जागतिक स्तरावर नैसर्गिक रंगद्रव्यांची मागणी वाढत आहे. यात बटरफ्लाय पी अर्थात गोकर्ण फुलांद्वारे तयार होणाऱ्या रंगद्रव्याचे महत्त्व त्यातील औषधी गुणधर्मामुळे अधिक आहे. यामुळे या फुलांची शेती करून शेतकऱ्यांचे आयुष्य बदलत आहे.
बटरफ्लाय पी (गोकर्ण)चे महत्त्व काय?
बटरफ्लाय पी अर्थात गोकर्ण या वेलीचा वापर पंचकर्मात शरीरातील त्रिदोषांना संतुलित करण्यासाठी, तसेच शरीरातील नको असणारे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी केला जातो. गोकर्णच्या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो. या फुलांचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेच अनेक रोग, व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर करतात. गोकर्णाच्या निळ्या फुलांपासून नैसर्गिक रंगदेखील तयार होतो. गोकर्णाची फुले सावलीत वाळवून त्यांची पावडर करतात. या पावडरचा चहा करता येतो. गोकर्णाच्या फुलांचा चहा अत्यंत औषधी असून, तो मध किंवा गूळ घालून घेतात. गोकर्णाची फुले, शेंगा, पाने, साल, मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधांमध्ये वापर केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे, असे मानले जाते. तसेच त्वचा विकार आणि रक्तशुद्धीकरणासाठीदेखील गोकर्णाचा वापर केला जातो.
जागतिक स्तरावर गोकर्णचे स्थान काय?
थायलँड आणि इंडोनेशिया हे देश गोकर्ण फुलांचे आघाडीचे उत्पादक आणि ग्राहक आहेत. तसेच जागतिक स्तरावर या फुलांची मागणी वाढत आहे. ही भारतातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. टीएचएस इम्पेक्सच्या संस्थापक वर्षाका रेड्डी यांनी सांगितले की, नैसर्गिक रंगद्रव्यांची जागतिक मागणी वाढत आहे. त्या मागणीमागे नैसर्गिक घटकांसाठी आग्रही असलेले ग्राहक आणि अमेरिका, युरोप या देशांमध्ये कृत्रिम अन्न रंगांवर टाकण्यात आलेले निर्बंध ही प्रमुख कारणे आहेत. यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (एफडीए) यांनी गोकर्ण फुलाला फूड ॲडिटिव्ह (अन्नपदार्थांची चव, रंग, पोत (टेक्सचर) आणि टिकाऊपणा सुधारण्यासाठी प्रक्रिया करताना त्यात मिसळले जाणारे पदार्थ.) म्हणून मान्यता दिली आहे. तर २०२२ मध्ये युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटी (ईएफएसए) यांनी फुलांच्या वापराबद्दल सुरक्षिततेची चिंता व्यक्त केली. दरम्यान, युरोपियन युनियन आणि ब्रिटन या दोन्ही देशांनी गोकर्ण फुलाला खास अन्न या वर्गात घेतले आहे.
भारतीय शेतकऱ्यांसाठी काय आहेत संधी?
टीएचएस इम्पेक्सच्या संस्थापक वर्षाका रेड्डी यांच्या मते गोकर्ण फुलांच्या शेतीकडे अजूनही व्यावसायिक वस्तू म्हणून न पाहता अंगणातील शोभेची वनस्पती किंवा औषधी वनस्पती म्हणून पाहिले जात आहे. भारताच्या बाजारपेठेत या फुलांबाबत अधिक जागरूकता दिसून येत नाही. तसेच येथील सरकारने या फुलांना न दिलेले महत्त्व, निश्चित किंमत नसणे यामुळे शेतकरी या फुलांच्या उत्पादनातून मिळू शकणाऱ्या परताव्याबद्दल साशंक आहे. रेड्डी यांनी सांगितले की, त्या उत्तर प्रदेशातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांच्या समर्पित समूहाबरोबर गोकर्ण फुलांच्या शेतीसंदर्भात काम करत आहेत. यामध्ये महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे त्यांनी सांगितले. गोकर्ण फुलांच्या उत्पादनाबाबत त्यांनी तेथील शेतकऱ्यांशी करार केले आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांना उत्पादन कसे घ्यावे, फुलांचे गुणधर्म वाढण्यासाठी काय करावे या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे.
गोकर्ण फुलांमुळे चक्क एक ब्रँड
गोकर्ण फुलांद्वारे ‘ब्लू टी’ची स्थापना करणारे नितेश सिंह यांनी सांगितले की, गोकर्ण फुलांद्वारे तयार झालेली पावडर पाण्यात टाकल्यावर पाणी निळे होते, त्यात लिंबू पिळल्यावर ते जांभळे होते, हे आश्चर्यकारक आहे. फुलांद्वारे गुणकारी अन्न बनू शकते हा विचार मनात आला आणि त्यातूनच २०१८ मध्ये ब्लू टीची स्थापना केली. सुरुवातीला त्यांना भारतात चांगल्या दर्जाची फुले मिळत नसल्याने आयात करावी लागली. येथील फुलांना कमी पाकळ्या होत्या आणि एकदा उन्हात वाळवल्यानंतर काहीही शिल्लक राहात नव्हते. सुकल्यानंतर रंग टिकवून ठेवण्यासाठी त्यांना जास्त रंगद्रव्ये असलेले, जास्त पाकळ्या असलेले फूल हवे होते. त्यानंतर चांगली गुणवत्ता असलेले फूल मिळावे यासाठी त्यांनी भारतातील जवळपास ६०० शेतकऱ्यांबरोबर काम सुरू केले. शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि गुणवत्ता नियंत्रण ही सर्वात मोठी आव्हाने आहेत, असे सिंह यांनी सांगितले.
अधिक संशोधनाची गरज
आकर्षक रंगाबरोबरच गोकर्ण फुलांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत त्यामुळे यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चेन्नईतील श्री. रामचंद्र उच्चशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या सहयोगी प्राध्यापक व्ही. सुप्रिया यांनी गोकर्ण फुलांद्वारे तयार करण्यात येणाऱ्या साहित्याचा आढावा घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना या फुलांमध्ये अनेक प्रभावी आणि औषधी गुणधर्म असूनही, त्यावर फारसे लक्ष केंद्रित केले नसल्याचे जाणवले. त्यावर त्यांनी मधुमेह पूर्व (प्री डायबिटीज) आजारावर एक छोटासा अभ्यास केला. यात गोकर्ण फुलांपासून बनवलेला चहा घेतलेल्यांमध्ये साखरेचे नियंत्रण तो चहा न घेणाऱ्यांपेक्षा अधिक चांगले दाखवले. गोकर्ण फुलांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. या फुलांतील आरोग्यवर्धक गुणधर्मावर लक्ष केंद्रित केल्यास या फुलांना अधिक महत्त्व मिळेल, असे सुप्रिया यांना वाटते.
गोकर्ण फुलांची पावडर कशी बनते?
फुले तोडणे हा या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. शेतकऱ्यांना तोडण्यासाठी योग्य फूल कसे ओळखायचे याचे प्रशिक्षण आवश्यक असते. एकदा काढणी केल्यानंतर, फुले वाळवावी लागतात, आणि ते देखील काळजीपूर्वक करावे लागते. हे फुल सुकविण्यासाठी तापमान नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्याची पावडर बनवली जाते.
सर्वाधिक उत्पादन कोठे होते?
गोकर्ण फुलाचे व्यावसायिकदृष्ट्या सर्वाधिक उत्पादन पश्चिम बंगालमध्ये घेतले जात आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये या फुलांची लागवड केली जात असली तरी, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये गोकर्ण फुलांच्या शेतीचे उत्पादन जास्त होते. महाराष्ट्रातही गोकर्ण फुलांच्या शेतीबाबत जागरूकता वाढत आहे.
dharmesh.shinde@expressindia.com
