अनेक प्राण्यांच्या प्रजाती नैसर्गिकरीत्या रासायनिक विषारी पदार्थ तयार करतात. शिकार करण्यासाठी, स्वरक्षणासाठी किंवा भक्षकांपासून बचाव करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. विविध प्रजातींचे साप, बेडूक, काही कीटक, मासे विषारी असतात. मात्र आधुनिक जीवशास्त्रात बहुतेक जणांची, पक्षी विषारी नसावेत असा एक व्यापक समज होता. तो पक्षीशास्त्रज्ञांनी खोडून काढला. न्यू गिनीमध्ये आढळणारा ‘हुडेड पिटोहुई’ हा जगातील सर्वाधिक विषारी पक्षी असल्याचा दावा पक्षीशास्त्रज्ञांनी केला आहे. या ‘जहरी खग’विषयी…

‘हुडेड पिटोहुई’चा शोध कधी लागला?

विज्ञानाला ज्ञात असलेल्या पहिल्या विषारी पक्ष्याचा शोध १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धात पक्षीशास्त्रज्ञ जॅक डम्बाचर यांनी फील्डवर्क करताना लावला. या पक्ष्यांना हाताळताना डम्बाचर यांना त्यामध्ये काहीतरी विचित्र जाणवले. पक्ष्याच्या चोचीला व डोळ्यांना स्पर्श केल्यानंतर सतत अस्वस्थ वाटत असे. कालांतराने डम्पाचर यांच्या लक्षात आले की पक्ष्याच्या पंखांना किंवा त्वचेला स्पर्श केल्यास मुंग्या येणे, सुन्न होणे आणि जळजळ होत आहे. या पक्ष्याचे स्थानिक नाव ‘हुडेड पिटोहुई’ होते आणि स्थानिक लोकांनी हा पक्षी अखाद्य असल्याचा इशारा दिला होता. डम्बाचर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या पक्ष्यावर संशोधन केले आणि १९९२ मध्ये त्यावरील अभ्यास प्रकाशित केला. हुडेड पिटोहुईच्या त्वचेत आणि पंखांमध्ये बॅट्राकोटॉक्सिन (Batrachotoxin) नावाचे न्यूरोटॉक्सिन असते, जे विषारी बेडकांमध्ये आढळते. मानवासाठी विषारी असलेल्या पक्ष्यांच्या प्रजातीचे हे पहिले सत्यापित प्रकरण होते.

संपर्कात आल्यावर काय परिणाम?

बॅट्राकोटॉक्सिन हे एक अत्यंत शक्तिशाली न्यूरोटॉक्सिन आहे, जे मज्जासंस्थेवर परिणाम करू शकते. दक्षिण अमेरिकेतील विषारी बेडकांमध्ये आणि काही कीटकांमध्ये ते आढळते. या विषाचा त्वचेला स्पर्श झाल्यास किंवा शरीरात गेल्यास स्नायूंना तात्काळ त्रास देऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मानवांमध्ये या रसायनाचा थोड्या प्रमाणात संपर्क आल्यास सामान्यतः सुन्नपणा, मुंग्या येणे आणि जळजळ होण्याची शक्यता असते. अधिक प्रमाणात या विषाचा संपर्क झाल्यास पक्षाघातही येऊ शकतो. मात्र महत्त्वाचा फरक म्हणजे विषारी साप किंवा कीटकांप्रमाणे हा पक्षी डंख मारत नाही. केवळ त्याच्या संपर्कात आल्यानंतरच विषाचे परिणाम दिसून येतात.

हुडेड पिटोहुई विष कसे मिळवतो?

डम्बाचर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २००४ मध्ये पीएनएएस मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात पिटोहुईच्या विषारीपणाबद्दल सांगितलेल्या सर्वात महत्त्वाच्या निष्कर्षांपैकी एक म्हणजे पिटोहुई स्वतःहून बॅट्राकोटॉक्सिनचे संश्लेषण करत नाहीत. हे विष प्रत्यक्षात आहाराद्वारे, सिक्वेस्ट्रेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेद्वारे प्राप्त होते. आपल्या आहारातून विशेषत: विषारी किड्यांना खाऊन हा पक्षी हे विष मिळवतो. मेलिरीड बीटल (कोरेसिन) हा भृंग प्रकारातील किडा हा पिटोहुईचा विषाचा मुख्य स्रोत आहे. या किड्यामध्ये बॅट्राकोटॉक्सिन असतात आणि पिटोहुई ते नियमितपणे खातात, असे डम्बाचर यांनी सांगितले. विषारी डार्ट बेडकांमध्येही हाच विषाचा स्रोत असतो, असेही त्यांनी सांगितले.

पक्ष्याला विषबाधा का होत नाही?

बॅट्राकोटॉक्सिन या शक्तिशाली न्यूरोटॉक्सिनच्या संपर्कातही पिटोहुई कसा टिकू शकतो यावर पक्षीतज्ज्ञांनी संशोधन केले. याचे उत्तर पिटोहुईच्या सुधारित सोडियम संयुगामध्ये त्यांनी शोधले, जे शेवटी बॅट्राकोटॉक्सिनची त्यांची संवेदनशीलता कमी करते. ‘जर्नल ऑफ केमिकल इकॉलॉजी’च्या संशोधनात नमूद केल्याप्रमाणे, विषारी डार्ट बेडूक आणि काही विष-प्रतिरोधक सापांमध्ये अशाच प्रकारच्या प्रतिकार यंत्रणा स्वतंत्रपणे विकसित झाल्या आहेत. जरी हे बदल विषाचे परिणाम पूर्णपणे काढून टाकत नसले तरी, मज्जातंतू सिग्नलिंगमध्ये घातक व्यत्यय टाळण्यासाठी ते त्याचे बंधन पुरेसे कमी करतात.