Home Remedies for Phlegm: आजूबाजूला वाढतं प्रदूषण, अनियमित हवामान यामुळे सध्या कधीही सर्दी-पडशाचा त्रास होतो. हा त्रास इतका नेहमीचा झाला आहे की, सारखं सारखं डॉक्टरकडे का जायचं हा विचारकरून आपल्यापैकी अनेक जण घरघुती उपायांवरच भर देतात. सर्दी, खोकला किंवा छातीत कफ साचल्यावर गरम पाण्याची वाफ घेण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. काही जण वाफ घेताना पाण्यात निलगिरीचे तेल किंवा इतर औषधी पदार्थही टाकतात. वाफ घेतल्यानंतर नाक मोकळे झाल्यासारखे वाटते आणि श्वास घेणे काहीसे सोपे होते, असा अनेकांचा अनुभव असतो. त्यामुळे गरम पाण्याची वाफ घेतल्याने फुप्फुसांमध्ये साचलेला कफ विरघळून बाहेर पडतो, असाही समज प्रचलित आहे. मात्र, ही घेतलेली वाफ खरोखरच फुप्फुसां
पर्यंत पोहोचते का? तिच्यामुळे छातीत साचलेला कफ बाहेर पडतो का? याविषयी वैज्ञानिक संशोधन काय सांगते, ते जाणून घेऊया.
फुप्फुसांमध्ये कफ का तयार होतो?
आपल्या श्वसनमार्गाच्या आतील भागात श्लेष्मा (Mucus) नावाचा चिकट पदार्थ नैसर्गिकरीत्या तयार होत असतो. श्वासावाटे शरीरात प्रवेश करणारे धुळीचे कण, सूक्ष्मजीव आणि इतर हानिकारक घटक अडकवून ठेवण्याचे काम हा श्लेष्मा करतो. श्वसनमार्गातील सूक्ष्म केसांसारख्या रचनांना सिलिया (Cilia) म्हणतात, सिलिया हा श्लेष्मा घशाच्या दिशेने हलवण्यास मदत करतात. मात्र, श्वसनमार्गाला संसर्ग झाल्यास किंवा दाह निर्माण झाल्यास श्लेष्माचे प्रमाण वाढू शकते. काही वेळा तो अधिक घट्ट होतो आणि खोकल्याद्वारे बाहेर पडतो. यालाच आपण सामान्यतः कफ म्हणतो.
गरम पाण्याची वाफ घेतल्याने कफ बाहेर पडतो का?
गरम पाण्याची वाफ घेतल्याने नाक आणि घशातील कोरडेपणा कमी झाल्यासारखा वाटू शकतो. काही व्यक्तींना त्यामुळे तात्पुरता आरामही मिळतो. मात्र, नाक मोकळे होणे आणि फुप्फुसांमधील कफ बाहेर पडणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. श्वासावाटे आत घेतलेली गरम, आर्द्र हवा श्वसनमार्गातून जाताना थंड होते. त्यामुळे घरच्या घरी घेतलेली वाफ फुप्फुसांच्या खोलवर पोहोचून तेथील कफ विरघळवते, असे मानणे योग्य नाही. वाफेमुळे छातीतील कफ बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते, हे सिद्ध करणारे पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.
वाफ घेण्याबाबत वैज्ञानिक संशोधन काय सांगते?
२०१७ साली ‘कोक्रेन डेटाबेस ऑफ सिस्टिमॅटिक रिव्ह्यूज’मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात सर्दीच्या उपचारांसाठी गरम आणि आर्द्र हवेच्या वापराचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी ३८७ सहभागींचे सहा नियंत्रित चाचण्यांचे विश्लेषण केले. या चाचण्यांमध्ये विशेष उपकरणाद्वारे गरम आणि आर्द्र हवा देण्यात आली होती. काही अभ्यासांमध्ये सर्दीच्या लक्षणांमध्ये सुधारणा दिसून आली, तर इतर अभ्यासांमध्ये लक्षणीय फायदा आढळला नाही.
वाफ नाक व घशाचा कोरडेपणा कमी करत
“वाफ घेतल्याने तात्पुरते नाक मोकळे झाल्यासारखे वाटते, पण त्यामुळे फुप्फुसांतील खोलवर साचलेला कफ विरघळतो किंवा फुफ्फुसे स्वच्छ होतात, हे सिद्ध करणारे ठोस वैद्यकीय पुरावे नाहीत. वाफ केवळ वरच्या श्वसनमार्गातील (नाक आणि घसा) कोरडेपणा कमी करते.”
डॉ. संदीप नायर (BLK-Max हॉस्पिटल, दिल्ली/blkmaxhospital.com)
वाफ घेतल्याने सर्दीचे विषाणू नष्ट होतात का?
गरम पाण्याची वाफ घेतल्याने श्वसनमार्गातील विषाणू नष्ट होतात, असाही एक समज आहे. मात्र, प्रयोगशाळेत उच्च तापमानाचा विषाणूंवर होणारा परिणाम आणि मानवी शरीरात वाफ घेतल्यानंतर होणारा परिणाम यांमध्ये फरक आढळला. कोक्रेनच्या संशोधनातील एका चाचणीत गरम आणि आर्द्र हवा दिल्यानंतरही नाकातील स्रावामधील रायनो व्हायरसच्या प्रमाणात लक्षणीय घट आढळली नाही. त्यामुळे वाफ घेणे हा सर्दीचे विषाणू नष्ट करण्याचा सिद्ध उपाय नाही.
गरम पाण्याची वाफ घेणे, धोकादायक ठरू शकते का?
गरम पाण्याची वाफ घेणे हा साधा घरगुती उपाय वाटत असला, तरी त्यामध्ये काही धोके आहेत. उकळत्या पाण्याच्या भांड्यावर चेहरा धरून वाफ घेताना पाणी अंगावर सांडल्यास गंभीर स्वरूपाच्या भाजण्याच्या जखमा होऊ शकतात. विशेषतः लहान मुलांमध्ये हा धोका अधिक असतो. ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने (NHS) आणि ब्रिटिश बर्न असोसिएशनने नोव्हेंबर २०२५ मध्ये यासंदर्भात सार्वजनिक इशारा दिला होता. वाफ घेण्यामुळे सर्दी लवकर बरी होते, याचे ठोस पुरावे नसताना गरम पाण्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
वाफ नको, द्रवपदार्थ प्या
“उकळत्या पाण्याच्या भांड्यावरून वाफ घेताना अपघात होऊन चेहरा आणि छाती भाजण्याचा धोका असतो. वाफेचा फुप्फुसांतील कफावर थेट परिणाम होत नाही. त्यामुळे कफ बाहेर काढण्यासाठी वाफेवर अवलंबून न राहता भरपूर द्रवपदार्थ प्यावेत आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा” असा सल्ला डॉ. जेरेमी यारो (बर्न स्पेशलिस्ट) यांनी blkmaxhospital.com या संकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखात दिला आहे.
मग छातीत साचलेला कफ बाहेर काढण्यासाठी काय करावे?
छातीत कफ साचल्यास त्यामागील कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. सामान्य सर्दी किंवा तीव्र ब्राँकायटिसमुळे कफ तयार होत असल्यास पुरेशी विश्रांती घेणे आणि पाणी व इतर द्रवपदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन करणे उपयुक्त ठरू शकते. अमेरिकन लंग असोसिएशनच्या संशोधनानुसार, पुरेसे पाणी प्यायल्याने छातीत साचलेला कफ पातळ होण्यास मदत होऊ शकते. नाक बंद झाल्यास सलाइन नेझल स्प्रेचाही वापर करता येतो. मात्र, दम्याचा त्रास, न्यूमोनिया किंवा फुप्फुसांचा वा इतर आजार असल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहणे योग्य नाही.
कफ झाल्यास डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
सर्दीमुळे होणारा खोकला अनेकदा काही दिवसांत कमी होऊ लागतो. मात्र, तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला टिकून राहिल्यास, कफातून रक्त पडल्यास, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा ताप पाच दिवसांपेक्षा जास्त काळ टिकल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तीव्र श्वसनाचा त्रास किंवा छातीत सतत वेदना होत असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. अशा परिस्थितीत वाफ घेऊन लक्षणे कमी होण्याची वाट पाहणे धोकादायक ठरू शकते.
गरम पाण्याची वाफ घेतल्याने काही व्यक्तींना नाक मोकळे झाल्यासारखे वाटू शकते. मात्र, त्यामुळे फुप्फुसांमधील कफ बाहेर पडतो किंवा फुफ्फुसे स्वच्छ होतात, असे सिद्ध झालेले नाही. उलट, उकळत्या पाण्याच्या भांड्यातून वाफ घेताना भाजण्याचा धोका असतो. त्यामुळे कफाचा त्रास होत असल्यास त्यामागील कारण ओळखून योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
