Cancer Treatment India भारतात कर्करोगाची (कॅन्सर) नवीन प्रकरणे सातत्याने वाढत असल्याने तज्ज्ञांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे. कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कर्करोग हा जगातील सर्वांत मोठा मारक विकार ठरत आहे. जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची आणि मृत्यूची संख्या कमी होत असली तरी भारतात मात्र ही संख्या वाढत आहे, असे ‘द लॅन्सेट’ने प्रसिद्ध केलेल्या अभ्यासातही स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतात कर्करोगावरील उपचारांचा भार लक्षणीय आहे. तज्ज्ञांच्या मते, मोठ्या संख्येने कर्करोगाचे निदान होणे, अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे दर्जेदार उपचारांची मर्यादित उपलब्धता आणि रुग्णांवर असलेला मोठा आर्थिक बोजा ही याची कारणे आहेत. भारतातील कर्करोगावरील उपचार परवडणारे आहेत का? उपचारासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

भारतात होणारे कर्करोगावरील उपचार

भारतात अनेकदा उपचारांशी संबंधित अवाढव्य खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागत असल्याने कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडते. भारतात कर्करोगावरील उपचारांचा सरासरी खर्च अडीच लाख ते २० लाखांदरम्यान असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, विविध उत्पन्न स्तर असलेल्या देशांमध्ये उपचार उपलब्धतेत मोठी तफावत आहे. उच्च उत्पन्न असलेल्या ९० टक्क्यांहून अधिक देशांमध्ये सर्वसमावेशक उपचार उपलब्ध आहेत; परंतु कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे प्रमाण १५ टक्क्यांहून कमी आहे.

गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये अनेक महत्त्वपूर्ण औषधांवरील मूलभूत सीमाशुल्क पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली होती. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातही कर्करोगाच्या १७ औषधांवरील मूलभूत सीमाशुल्क पूर्णपणे माफ केल्याची घोषणा करण्यात आली आहे. कर्करोग, दुर्मीळ आजार आणि दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांचा उपचारखर्च कमी व्हावा हा या सवलतीचा उद्देश आहे. त्यामुळे ‘पेशंट असिस्टन्स प्रोग्राम्स’ (पीएपी)द्वारे आवश्यक औषधे अधिक स्वस्त आणि सुलभ होतील.

ही सवलत दुर्मीळ आनुवंशिक विकार, कर्करोग आणि रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित आजारांच्या उपचारांत वापरल्या जाणाऱ्या औषधांना लागू होते. त्यात प्रामुख्याने स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी (Onasemnogene Abeparvovec) व गौचर आजार (Velaglucerase Alpha) यांवरील उपचारांचा समावेश आहे. ही दोन्ही औषधे नोव्हार्टिस, सनोफी व टाकेडासारख्या जागतिक औषध कंपन्यांनी उत्पादित केलेली आहेत आणि ती अत्यंत महाग आहेत. ‘बिझनेस टुडे’च्या वृत्तानुसार, या सवलतीमुळे ही औषधे अधिक परवडणारी होतील, विशेषतः त्या रुग्णांसाठी जे ‘पीएपी’वर अवलंबून आहेत.

कोणकोणत्या औषधांवर सूट

गेल्या वर्षी अर्थसंकल्पात कर्करोगावरील उपचारांच्या क्षेत्रात, डाराटुमुमॅब (मल्टिपल मायलोमासाठी वापरले जाणारे) व अतेझोलिझुमॅब (विविध कॅन्सरसाठी वापरले जाणारे) या औषधांनाही सीमाशुल्कातून सवलत देण्यात आली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन व रोश या कंपन्यांनी उत्पादित केलेल्या या औषधांच्या किमती भारतात खूप जास्त होत्या. डाराटुमुमॅबच्या एका डोसची किंमत सात लाख रुपयांपेक्षा जास्त आहे; तर अतेझोलिझुमॅबची किंमत सुमारे १.५ लाख रुपये आहे. गेल्या वर्षी सीमाशुल्कातून सूट मिळाल्यामुळे या किमती प्रति डोस १० हजार ते ३० हजार रुपयांनी कमी होण्याची अपेक्षा होती. यंदाच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर या किमतींमध्ये अधिक घट होण्याची शक्यता आहे.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, ही सवलत रुग्ण आणि औषध कंपन्या या दोघांसाठी एक मोठे पाऊल आहे. औषधाच्या प्रकारानुसार उपचारखर्चात १० ते २० टक्क्यांनी घट होण्याची अपेक्षा आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये सरकारने ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन, ओसिमर्टिनिब व डुरवालुमॅब या तीन मुख्य कॅन्सर औषधांवरील जीएसटी कमी केला होता. अर्थमंत्र्यांनी २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘कॅन्सर केअर सेंटर्स’ (कॅन्सर उपचार केंद्रे) स्थापन करण्याची तरतूदही जाहीर केली आहे. ही पावले विशेषतः त्या कॅन्सर रुग्णांसाठी फायदेशीर आहेत, जे बऱ्याच काळापासून स्वस्त उपचार पर्यायांची मागणी करत होते.

कर्करोगावरील थेरपी

‘इम्युनिल थेरप्युटिक्स’चे क्वार्टेमी याला पुलित्झर विजेते कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ मुखर्जी आणि बायोटेक उद्योजिका किरण मजुमदार-शॉ यांचा पाठिंबा आहे. हे देशात उपलब्ध होणारे दुसरे ‘CAR T-cell’ थेरपी उपचार ठरले आहेत. ही एक प्रकारची इम्युनोथेरपी असून, रक्ताच्या कर्करोगाच्या अशा रुग्णांसाठी वापरली जाते, ज्यांचा आजार पुन्हा बळावला आहे किंवा ज्यांच्यावर इतर उपचारांचा परिणाम होत नाहीये.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, याची किंमत ३५ ते ५० लाख रुपयांदरम्यान असेल. हा खर्च देशातील इतर ‘CAR T-cell’ थेरपीच्या बरोबरीचा आहे. आयआयटी बॉम्बे आणि टाटा मेमोरियल यांच्या सहकार्याने ‘इम्युनोॲक्ट’ने विकसित केलेली थेरपीदेखील अशाच प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगावर काम करते आणि ती सुमारे ४० लाख रुपयांत उपलब्ध करून दिली जाते.

कर्करोगाची प्रकरणे का वाढत आहेत?

तंबाखू, दारूचे सेवन, अयोग्य आहार, उच्च रक्तदाब व मधुमेहावर नियंत्रण नसणे ही कर्करोगवाढीची करणे असल्याचे सांगण्यात येते. त्याचा अर्थ, वर्तनाच्या बदलातून कर्करोगाचे प्रमाण कमी केले जाऊ शकते आणि मृत्युदरही कमी होऊ शकतो. भारतासाठी ही संधी अधिक मोठी आहे. दिल्लीच्या एम्स येथील ऑन्कोलॉजिस्ट (कर्करोगतज्ज्ञ) डॉक्टर अभिषेक शंकर सांगतात, “भारतात लठ्ठपणा आणि मधुमेह असणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. तसेच भारतात तंबाखू खाणाऱ्यांचीही मोठी संख्या आहे. एचपीव्ही, हेपॅटायटिस बी व एच पायलोरी यांसारख्या कर्करोगाशी संबंधित संसर्गाचे प्रमाण आपल्याकडे अधिक आहे. प्रदूषणाची उच्च पातळी हा भारतीयांसाठी आणखी एक अतिरिक्त धोक्याचा घटक आहे.” ते पुढे नमूद करतात की, हवेची गुणवत्ता सुधारणे, संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता राखणे, एचपीव्ही व हेपॅटायटिस बीसाठी लसीकरण मोहीम राबवणे, या सर्वांमुळे देशातील कर्करोगाचा भार कमी करण्यास मदत होऊ शकते.