Why Gold Loans Increased in India: सोन्याच्या किंमतीत मागील काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली. आता सोन्याच्या किंमती काही प्रमाणात स्थिर झाल्या आहेत. परंतु, सोने तारण ठेवून कर्ज घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ‘गोल्ड लोन’च्या पर्यायाला भारतीय पसंती देत आहेत. तज्ज्ञांच्या मते, कर्ज घेताना आपल्याकडे जे आहे ते तारण ठेवून त्या बदल्यात कर्ज घेण्याचे प्रमाण भारतात वाढले आहे.
मागील काही वर्षांत लोकांचा सोने तारण ठेवून कर्ज घेण्यावरील विश्वास वाढला आहे. ‘प्राइम’ किंवा ‘प्राइम श्रेणीच्या वरील’ ग्राहकांच्या सोने तारण ठेवण्यात ४३ टक्क्यांवरून ५२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, अशी माहिती आनंद राठी ग्लोबल फायनान्सच्या एसएमइ आणि रिटेल व्हर्टिकलचे सीईओ सिमरनजीत सिंह यांनी दिली आहे. “सोने तारण ठेवून कर्ज घेणे हा अडचणीच्या काळातील अंतिम पर्याय मानला जात होता. परंतु, आता कर्ज घेण्यासाठी सोने तारण ठेवण्याकडे हे साधन म्हणून पाहिले जात आहे”, असे सिंह यांनी म्हटले.
‘गोल्ड लोन’चा वापर कशासाठी? आरबीआयने काय म्हटले?
‘गोल्ड लोन’चा वापर नेमका कशासाठी केला जातो, तर तज्ज्ञांच्या मते, व्यवसायाला वाढवण्यासाठी, सहलीसाठी आणि उच्च शिक्षणासाठी ‘गोल्ड लोन’ घेतले जाते. दरम्यान, आरबीआयने मात्र ‘गोल्ड लोन’ घेण्यामागील एक वेगळे कारण मागील आठवड्यात प्रकाशित झालेल्या ‘फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट’मध्ये नमूद केले. आरबीआयनुसार, लोकांनी सोन्याच्या वाढत्या किंमतीचा फायदा करून घेण्यासाठी सोने तारण ठेवले. त्या बदल्यात त्यांनी मोठी रक्कम कर्ज म्हणून घेतली. तो पैसा पूर्वी घेतलेले इतर कर्ज फेडण्यासाठी वापरला, असे आरबीआयच्या अहवालात आहे.
‘गोल्ड लोन’च्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. आरबीआयने मंगळवारी एक नवीन डेटा जाहीर केला. त्यात आरबीआयने म्हटले की, नॉन बँकिंग क्षेत्राची सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात कर्ज वाटप करण्यात वर्षभरात तब्बल ७० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. या क्षेत्राची सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. नॉन-बँक क्षेत्राने मे २०२४ मध्ये ३ टक्के ‘गोल्ड लोन’ सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात वाटप केले होते. आता यात वाढ होऊन ते सध्या ६ टक्क्यांवर पोहोचले आहे. ३.३ लाख कोटी रूपयांचे ‘गोल्ड लोन’ नॉन बँक क्षेत्राने दिले आहे.
बँकांच्या ‘गोल्ड लोन’ वाटपात चौपट वाढ?
बँक व नॉन बँक या दोन्ही क्षेत्रांत ‘गोल्ड लोन’ वितरणात प्रचंड वाढ झाली आहे. बँकांनी (नॉन बँकिंग क्षेत्र वगळून) दिलेल्या ‘गोल्ड लोन’ मध्ये १०५ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. तर बँकांनी तब्बल ५.१ लाख कोटी रूपयांचे ‘गोल्ड लोन’ मे २०२६ अखेरपर्यंत वितरीत केले आहे. मागील दोन वर्षांत नॉन बँक क्षेत्राने दुप्पट ‘गोल्ड लोन’ दिले, तर बँक क्षेत्राने मागील दोन वर्षात तब्बल चौपट ‘गोल्ड लोन’ दिले आहे. बँक क्षेत्राच्या ‘गोल्ड लोन’चे प्रमाण मे २०२४ मध्ये ०.६४ टक्क्यांवरून वाढून २.४ टक्क्यांपर्यंत मे २०२६ मध्ये वाढले आहे.
गोल्ड लोन घेण्याकडे कल का वाढला?
नॉन-बँकांची सोने तारण ठेवून कर्ज देण्याच्या प्रमाणात दरवर्षी १४ टक्के वाढ मे अखेरपर्यंत नोंदवण्यात आली आहे. तर एकूण कर्ज वाटपाच्या प्रमाणात १८ टक्के वाढ झाली आहे. आरबीआयने ‘फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट’मध्ये नमूद केले की , ‘गोल्ड लोन’ घेण्याचे प्रमाण वाढल्यानंतर पर्सनल लोन घेण्याचे प्रमाण व थकीत कर्जाची रक्कमही कमी झाली. ज्यांच्याकडे पर्सनल लोन व गोल्ड लोन असे दोन्ही पर्याय होते, त्यांनी गोल्ड लोनला प्राधान्य दिले. गोल्ड लोनमुळे पर्सनल लोनची थकबाकी आणि पर्सनल लोनच्या खात्यांमध्ये कमतरता आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
‘ट्रान्सयुनियन सीबील'(TransUnion CIBIL) या संस्थेच्या मते, डिसेंबर २०२५ मध्ये बँक व नॉन बँक क्षेत्राच्या एकूण कर्ज वाटपात गोल्ड लोनचे प्रमाण ११.१ टक्क्यांपर्यंत वाढले. जानेवारी २०२६ च्या आधी सोन्याचे दर प्रति औन्स ५५०० डॉलरपर्यंत वाढले होते. त्याचवेळी गोल्ड लोनमध्ये प्रामुख्याने वाढ झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आता सोन्याचे दर प्रति औन्स ४००० डॉलरपर्यंत घसरले असून स्थिर झाले आहेत. सोन्याच्या दरांमध्ये आणखी घसरण झाल्यास कर्जदारांवर तणाव येऊ शकतो. त्यामुळे सोन्याच्या किंमतींवर तसेच सोन्याशी संबंधित धोरणावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे.
सोने तारण ठेवून कर्ज घेणे फायदेशीर कसे?
देशातील सोन्याच्या खरेदी – विक्रीवर लक्ष ठेवणाऱ्या एका विश्लेषकांनी सांगितले की, सोने फक्त अडचणीच्या काळातच उपयोगात आणण्यासाठी नसून त्याचा एक आर्थिक साधन म्हणून वापर करता येऊ शकतो. ज्या समाजात पगार किंवा मजुरीत वाढ अत्यंत संथ गतीने होते, तिथे सोन्याचा वापर एक आर्थिक साधन म्हणून करणे फायदेशीर ठरू शकते. गोल्ड लोन सध्या अत्यंत प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे येत्या काळात कर्ज घेण्याच्या पद्धतीत परिवर्तन होऊ शकते.
सोने तारण ठेवून कर्ज घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे कर्ज देणाऱ्या संस्था किंवा बँकानाही फायदा होत आहे. सोने तारण ठेवून कर्ज देताना बँका व नॉन बँकांनाही संरक्षण मिळते. त्यामुळे ‘गोल्ड लोन’मध्ये येत्या काळात वाढ होण्याची व ती दीर्घकाळ टिकण्याची दाट शक्यता आहे. गोल्ड लोन क्षेत्राचा येत्या काळात विस्तार पाहायला मिळेल असा अंदाज आनंद राठी ग्लोबल फायनान्सच्या सिमरनजीत सिंह यांनी व्यक्त केला.
