Comprehensive guide on Hot or Cold Compress pain relief and recovery: शरीराला झालेली दुखापत, अचानक आलेली सूज किंवा स्नायूंचा कडकपणा यावर घरगुती उपाय म्हणून ‘शेक’ घेण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, चुकीचा शेक घेतल्यास आराम मिळण्याऐवजी त्रास वाढू शकतो.
गरम शेक घ्यावा की थंड?
दुखापत झाली, सूज आली किंवा स्नायू दुखू लागले की, सर्वप्रथम विचारला जाणारा प्रश्न म्हणजे “गरम शेक घ्यावा की थंड?” काहीजण गरम पाण्याची पिशवी वापरतात, तर काहीजण बर्फाचा शेक घेतात. अनेकदा हा निर्णय अंदाजाने घेतला जातो. परिणामी अपेक्षित आराम मिळत नाही, आणि कधी कधी वेदना वाढतात किंवा सूजही वाढू शकते. त्यामुळे गरम आणि थंड शेक यांचा योग्य वापर कधी आणि कसा करावा, हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे.
शेक म्हणजे काय?
शरीरातील वेदना, सूज आणि कडकपणा कमी करण्यासाठी तापमानाचा उपयोग करून दिला जाणारा उपचार म्हणजे शेक. वैद्यकीय भाषेत याला थर्मोथेरपी (Heat Therapy) आणि क्रायोथेरपी (Cold Therapy) असे म्हणतात. योग्य प्रकारे वापरल्यास हे दोन्ही उपाय सुरक्षित, प्रभावी आणि सहज उपलब्ध असतात. घरच्या घरी करता येणारा हा साधा उपाय योग्य वेळी केल्यास वेदना किंवा सूज कमी करण्यात मोठी मदत करतो.
थंड शेक (Cold Therapy): सूज आणि तीव्र वेदनांसाठी
थंड शेक देताना बर्फ किंवा थंड पाण्याचा उपयोग केला जातो. यामुळे दुखऱ्या भागातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात (Vasoconstriction), परिणामी सूज, जळजळ आणि वेदना कमी होतात. तसेच, थंडावा त्या भागाला तात्पुरती सुन्नता देतो, ज्यामुळे वेदनांची तीव्रता कमी जाणवते.
थंड शेक कधी घ्यावा?
- अचानक झालेली दुखापत (Sprain किंवा Strain)
- मुरगळणे किंवा पडल्यामुळे आलेली सूज
- खेळा दरम्यान होणाऱ्या दुखापती
- स्नायू किंवा लिगामेंटची इजा
- शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीच्या टप्प्यात
- तीव्र वेदना आणि जळजळ
- टाच किंवा गुडघ्याला आलेली सूज
- दातदुखी किंवा डोकेदुखीच्या काही परिस्थितींमध्ये
उदाहरणार्थ, पाय मुरगळल्यावर लगेच थंड शेक केल्यास सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दुखापतीनंतर पहिल्या २४ ते ४८ तासांत थंड शेक अधिक उपयुक्त ठरतो.
थंड शेक कसा घ्यावा?
- बर्फ स्वच्छ कापडात गुंडाळून वापरावा; थेट त्वचेवर ठेवू नये.
- १० ते १५ मिनिटे शेक द्यावा.
- दिवसातून २ ते ३ वेळा वापरता येतो.
- प्रत्येक सत्रामध्ये किमान १ तास अंतर ठेवावे.
- बर्फाऐवजी जेल पॅक किंवा थंड पाण्यात भिजवलेला टॉवेलही वापरता येतो.
गरम शेक (Heat Therapy) : स्टिफनेस आणि जुन्या वेदनांसाठी
गरम शेकामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात (Vasodilation), ज्यामुळे रक्तप्रवाह वाढतो. परिणामी स्नायूंना विश्रांती मिळते, कडकपणा कमी होतो आणि हालचाल सुलभ होते. दीर्घकालीन वेदनांमध्ये हा उपाय विशेष प्रभावी ठरतो.
गरम शेक कधी घ्यावा?
- जुनाट कंबरदुखी आणि मानदुखी
- स्नायूंचा कडकपणा आणि ताण
- सांध्यांतील स्टिफनेस
- दीर्घकाळ बसून काम केल्याने होणारा त्रास
- व्यायामानंतर स्नायूंमध्ये आलेला ताण
- मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी
- जुन्या दुखापतींमधील वेदना
उदाहरणार्थ, दिवसभर संगणकावर बसून काम केल्यानंतर मानेत किंवा कंबरेत कडकपणा जाणवल्यास गरम शेक आराम देतो.
गरम शेक कसा घ्यावा?
- गरम पाण्याची पिशवी, हॉट पॅक किंवा गरम टॉवेल वापरावा.
- तापमान सहनशक्तीनुसार ठेवावे; अतिउष्ण नसावे.
- १५ ते २० मिनिटे शेक द्यावा.
- दिवसातून २ ते ३ वेळा वापरता येतो.
- शेक घेताना झोप लागणार नाही याची काळजी घ्यावी, कारण भाजण्याचा धोका असतो.
गरम आणि थंड शेक: झटपट तुलना
परिस्थितीयोग्य शेक

सोपं सूत्र लक्षात ठेवा
सूज आणि तीव्र वेदना – थंड शेक
कडकपणा आणि जुन्या वेदना – गरम शेक
कॉन्ट्रास्ट थेरपी म्हणजे काय?
काही परिस्थितींमध्ये गरम आणि थंड शेक आलटून-पालटून दिला जातो. याला कॉन्ट्रास्ट थेरपी किंवा कॉन्ट्रास्ट बाथ असं म्हणतात. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि सूज कमी होण्यास मदत होते. मात्र, हा उपाय फिजिओथेरेपिस्टच्या मार्गदर्शनाखालीच करावा. कारण यात गरम आणि थंड शेक किती वेळ आणि अनुक्रमे कितीदा घ्यायचा आहे याचं प्रमाण ठरलेलं आहे.
शेक देताना घ्यावयाची काळजी
- बर्फ किंवा गरम पिशवी थेट त्वचेवर ठेवू नये.
- जास्त वेळ शेक देऊ नये.
- त्वचा लाल, सुन्न किंवा जळजळीत वाटल्यास शेक थांबवावा.
- जखम, संसर्ग किंवा उघड्या त्वचेवर गरम शेक टाळावा.
- मधुमेह, रक्ताभिसरणाचे विकार किंवा संवेदनशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
- लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींमध्ये तापमान नियंत्रित ठेवावे.
- वेदना वाढल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
फिजिओथेरेपीचा दृष्टिकोन
गरम आणि थंड शेक हे वेदना कमी करण्यासाठी प्रभावी सहाय्यक उपाय असले, तरी ते मुख्य उपचार नाहीत. वेदनेचं मूळ कारण दूर करण्यासाठी फिजिओथेरेपी आवश्यक असते. योग्य व्यायाम, हालचालींचे प्रशिक्षण, स्नायू बळकट करणारे उपाय आणि जीवनशैलीतील सुधारणा यामुळे दीर्घकालीन आराम मिळतो. फिजिओथेरेपिस्ट रुग्णाच्या स्थितीनुसार योग्य शेक, त्याचा कालावधी आणि वारंवारता ठरवतात. त्यामुळे फिजिओथेरेपी तज्ज्ञांचा सल्ला घेणं हितावह ठरतं.
चुकीचा शेक केल्यास वेदना वाढू शकतात
गरम आणि थंड शेक हे साधे, सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहेत पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरले तरच. चुकीचा शेक केल्यास वेदना वाढू शकतात.
