Iran war impact on India internet connectivity : अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडणारा हा चिंचोळा जलमार्ग सध्या जागतिक चिंतेचा विषय ठरत आहे. जगभरातील अनेक देशांना या जलमार्गातूनच कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. याच सामुद्रधुनीच्या तळातून जागतिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा कणा असलेल्या सबमरीन फायबर-ऑप्टिक केबल्सचे दाट जाळे पसरलेले आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे समुद्राखालील पायाभूत सुविधांना धक्का लागल्यास भारतात इंटरनेट वापरण्यास मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्याविषयीचा हा आढावा…
इंटरनेट कॉरिडॉर काय आहे?
भारताला युरोप, पश्चिम आशिया आणि इतर जागतिक डिजिटल केंद्रांशी जोडणारे अनेक इंटरनेट केबल्स जलमार्गातून विस्तारलेले आहेत. आजही अनेकांचा असा समज आहे की- आपल्या मोबाईलला मिळणारे इंटरनेट हे सॅटेलाईटद्वारे चालते; परंतु तसे अजिबात नाही. जगभरातील अनेक देशांना उपग्रहांऐवजी समुद्राच्या तळाखाली टाकलेल्या फायबर-ऑप्टिक केबल्सद्वारे इंटरनेटचा पुरवठा होता. यामध्ये हॉर्मुझच्या सामुद्रधुनीखालील भाग हा जगातील सर्वात महत्त्वाचा इंटरनेट कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. आपण पाठवलेले ईमेल, ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, क्लाउड सर्व्हिसेस, स्ट्रीमिंग कंटेंट आणि आंतरराष्ट्रीय डिजिटल व्यवहार हे सर्व या समुद्राखालून गेलेल्या केबल्सवर अवलंबून असतात. उपग्रहांच्या तुलनेत या केबल्स अत्यंत वेगाने आणि मोठ्या प्रमाणात डेटा वाहून नेण्याची क्षमता ठेवतात.
हॉर्मुझची सामुद्रधुनीच का महत्त्वाची?
होर्मुझ सामुद्रधुनीचा परिसर दक्षिण आशिया, पश्चिम आशिया आणि युरोपला जोडणाऱ्या समुद्राखालील केबल्ससाठी महत्त्वाचा ट्रान्झिट मार्ग मानला जातो. या प्रदेशाच्या भौगोलिक रचनेमुळे अनेक केबल नेटवर्क अतिशय अरुंद समुद्री भागात एकत्र येतात. त्यामुळे जगातील महत्त्वाच्या डिजिटल डेटा मार्गांचे मोठे केंद्र येथे तयार झाले आहे. आशियातील डेटा सेंटर्सना युरोपियन आणि पश्चिम आशियाई नेटवर्कशी जोडण्यासाठी हा मार्ग सर्वात कमी अंतराचा आणि वेगवान मानला जातो. त्यामुळेच जर या भागात कोणतीही युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम थेट इंटरनेटच्या वेगावर होऊ शकतो.
आणखी वाचा : एआयमुळे कोणाच्या नोकऱ्या सर्वाधिक धोक्यात? नवीन अभ्यास काय सांगतो? अँथ्रोपिकचा इशारा काय?
भारताला या मार्गातून इंटरनेट कसे मिळते?
मध्यपूर्वेतील वाढता तणाव भारताच्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय इंटरनेट ट्रॅफिकचा एक मोठा हिस्सा अरबी समुद्र आणि आखाती प्रदेशातील केबल प्रणालीद्वारे पश्चिमेकडे युरोपपर्यंत जातो. तज्ज्ञांच्या मते, भारताचा पश्चिमेकडील सुमारे एक-तृतीयांश डेटा ट्रॅफिक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून किंवा त्याच्या जवळून जाणाऱ्या नेटवर्कवर अवलंबून आहे. भारताला जागतिक नेटवर्कशी जोडणाऱ्या अनेक प्रमुख केबल सिस्टिम्स या भागातून जातात, ज्यामध्ये SEA-ME-WE 4 (SMW4), I-ME-WE (IMEWE) आणि Flag Telecom च्या FALCON या केबल प्रणालींचा समावेश आहे. या केबल्सद्वारे भारत जागतिक डिजिटल नेटवर्कशी जोडला जातो. हीच पायाभूत सुविधा कुवेत, कतार, बहरीन, इराक आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या आखाती देशांसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे.
गुगलची नवीन गुंतवणूक भारतासाठी फायद्याची
होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली किंवा तिथे मोठा संघर्ष पेटल्यास या संपूर्ण प्रदेशाचा जागतिक डिजिटल जगाशी असलेला संपर्क तुटू शकतो. वाढत्या डेटा मागणीमुळे या भागात नवीन फायबर-ऑप्टिक केबल सिस्टममध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे. दिग्गज तंत्रज्ञान कंपन्या आणि टेलिकॉम ऑपरेटर्स आता पुढच्या पिढीतील सबमरीन केबल्स उभारण्यात गुंतले आहेत. या संदर्भात गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकार सुंदर पिचाई यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या नवी दिल्ली भेटीदरम्यान एका नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे. ‘इंडिया-अमेरिका कनेक्ट’ असे या उपक्रमाचे नाव असून, याद्वारे भारताला आंतरराष्ट्रीय डिजिटल नेटवर्कशी जोडणारे अतिरिक्त सबमरीन केबल मार्ग तयार केले जाणार आहेत. यामुळे भविष्यात अशा भौगोलिक तणावाच्या काळात भारताची इंटरनेट सुरक्षा अधिक सुरक्षित राहणार आहे.
समुद्राखालील केबल्स असुरक्षित का असतात?
समुद्राच्या तळाशी असलेल्या फायबर-ऑप्टिक केबल्स अतिशय मजबूत असल्या तरीही युद्ध किंवा संघर्षाच्या काळात त्या कमालीच्या असुरक्षित ठरतात. मोठ्या जहाजांचे नांगर समुद्राच्या तळावरून ओढले गेल्यास ते केबल्सना अडकून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकतात. मासेमारीसाठी वापरली जाणारी अवजड उपकरणे फायबर-ऑप्टिक लाईन्स तोडू शकतात. युद्धक्षेत्रातील पाण्याखालील स्फोट किंवा नौदलाच्या हालचालींमुळे केबलचे मार्ग विस्कळीत होऊ शकतात. अनेकदा हे नुकसान जाणीवपूर्वकही केले जाऊ शकते. समुद्राच्या तळाशी होणारे भूकंपाचे धक्के किंवा जमिनीची हालचालदेखील या पायाभूत सुविधांवर परिणाम करू शकते. समुद्राखालील केबल खराब झाल्यास ती शोधण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी विशेष दुरुस्ती जहाजे तैनात केली जातात. मात्र, युद्ध किंवा संघर्षाच्या काळात ही दुरुस्ती करणे जवळजवळ अशक्य होते. सध्याच्या अनेक संघर्षमय भागांमध्ये केबल्सची दुरुस्ती स्थगित करण्यात आली आहे.
हेही वाचा : एकाच ब्लड टेस्टने ओळखता येणार सर्व प्रकारचे कॅन्सर? तज्ज्ञांचे मत काय? संशोधन काय सांगते?
समुद्राखालील केबल्स तुटल्यास काय होते?
समुद्राखालील केबल्समध्ये झालेल्या बिघाडानंतर त्याची वेळेत दुरुस्ती न झाल्यास इंटरनेटचा स्पीड मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. काही केबल्स नैसर्गिक कारणांमुळे किंवा अपघाताने खराब झाल्या तरीही उरलेल्या सक्रिय केबल्सवरील ताण प्रचंड वाढतो. मोजक्याच केबल्सवर संपूर्ण जगाचा डेटा ट्रॅफिक आल्यामुळे त्या ओव्हरलोड होऊ शकतात. यामुळे नेटवर्कमध्ये अडथळे निर्माण होणे, इंटरनेटचा वेग कमालीचा मंदावणे किंवा काही सेवा पूर्णपणे ठप्प होणे असे प्रकार घडू शकतात. एखाद्या समुद्री मार्गातील केबल्समध्ये बिघाड झाल्यानंतर इंटरनेटचा पुरवठा पर्यायी मार्गाने करावा लागतो. त्यातच डेटाला अधिक लांबचा प्रवास करावा लागल्यामुळे वेबसाईट उघडण्यास उशीर होणे, व्हिडिओ कॉलिंगमध्ये व्यत्यय येणे आणि ऑनलाइन गेमिंग किंवा ट्रेडिंगमध्ये अडथळे येणे, यासारख्या समस्या निर्माण होतात. समुद्राखालील केबल्सला इंटरनेटचे महामार्ग म्हणून ओळखले जाते. या महामार्गांवर अडथळे आल्यास संपूर्ण जगाचा डिजिटल प्रवास खडतर होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
