चीनच्या बीजिंगमध्ये आयोजित एका इनडोअर फिटनेस स्पर्धेत ऑस्ट्रेलियन अॅथलीटला अचानक शौचाचा त्रास झाला. तरीही तिने माघार न घेता जवळपास अर्धा तास स्पर्धेतील वेगवेगळे टास्क पूर्ण केले. यादरम्यान तिने कपड्यातच शौच केल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. या व्हिडीओत हातावर आणि पायावर शौचाची घाण पसरली असतानाही सदरील महिला आपले टास्क पूर्ण करताना दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकारानंतर खेळाडूची जबाबदारी, स्वच्छता आणि आयोजकांची भूमिका यावरून क्रीडा विश्वात मोठा वाद पेटला आहे. पँटमध्ये शौच केल्यानंतरही या महिला खेळाडूला स्पर्धा पुढे सुरू ठेवण्याची परवानगी का देण्यात आली? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे, त्याविषयी…
बीजिंगमधील स्पर्धेत नक्की काय घडले?
‘एबीसी’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगमध्ये १२ सप्टेंबर रोजी ‘हायरॉक्स’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही एक इनडोअर फिटनेस स्पर्धा असून त्यात सहभागी झालेल्या खेळाडूंना एक किलोमीटर धावणे आणि व्यायामाचे कठीण प्रकार करावे लागतात. त्यात स्लेड पुश, बर्पी जंप, रोईंग आणि सँडबॅग लंजेस यांसारख्या आव्हानांचा समावेश असतो. या स्पर्धेची सुरुवात २०१७ मध्ये जर्मनीतील हॅम्बुर्ग येथे झाली होती आणि त्यानंतर तिचा जगभरात विस्तार झाला. २०२४ मध्ये हायरॉक्स स्पर्धेला चीनमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली. त्यावेळी बीजिंगमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याने आयोजकांना ही स्पर्धा वाढवून चार दिवसांची करावी लागली. यादरम्यान यंदाच्या हायरॉक्स स्पर्धेत जागतिक विक्रम आपल्या नावावर असलेली ऑस्ट्रेलियन खेळाडू जोआना व्हिएट्रीक ही सहभागी झाली होती; पण स्पर्धेच्या मध्यातच तिला अचानक शौच अनावर झाली. तरीही जोआनाने त्याकडे दुर्लक्ष करून आपले टास्क वेळेत पूर्ण केले आणि अखेर स्पर्धा जिंकली.
हिला खेळाडूवर टीकेची झोड का उठली?
जोआनाने स्पर्धेदरम्यान कपड्यातच शौच केल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिच्या जिद्दीचे तोंडभरून कौतुक केले. सहनशक्तीच्या क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना अशा प्रकारच्या समस्यांना कधीकधी सामोरे जावे लागू शकते, असे त्यांनी म्हटले. त्याचवेळी काहींनी या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवत थेट स्पर्धेच्या आयोजकांवरच तोंडसुख घेतले. चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘वेइबो’ वरील एका वापरकर्त्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूवर सडकून टीका केली. जोआना ही अत्यंत स्वार्थी खेळाडू आहे. जुलाब लागलेले असतानाही ती संपूर्ण ट्रॅकवर धावत राहिली. तिच्या मागे धावणाऱ्या इतर खेळाडूंचा तिने विचारही केला नाही, असे त्याने म्हटले. दुसऱ्या एकाने थेट आयोजकांवरच ताशेरे ओढताना त्यांनी निर्लज्जपणाचा कळस ओलांडल्याचे नमूद केले. या घटनेशी संबंधित व्हिडीओला आतापर्यंत तब्बल २.७ कोटींहून (२७ दशलक्ष) अधिक व्ह्यूज मिळाले असून, चीनच्या समाजमाध्यमांवर यावरून बरीच चर्चा रंगली आहे.
आयोजकांवरही टीका नेमकी का होत आहे?
या संपूर्ण प्रकरणातील संतापाचा मोठा रोख हा स्पर्धेच्या आयोजकांवरच आहे. जोआनाने स्पर्धेदरम्यान शौच पँटमध्येच केल्यानंतर तिला तात्काळ थांबवण्यात का आले नाही. तसेच शौचामुळे घाण झालेला ट्रॅक आयोजकांनी स्वच्छ का केला नाही? असे असंख्य सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केले जात आहे. हायरॉक्स स्पर्धा प्रामुख्याने इनडोअर बंदिस्त जागेत खेळवली जाते आणि सर्व खेळाडू एकाच साहित्याचा वापर करतात, त्यामुळे ही बाब आरोग्याच्या दृष्टीने अधिक चिंताजनक ठरते, याकडेही काहींनी लक्ष वेधले आहे. याबाबत अमेरिकेतील नर्स एरिका डॉज यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. इतर खेळाडूंचे आरोग्य आणि स्पर्धेतील स्वच्छतेच्या नियमांनुसार आयोजकांनी त्या महिला खेळाडूला तात्काळ थांबवायला हवे होते. तसेच इतर खेळाडूंना पुढे जाण्याची परवानगी देण्यापूर्वी तो सर्व परिसर बंद करून व्यवस्थित स्वच्छ करायला हवा होता, असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले. काही स्पर्धकांनी तर आपल्याला अस्वच्छ आणि दूषित साहित्याचा वापर करावा लागल्यामुळे आयोजकांकडून माफीची मागणी केली. तसेच आपले नोंदणी शुल्क तातडीने परत करावे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
स्पर्धेतील वादानंतर आयोजकांचे म्हणणे काय?
हायरॉक्स स्पर्धेदरम्यान घडलेल्या वादग्रस्त प्रकारानंतर आयोजकांनी आपली भूमिका मांडली. घटनेनंतर संबंधित भागाची तात्काळ स्वच्छता करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच खेळाडूंना ऑनलाइन धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयोजकांनी दिला. एबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, आयोजकांनी स्पर्धेनंतर शौच पसरलेला भाग तातडीने स्वच्छ करून संपूर्ण निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली. संबंधित साहित्य आणि उपकरणे मैदानातून हटवण्यात आली असून महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन नियमांनुसार त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच, भविष्यातील स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणचे फ्लोअरिंग बदलण्यात येणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले. या स्पर्धेदरम्यान नियमांची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली नसल्याच्या तक्रारींचीही आयोजकांनी गंभीर दखल घेतली. या प्रकारामुळे क्रीडा विश्वात संताप आणि प्रश्न निर्माण होणे साहजिक असल्याचे आयोजकांनी मान्य केले आहे.
‘त्या’ महिला खेळाडूला थांबवायला हवे होते का?
हायरॉक्स स्पर्धेदरम्यान घडलेल्या प्रकारानंतर संबंधित ॲथलीटला तिथेच थांबवायला हवे होते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर चीनमधील झेंगझोऊ विद्यापीठातील क्रीडा व्यवस्थापन विषयाचे सहयोगी प्राध्यापक ली होंगशिन यांनी आपले मत व्यक्त केले. खेळाडूवर टीका करण्याऐवजी आयोजकांनी इतर स्पर्धकांच्या सुरक्षेचा विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. स्पर्धेदरम्यान एखाद्या खेळाडूला शारीरिक समस्येचा सामना करावा लागल्याबद्दल तिच्यावर टीका करणे चुकीचे आहे. त्याउलट तिने दाखवलेली जिद्द आणि तिची खेळाविषयीचे प्रेम समजून घेण्यासारखे आहे, पण अशा परिस्थितीत इतर स्पर्धकांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार करणे ही सर्वस्वी आयोजकांची जबाबदारी होती, असा युक्तिवादही त्यांनी केला आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूने स्पर्धेदरम्यान पँटमध्येच शौच केल्याच्या या प्रकाराची सध्या समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे.
