Hormuz Strait Ship Attack US Iran Conflict : पश्चिम आशियातील तणाव काहीसा निवळला असतानाच होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका मालवाहू जहाजावर गुरुवारी अचानक हल्ला झाला. अमेरिका-इराण यांच्यातील शांतता करारानंतर अवघ्या आठवडाभरातच ही घटना घडल्याने जगभरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांत झालेल्या करारावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली. जागतिक तेलपुरवठ्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा हा सागरी जलमार्ग पुन्हा अस्थिर होण्याची भीती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर अमेरिका-इराण यांच्यातील कराराचे पुढे काय होणार, या हल्ल्याचा जागतिक खनिज तेल पुरवठ्यावर काय परिणाम होऊ शकतो, त्याविषयी…

जहाजावर हल्ला नेमका कसा झाला?

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, २५ जून रोजी ‘एव्हर लव्हली’ नावाचे मालवाहू जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत होते. सिंगापूरचा ध्वज असलेला या जहाजावर दुपारी दोनच्या सुमारास अचानक ड्रोन हल्ला झाला. सुदैवाने या हल्ल्यात जहाजावरील कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, हल्ल्यामुळे जहाजाच्या उजव्या बाजूचा भागाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. जहाजाची मुख्य इंजिन यंत्रणा सुरक्षित कार्यरत राहिल्याने त्याने पुढील प्रवास करून ओमानच्या आखातात प्रवेश केला. इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने हा हल्ला केल्याचा आरोप अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे. हल्ल्यानंतर इराणच्या सैनिकांनी जहाजावर अंदाधूंद गोळीबार केल्याची माहितीही समोर आली आहे.

इराणकडून व्यापारी जहाजांना धमक्या?

‘एव्हर लव्हली’ या जहाजावरील हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीबाबत नवे निर्देश जारी केले होते. इराणने नुकत्याच स्थापन केलेल्या पर्शियन गल्फ स्ट्रेट अथॉरिटीने त्याबाबतची नियमावली जारी केली होती. त्यात सर्व व्यापारी जहाजांनी केवळ इराणने तेहरानने (इराणने) मंजूर केलेल्या मार्गांवरूनच प्रवास करण्याचे फर्मान सोडण्यात आले. अनधिकृत मार्गांचा वापर करून प्रवास केल्यास उद्भवणाऱ्या कोणत्याही परिणामांची जबाबदारी संबंधित जहाजांचीच असेल. याशिवाय इराणने निश्चित केलेल्या सागरी मार्गांचा वापर करणाऱ्या जहाजांनाच सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाईल. या नियमांचे पालन न करणाऱ्या जहाजांवर कडक कारवाई केली, असा इशाराही इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) दिला होता.

जहाजांना कसा दिला जातोय मार्ग?

सध्या होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक दोन स्वतंत्र व्यवस्थांनुसार सुरू आहे. त्यातील पहिली व्यवस्था ओमानच्या पाठिंब्याने आणि आंतरराष्ट्रीय सागरी संघटना यांच्या समन्वयातून राबविली जात आहे. त्या अंतर्गत व्यापारी जहाजांना ओमानच्या सागरी हद्दीतून स्वैच्छिक सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिले जात आहेत, जेणेकरून मध्यवर्ती सामुद्रधुनीतील स्फोटके पेरलेल्या किंवा अतिजोखमीच्या भागांना टाळता येईल. अमेरिका आणि इराण यांच्यात फेब्रुवारीच्या अखेरीस संघर्ष सुरू झाल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या अनेक जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. दुसरी व्यवस्था इराणच्या पर्शियन गल्फ स्ट्रेट अथॉरिटी आणि आयआरजीसी नेव्हीच्या नियंत्रणाखाली आहे. या व्यवस्थेनुसार, व्यापारी जहाजांनी इराणने निश्चित केलेल्या सागरी वाहतूक मार्गांचे पालन करणे आणि त्या मार्गात प्रवेश करण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक परवानगी घेणे बंधनकारक आहे. पर्यायी मार्ग निवडणाऱ्या जहाजांना सुरक्षा हमी दिली जाणार नाही, असेही इराणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांची प्रतिक्रिया काय?

‘एव्हर लव्हली’ या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर तीव्र पडसाद उमटले. आखातात संघर्षाचा भडका उडाल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीत अडकून पडलेल्या शेकडो व्यापारी जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सागरी संघटनेने मोहीम सुरू केली होती. मात्र, या हल्ल्यानंतर त्यांनी आपली बचाव मोहीम तात्पुरती स्थगित केली; तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट लष्करी कारवाईचा इशारा दिला. आमच्या बचाव यादीतील जहाजांना आणि या भागातील सर्वांना आवश्यक सुरक्षेची हमी मिळावी यासाठी ही मोहीम तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सागरी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे अनेक महिन्यांपासून सुरक्षित बाहेर पडण्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेकडो व्यापारी जहाजांना अडथळा निर्माण झाला.

इराण शांतता करारात नेमके काय आहे?

पश्चिम आशियातील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात १७ जून रोजी शांतता करार झाला होता. मात्र, हा कायमस्वरुपीचा करार नसून तो फक्त ६० दिवसांसाठीच करण्यात आला आहे. या कालावधीत दोन्ही देशांनी मोठ्या लष्करी कारवायांपासून दूर राहण्याचे मान्य केले आहे. या करारानुसार अमेरिकेने इराणवरील नौदल नाकेबंदी काही प्रमाणात शिथिल करणे, गोठवलेली इराणी मालमत्ता मुक्त करण्यास मदत करणे आणि किमान ३०० अब्ज डॉलर खर्चाच्या पुनर्बांधणी आराखड्यावर काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याबदल्यात इराणने ६० दिवसांच्या वाटाघाटी कालावधीत व्यापारी जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून कोणतेही शुल्क न आकारता प्रवास करण्याची परवानगी देण्यास मान्य केले आहे. तसेच भविष्यात सामुद्रधुनीचे प्रशासन कसे असेल, यावर पुढील चर्चा सुरू ठेवण्याचे ठरले आहे. या चर्चांमध्ये इराणचा अणुकार्यक्रम, तपासणी यंत्रणा, निर्बंध हटविणे, आर्थिक सवलती, होर्मुझ सामुद्रधुनीचे दीर्घकालीन व्यवस्थापन आणि लेबनॉनमधील इस्रायलच्या लष्करी कारवायांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

अमेरिका-इराणची नेमकी भूमिका काय?

होर्मुझ सामुद्रधुनीत मालवाहू जहाजावर हल्ला झाल्यानंतर तणाव वाढला असला तरी अमेरिका आणि इराणने १७ जूनच्या सामंजस्य करारातून माघार घेण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत. त्याउलट दोन्ही देशांचे पश्चिम आशियातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराबाबत कठोर भूमिका व्यक्त केली होती. इराणबरोबरचा हा करार मला पसंत पडला नाही किंवा त्यांनी नियम पाळले नाहीत, तर आम्ही पुन्हा इराणवर पुन्हा करू, असा इशारा त्यांनी दिला होता. त्याचवेळी अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे इराणने स्पष्ट केले होते. यादरम्यान जहाजावरील हल्ल्याची बातमी समोर येताच गुरुवारी जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतींमध्ये दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली. ब्रेंट क्रूडचा भाव काही काळासाठी ७५.२६ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला. मात्र, शुक्रवारी परिस्थिती काहीशी स्थिर झाल्यानंतर तेलाच्या किमती पुन्हा घसरल्या आहेत.

होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलाची किती आवक?

जहाजवाहतुकीच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या संघर्षानंतर प्रथमच होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी कच्च्या तेलाची निर्यात सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. अमेरिकेचे ऊर्जा मंत्री क्रिस राईट यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत किमान दोन कोटी बॅरल तेल या सामुद्रधुनीतून बाहेर पाठविण्यात आले. मात्र, एकूण जहाजवाहतूक अद्यापही संघर्षपूर्व पातळीपेक्षा कमी आहे. युद्धापूर्वी दररोज सुमारे १२५ जहाजे या सामुद्रधुनीतून प्रवास करत होती. सध्या वाहतूक वाढत असली तरी ती अजूनही पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी आहे. दरम्यान, दक्षिण कोरियाच्या महासागर मंत्रालयाने आणखी आठ दक्षिण कोरियन जहाजांनी सुरक्षितपणे होर्मुझ सामुद्रधुनी पार केल्याची माहिती दिली. सौदी अरेबियानेही तेल निर्यातीला पुन्हा सुरुवात केल्याने अनेक देशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे- दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलामध्ये गुरुवारी झालेल्या भूकंपामुळे तेल उत्पादनाबाबत काहीशी चिंता निर्माण झाली. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपात प्रमुख तेलक्षेत्रे, पाइपलाइन, रिफायनऱ्या आणि निर्यात टर्मिनल्सना मर्यादित नुकसान झाले आहे.