Mastering Home Loan Prepayment and Investment strategies: गृह कर्ज (Home Loan) हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक प्रवास असतो. १५ ते २० वर्षांच्या या प्रवासात कधी पदोन्नती मिळते, तर कधी बोनसच्या रूपाने मोठी रक्कम हाती येते. अशा वेळी ही रक्कम गृह कर्जाच्या खात्यात जमा करून कर्जमुक्त व्हावे की त्याची गुंतवणूक करावी, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
साधकबाधक विचार कसा कराल?
आता बहुतेकजण गृह कर्ज (होम लोन ) घेऊनच नवीन घर विकत घेतात. या कर्जाचा कालावधी साधारणपणे १५ ते २० वर्षे इतका असतो. या दीर्घ कालावधीत आपल्या आर्थिक परिस्थितीत व्यवसाय वाढ, नोकरीतील बदल/ प्रमोशन किंवा वारसा हक्काने मिळालेली एकमूठी रक्कम यामुळे बदल होत असतो व यामुळे आपल्याला गृह कर्जाचा हप्ता वाढविता येऊ शकतो किंवा एकमुठी रक्कम कर्ज खात्यात जमा करून कर्ज पूर्ण चुकते करता येऊ शकते किंवा सध्याचा कर्जाचा हप्ता कमी करून घेता येऊ शकते. तथापि, ही रक्कम होम लोनच्या परतफेडीसाठी वापरावी की, गुंतवणूक करावी असा संभ्रम होत असतो. याचा साधकबाधक विचार कसा करावा याबद्दल आज जाणून घेऊ.
गुंतवणूक करायची की, कर्ज परतफेड?
गुंतवणूक करायची की, कर्ज परतफेड करावयाची याचा निर्णय घेताना खालील बाबी विचारात घेऊनच निर्णय घेणे योग्य असते. रक्कम कर्ज परतफेडीसाठी वापरली तर आपले कर्ज मुदतीपेक्षा कमी कालावधीत चुकते होऊ शकते . यामुळे कर्जावरील द्यावे लागणारे व्याजही कमी होते. उपलब्ध रकमेतून संपूर्ण कर्ज चुकते झाले तर कर्ज मुक्त झाल्याचे समाधान मिळते तसेच पुढे हप्ता भरावा लागणार नसल्याने तेवढी रक्कम दरमहा खर्चासाठी उपलब्ध असल्याने आत्तापर्यंत जी काटकसर करावी लागत होती ती आता करावी लागणार नाही. किंवा सढळ हाताने खर्च करता येऊ शकतो अथवा हातात येणारी वाढीव रक्कम भविष्यातील गरजांसाठी गुंतविता येऊ शकते. कर्ज चुकते झाल्याने जी हप्त्याची रक्कम भरावी लागणार नसते त्यामुळे तुलनेने कमी हप्त्याचे व कमी कालावधीचे कार लोन घेऊन आपली कारची हौस भागविता येते.

उपलब्ध रकमेची गुंतवणूक करण्याचे फायदे
आता आपण कर्ज परतफेड न करता उपलब्ध रकमेची गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत हे पाहू.
सध्या बहुतांश बँका किंवा होम फायनान्स कंपन्यांचे होम लोन साठीचे व्याज दर ७.५ ते ८% च्या दरम्यान आहेत. अशा वेळी जर आपण थोडी जोखीम घेऊन शेअर्स /म्युचुअल फंड किंवा अन्य अपारंपारिक पर्यायात (उदा: इनव्हॉईस डिस्काऊंटिंग, व्हर्चुअल करन्सी, रिअल इस्टेट फंड आदी) दीर्घकालीन उद्देशाने एकरकमी अथवा नियमित (एसआयपी ) गुंतवणूक केल्यास १२ ते १३% रिटर्न मिळवता येतो. याउलट परतफेड केल्याने केवळ ७.५ ते ८% या दराने लागू होणारे व्याज वाचते.
जोखीम घेऊन गुंतवणूक केल्यास
दीर्घकालीन ३.५ ते ४% च्या फरकामुळे अंतिम शिल्लक रक्कम द्याव्या लागणाऱ्या व्याजपेक्षा निश्चितच जास्त असते. तसेच होम लोन परतफेडीचा प्राप्तिकर वाचविण्यासाठी जो उपयोग होतो (८० अंतर्गत मुद्दल परतफेड व सेक्शन २४(ब) अंतर्गत रु. २ लाखापर्यंचे व्याज ) तो लाभ कर्ज रक्कम मुदतपूर्व फेडल्यास मिळत नाही. (ही कर सवलत नवीन कर प्रणाली स्वीकारल्यास मिळत नाही ) नियमित कर्जफेड करून उपलब्ध वाढीव रक्कम वेळोवेळी योग्य ती जोखीम घेऊन गुंतविल्यास कर्ज फेड होत असतानाच आपली गुंतवणूक होत असल्याने कर्ज फेडीची मुदत संपताना आपण कर्जमुक्त तर होतोच शिवाय वेळोवेळी केलेल्या गुंतवणुकीमुळे व त्यावर मिळणाऱ्या रिटर्न मुळे चांगली शिल्लक जमा होते.
तज्ज्ञांचा सल्ला (Expert Verdict)
“जर तुमच्या कर्जाचा व्याजदर ९% पेक्षा कमी असेल आणि तुम्ही दीर्घकालीन (५+ वर्षे) गुंतवणूक करू शकत असाल, तर म्युच्युअल फंड किंवा इक्विटीमधील गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरू शकते. मात्र, तुम्हाला मानसिक शांतता आणि कर्जमुक्त आयुष्य हवे असेल, तर प्रीपेमेंट हा सर्वोत्तम पर्याय आहे.”
फायदेशीर काय याचा आढावा घ्या
एकमुठी परतफेड करताना आपल्याकडे आपत्कालीन गरजांसाठी पुरेशी शिल्लक आहे, याची खात्री करावी तसेच गुंतवणूक करणे व परतफेड करणे यातील काय फायदेशीर आहे याचा आढावा घ्यावा , तसेच आपली इतर कर्ज असल्यास त्यांचा व्याज दर गृह कर्जाच्या तुलनेने जास्त असतो त्यामुळे गृह कर्ज परतफेड करण्याऐवजी जास्त व्याजाची कर्जे परतफेड करणे योग्य असते, या बाबी विचारात घेऊन आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा कारण दोन्हीचे काही फायदे काही तोटे आहेत.
निर्णयामागचे गणित कसे कराल?
तर काही जणांना एकमूठी रक्कम भरणे शक्य नसते, मात्र नोकरीतील बदल/ प्रमोशन किंवा व्यवसाय वाढल्याने उत्पन्नात वाढ झालेली असते; अशा वेळी आपल्या गृह कर्जाच्या मासिक हप्त्यापेक्षा जास्त रक्कम भरणे शक्य असते. अशा वेळी सुद्धा आपला हप्ता वाढवून कर्ज लवकर फेडायचे की, हप्ता तसाच ठेवून कर्ज फिटेपर्यंत नियमित गुंतवणूक करावयाची याबाबत सुद्धा संभ्रम असू शकतो. अशा वेळी सुद्धा वरील प्रमाणे कर्जावरील व्याज दर व गुंतवणुकीतून मिळणारा परतवा (रिटर्न ) विचारात घेऊन निर्णय घ्यावा. उदा: सध्या आपले रु. एक कोटीचे ८% व्याजाचे २० वर्षे मुदतीचे गृह कर्ज आहे व त्याचा रु.८३६५० इतका मासिक हप्ता आहे. व अजून कर्जाची मदत १५ वर्षे आहे. आता आपले उत्पन्न वाढल्यामुळे रु.१,५०,००० दरमहा भरणे शक्य आहे आणि आपण मार्केट जोखीम घेण्यास तयार असाल तर सध्याचा हप्ता तसाच ठेवून पुढील १५ वर्षे दरमहा रु. ६३६५० ची इक्विटी म्युचुअल फंडात एसआयपी केल्यास सरासरी १२% इतका रिटर्न मिळू शकतो व या गुंतवणुकीमुळे १५ वर्षानंतर रु. ३.२५ कोटी ते ३.५० कोटी इतकी रक्कम जमा होऊ शकते. यामुळे कर्ज फिटताना आपल्याकडे चांगली रक्कम असू शकते, जी आपल्याला सेवानिवृत्तीनंतर निश्चित उपयोगी पडू शकते.
