बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटमधील (BLF) महिलांच्या एका तुकडीने पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानचे ९ जवान ठार झाल्याचे दावा करण्यात आला. बीएलएफ संघटनेकडून या हल्ल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करण्यात आला. त्यात बीएलएफच्या करिमा ‘आर्म्ड असॉल्ट डिव्हिजन’ (KAAD) तुकडीतील महिला सैनिक पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार करताना दिसून येत आहे. हा हल्ला चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर महामार्गावर २२ सप्टेंबर रोजी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानात एकच खळबळ उडाली असून तेथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर बीएलएफ संघटनेची ‘KAAD’ तुकडी किती घातक? त्यांनी पाकिस्तानी लष्करावर नेमका कसा हल्ला केला? त्याविषयी…
बलोच महिलांची ‘KAAD’ तुकडी किती घातक?
पाकिस्तानच्या डॉन या वृत्तापत्राने दिलेल्या माहितीनुसार, KAAD ही बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटमधील महिला सैनिकांची अत्यंत घातक तुकडी आहे. पाकिस्तानी सुरक्षा दले, लष्कराचे ताफे आणि चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोअरशी संबंधित प्रकल्पांवर सशस्त्र हल्ले करणे हे या तुकडीचे मुख्य उद्दिष्ट आहे. दिवंगत मानवाधिकार कार्यकर्त्या करिमा बलोच यांच्या सन्मानार्थ या तुकडीचे ठेवण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, करिमा या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या समर्थक कार्यकर्त्या होत्या. तसेच त्या बलोच स्टुडंट्स ऑर्गनायझेशन-आझाद संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षाही होत्या. २०२० मध्ये कॅनडातील टोरंटो येथे त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मृतीला स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक मानून बीएलएफने आपल्या पहिल्या महिला KAAD असे नाव दिले आहे.
‘KAAD’ तुकडी स्थापनेचे नेमके उद्दिष्ट काय?
गेल्या काही वर्षांत बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून होणाऱ्या कथित मानवाधिकार उल्लंघनाविरुद्ध अनेक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. त्याचवेळी आंदोलने आणि शांततापूर्ण मार्गांवरून न्याय मिळत नाही, असा विचार बीएलएल संघटनांनी या महिलांमध्ये पसरवला. परिणामी सुशिक्षित आणि तरुण महिलांचा सशस्त्र संघर्षाकडे कल वाढू लागला आहे. यापूर्वी बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटच्या मजीद ब्रिगेडने महिलांचा वापर प्रामुख्याने आत्मघाती हल्ल्यांसाठी केला होता. आता मात्र बीएलएफने महिलांची एक घातक तुकडी तयार केली आहे. या तुकडीकडून सातत्याने दहशतवादी हल्ले घडवून आणले जात आहे, अशी माहिती सिंध प्रांतातील एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने डॉन या वृत्तपत्राला दिली. तसेच या महिलांच्या या तुकडीला दुर्गम डोंगराळ भागांतील गुप्त छावण्यांमध्ये रायफली, चालवणे, रणांगणावर रणनीती आखणे आणि पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यांवर अचूक हल्ले करण्याचे लष्करी प्रशिक्षण दिले जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत महिला कमांडरची फळीही विकसित करण्यात आली, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानी लष्करावर कसा केला हल्ला?
शांततापूर्ण आंदोलनांपासून थेट सशस्त्र गनिमी काव्यापर्यंत पोहोचलेल्या बलुच संघर्षातील KAAD तुकडीने पाकिस्तान सरकारची चिंता वाढवली आहे. बलोच महिलांचा थेट सशस्त्र तुकड्यांमध्ये सहभाग वाढत असल्यामुळे पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांसमोरील आव्हाने अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. यादरम्यान बीएललने अलीकडेच शेअर केलेल्या व्हिडीओत एक महिला कमांडर आपल्या साथीदारांना मार्गदर्शन करताना दिसत आहे. त्यानंतरच्या चित्रफितीत इतर महिला सैनिक पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर अगदी जवळून गोळीबार करताना दिसून येत आहे. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटच्या दाव्यानुसार, या हल्ल्यात पाकिस्तानी लष्करातील अनेक जवान ठार झाले असून त्यांच्या वाहनांचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या सर्व दाव्यांना पाकिस्तान सरकारने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
बीएलएफच्या व्हिडीओत नेमके काय?
बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचे प्रवक्ते मेजर ग्वाहराम बलोच यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी संघटनेने महिला सैनिकांची तुकडी पाठवली होती. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानी सुरक्षा दलांनी घातलेला वेढा मोडून काढण्यासाठी आणि लढाऊ महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी संघटनेच्या कुर्बान युनिटनेही महत्त्वाची मदत केली. या हल्ल्यादरम्यान कुर्बान युनिटचा लढाऊ सैनिक चाकर मुराद ऊर्फ दिलीप जान हा ठार झाल्याची माहितीही त्यांनी दिली. यादरम्यान बीएलएलकडून जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमधील आणखी एका चित्रफितीत KAAD तुकडीतील महिला सैनिक कलातमधील मंगचर परिसरात वाहनांची तपासणी करताना दिसून येत आहेत. या संपूर्ण व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून बीएलएफने आपल्या महिला तुकडीचे खडतर प्रशिक्षण आणि रणांगणावरील सज्जता संपूर्ण जगासमोर मांडली आहे. KAAD तुकडीकडून सातत्याने सुरू असलेल्या कारवायांमुळे संघटनेतील महिला लढवय्यांची भूमिका वाढत असल्याचा दावाही बीएलएफने केला आहे.
बलुचिस्तान पाकिस्तानसाठी महत्त्वाचे का?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असलेला बलुचिस्तान दीर्घकाळापासून बंडखोरीच्या गर्तेत सापडला आहे. पाकिस्तानातील चिनी हितसंबंध हे बलोच लिबरेशन आर्मीचे मुख्य लक्ष्य राहिले आहेत. चीन बलुचिस्तानमधील संसाधनांचे शोषण करण्यात पाकिस्तानला मदत करीत असल्याचा आरोप या गटाकडून करण्यात आला आहे. बलुचिस्तान हा चीनच्या ६५ अब्ज डॉलर्सच्या ‘चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) प्रकल्पाचा कणा आहे. बलुचिस्तानमध्ये ग्वादरसारखे खोल पाण्याचे बंदर आणि रेको डिकसारखे जगातील सोने व तांब्याचे सर्वांत मोठे साठे आहेत. मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपत्ती असूनही, बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वांत गरीब प्रांत आहे. राजकीय प्रतिनिधित्व, संसाधनांचे वाटप व सुरक्षा दलांकडून होणारे अत्याचार यांमुळे या भागातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. सशस्त्र बलोच गटांचे म्हणणे आहे की, त्यांचा लढा राजकीय उपेक्षा, आर्थिक दुर्लक्ष आणि त्यांच्या संसाधनांच्या शोषणाविरुद्ध आहे. त्यामुळेच काही वर्षांपासून तेथील महिलादेखील आत्मघाती बॉम्बस्फोटांसह लढाऊ भूमिका घेताना दिसून येत आहे.
