येमेनमधील हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर पुन्हा भीषण हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सौदी प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला असून तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून काही भारतीय विमान कंपन्यांनी रियाधला जाणारी सर्व विमानसेवा तातडीने स्थगित केली आहे. सौदी अरेबियात मोठ्या संख्येने भारतीय वास्तव्यास असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हीच बाब लक्षात घेता तेथील भारतीय दूतावासाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. वाढत्या तणावाच्या काळात सौदीतील भारतीयांनी घरातच थांबावे, अशा सूचना दूतावासाकडून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सौदीमध्ये सध्या किती भारतीय राहतात? आणि तिथे ते नेमके काय काम करतात? त्याविषयी…

सौदी अरेबियावर हुती बंडखोरांचे हल्ले

जागतिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी हुती बंडखोरांनी सौदीतील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हल्ले केले. त्यात तिघांचा मृत्यू झाला असून जवळपास ३६ जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यांची अधिकृत जबाबदारी इराणसमर्थित हुथी बंडखोरांनी स्वीकारली. याशिवाय रियाध आणि नजरान येथील विमानतळांना लक्ष्य करून आणखी क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावाही हुथी बंडखोरांनी केला. सौदी अरेबियाच्या हवाई क्षेत्रातून विमानांचे संचालन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनाही त्यांनी इशारा दिला. परिस्थिती चिघळल्याने अनेक विमान कंपन्यांनी रियाधला जाणारी काही विमानसेवा रद्द केल्याचे समजते. भारताने या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. अधिकृत निवेदनात भारताने मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे कामकाज सुरूच आहे. परिस्थितीनुसार पुढील सूचना जारी केल्या जातील, असे सांगण्यात आले आहे. तसेच अडचणीच्या प्रसंगी भारतीयांना संपर्क साधता यावा याकरिता प्रवासी भारतीय सहायता केंद्राचा २४ तास सुरू असलेला टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक ८००२४७१२३४ देण्यात आला आहे.

सौदी अरेबियात सध्या किती भारतीय राहतात?

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सौदी अरेबियात सुमारे २७.४ लाख भारतीय राहतात. त्यामध्ये कुशल-अकुशल कामगार, व्यावसायिक, उद्योजक आणि इतर अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. त्यांचे वास्तव्य हे केवळ एका शहरापुरते मर्यादित नसून रियाध, जेद्दाह आणि दम्माम यांसारख्या प्रमुख व्यापारी व नागरी केंद्रांमध्ये ते मोठ्या संख्येने काम करतात. सौदी अरेबियातील या मोठ्या भारतीय लोकसंख्येचे मुख्य कारण म्हणजे तेथे मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी. तेथील तांत्रिक आणि श्रमाच्या कामांपासून ते व्यवस्थापकीय आणि उच्च व्यावसायिक पदांपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये भारतीय कार्यरत आहेत. सध्या सौदी अरेबिया ‘व्हिजन २०३०’ हा आर्थिक विविधीकरण प्रकल्प राबवत आहे. देशाचे तेलावरील अवलंबित्व कमी करून पर्यटन, तंत्रज्ञान, डिजिटल सेवा आणि व्यवसाय यांसारख्या इतर क्षेत्रांचा विकास करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

सौदीतील भारतीय तेथील सुरक्षेबाबत काय सांगतात?

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एनडीटीव्हीने सौदी अरेबियातील भारतीय व्यावसायिकांशी संवाद साधला होता. या संवादात रियाधमध्ये भारतीय व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले होते. रियाधमध्ये गेल्या दहा वर्षांपासून वास्तव्यास असलेले चार्टर्ड अकाउंटंट नवीन गोयल म्हणाले होते की, कामाच्या दृष्टीने रियाधमध्ये नेहमीच चांगले वातावरण राहिले आहे. मी २०१५ मध्ये सौदी अरेबियात आलो होतो. त्या काळात देशात अनेक बदल घडत होते. परदेशात राहत असल्याची वेगळी भावना निर्माण होईल, असे काही येथे जाणवत नाही. त्यांचे सहकारी अविनाश गुप्ता यांनी सांगितले की, भारतातील ‘बिग फोर’ कंपन्यांच्या धर्तीवर भारतीय कंपनी उभारण्याच्या उद्दिष्टाने ते काम करत आहेत. त्यांच्या भारतातील कंपनीत सुमारे ४५० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांनी व्यवसायाची सुरुवात दुबईतून केली होती आणि नंतर तिचा रियाधपर्यंत विस्तार केला होता.

भारताचे सौदी अरेबियाशी धार्मिक-सांस्कृतिक नाते

रोजगाराव्यतिरिक्त भारत आणि सौदी अरेबियामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक संबंधही महत्त्वाचे आहेत. इस्लाम धर्मातील दोन पवित्र शहरे मक्का आणि मदीना सौदी अरेबियातच आहेत. भारतात २० कोटींहून अधिक मुस्लीम नागरिक असून ते मोठ्या संख्येने या दोन शहरांमध्ये धार्मिक यात्रेसाठी जातात. हज ही मक्का येथे दरवर्षी होणारी धार्मिक यात्रा आहे. धार्मिक नियमांनुसार, शारीरिक व आर्थिक क्षमता असलेल्या मुस्लिमांनी आयुष्यात किमान एकदा हज यात्रा करणे अपेक्षित असते. उमराह हीदेखील मक्का येथे केली जाणारी धार्मिक यात्रा आहे. मात्र, हजप्रमाणे ती ठरावीक वार्षिक कालावधीतच करावी लागते असे नाही. वर्षभरात विविध वेळी उमराह करता येते. रियाधमधील भारतीय दूतावासानुसार, भारताचा वार्षिक हज कोटा १,७५,०२५ भाविकांचा आहे. या प्रवासासाठी वाहतूक, निवास, परवाने आणि इतर सेवांची मोठी व्यवस्था करावी लागते. त्यामुळे विमानतळांवर किंवा उड्डाणांच्या वेळापत्रकावर होणाऱ्या कोणत्याही परिणामाचा फटका यात्रेकरूंना बसू शकतो.

हल्ल्यांचा भारतीयांवर काय परिणाम होऊ शकतो?

सौदी अरेबियातील विमानतळांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने ८ ऑक्टोबर रोजी भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. भारतीयांनी विनाकारण घराबाहेर पडणे आणि प्रवास करणे टाळावे, सतर्क राहावे तसेच स्थानिक प्रशासनाकडून अधिकृत माध्यमांतून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, ८ ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियातील विमानतळावर २७५ हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. त्या दिवशी नियोजित आगमनांपैकी सुमारे ४० टक्के, तर नियोजित उड्डाणांपैकी ३० टक्के उड्डाणे रद्द झाल्याचे या आकडेवारीतून समोर आले. एअर इंडियानेही १० ऑक्टोबरपर्यंत रियाधला जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या विमानसेवा स्थगित केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीहून रियाधला जाणारे एक विमान पुन्हा दिल्लीला परतले आणि त्याची उड्डाणसेवा रद्द करण्यात आली. याशिवाय, अकासा एअरने १९ ऑक्टोबरपर्यंत, तर इंडिगोने ९ ऑक्टोबरपर्यंत आपली सर्व नियोजित उड्डाणे रद्द केली आहे. मात्र, भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील सर्व विमानसेवा बंद करण्यात करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सौदी अरेबियाला जाण्याचे किंवा तेथून भारतात परतण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून उड्डाणाची सद्यस्थिती तपासावी, तसेच भारतीय दूतावास आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.