सायबर सुरक्षा क्षेत्रातील आघाडीची कंपनी क्लाउडफ्लेअरने आपल्या २० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच एआयचा अधिक वापर करून आपल्या कामकाजाची पुनर्रचना करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. या निर्णयामुळे जगभरातील १,१०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम होणार असल्याचे सांगितले जाते. एआयने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शिरकाव केल्यानंतर अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात केल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि ऑटोमेशनवर दिला जाणारा भर ही यामागची प्रमुख कारणे मानली जात आहेत. यापार्श्वभूमीवर २०२६ मध्ये कोणकोणत्या कंपन्यांनी किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…
क्लाउडफ्लेअर कंपनीने निवेदनात काय म्हटले?
कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर क्लाउडफ्लेअर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (७ मे) एक सविस्तर निवेदन सादर केले. कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर किंवा त्यांच्या कौशल्यावर हा निर्णय आधारित नाही. मात्र, आम्ही कंपनीतील प्रत्येक अंतर्गत प्रक्रिया, कार्यसंघ आणि भूमिकेचा नव्याने विचार करत आहोत, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले. ‘रॉयटर्स’च्या माहितीनुसार, २०२५ च्या अखेरीस क्लाउडफ्लेअर कंपनीकडे पाच हजार १५६ पूर्णवेळ कर्मचारी कार्यरत होते. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये १४ टक्क्यांहून अधिक मोठी घसरण पाहायला मिळाली. क्लाउडफ्लेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू प्रिन्स आणि सह-संस्थापिका मिशेल झेटलिन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात काम करण्यासाठी कंपनी सज्ज होत आहे. त्याकरिता प्रत्येक कार्यसंघ आणि कामकाजाच्या पद्धतीची पुनर्रचना केली जात आहे. त्यांच्या मते, गेल्या अवघ्या तीन महिन्यांत कंपनीच्या अंतर्गत कामात एआयचा वापर ६०० टक्क्यांहून अधिक वाढला आहे. इंजिनिअरिंग, मानव संसाधन, फायनान्स आणि मार्केटिंग यांसारख्या विभागांतील कर्मचारी दररोज हजारो एआय एजंट सत्रांचा वापर करीत आहेत.
एआयमुळे २०२६ मध्ये किती जण बेरोजगार?
तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांकडून कर्मचारी कपातीचा सपाटा सुरूच आहे. यावर्षीच्या पहिल्या पाच महिन्यांतच १०६ कंपन्यांमधील ९३,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. या कर्मचारी कपातीचा परिणाम केवळ टेक क्षेत्रापुरता मर्यादित नसून मीडिया, वित्तीय सेवा आणि किरकोळ विक्री क्षेत्रांवरही झाला आहे. Freshworks आणि Coinbase या कंपन्यांनीही नुकतीच कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. एआय आणि ऑटोमेशनमुळे कामकाजाच्या पद्धती बदलत असल्यामुळे कार्यसंघाची (टीम) पुनर्रचना करावी लागत असल्याचे बहुतांश कंपन्यांचे म्हणणे आहे. टेक क्षेत्रातील कर्मचारी कपातीवर लक्ष ठेवणाऱ्या Layoffs.fyi या वेबसाईटनुसार, २०२५ मध्ये एआयमुळे तब्बल एक लाख २४ हजार २०१ कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या होत्या. ‘बिझनेस इन्सायडर’च्या अहवालानुसार, २०२६ मध्ये १०० हून अधिक कंपन्यांनी आगामी कर्मचारी कपातीसंदर्भात नोटिसा जाहीर केल्या आहेत. गेल्या वर्षीच्या एका सर्वेक्षणानुसार, जगातील ४१ टक्के कंपन्यांनी मान्य केले आहे की, एआयच्या वाढत्या वापरामुळे पुढील पाच वर्षांत त्यांना मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करावी लागेल. मात्र, २०३० पर्यंत बिग डेटा, फिनटेक आणि एआय क्षेत्रातील नोकऱ्या दुप्पटीने वाढतील, असा अंदाजही या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.
कोणकोणत्या कंपन्यांनी केली नोकरकपात?
फ्रेशवर्क्स या कंपनीने अलीकडेच आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी ११ टक्के कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे सुमारे ५०० कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला. चेन्नईस्थित या सॉफ्टवेअर कंपनीकडून गेल्या काही वर्षांत करण्यात आलेली ही तिसरी कर्मचारी कपात ठरली. त्याशिवाय कॉईनबेस या कंपनीनेही १४ टक्के (सुमारे ७०० कर्मचारी) कपात जाहीर केली. क्रिप्टो बाजारातील मंदी आणि एआय युगाशी जुळवून घेण्यासाठी कंपनी ही कपात केल्याचे सांगण्यात आले. जानेवारी महिन्यात ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी अॅमेझॉनने १६,००० कॉर्पोरेट नोकऱ्या कपात करण्याची घोषणा केली. त्याचा फटका अमेरिका, ब्रिटन आणि भारताला बसला. त्याआधी ऑक्टोबरमध्ये कंपनीने १४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत अॅमेझॉनने एकूण ३०,००० नोकऱ्या केल्याचे दिसून आले. स्नॅपचॅटची मूळ कंपनी ‘स्नॅप’ने आपल्या १६ टक्के कर्मचाऱ्यांना (१,००० जण) कामावरून कमी केले.
दिग्गज कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना नारळ
एप्रिल महिन्यात ओरॅकल कंपनीने जगभरातील आपल्या विविध शाखांमधून तब्बल ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. विशेष म्हणजे, याचा सर्वाधिक फटका भारतातील तंत्रज्ञान विभागाला बसला असून, ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेसमधील १,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले. भारतातील अग्रगण्य आयटी कंपन्या – टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा यांनी आर्थिक वर्ष २०२६ मध्ये आपल्या एकूण कर्मचारी संख्येत एकत्रितपणे जवळपास सात हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. सिटी समूहाने आपल्या कर्मचारी संख्येत १० टक्के म्हणजेच २०,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखली. व्यवसायाची गरज आणि तांत्रिक कौशल्यांमधील बदल हे यामागचे कारण सांगण्यात आले. ट्रॅव्हल कंपनी एक्स्पेडियानेही आपले कामकाज सोपे करण्यासाठी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी जानेवारीत मोठ्या संख्येने नोकरकपात केली. त्याशिवाय लुलुलेमन या प्रसिद्ध कंपनीनेही उत्तर अमेरिकेतील आपल्या कॉन्टॅक्ट सेंटरमधील १०० अर्धवेळ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले.
हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाने गेल्या महिन्यात आपल्या एकूण कर्मचारी संख्येपैकी १० टक्के कपात करण्याची घोषणा केली. कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात सांगितले की, एकूण कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के म्हणजेच सुमारे ८,००० कर्मचाऱ्यांना कमी करण्याची योजना आहे. तसेच, भरती प्रक्रियेत असलेल्या हजारो रिक्त पदांवरही नियुक्त्या न करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. लॉजिस्टिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी युपीएसने २०२६ मध्ये आपल्या कार्यबलातून ३०,००० कर्मचारी कमी करण्याचे संकेत दिले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन डायक्स यांनी सांगितले की, २०२६ मध्ये कंपनी आपल्या ऑपरेशनल कर्मचाऱ्यांपैकी ३०,००० पदे कमी करणार आहे. कर्मचाऱ्यांची ही कपात स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजनेद्वारे केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सॉफ्टवेअर कंपनी वर्कडेने फेब्रुवारीमध्ये ४०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. या कपातीचा सर्वाधिक फटका ‘कस्टमर फेसिंग’ या विभागाला बसल्याचे दिसून आले. एकंदरीत ‘एआय’ तंत्रज्ञानातील वाढती स्पर्धा आणि आर्थिक पुनर्रचना यामुळे दिग्गज कंपन्यांनी मनुष्यबळ कमी करून तांत्रिक कार्यक्षमतेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आगामी काळातही मोठी नोकरकपात होऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
