नोकरीच्या शोधात रशियात गेलेला छत्तीसगडमधील २१ वर्षीय तरुण ७ ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. विनीत कुमार दुबे असे या तरुणाचे नाव असून तो बिलासपूर जिल्ह्यातील बिल्हा शहरातला रहिवासी आहे. विनीतला रशियात डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच युक्रेनविरुद्धच्या युद्धात सहभागी होण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या प्रकरणी विनीतच्या बहिणीने जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत मदतीची याचना केली आहे. या प्रकरणात आम्ही भारतीय दूतावासाच्या उत्तराची प्रतीक्षा करीत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

विनीतला नोकरीची ऑफर कशी मिळाली?

विनीत कुमारला टेलिग्रामवरील एका ग्रुपच्या माध्यमातून रशियातील एका रेस्टॉरंटमध्ये फूड स्टोरेज सुपरवायझर म्हणून काम करण्याची ऑफर मिळाली होती. या कामासाठी त्याला दरमहा १,२०० डॉलर म्हणजेच सुमारे एक लाख १४ हजार रुपये पगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, विनीतने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. कामाच्या शोधात असताना त्याला एकेदिवशी अचानक टेलिग्रामवरील एका ग्रुपवरून रशियात नोकरीची ऑफर मिळाली होती. त्याची बहीण आशी दुबे हिने सांगितले की, संबंधित कंपनीने विनीतच्या पर्यटक व्हिसासाठी आणि विमान तिकिटांसाठी सुमारे ७० हजार रुपये खर्च केले होते. मात्र, त्याला नोकरीचा करार देण्यात आला नव्हता. तसेच रशियातील कोणत्या शहरात त्याला काम करावे लागणार आहे, याचीही माहिती देण्यात आली नव्हती. टेलिग्रामवर त्याच्याशी संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने पर्यटक व्हिसाचे रूपांतर वर्क व्हिसामध्ये केले जाईल, असे आश्वासन दिले होते.

विनीत रशियात पोहोचल्यानंतर काय घडले?

२९ सप्टेंबर रोजी विनीत छत्तीसगडहून दिल्लीला पोहोचला आणि तिथून तो विमानाने मॉस्कोमार्गे १ ऑक्टोबरला रशियात दाखल झाला. त्यानंतर त्याने व्होल्गोग्राड शहराकडे प्रवास केला. सुरुवातीला विनीत कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलद्वारे नियमित संपर्कात होता. मात्र, ७ ऑक्टोबर रोजी त्याने स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगितल्याने दुबे कुटुंबीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. “विनीतने ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच किंवा सहा वाजण्याच्या सुमारास आम्हाला फोन केला. तो घाबरलेला आणि अस्वस्थ वाटत होता. त्याचा आवाजही थरथरत होता. कंपनीने आपली फसवणूक केली असून, आता डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे त्याने सांगितले. त्यावर आम्ही त्याला तातडीने घरी येण्याचा सल्ला दिला होता,” असे विनीतच्या बहिणीने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

विनीतचा कुटुंबीयांशी संपर्क कसा तुटला?

आशीच्या म्हणण्यानुसार, विनीतने दुसऱ्या दिवशी कंपनीला आपल्याला भारतात परत पाठवण्याची विनंती केली होती. त्याच रात्री त्याने वडिलांशीही संवाद साधला होता. दुसऱ्या दिवशी आपल्याला कुठेतरी नेले जाणार असल्याचे त्याने सांगितले होते. तसेच फोन बंद झाल्यानंतर माझी अजिबात काळजी करू नका, असेही तो म्हणाला होता. ७ ऑक्टोबरपासून विनीतचा फोन कायमचा बंद झाला. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विनीतशी संपर्क तुटल्यानंतर किशोर नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या कुटुंबीयांना व्हॉट्सॲपवर मॅसेज पाठवला. विनीतला डांबून ठेवण्यात आले असून त्याच्यावर युक्रेनविरुद्धच्या युद्धात उतरण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याची माहिती त्याने दिली. दुबे कुटुंबीयांच्या आरोपानुसार, विनीतला सुरुवातीला मॉस्कोमधील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला व्होल्गोग्राडमधील एका फ्लॅटमध्ये हलवले गेले. तिथून एका अज्ञात ठिकाणी नेऊन रशियातील वास्तव्याशी संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी आणि युद्धात सहभागी होण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात आला.

विनीतला डिटेन्शन केंद्रात ठेवल्याची माहिती

२७ ऑक्टोबर रोजी ईटीव्ही भारतने दिलेल्या वृत्तानुसार, युद्धात सहभागी होण्यास नकार दिल्याने विनीतला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप आशीने केला. तसेच, त्याच्यावर दबाव आणण्यासाठी अंमली पदार्थांशी संबंधित खोट्या गुन्ह्याचा वापर केला जात असल्याचेही तिने सांगितले. मात्र, विनीतच्या सध्याच्या स्थितीबाबत रशियन किंवा भारतीय यंत्रणांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. विनीतच्या सुटकेसाठी आशीने ८ ऑक्टोबरला भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आणि त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘MADAD’ पोर्टलवर रीतसर तक्रार दाखल केली. त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी विनीतकडे अंमली पदार्थ सापडल्यामुले त्याला रशियातील एका डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आशीला दिली. तसेच त्याला एक सरकारी वकील आणि अनुवादक (ट्रान्सलेटर) पुरवण्यात आल्याचेही सांगितले. मात्र, आशीने या आरोपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विनीतकडे बेकायदा पदार्थ असते, तर तो तीन विमानतळांवरील सुरक्षा तपासण्या पार करून कसा गेला असता, असा सवाल तिने केला.

vineet-kumar-dubey-russia-ukraine-war-job-fraud-chhattisgarh
रशियात नोकरीच्या जाळ्यात अडकलेला छत्तीसगडचा विनीत दुबे आणि त्याची बहीण आशी दुबे

विनीतच्या शेवटच्या संदेशाने कुटुंबीय चिंतेत

९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रशियातील आणखी एका भारतीय व्यक्तीने आमच्याशी संपर्क साधला आणि विनीतला डिटेन्शन केंद्रात ठेवण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्याला लष्करी प्रशिक्षण देऊन युद्धात लढण्यासाठी पाठवले जाणार असल्याचे या व्यक्तीने सांगितल्याचा दावा आशीने केला. तसेच, वकील नेमण्यासाठी त्या व्यक्तीने ३.५ लाख रुपयांची मागणी केल्याचेही तिने सांगितले. १३ ऑक्टोबर रोजी विनीतने डिटेन्शन केंद्रातून भाषांतरकाराच्या मदतीने एक व्हॉइस मेसेज पाठवला. हाच त्याचा शेवटचा व्हॉइस मेसेज असल्याचे आशीने सांगितले. या संदेशात त्याने कुटुंबीयांची माफी मागितली आणि आपल्या भविष्याबद्दल भीती व्यक्त केली होती. “मी रशियात काम करण्यासाठी आलो होतो; पण तुरुंग आणि न्यायालयाच्या कचाट्यात अडकलो आहे. तुम्ही जास्त विचार करू नका आणि पप्पांनाही जास्त काळजी करू देऊ नका. आता मला सहा ते सात वर्षे तुमच्यापासून दूर राहावे लागेल. मी सर्वांसाठी पैसे कमवेन आणि सगळ्यांना आनंदी ठेवेन, असा विचार केला होता; पण आता तसे होईल असे वाटत नाही,” असे विनीतने संदेशात म्हटल्याचे आशियाने सांगितले.

विनीतच्या मृत्यूच्या दाव्याने वाढली चिंता

२७ ऑक्टोबर रोजी दुबे कुटुंबीयांना आणखी एक ऑडिओ संदेश मिळाला. या संदेशात विनीतने डिटेन्शन केंद्रात असताना आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, हा संदेश खरा आहे की नाही याची खात्री अद्याप झालेली नाही. त्याच डिटेन्शन केंद्रात ठेवण्यात आल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने विनीतच्या मृत्यूची माहिती आम्हाला दिल्याचे आशीने सांगितले. हे ऐकल्यानंतर माझे वडील रडू लागले. कोणावर विश्वास ठेवावा हे आम्हाला समजत नाही. मात्र, सरकारने आम्हाला याबाबतची माहिती द्यायला हवी, असे आशी म्हणाली. गेल्या तीन आठवड्यांपासून आशी आपल्या भावाचा शोध घेण्यासाठी आणि त्याला भारतात परत आणण्यासाठी वरिष्ठ सरकारी अधिकारी तसेच राजकीय नेत्यांचे उंबरठे झिंजवत आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मदतीची विनंती केली आहे.

विनीतच्या शोधासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न

याबाबत बिलासपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजनेश सिंह यांनी सांगितले की, दुबे कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून विनीतबाबत माहिती मिळवण्यासाठी आम्ही भारतीय दूतावासाला पत्र पाठवले आहे. मात्र, या पत्राला अद्याप उत्तर मिळालेले नाही. दूतावासाकडून उत्तर मिळताच पुढील कार्यवाही केली जाईल. दुसरीकडे बिलासपूरचे जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली असून, परराष्ट्र मंत्रालयाकडेही संपर्क साधला आहे. संबंधित यंत्रणांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.