Alcohol Effects on Male Sexual Health Doctor Advice : अनेकांच्या आयुष्यात मद्यपानाची सुरुवात आनंदाच्या क्षणाने किंवा मनावरचा ताण हलका करण्याच्या बहाण्याने होते. दारूचा एक पेग घेतल्यानंतर काही काळासाठी आपला आत्मविश्वास वाढत असल्याचे अनेकजण मान्य करतात. मद्यपानानंतर जोडीदाराशी शरीरसंबंध ठेवतानाही लैंगिक उत्तेजना आणखीनच वाढत असल्याचा समजही काहींच्या मनात असतो; पण खरेच असे होते का? मद्यसेवनामुळे कामेच्छा वाढते की कमी होते? याबाबत तज्ज्ञ डॉक्टर काय सांगतात? त्याविषयी…

मद्यपानामुळे लैंगिक क्षमतेवर कसा होतो परिणाम?

वंश वाढवायचा असल्यास स्त्रियांच्या आरोग्याबरोबर पुरुषांचे आरोग्यही तितकेच महत्वाचे असते; पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांमध्ये लैंगिक समस्या सामना करावा लागत असल्याचे दिसून येते. कामेच्छा कमी होणे, उत्तेजना न होणे, शरीरसुखात मन न लागणे, जास्त वेळ टिकता न येणे, यांसारख्या कितीतरी समस्या पुरुषांमध्ये निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. त्यातच गेल्या काही दशकांत जगभरातील पुरुषांमधील शुक्राणूंच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे विविध अहवालांतून उघड होते. त्यासाठी कोणतीही ठरावीक बाब कारणीभूत नसून अनेक घटक जबाबदार असल्याचे सांगितले जाते. नियमित मद्यपानामुळे लैंगिक क्षमता वाढण्याऐवजी एखाद्या व्यक्तीची कामेच्छा कमी होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. सामान्य भाषेत या समस्येला ‘व्हिस्की डिक’ असे संबोधले जाते. मद्यपानामुळे पुरुषांमध्ये लैंगिक उत्तेजना टिकवून ठेवण्यास येणाऱ्या समस्येसाठी हा शब्द वापरला जातो.

मद्यपान आणि कामवासनेबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

दारूच्या अतिसेवनामुळे शरीरातील चेतातंतूंचे कार्य मंदावते आणि लैंगिक अवयवांपर्यंत होणारा रक्तप्रवाह काही क्षणासाठी विस्कळीत होतो. त्यामुळे तात्पुरता आत्मविश्वास मिळवण्याच्या नादात बेडरूममध्ये अपयशाचा सामना करावा लागू शकतो, असे हैदराबाद येथील केअर रुग्णालयातील मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. पी. वामसी कृष्णा यांनी इंडिया टुडेला सांगितले. मद्यपान केल्यानंतर जाणवणारी तात्पुरती लैंगिक ताठरता येण्याची अडचण सहसा अल्पकाळ टिकते. एखादी व्यक्ती थकलेली, तणावाखाली किंवा डिहायड्रेटेड (शरीरात पाण्याची कमतरता) असल्यास कमी मद्यपानामुळेही ही समस्या उद्भवू शकते. दारूचे प्रमाण जितके जास्त, तितकी ही समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते. कोणतीही लैंगिक समस्या नसणाऱ्या पुरुषांनाही आयुष्यात किमान एकदा तरी या प्रसंगाचा सामना करावा लागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दारूमुळे लैंगिक इच्छा कमी होत नाही, पण…

इंडिया टुडेशी बोलताना डॉ. कृष्णा सांगतात की, दारूमुळे अनेकांच्या मनातील संकोच कमी होतो आणि काही काळासाठी का होईना त्याचा आत्मविश्वास वाढतो. मात्र, अल्कोहोलमुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी तात्पुरती कमी होते आणि लैंगिक उत्तेजनेला मिळणारा मेंदूची प्रतिक्रिया मंदावते. कालांतराने मद्यपानाचे प्रमाण वाढत गेले की लैंगिक इच्छा वाढण्याऐवजी कमी होऊ लागते. सोप्या भाषेत सांगायचे तर, अल्कोहोलमुळे लैंगिक इच्छा निर्माण झाल्यासारखी वाटू शकते; पण शरीराची त्याला प्रत्यक्ष प्रतिसाद देण्याची क्षमता त्याचवेळी बाधित होते. मद्यपानानंतर लैंगिक उत्तेजनेत अडथळा येण्यामागे दारू कारणीभूत असली, तरी याचा अर्थ जोडीदाराबद्दल इच्छा किंवा आकर्षण संपले आहे असा होत नाही. एखादी व्यक्ती मानसिक आणि भावनिकदृष्ट्या लैंगिक संबंधांसाठी उत्सुक असू शकते, परंतु दारूच्या प्रभावामुळे तिचे शरीर त्याला अनुकूल प्रतिसाद देत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नात्यांवर कसा पडू शकतो विपरित प्रभाव?

डॉ. कृष्णा पुढे सांगतात की, जोडीदाराबरोरची डेट, सेलिब्रेशन किंवा खास क्षणांमध्ये अनेकदा पुरुष मद्यपान करतात. अशा वेळी लैंगिक संबंधासाठी मन तयार असूनही शरीर साथ देत नसल्याने ही परिस्थिती अत्यंत निराशाजनक आणि लाजीरवाणी ठरू शकते. काही पुरुषांमध्ये ही समस्या तात्पुरती असली, तरी त्यामुळे जोडीदारांमध्ये गैरसमज, संकोच आणि चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. पुढच्या वेळीही असेच घडेल अशी भीतीही काही पुरुषांना वाटू शकते. अनेकदा जोडीदार या परिस्थितीचा चुकीचा अर्थ काढून आता आपल्यात रस किंवा आकर्षण उरले नाही असे समजू शकतात. या विषयावर उघडपणे चर्चा न झाल्यास हळूहळू जोडीदारांमधील संवाद आणि आत्मविश्वास कमी होऊ लागतो. मात्र अधूनमधून अल्कोहोलच्या सेवनामुळे लैंगिक ताठरता येण्यात अडचण निर्माण होणे ही वैद्यकीय समस्या मानली जात नाही.

उपाय काय? कधी घ्यावी डॉक्टरांची मदत?

अल्कोहोलचे सेवन कमी करणे, शरीरात पुरेसे पाणी राखणे, योग्य आहार घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे यामुळे ही समस्या सहसा सुधारते. मात्र अल्कोहोलचे सेवन न करताही ही समस्या उद्भवत असेल किंवा ती वारंवार होत असेल, तर वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे, असा सल्लाही डॉ. कृष्णा यांनी दिला आहे. सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वानुसार एका वेळी दोनपेक्षा अधिक स्टँडर्ड ड्रिंक्स घेतल्यास लैंगिक ताठरतेशी संबंधित समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो. नियमितपणे मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्यास रक्तवाहिन्या, मज्जातंतू आणि हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम होऊन कालांतराने ताठरता येण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मद्यपानाचे प्रमाण कमी करणे, दोन ड्रिंक्समध्ये पुरेसे अंतर ठेवणे आणि आठवड्यातील काही दिवस अल्कोहोलमुक्त ठेवणे, यामुळे ही समस्या कमी होण्यास अनेकदा मदत होते, असेही डॉ. कृष्णा यांनी स्पष्ट केले.

मद्यपान-धूम्रपानाचे शुक्राणूंवर गंभीर परिणाम

तज्ज्ञांच्या मते, धूम्रपान हे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करणाऱ्या प्रमुख कारणांपैकी एक मानले जाते. सिगारेटच्या धुरामध्ये हजारो हानिकारक रसायने असतात आणि ही रसायने शरीरातील निरोगी पेशींना हानी पोहोचवतात. त्याचा थेट परिणाम शुक्राणूंची गुणवत्ता आणि अंड्याचे फलन करण्याची क्षमता यांवर होतो. नियमित धूम्रपान करणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होणे, शुक्राणूंची हालचाल कमी होणे, असामान्य आकाराचे शुक्राणू वाढणे, शुक्राणूंमधील डीएनएचे नुकसान होणे यांसारख्या समस्या आढळून येतात. अति मद्यपानाचाही प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो. अधूनमधून मद्यपान केल्याने प्रजनन क्षमतेवर फारसा परिणाम होत नाही. मात्र, दीर्घकाळ किंवा अति प्रमाणात मद्यपान केल्यास पुरुषांमधील हार्मोन्सची शक्ती कमी होऊ शकते. शुक्राणूंची निर्मिती, स्नायूंची वाढ आणि लैंगिक इच्छेसाठी हार्मोन्स महत्त्वाचा मानला जातो. मद्यपानामुळे शुक्राणूंचे उत्पादन घटणे, लैंगिक इच्छा कमी होणे, उत्तेजना टिकवून ठेवण्यात अडचण येणे, वीर्याच्या गुणवत्तेत घट होणे, यांसारख्या समस्या उद्भवतात, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.