फ्लेवर्ड माल्ट दूध पावडर आणि बेबी फूड या संदर्भातील बातम्या गेले आठवडाभर चर्चेत आहेत. या पदार्थांमधील अतिरिक्त साखर हा चिंतेचा विषय ठरला आहे. त्याच संदर्भात सरकारी यंत्रणांकडून अशा स्वरूपाच्या पदार्थांची जाहिरात हेल्दी किंवा आरोग्यदायी अथवा सकस पदार्थ म्हणून करण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा आणि विपणनाचा निषेध सार्वजनिकरित्या करण्यात आला आहे. तर केंद्र सरकारने अशी निर्मिती आणि विपणन करणाऱ्या कंपन्यांना कारवाईचा इशाराही दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिमुरड्यांच्या प्रकृतीसाठी अशा स्वरूपाची अतिरिक्त साखर असणारी उत्पादने हानिकारक का ठरत आहेत, हे जाणून घेणे गरजेचे ठरणारे आहे.

अधिक वाचा: मीठ आणि साखर यांना ‘पांढरं विष’ का म्हणतात? मधुमेह आणि रक्तदाबाशी नेमका संबंध काय?

बेबी फूड/ लहान मुलांना देण्यात येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांना ‘हेल्दी’ म्हणणे धोकादायक का ठरत आहे?

हल्ली मुलांच्या आरोग्यवर्धक पेयांच्या जाहिराती आपण किती निकोप आणि सकस पदार्थ/ पेय तयार करतो याचा दावा करतात. परंतु त्यात कितपत तथ्य आहे हा मुद्दा आता वादग्रस्त ठरला आहे. अशा पदार्थांमध्ये (उदाहरणार्थ, अलीकडेच अशाप्रकारे हेल्दी म्हणण्यास बंदी घालण्यात आलेल्या पेयामध्ये) प्रत्येक १०० ग्रॅम मागे ८६.७ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात, त्यापैकी ४९.८ ग्रॅम साखरेचे प्रमाण असते. त्यातील एकूण शर्करेपैकी ३७.४ ग्रॅम सुक्रोज किंवा अधिक मिसळलेली साखर असते. म्हणजेच प्रत्येकी २० ग्रॅम चॉकलेट पावडरच्या मागे मुलं १० ग्रॅम साखरेचं सेवन करतात. हे पदार्थ माल्ट आधारित असल्याने या पदार्थांमध्ये अतिरिक्त मिसळलेल्या साखरेशिवाय तृणधान्ये अंकुरित करणे, वाळवणे, भाजणे आणि त्यांची पूड करणे या प्रक्रियेतूनही साखर तयार होते.

व्हिस्की तयार करण्याच्या प्रक्रियेचा वापर

माल्टिंग ही मूलत: सिंगल माल्ट व्हिस्की तयार करण्यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया होती. तीच प्रक्रिया माल्ट-आधारित दुधाची पेये तयार करण्यासाठी देखील वापरली जाते. (भारतीय अन्न मानक आणि सुरक्षा प्राधिकरण) FSSAI च्या वैज्ञानिक समितीच्या एका सदस्याने या संदर्भात ‘द हिंदू’ला सांगितले की, एकदा तुम्ही धान्य अंकुरित केले की, धान्यातील स्टार्चचे साखरेत रूपांतर होते. ही प्रक्रिया अमायलेसमुळे घडते. जेव्हा तुम्ही ते भाजता तेव्हा साखरेला कॅरेमेलाइज केल्यामुळे छान चव येते. “माल्टोज हे दुसरे काहीही नसून ग्लुकोजचीच दोन युनिट्स आहेत, एकमेकांशी जोडलेला साखरेचा एक प्रकार आहे. मिसळलेल्या साखरेव्यतिरिक्त, चॉकलेट पावडरमध्ये माल्टोडेक्सट्रिन, द्रव ग्लुकोज, तृणधान्यांच्या माल्टिंग प्रक्रियेतून तयार होणारे माल्टोज इत्यादी असतात”.

साखर सामग्रीबाबत FSSAI ची भूमिका काय आहे?

अन्न सुरक्षा आणि मानके (जाहिरात आणि दावे) विनियम २०१८ मध्ये, FSSAI ने म्हटले आहे की उत्पादनामध्ये १०० ग्रॅमच्या मागे साखरेचे प्रमाण ५ ग्रॅम एवढेच असले तरच त्या उत्पादनांना कमी साखरेचे असे संबोधू शकता. कमी साखरेचे पदार्थ हेल्दी या श्रेणीत येऊ शकतात. परंतु जेव्हा उत्पादने ही आवश्यकता पूर्ण करत नाहीत आणि तरीही त्यांच्या उत्पादनांची ‘हेल्थ ड्रिंक्स’ म्हणून जाहिरात करतात तेव्हा ते समस्याप्रधान असते. एखाद्या मुलाने हे पेय चार वेळेस घेतले तर तो किंवा ती ४० ग्रॅम साखरेचे सेवन करेल. जागतिक आरोग्य संघटनेने दररोज केवळ २५ ग्रॅम किंवा सहा चमचे साखर घेण्याचाच सल्ला दिला असून, हे त्याचे उल्लंघन ठरते. भारतीय घरांमध्ये चॉकलेट-पावडर ड्रिंकमध्ये बरेचदा अतिरिक्त चमचे साखर देखील घालतात, मुळातच अतिरिक्त साखर असलेल्या पदार्थात आणखी साखर घालून दुष्परिणामांना आमंत्रित करण्यासारखे आहे.

बेबी फूडवरून वाद काय?

नेस्लेचे सेरेलॅक हे उत्पादन भारतीय मुलांच्या नित्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. याच ब्रॅण्डच्या व्हीट ऍपल चेरी बेबी सीरिअलच्या परीक्षणाअंती एक महत्वाची गोष्ट समोर आली, ती म्हणजे १०० ग्रॅम मागे २४ ग्रॅम साखर असते. एक ते दोन वर्षांच्या मुलासाठी, कंपनी दररोज बारा स्कूप किंवा १०० ग्रॅम बेबी फूड खाण्याची शिफारस करते. याचा अर्थ बाळ दररोज २४ ग्रॅम साखरेचे सेवन करते. ही एक हानिकारक पद्धत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. “बाळांना फक्त आईच्या दुधाची चव माहीत असते. लॅक्टोज, जो नैसर्गिकरित्या साखरेचा प्रकार आहे, तो कमी गोड असतो. जेव्हा बाळाला आईच्या दुधापासून पूरक पदार्थांकडे नेले जाते तेव्हा अतिरिक्त साखर दिली जाते. लहान बाळाच्या आहारातील अतिरिक्त साखर बाळाच्या स्वादुपिंडावर अनावश्यक दबाव निर्माण करते, ज्यामुळे अतिरिक्त इन्सुलिन तयार होते ज्यामुळे भविष्यात मधुमेह आणि लठ्ठपणाची शक्यता असल्याचे मत FSSAI च्या सदस्याने ‘द हिंदू’शी बोलताना व्यक्त केले. चव आणि पोत सुधारण्यासाठी माल्टोडेक्सट्रिन सारख्या घटकांचा समावेश करणे हानिकारक आहे कारण माल्टोडेक्सट्रिनच्या पांढऱ्या पिष्टमय पावडरमध्ये टेबल शुगरपेक्षा जास्त ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असतो. FSSAI च्या सदस्याने पुढे सांगितले की, अतिरिक्त साखरेचे ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतर होते, चरबीचा एक प्रकार जो यकृतामध्ये साठवला जातो ज्यामुळे फॅटी यकृत आणि इन्सुलिन प्रतिरोधकपणामुळे मधुमेह होतो.

दिशाभूल करणाऱ्या लेबलांच्या प्रथेला आळा घालण्यासाठी FSSAI ची चौकशी पुरेशी ठरेल का?

सप्टेंबर २०२२ मध्ये, FSSAI ने एक मसुदा अधिसूचना जारी केली, ज्यामध्ये असे म्हटले आहे की हाय फॅट, साखर, मीठ (HFSS) अन्न म्हणजे प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन ज्यामध्ये संतृप्त चरबी किंवा एकूण साखर किंवा सोडियमचे प्रमाण जास्त आहे. मसुदा अधिसूचना HFSS खाद्यपदार्थात काय समाविष्ट आहे आणि खाद्यपदार्थाच्या पाकिट किंवा पेयाच्या बाटलीच्या पुढील- पॅक लेबलिंगवर ग्राहकांना त्याबद्दल इशारा कसा द्यावा हे स्पष्ट करण्यासाठी जारी करण्यात आली होती. परंतु FSSAI ने दिलेल्या नियमावलीत ग्राहकांना देण्यात येणारा इशारा उत्पादनाच्या पुढच्या भागात असणार की, नाही हे स्पष्ट करण्यात आले नाही. किंबहुना इशारा किंवा सूचना असे कुठेही म्हटलेले नसते. साखरेचे किंवा मिठाचे देण्यात येणारे प्रमाण हे प्रत्येकी एका सेवनाचे असे असते, ग्राहकांना अपुऱ्या ज्ञानामुळे किंवा प्रत्येक वेळी प्रमाण मोजणे शक्य नसल्यामुळे त्यांची दिशाभूल होते, असे मत डॉ.न्यूट्रिशन अॅडव्होकसी इन पब्लिक इंटरेस्टचे निमंत्रक आणि पंतप्रधानांच्या कौन्सिल ऑन इंडियाज न्युट्रिशन चॅलेंजेसचे अरुण गुप्ता यांनी व्यक्त केले आहे.

अधिक वाचा: हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का? गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; का आहे हे संशोधन महत्त्वाचे?

पुढे काय?

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स (फुड्स फॉर इन्फंट न्यूट्रिशन) रेग्युलेशन, २०१९ नुसार, तृणधान्यांवर आधारित दुधाच्या पूरक अन्नामध्ये साखरेला परवानगी आहे ,असे डॉ. गुप्ता सांगतात. नियमानुसार, अन्न आणि अर्भक पोषणासाठी लॅक्टोज आणि ग्लुकोज पॉलिमर यांना कर्बोदकांमधे प्राधान्य दिले जाते. कार्बोहायड्रेटचा स्रोत म्हणूनच केवळ सुक्रोज किंवा फ्रूक्टोजचा समावेश करण्यास परवानगी आहे. मात्र तीदेखील एखूण कार्बोहायट्रेडटसच्या केवळ २० टक्क्यांहून अधिक नसेल, अशाच मानकापर्यंत मर्यादित आहे. अशाप्रकारे नियमन साखरेला परवानगी देते, म्हणूनच मूळातून नियमनाचाच पुनर्विचार करण्याची गरज आहे,” ते म्हणतात. त्यामुळेच डॉ. गुप्ता सांगतात, सर्वात आधी सगळ्या पेय आणि खाद्यपदार्थांसाठी हेल्दी आणि अनहेल्दी म्हणजे नक्की काय याची नियमावली स्पष्ट असणे गरजेचे आहे. जास्त चरबीयुक्त पदार्थ, अतिरिक्त मीठ आणि साखरेचे पदार्थ/ पेय यांच्या पाकिटांवर काय असावे याविषयी नियमावली आहे. परंतु खरी समस्या विपणनाची असल्याचे मत डॉ. गुप्ता यांनी व्यक्त केले आहे.

हॉर्लिक्सचा समावेश पुण्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनामध्ये करण्यात आला. असे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा २०२२ च्या वार्षिक अहवालात मूद केले आहे. या योजनेत ४,६०० अंगणवाडी केंद्रांतील १.४५ लाख बालकांचा समावेश आहे. शिवाय अर्भक दूध पर्याय कायद्यांतर्गत, जाहिरातींद्वारे अर्भक खाद्यपदार्थांची जाहिरात केली जाऊ शकत नाही. असे असले तरी नियमांचे उल्लंघन करून जाहिरात केली जाते, त्यामुळे बेकायदेशीर जाहिरातींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, असे डॉ. गुप्ता सांगतात.