How To Identify Eye Cancer : डोळे लाल होणे, अंधुक दिसणे, डोळ्यांची सतत जळजळ होणे, तसेच डोळ्यावर लहान डाग दिसणे, अशा तक्रारी अनेकांना जाणवतात. बहुतांश प्रकरणांमध्ये ही लक्षणे अॅलर्जी, कोरडेपणा किंवा संसर्ग यांसारख्या तुलनेने किरकोळ कारणांमुळे दिसतात. मात्र, ती दीर्घकाळ टिकून राहिल्यास, तसेच अधिक तीव्र झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण- अशी लक्षणे डोळ्यांच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराचीही असू शकतात. या पार्श्वभूमीवर डोळ्यांच्या कॅन्सरची (Eye Cancer) सुरुवातीची लक्षणे कोणती आणि नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला कधी घ्यावा, याबाबत बंगळुरू येथील शंकरा नेत्रालय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ. राजेश व्ही. आर यांनी ‘एनडीटीव्ही’मध्ये लिहिलेल्या एका लेखात सविस्तर माहिती दिली, त्याविषयी…
डॉ. राजेश यांच्या मते, डोळ्यांचा कर्करोग हा अत्यंत दुर्मीळ आजार असून, तो डोळ्यांच्या बुबुळात किंवा सभोतालच्या पेशींमध्ये उद्भवतो. चिंताजनक बाब म्हणजे या कर्करोगाच्या काही प्रकारांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे दिसून येत नाहीत. केवळ डोळ्यांची नियमित तपासणी केल्यानंतरच त्याचे निदान शक्य होते. त्यामुळे या आजाराचे धोक्याचे संकेत वेळीच समजून घेणे आणि योग्य वेळी नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ‘ऑक्युलर मेलॅनोमा’ हा डोळ्यांच्या कर्करोगाचा एक प्रकार प्रामुख्याने प्रौढांमध्ये आढळून येतो. डोळ्यांमध्ये रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशींमध्ये त्याची निर्मिती होते. हा कर्करोग प्रामुख्याने डोळ्यांच्या मधल्या थरात, तसेच बाह्य आवरणात, पापण्यांच्या आणि त्या सभोवतालच्या पेशींमध्ये उद्भवतो.
‘रेटिनोब्लास्टोमा’ हा डोळ्यांच्या कर्करोगाचा आणखी एक प्रकार असून तो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळतो. कर्करोगाची निर्मिती डोळ्याच्या मागील बाजूस असलेल्या आणि प्रकाश संवेदनशील असलेल्या ‘रेटिना’ या थरात होते. डोळ्यांचा कर्करोग हा दुर्मीळ असला तरी त्याच्या काही प्रकारांमुळे दृष्टी जाण्याचा धोका असतो. तसेच वेळीच निदान आणि योग्य उपचार न झाल्यास हा कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकतो. डोळ्यांमध्ये दिसणारा प्रत्येक असामान्य बदल हा कर्करोगाचे लक्षण असेलच, असे नाही. मात्र, दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता डोळ्यांची योग्य ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
डोळ्यांच्या कोणत्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये?
डोळ्यांच्या कर्करोगाची काही सुरुवातीची लक्षणे ही नेहमीच्या डोळ्यांच्या आजारांसारखीच असू शकतात; पण ती दीर्घकाळ कायम राहतात का, त्यांची तीव्रता वाढते का, तसेच त्यासोबत डोळ्यांमध्ये इतर असामान्य बदलही दिसतात का याकडे लक्ष देणे महत्वाचे ठरते.
डोळे सतत लाल होणे किंवा जळजळ होणे
डोळ्यांचा कोरडेपणा, अॅलर्जी किंवा डोळ्यांच्या बाह्य आवरणाचा संसर्ग यांमुळे डोळे लाल होण्याची समस्या सामान्यतः उद्भवते. मात्र, डोळे सतत लाल राहत असतील, जळजळ कमी होत नसेल किंवा ही समस्या वारंवार उद्भवत असेल, तर नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. विशेषतः डोळ्यावर असामान्य गाठ वाढत असल्यास तपासणी करून घेणे आवश्यक आहे. केवळ डोळे सतत लाल होणे म्हणजे कर्करोग झाला आहे, असे नाही. मात्र, त्यामागील कारण स्पष्ट नसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
दृष्टी अंधुक होणे किंवा विकृत दिसणे
डोळ्यांचा कोरडेपणा, दृष्टीतील दोष किंवा बराच वेळ स्क्रीनसमोर बसणे यांमुळे काही काळ अंधुक दिसू शकते. मात्र, सतत अंधुक दिसणे, वस्तूंचा आकार किंवा प्रतिमा विकृत दिसणे अथवा एका डोळ्याची दृष्टी हळूहळू कमी होणे, ही अधिक गंभीर समस्येची लक्षणे असू शकतात. डोळ्यांमध्ये निर्माण झालेल्या काही गाठींचे स्थान आणि आकार यांनुसार दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.
डोळ्यांवर काळे डाग पडणे
डोळ्यांच्या रंगीत भागावर म्हणजेच ‘आयरिस’वर नवीन काळा डाग दिसल्यास किंवा डोळ्यांच्या पृष्ठभागावर रंगद्रव्ययुक्त डाग आढळल्यास त्याची तपासणी करून घ्यावी. विशेषतः या डागाचा आकार वाढत असल्यास किंवा त्याच्या स्वरूपात बदल होत असल्यास अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांवरील काही डाग निरुपद्रवी असतात. मात्र, त्यांच्या आकारात, स्वरूपात, तसेच रंगात बदल होत असल्यास नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
डोळ्यांसमोर नवीन ठिपके चमकणे
डोळ्यांसमोर लहान ठिपके, धाग्यांसारख्या रेषा किंवा वाकड्या-तिकड्या आकृत्या तरंगताना दिसणे, याला ‘फ्लोटर्स’, असे म्हणतात. विशेषतः वाढत्या वयानुसार डोळ्यांमधील जेलसारख्या पदार्थात (व्हिट्रियस) बदल झाल्यामुळे असे दिसू शकते. मात्र, अचानक नवीन ठिपके दिसू लागणे, त्यांची संख्या वाढणे तसेच डोळ्यांसमोर प्रकाश चमकल्यासारखे जाणवणे, ही रेटिनाशी संबंधित समस्यांची लक्षणे असू शकतात. क्वचित प्रसंगी डोळ्यांमधील गाठींमुळेही असे होऊ शकते. डोळ्यांसमोर अचानक मोठ्या प्रमाणात ठिपके दिसू लागल्यास, प्रकाश चमकल्यासारखे जाणवल्यास, दृष्टीसमोर पडदा आल्याप्रमाणे सावली दिसू लागल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.
पापणीवर आलेली गाठ बरी न होणे
पापण्यांवर येणाऱ्या बहुतांश गाठी या साध्या पापण्यांच्या संसर्गामुळे (रांजणवाडी) निर्माण होतात. मात्र, पापणीवरील गाठ सतत वाढत असेल, ती बरी झाल्यानंतर पुन्हा पुन्हा निर्माण होत असेल किंवा त्या ठिकाणी जखम अथवा व्रण तयार होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. तसेच गाठीच्या आसपासच्या पापण्यांचे केस गळत असतील, तरी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पापण्यांच्या कर्करोगाचे काही प्रकार हे सामान्य संसर्ग किंवा गाठींसारखेच दिसू शकतात.
डोळ्यांची जागा किंवा स्वरूप बदलणे
एका डोळ्याचा आकार अचानक मोठा आणि बाहेर आलेला दिसणे, डोळ्यांच्या हालचालींमध्ये बदल होणे किंवा बाहुलीच्या आकारात कोणतेही स्पष्ट कारण नसताना बदल होणे, ही डोळ्यांच्या आत, तसेच सभोवतालच्या भागात गाठ निर्माण झाल्याची लक्षणे असू शकतात. विशेषतः कोणतेही स्पष्ट कारण नसताना असे बदल दिसू लागल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
डोळ्यांचा कर्करोग कोणतीही लक्षणे न दिसता होऊ शकतो का?
डॉ. राजेश यांच्या मते, डोळ्यांच्या कर्करोगाचे काही प्रकार, विशेषत: डोळ्याच्या आत विकसित होणारा ‘ऑक्युलर मेलानोमा’ सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे दर्शवत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ही गाठ डोळ्यांच्या अशा भागात वाढू शकते, जी आपण आरशात पाहून सहजासहजी ओळखू शकत नाही. एखादी व्यक्ती डोळ्यांची नियमित तपासणी करते, तेव्हा नेत्ररोगतज्ज्ञ डोळ्याच्या अंतर्गत संरचनेची तपासणी करत असताना हा आजार अचानक उघडकीस येतो. त्यामुळे दृष्टीसंबंधित कोणतीही स्पष्ट समस्या नसली तरीही डोळ्यांची नियमितपणे तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे असते. पालकांनी लहान मुलांच्या डोळ्यांमधील असामान्य बदलांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. फ्लॅश वापरून काढलेल्या फोटोंमध्ये मुलांच्या डोळ्यांच्या बाहुलीवर (Pupil) पांढरा चमकणारा ठिपका दिसणे, हे ‘लहान मुलांमधील डोळ्यांच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्याची इतरही काही कारणे असू शकतात; मात्र डॉक्टरांकडून याची त्वरित तपासणी करून घेणे हिताचे ठरते.
डोळ्यांच्या कर्करोगाचा धोका कोणाला अधिक?
डोळ्यांच्या कर्करोगाचा धोका हा त्याच्या प्रकारानुसार वेगवेगळा असतो. ‘ऑक्युलर मेलॅनोमा’चा संबंध प्रामुख्याने वाढते वय, डोळ्यांच्या रंगद्रव्यांशी संबंधित काही वैशिष्ट्ये आणि डोळ्यांवर आधीपासून असलेल्या काही डागांशी असतो. मात्र, कोणतेही ज्ञात जोखीम घटक नसलेल्या व्यक्तींनाही हा कर्करोग होऊ शकतो. ‘रेटिनोब्लास्टोमा’ हा कर्करोग जनुकीय बदलांशी संबंधित आहे. हे बदल काही वेळा नैसर्गिकरीत्या होतात, तर काही वेळा पालकांकडून मुलांमध्ये संक्रमित होऊ शकतात. कुटुंबात यापूर्वी हा आजार झाल्याचा इतिहास असल्यास संबंधित मुलांची विशेष तपासणी आणि नियमित निरीक्षण करणे आवश्यक ठरू शकते. एखाद्या व्यक्तीमध्ये एक किंवा अधिक जोखीम घटक असले तरी तिला डोळ्यांचा कर्करोग होईलच, असे नाही. त्याचप्रमाणे कोणतेही ज्ञात जोखीम घटक नसल्याने कर्करोगाचा धोका पूर्णपणे टळतो, असेही म्हणता येत नाही.
डोळ्यांच्या कर्करोगाचे निदान कसे केले जाते?
नेत्ररोगतज्ज्ञांना डोळ्यांचा कर्करोग असल्याचा संशय आल्यास ते सर्वप्रथम डोळ्यांची सविस्तर तपासणी करतात. त्यामध्ये डोळ्यांतील बाहुली मोठी करून, रेटिना आणि डोळ्याच्या आतील इतर भागांची तपासणी केली जाते. या तपासणीतील निष्कर्षांनुसार डॉक्टर डोळ्यांची सोनोग्राफी किंवा ऑप्टिकल इमेजिंग यांसारख्या विशेष चाचण्या करण्याचा सल्ला देऊ शकतात. डोळ्यांतील संशयास्पद भागाचे स्वरूप आणि स्थिती समजून घेण्यासाठी या चाचण्या केल्या जातात. मात्र, केवळ लक्षणांच्या आधारे डोळ्यांच्या कर्करोगाचे निदान करता येत नाही. योग्य तपासणीमुळे डोळ्यांमधील संशयास्पद गाठ आणि सामान्य, कर्करोग नसलेल्या समस्यांमधील फरक स्पष्ट होतो. त्यानुसार पुढील उपचारांची दिशा ठरवता येते.
डोळ्यांच्या कर्करोगावर उपचार शक्य आहेत का?
डॉ. राजेश यांच्या मते, डोळ्यांच्या कर्करोगावरील उपचार हे गाठीचा प्रकार, तिचे स्थान, आकार आणि कर्करोगाची अवस्था, तसेच तो शरीराच्या इतर भागांमध्ये पसरला आहे की नाही, यावर अवलंबून असतात. रुग्णाच्या स्थितीनुसार काही लहान गाठींचे नियमित निरीक्षण केले जाते. त्याशिवाय रेडिएशन थेरपी, लेसरद्वारे उपचार, शस्त्रक्रिया किंवा इतर विशेष उपचारपद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो. ‘रेटिनोब्लास्टोमा’ झालेल्या मुलांवरील उपचार हे आजार किती पसरला आहे, यानुसार ठरवले जातात. कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासोबतच शक्य तितकी दृष्टी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आजाराचे निदान कोणत्या टप्प्यावर होते, यावर उपचारांचे पर्याय आणि त्यांचे परिणाम अवलंबून असू शकतात. त्यामुळे सुरुवातीलाच योग्य तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला नेमका कधी घ्यावा?
डोळ्यांवर असलेला काळा डाग वाढत असल्यास, पापणीवरील गाठ बरी होत नसल्यास, डोळ्यांची जळजळ सतत होत असल्यास, अंधुक दिसण्याची समस्या वाढत असल्यास किंवा डोळ्यांच्या स्वरूपात कोणताही असामान्य बदल जाणवत असल्यास नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मात्र, अचानक दृष्टी कमी होणे, डोळ्यांसमोर अचानक मोठ्या प्रमाणात ठिपके दिसू लागणे, प्रकाश चमकल्यासारखे जाणवणे किंवा दृष्टीसमोर सावली अथवा पडदा आल्यासारखे दिसणे, अशी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. ही लक्षणे दृष्टीला धोका निर्माण करणाऱ्या गंभीर समस्यांची असू शकतात. त्यामुळे डोळ्यांच्या कर्करोगाचा संशय असो किंवा नसो, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
