जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या एका सर्च ऑपरेशनदरम्यान राष्ट्रीय रायफल्स बटालियनमध्ये कार्यरत एका दोन वर्षीय लष्करी श्वानाचा मृत्यू झाला होता. आर्मी डॉग युनिटमध्ये त्याने सेवा दिली होती. एक्सेल असं या श्वानाचं नाव होतं. त्यांच्या निधनानंतर लष्कराकडून त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ही देण्यात आला. मात्र, आर्मीमध्ये या श्वानांची भरती नेमकी कशी होती आणि ते नेमकं काय काम करतात हे जाणून घेऊया.

एक्सेलचा मृत्यू कसा झाला?

एक्सेल हा काश्मीरमधील २६ आर्मी डॉग युनिटमध्ये सेवा देत होता आणि २९ राष्ट्रीय रायफल्सच्या दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान तो तैनात होता. संशयित दहशतवादी लपून बसलेल्या खोली गेल्यानंतर एका दहशतवाद्याने त्याच्यावर गोळीबार केला. यातच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – विश्लेषण: अमेरिकेने ठार केलेला अल जवाहिरी नेमका कोण होता? बाल्कनीत उभा असताना त्याचा खात्मा कसा करण्यात आला?

भारतीय सैन्यात श्वानांच्या किती तुकड्या आहेत?

संरक्षण राज्यमंत्र्यांनी २०१९ मध्ये संसदेत दिलेल्या निवेदनानुसार लष्कराकडे २५ पूर्ण श्वान आणि दोन अर्ध्या तुकड्या आहेत. पूर्ण श्वान युनिटमध्ये २४ श्वान असतात आणि अर्ध्या युनिटमध्ये १२ श्वान असतात.

कोणते श्वान सैन्यात भरती केले जातात?

भारतीय लष्कराच्या श्वान युनिट्समध्ये श्वानांच्या विविध जाती आहेत. यामध्ये लॅब्राडॉर, जर्मन शेफर्ड्स, बेल्जियन मालिनॉइस आणि ग्रेट माउंटन, स्विस डॉग्स यांचा समावेश आहे. एक्सेल हा बेल्जियन मालिनॉइस जातीचा श्वान होता.

हेही वाचा – विश्लेषण: गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’ मुंबईची जागा घेणार?

श्वानांचं काम असतं?

आर्मीतील श्वान गार्ड ड्युटी, गस्त, आयईडी सारखी स्फोटके शोधणे, खाण शोधणे, ड्रग्जसह निषिद्ध वस्तू शोधणे, हिमस्खलनाचा ढिगारा शोधणे. यासह विविध मोहिमेत श्वानांचा वापर केला जातो. तसेच दहशदवादी विरोधीत पथकातही श्वानांचा वापर होतो. प्रत्येक श्वानासोबत एक हँडलर असतो. त्यांच्यावर श्वानाच्या देखभालीची पूर्ण जबाबदारी असते.

श्वानांना प्रशिक्षण कुठं दिलं जातं?

आर्मीत दाखल झाल्यानंतर श्वानांना मेरठमधील रिमाउंट आणि वेटरनरी कॉर्प्स सेंटर या श्वान प्रशिक्षण शाळेत प्रशिक्षण दिलं जातं. हे सेंटर १९६० मध्ये सुरू करण्यात आलं होतं. इथे श्वानांना जाती आणि योग्यतेच्या आधारे विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. हे श्वान पुढे सुमारे आठ वर्षे सेवेत असतात.

हेही वाचा – विश्लेषण : देशातील पाच राज्यांचे आदिवासी वेगळ्या सरना धर्माची मागणी का करत आहेत?

आर्मीतील श्वांनाना शौर्य पदक मिळतात का?

भारतीय सैन्यात श्वानांच्या विशिष्ट सेवेसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन कार्ड, व्हाईस चीफ ऑफ स्टाफ कमेंडेशन कार्ड तसेच जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ कमेंडेशन कार्ड प्रदान करण्यात येतो. श्वान हाताळणाऱ्या सैनिकाला हे पदक दिले जाते.