश्यकता म्हणून तितकाच ग्रॅम एकच एक पदार्थ खाणं अशा पद्धतीने वजनाचा काटा सोबत ठेऊनच ते जगत असतात. या मोजमापात न पडता, पोषक आहारासाठी सुरुवात काही सोप्या प्रश्नांनी करता येते. उदा. माझ्या जेवणात प्रथिनांचा चांगला स्रोत आहे का? भाजी आणि फळांचा पुरेसा समावेश आहे का? माझं धान्याचं प्रमाण माझ्या शारीरिक गरजेनुसार आहे का? तेल, साखर आणि मीठ यांचे प्रमाण योग्य आहे का? दिवसभर माझ्या आहारात पुरेशी विविधता आहे का? मी दिवसभर पुरेसं पाणी पितो का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं आपल्या आहारातल्या अनेक त्रुटी दाखवू शकतात.

दोष घरच्या जेवणाचा नाही

स्वतःच्या या उलटतपासणीचा अर्थ असा अजिबात नाही, की घरचं जेवण चुकीचं आहे. उलट, आपल्या भारतीय घरगुती आहारात अनेक पौष्टिक पर्याय आहेत. यात डाळी, कडधान्यं, भाज्या, फळं, दही, दूध, पनीर, अंडी, मासे, चिकन, तृणधान्यं, सुकामेवा आणि बिया यांचा योग्य वापर करून अत्यंत संतुलित आहार तयार करता येतो. गरज आहे ती, “घरचं आहे म्हणजे हेल्दी” या समजुतीपलीकडे जाण्याची आणि आपल्या शरीराची वास्तविक गरज ओळखण्याची. एरवीसुद्धा आपल्या ताटातल्या प्रत्येक पदार्थाला “चांगला” किंवा “वाईट” असं लेबल लावण्याची खरोखरच गरज नसते. कारण, प्रत्येकाच्या शरीराच्या गरजेनुसार पदार्थ किती प्रमाणात, किती वेळा आणि कोणत्या पदार्थांसोबत खाल्ला जातो, हे पाहणं अधिक महत्त्वाचं असतं.

पोषणमूल्यांचं काय?

शेवटी प्रश्न ‘घरचे की बाहेरचे?’ हा नसतोच मुळी. आरोग्यदायी आहाराची सुरुवात घरापासून होऊ शकते; पण ती फक्त घरच्या स्वयंपाकघरात पदार्थ तयार होण्यापुरती मर्यादित नाही. आपण काय खातो, किती खातो, किती वेळा खातो आणि आपल्या शरीराला त्यातून काय मिळतं, हे चारही प्रश्न महत्त्वाचे ठरतात. म्हणून पुढच्या वेळी कोणी म्हणालं, “माझा आहार तर पूर्णपणे घरचा आहे,” तेव्हा त्यानंतरचा आपला प्रश्न असायला हवा की, “छान! पण तुमच्या ताटात नेमकं काय आहे, ते सांगाल का?” कारण घरचं जेवण हा चांगल्या आहाराचा पाया आहे हे खरंच; पण संतुलित आहारासाठी त्या ताटात योग्य पोषण असणंही तितकंच गरजेचं आहे. ते असलं तरच तुमचा आहार हेल्दी कॅटेगरीत बसतो. अन्यथा हेल्दी असल्याची ती निव्वळ हूल ठरते.