पर्शियन आखात आणि ओमानचे आखात यांना जोडणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीची इराणने नाकेबंदी इराणने केल्यामुळे भारतासह अनेक देशांसमोर ऊर्जा संकट विक्राळ बनले आहे. या सामुद्रधनीतून आशियाई देशांचे ८० ते ९० टक्के खनिज तेल आणि ६० ते ७० टक्के एलपीजी आणि एलएनजी मार्गस्थ होते. तो प्रवाह पूर्ण ठप्प झाला आहे. इतक्यात कोंडी फुटण्याची शक्यताही नाही. पण या बरोबरीने आणखी एका ऊर्जा व व्यापारमार्गाची कोंडी होण्याची दाट चिन्हे आहेत. लाल समुद्रात एडनजवळ बाब एल मंडेब सामुद्रधुनीवर हुथी बंडखोरांनी हल्ले सुरू केले असून त्यामुळे इंधनमार्गाबरोबरच व्यापारी मार्गही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. भारतासाठी ही बाब अधिक डोकेदुखीची ठरू शकते.
बाब एल मंडेब सामुद्रधुनी कुठे?
लाल समुद्र आणि एडनचे आखात यांना जोडणारा चिंचोळा समुद्रमार्ग म्हणजेच बाब एल मंडेब सामुद्रधुनी. अरबी भाषेत बाब एल मंडेबचा अर्थ अश्रूंचे द्वार! या मार्गाची लांबी १०० किलोमीटर असून किमान रुंदी ३० किलोमीटर आहे. सौदी अरेबियाच्या यांबू बंदरातून या मार्गातून मोठ्या प्रमाणात खनिज तेल मार्गस्थ होते. होर्मुझ सामुद्रधुमीची इराणकडून नाकेबंदी झाल्यामुळे सौदी अरेबियाने त्यांच्या पश्चिम सीमेवरील या बंदरातून तेल पाठवण्यास सुरुवात केली आहे. पण यांबूवर गेल्या आठवड्यात इराणने क्षेपणास्त्र डागले होते. या सामुद्रधुनीच्या एकीकडे येमेन आहे आणि दुसऱ्या बाजूस जिबुती आणि इरिट्रिया हे आफ्रिकी देश येतात. अरेबियन द्वीपकल्प आणि हॉर्न ऑफ आफ्रिका नावाने ओळखले जाणारे आफ्रिका खंडाचे ईशान्येकडील टोक यांच्या बेचक्यात हा समुद्रमार्ग येतो. या सामुद्रधुनीतून लाल समुद्र आणि सुएझ कालव्याच्या माध्यमातून भूमध्य समुद्र गाठता येतो. त्यामुळे आशिया आणि युरोप यांना जोडणारा अत्यंत मोक्याचा व्यापारी मार्ग या सामुद्रधुनीतून जातो. यासाठी युरोपहून येताना आफ्रिकेला वळसा घालून आशियाकडे येण्याची गरज भासत नाही. येथून तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू असते.
हा मार्ग धोकादायक का ठरतोय?
इराणने युद्धाच्या पहिल्याच आठवड्यात यांबू बंदरावर हल्ला केल्यामुळे सौदी अरेबियाच्या दुसऱ्या मोठ्या बंदरातून होणाऱ्या तेल वाहतुकीवर मर्यादा आल्या होत्या. नंतरच्या काळात इराणने येथे हल्ले केले नाहीत. त्यामुळे किमान येथून तरी तेलाची वाहतूक सुरळीत होईल असे वाटत होते. पण इराणच्या खार्ग बेटावरील तेलसाठ्यांवर अमेरिकेने हल्ले केल्यामुळे इराणने होर्मुझ व्यतिरिक्त इतरत्र हल्ल्यांची धमकी दिली आहे. तसे झाल्यास बाब एल मंडेब सामुद्रधुनी इराणी क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात येऊ शकते. इराणशी निष्ठा जाहीर केलेल्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र डागले, तसेच आणखी दोन क्षेपणास्त्रेही डागली. इस्रायल-हमास संघर्षादरम्यान हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील याच मार्गाला लक्ष्य केले होते. त्यामुळे येथील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ही सामुद्रधुनी येमेनच्या सागरी हद्दीत येते. यादवीग्रस्त येमेच्या निम्म्याहून अधिक भागावर हुथींचे नियंत्रण आहे. त्यामुळे लाल समुद्राचा काही भाग आणि संपूर्ण बाब एल मंडेब सामुद्रधुनी हुथींच्या माऱ्याच्या टप्प्यात येते. इराणशी वाटाघाटी करून होर्मुझमधील वाहतूक सुकर होऊ शकते. पण हुथींशी तशा स्वरूपाच्या वाटाघाटी शक्यच नाहीत.
हेझबोला, हुथी अजूनही सक्रिय?
इराणच्या ‘अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सशस्त्र बंडखोरांमध्ये हेझबोला, हुथी आणि काही प्रमाणात हमास ही नावे प्रामुख्याने घेतली जातात. हेझबोला आणि हमासच्या नेतृत्वाचा निःपात झाल्याची घोषणा गेल्या वर्षी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी केली होती. मात्र ती वस्तुस्थितीस धरून नसल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. इराण अडचणीत असल्याचे दिसल्यानंतर प्रथम हेझबोला आणि आता हुथी सक्रिय झाले आहेत. पण हेझबोलाचा धोका केवळ उत्तर इस्रायलपुरता सीमित आहे. तर हुथींचा धोका एका मोठ्या व्यापारमार्गाला असल्यामुळे त्यांचे उपद्रवमूल्य कितीतरी अधिक आहे.
हुथींचा धोका किती गंभीर?
होर्मुझमधून प्रामुख्याने तेल आणि एलएनजीची वाहतूक होते. तर बाब एल मंडेबमधून एलएनजी, खनिज तेल, खते, कृषीमाल, कोळसा, लोखंड, तयार वस्तू यांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. होर्मुझ हा प्रामुख्याने इंधनमार्ग आहे, तर बाब एल मंडेब हा महत्त्वाचा व्यापारमार्ग आहे. हुथींनी या भागात गेली काही वर्षे दहशत निर्माण केली आहेत. सन २०२३च्या अखेरीस ते २०२५च्या सुरुवातीच्या काळापर्यंत हुथींनी या भागात व्यापारी जहाजांवर १००हून अधिक हल्ले केल्याचे आकडेवारी सांगते. हुथींकडे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे मुबलक आहेत. इस्रायलने दोन-तीन वेळा येमेनमधील त्यांच्या तळांवर हल्ले केले, पण यातून हुथी पराभूत झाले नाहीत. या धोकादायक परिस्थितीमुळे जहाजांचा जोखीम विमा खर्च प्रचंड वाढतो. इस्रायल आणि हमासमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर या भागातील जहाजवाहतूक हळूहळू वाढत होती. त्यात आता या युद्धाने पुन्हा खंड पडण्याची चिन्हे आहेत.
