Hormuz Strait Iran Toll Collection : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाचा वणवा पेटला असतानाच होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. जगातील सुमारे २० टक्के खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक या महत्त्वाच्या जलमार्गातून केली जाते. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर दिसून येत असून, खनिज तेलाच्या किमतीत तब्बल ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याशिवाय नैसर्गिक वायूच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीची इराणने नाकेबंदी कशी केली? त्याविषयीचा हा आढावा…
होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचे किती नियंत्रण?
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे तत्कालीन नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखातातील अमेरिका व इस्रायलच्या मित्रदेशांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. परिणामी तणाव वाढतच गेल्याने जगभरातील अनेक देशांना खनिज तेलासह नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केली जाणारी वाहतूक ठप्प झाली. इराण हा होर्मुझच्या सामुद्रधुनीला लागून असलेला किनारी देश असल्याने या अत्यंत महत्त्वाच्या जागतिक सागरी मार्गावर त्याचे प्रभावी नियंत्रण आहे. भौगोलिकदृष्ट्या ही सामुद्रधुनी अत्यंत अरुंद (केवळ ३३ किमी) आहे. त्यामुळेच इराणच्या सागरी क्षेत्राचा वापर टाळून, या भागातून प्रवास करणे कोणत्याही जहाजासाठी अशक्य आहे. या मोक्याच्या स्थानाचा फायदा घेऊन इराणने याआधीही अनेकदा जागतिक शक्तींवर दबाव तंत्राचा वापर केलेला आहे.
इराणने किती जहाजांना केले लक्ष्य?
युद्धाच्या चौथ्या आठवड्यात इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपली पकड आणखीच मजबूत केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी हा मार्ग अधिकृतपणे बंद न करता, आपल्या अटींवर सुरू ठेवला आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी अनेक जहाजांकडून इराणने टोलसारखी वसूली सुरू केली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून इराणने परवानगीशिवाय हा जलमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे २० जहाजांवर हल्ले केले आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या इराणच्या शत्रूदेशांच्या जहाजांनाच लक्ष्य केले जात असल्याचा दावा इराणी अधिकाऱ्यांनी केला आहे. या श्रेणीत नेमके कोणते कोणते देश येतात हे मात्र त्यांनी अजूनही स्पष्ट केले नाही.
आणखी वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसमोर कोणत्या १५ अटी ठेवल्या? पाकिस्तानच्या मध्यस्थीने इस्रायलची धाकधूक का वाढली?
आतापर्यंत किती जहाजांना मिळाली परवानगी?
‘केपलर’ या विश्लेषण संस्थेच्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात आतापर्यंत केवळ १३८ जहाजांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास केला आहे. त्यामध्ये ८७ तेलवाहू जहाजे आणि नैसर्गिक वायूच्या टँकर्सचा समावेश आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी या जलमार्गातून दररोज १३८ ते १४० जहाजांची ये-जा होत होती. आता मात्र ही संख्या दिवसाला अवघ्या पाच ते सहा जहाजांवर आली आहे. आंतरराष्ट्रीय समुद्री संघटनेच्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीजवळ सुमारे २,००० जहाजे अडकून पडली आहेत. इराणने सध्या मोजक्याच देशांतील जहाजांना या मार्गातून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यामध्ये भारतासह पाकिस्तान, चीन, ग्रीस व तुर्की यांसारख्या देशांचा समावेश आहे. २८ फेब्रुवारीनंतर भारताकडे जाणाऱ्या सहा टँकर्सनी हा समुद्री मार्ग ओलांडला. उर्वरित २० जहाजे, ज्यामध्ये खलाशांचा समावेश आहे, ती सामुद्रधुनीतच अडकून पडल्याचे एका इराणी अधिकाऱ्याने सांगितले.
होर्मुझमधून जहाजांचा प्रवास कसा सुरू आहे?
होर्मुझच्या सामुद्रधुनीला लागून इराणची डोंगराळ किनारपट्टी असल्याने त्यांना या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना सहजपणे लक्ष्य करता येते. सुरुवातीला काही जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करताना आपली ट्रॅकिंग सिस्टीम जाणूनबुजून बंद केली होती. मात्र, १२ मार्च रोजी अमेरिकेच्या मालकीच्या ‘MT Safesea Vishnu’ या ऑईल टँकरवर इराणनेही केलेल्या हल्ल्यानंतर ही पद्धत थांबवण्यात आली. या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला होता.
होर्मुझ सामुद्रधुनीत इराणकडून टोलवसुली?
सध्या इराणचे अधिकारी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाचा मार्ग अडवत आहे. या सामुद्रधुनीत इराणने एक टोल बूथ उभा केल्याचा दावा काही विदेशी माध्यमांनी केला आहे. जहाजांना सुरक्षित रस्ता देण्यासाठी इराणी अधिकारी प्रत्येक जहाजाकडून तब्बल २० लाख डॉलर्स (सुमारे १८ कोटी रुपये) शुल्क आकारत असल्याचे वृत्त आहे. मात्र, इराणने हे वृत्त अधिकृतपणे फेटाळून लावले आहे. प्रत्यक्षात या मार्गावर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सद्वारे एक स्वतंत्र कॉरिडॉर उभारण्यात आले आहे. एखाद्या जहाजाला या मार्गावरून प्रवास करायचा असल्यास त्यांना प्रथम इराणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागतो. तिथे जहाजाची ओळख, मालकी, मालाचा तपशील, गंतव्य स्थान आणि खलाशांची यादी तपासणीसाठी सादर करावी लागते. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे अधिकारी या कागदपत्रांची छाननी करतात आणि मग त्यांना पुढील प्रवासाची परवानगी देतात.
होर्मुझमधून वाहतुकीचा धोका प्रचंड वाढला
विश्लेषक शनाका अन्सेलम परेरा यांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या मोठ्या जहाजांसाठी इराणकडून २० लाख डॉलर्सचे शुल्क आकारले जात आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम अमेरिकन डॉलरऐवजी चीनच्या ‘युआन’मध्ये घेतली जात आहे. १९७४ पासून जागतिक ऊर्जा व्यापारावर वर्चस्व गाजवणाऱ्या पेट्रोडॉलरला कमकुवत करण्याची ही एक रणनीती मानली जात आहे. यादरम्यान होर्मुझ सामुद्रधुनी औपचारिकपणे खुली असली तरीही या मार्गावरील वाहतुकीचा धोका प्रचंड वाढला आहे. त्याशिवाय या अवाढव्य खर्चामुळे तेल वाहतुकीचा नफा पूर्णपणे संपुष्टात आला आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास खनिज तेलाच्या किमती प्रति बॅरेल २०० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
