चीनमध्ये सध्या उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. वाढलेली उष्णता, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेचा सामना सध्या चीनमधील लोक करत आहेत. चीनमधील बरेचसे प्रांत असे आहेत जिथे यंदा पाऊसच झाला नाही. त्यामुळेच वाढलेल्या उष्णतेची दाहकता अधिक जाणवत आहे. अनेक प्रांतांमध्ये हजारो एकर शेतीचं उष्णतेमुळे नुकसान झालं आहे. अनेक मुख्य उद्योगांनाही या उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. नद्या आणि जलसाठ्यांमधील पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. अनेक साठ्यांमध्ये पाण्याचा स्तर हा किमान पातळीपर्यंत पोहचला आहे. विजेच्या तुटवड्यामुळे अनेक कारखाने सध्या बंद करण्यात आलेत. या कारखान्यांमधील उत्पादन बंद आहे. चीनमधील या परिस्थितीचा फटका जगातील इतर देशांनाही बसण्याची शक्यता आहे. चीनमधील हे संकट म्हणजे जगाला तापमान वाढ आणि त्याच्या दुष्परिणामांची दाहकता दाखवत इशारा देत असल्याचं म्हटलं जात आहे. चीनमध्ये नक्की काय काय घडलंय आणि त्यासंदर्भातील गोष्टींवर नजर टाकूयात…

अनेक ठिकाणी पारा ४० हून अधिक
अशीच परिस्थिती कायम राहिली तर जगभरामध्ये चीनमधून होणाऱ्या वस्तूंच्या पुरवठ्याची साखळी खंडित होतील. तसेच या माध्यमातून जागतिक अन्नाच्या तुटवड्याची समस्या अधिक भीषण रुप धारण करु शकते असा अंदाज बांधला जात आहे. मागील दोन महिन्यांपासून चीनमध्ये उष्णतेने अनेक विक्रम मोडले आहेत. अनेक ठिकाणी तापमान सातत्याने ४० डिग्री सेल्सिअसच्या वर आहे. चीनमध्ये कधी नाही ते एवढी उष्णता जाणवत असल्याचं वयस्कर लोक सांगतात. अनेक जमीनीखालील सबवे स्थानकांना रेस्ट एरिया म्हणून जाहीर केलं आहे. घर नसलेल्यांना या ठिकाणी राहण्याची मूभा देण्यात आली आहे.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Race for immersion on Rangpanchami in the five rahadis of the Peshwa era
नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…

सर्वात भीषण उष्णतेची लाट
चीनमधील सिचुआन प्रांतातील चोंगकिंगमध्ये १८ ऑगस्ट रोजी तापमानाचा पार ४५ अंशांवर पोहोचला होता. हे तापमान शिनजियांग प्रांतामधील वाळवंटाच्या क्षेत्राबाहेरील सर्वाधिक तापमान ठरलं आङे. १९६१ सालापासून आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास पहिल्यांदाच चीनमध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात उन्हाळा जाणवत आहेत. चीनमध्ये यंदा उन्हाळा फार लांबला आहे. हवामान क्षेत्रातील जाणकार असणाऱ्या मॅक्लिममिलियानो हेरेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आतापर्यंत जगभरात नोंदवण्यात आलेली सर्वात भीषण उष्णतेची लाट आहे. मॅक्लिममिलियानो हे जगभरातील वातावरण बदलचा अभ्यास करतात. वातावरणातील बदलांचा घटनाक्रम हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. हवामान इतिहासकार म्हणून ते जगभरात ओळखले जातात.

यापूर्वी असं घडलं नाही…
मॅक्लिममिलियानो हरेरा यांनी ही सर्व परिस्थिती अविश्वसनीय अशी आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर एकाच वेळी एवढ्या मोठ्याप्रमाणात उष्णतेच्या लाटेचा परिणाम दिसणं आश्चर्यकारक असल्याचं ते सांगतात. जागतिक जलवायू अभ्यासाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत असं कधीही मी वाचलेलं किंवा पाहिलेलं नाही जे सध्या चीनमध्ये घडत आहे, असंही मॅक्लिममिलियानो यांनी स्पष्ट केलं आहे.

६६ नद्या पडल्या कोरड्या…
भयंकर उष्णता आणि उष्णतेच्या लाटेमुळे चीनमधील अनेक नद्यांची पात्रं कोरडी पडली आहे. काही भागांमध्ये नद्यांमधील पाण्याचा स्तर सातत्याने कमी होत आहे. चीनमधील जवळजवळ ६६ अशा नद्या आहेत ज्या पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. यांगत्से या चीनमधील सर्वात प्रमुख नदीच्या बाबतीतही परिस्थिती वेगळी नाही. या नदीच्या काही भागांमध्ये १८६५ नंतर पहिल्यांदाच पाण्याचा स्तर कमालीचा कमी झाला आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. अनेक प्रांतांमध्ये पाण्यासाठी लोकांना धडपडावं लागत आहे. बऱ्याच भागांमध्ये पाण्याचे टँकर पाठवले जात आहेत. या टँकर्समधील पाण्यासाठीही लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. १९ ऑगस्ट रोजी चीनमध्ये पहिल्यांदाच नऊ वर्षानंतर राष्ट्रीय दुष्काळ जाहीर करण्यात आला. चीनमधील शेतीलाही याचा मोठा फटका बसला असून अन्नधान्याच्या तुटवड्याचं संकट यामुळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नद्या सुकल्याने विजेची टंचाई…
नद्यांमधील पाण्याचा स्तर कमी झाल्याने अनेक ठिकाणी विजेच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. सिचुआन प्रांतामध्ये तर लोकांच्या घरांमधील वीज मागील अनेक दिवसांपासून गायब आहे. या प्रांतातील ८० टक्के विजनिर्मिती जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून होते. एअर कंडिशनसाठी मोठ्याप्रमाणात विजेची मागणी केली जात आहे. मात्र वीज उपलब्ध नसल्याने सगळा गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक कारखान्यांमध्येही विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने कारखानेच बंद करण्यात आले आहेत. अनेक कार्यालये तसेच शॉपिंग मॉल्समध्येही वीज वाचवण्यासंदर्भातील निर्देश जारी करण्यात आले आहेत.

१ लाख १६ हजार एकर शेतीचं नुकसान
एकट्या सिचुआनमध्ये ४७ हजार हेक्टरवरील (१ लाख १६ हजार १४० एकर) शेतमालाचं नुकसान झालं आहे. चीनमधील कृषी मंत्रालयाने कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भातील तयारी सुरु केली आहे. मात्र वैज्ञानिकांना अशाप्रकारे क्लाउड सीडिंगच्या माध्यमातून पाऊस पाडल्यास त्याचा शेतमालाला फायदा होईल की नाही याबद्दल शंका आहे.

युरोप अमेरिकेतही दुष्काळ
केवळ चीनच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मान्सून आणि पावसाचा कालावधी बदलत आहे. युरोपमध्येही अनेक देशांमध्ये मोठ्याप्रमाणात दुष्काळ पडला आहे. अशी परिस्थिती ५०० वर्षांमध्ये कधीच निर्माण झाली नव्हती. आफ्रिका खंडातही मोठ्याप्रमाणात दुष्काळ पडला आहे. अमेरिका तसेच मॅक्सिकोमधील अनेक भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे.

अन्न टंचाई निर्माण होणार
दुष्काळ पडलेल्या भागांमध्ये कमी प्रमाणात शेतमाला उत्पादन होणार असल्याने जागतिक अन्न संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याच्या आधापासूनच जागतिक स्तरावरील खाद्य पदार्थांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. चीन अन्नधान्य साठवून ठेवण्यासाठी सक्षम देश असला तरी इतर देश चीन इतके सक्षम नसल्याने जागतिक स्तरावर विचार केल्यास दुष्काळामुळे अन्न टंचाई निर्माण होऊ शकतं.

अधिक कठीण काळ येणार
इंटरगव्हरमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या २०२१ च्या अहवालानुसार जागतिक तपामानवाढीमुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. ज्यापद्धतीने उष्णता वाढणार त्यानुसार लोकांना उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळाचा सामना करावा लागणार. येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती अधिक चिंताजनक होण्याची शक्यता आहे. हे केवळ चीनमध्येच होणार आहे असं नाही तर याचा परिणाम आशिया आणि युरोप खंडातील अनेक देशांवर पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.