-भक्ती बिसुरे

श्वानदंशामुळे होणारा रेबीज हा अत्यंत गुंतागुंतीचा आजार आहे. केरळमध्ये नुकताच रेबीजने एका लहान मुलीचा जीव घेतला. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार श्वानदंशावरील उपचारांबाबत जनजागृती कमी आहे. त्याचाच परिणाम म्हणून जगात दरवर्षी श्वानदंशामुळे हजारो मृत्यू होतात. आशिया आणि आफ्रिकेत या आजाराचे प्रमाण अधिक आहे. श्वानदंश झाला असता १४ इंजेक्शन आणि तिही पोटात घ्यावी लागतात या गैरसमजामुळे रेबीजवरील उपचारांबाबत एक प्रकारचे भय नागरिकांमध्ये असते. त्यामुळे रेबीज म्हणजे काय, त्याचे गांभीर्य किती, त्याची लक्षणे कोणती याबाबत माहिती देणारे हे विश्लेषण.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?

रेबीज म्हणजे काय?

रेबीज हा एक विषाणुजन्य आजार आहे. त्यामुळे इतर विषाणुजन्य आजारांप्रमाणेच तातडीचे उपचार मिळाले असता रुग्ण संपूर्ण बरा होतो. रेबीजची लागण झालेल्या श्वानाच्या दंशामुळे हा आजार होतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास या आजारात माणसाचा मृत्यू होतो. रेबीजमुळे जगभरात दरवर्षी हजारो मृत्यू होतात. त्यापैकी ३६ टक्के मृत्यू केवळ भारतात होतात. २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिवस म्हणून पाळला जातो.  रेबीज विषाणुजन्य आजार आहे. हा विषाणू प्रामुख्याने प्राण्यांच्या, विशेषतः श्वानाच्या दंशाने पसरतो. विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर तो माणसाच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो. त्यामुळे मणक्याला आणि मेंदूला सूज येते. पक्षाघाताचा झटका येतो. माणूस कोमात जाण्याची शक्यता असते आणि या आजारात माणसाचा मृत्यूही होतो. काही वेळा या आजाराचे रुग्ण वेगळे वर्तन करतात असेही दिसते.

भारतातील रेबीजची सद्यःस्थिती काय?

नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलच्या माहितीनुसार प्राण्यांचा दंश, ओरखडे, प्राण्यांची लाळ आणि माणसांच्या जखमांचा संसर्ग यामुळे रेबीजचे विषाणू मानवाच्या संपर्कात येतात. जंगली प्राण्यांमध्ये आढळणारा हा आजार श्वान आणि इतर काही मोजक्या पाळीव प्राण्यांमध्येही आढळतो. भारतात मात्र श्वानदंश हेच ९५ टक्के रेबीजला कारणीभूत आहे. काही प्रमाणात रेबीज संसर्ग मांजरांमुळेही होतो. रेबीज पूर्ण बरा करणारा उपाय नाही त्यामुळे श्वानदंशावर प्रतिबंधात्मक इलाज करणे अत्यावश्यक ठरते.

रुग्ण कसा ओळखावा?

रेबीजची लक्षणे सहसा उशिरा लक्षात येतात. विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर एक आठवडा ते एक वर्ष एवढ्या कालावधीत कधीही याची लक्षणे दिसतात. दोन-तीन महिन्यांतही लक्षणे दिसून येऊ शकतात. विषाणूने मज्जासंस्थेवर हल्ला केल्याने मेंदू आणि मणक्याला सूज येणे, ताप येणे, अंग दुखणे, पाण्याची भीती वाटणे, वर्तन बदल किंवा हृदयविकाराचा झटका अशी वेगवेगळी लक्षणे दिसू शकतात. काही रुग्णांमध्ये स्नायू कमकुवत होणे, कोमात जाऊन मृत्यू होणे या घटनाही घडतात. लवकरात लवकर उपचार झाले नाहीत तर रुग्णांचा मृत्यू होतो.

प्राणी चावले तर प्रथमोपचार काय?

रेबीजचा विषाणू प्राण्याच्या लाळेतून माणसाकडे येतो. श्वानदंश झाल्यानंतर, घाबरून न जाता तातडीच्या उपायांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. श्वानदंश झालेल्या व्यक्तीला भीती वाटत असेल तर आधी त्याला धीर द्यावा. नंतर प्राणी चावल्यानंतर आधी जखम स्वच्छ करावी. त्यामुळे विषाणू शरीराच्या इतर भागात पसरत नाही. पाणी आणि जंतूनाशक साबणाने १५ मिनिटांपर्यंत जखम धुवावी. मलम लावावे. जखम बांधू नये. टीटी म्हणजे धनुर्वाताचे इंजेक्शन घ्यावे. जखम अनावश्यक हाताळू नये. श्वानदंश किंवा श्वानाचा दात लागणे, त्याने बोचकारणे असे काही घडल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे. श्वान दंशानंतर डॉक्टर रेबीज प्रतिबंधात्मक पाच इंजेक्शन देतात. श्वानदंश झाला असेल, त्याच दिवशी पहिले इंजेक्शन घेणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर तिसऱ्या, सातव्या, १४ व्या आणि २८ व्या दिवशी इंजेक्शन घ्यावे. प्राण्यांनाही अशाच पद्धतीने रेबीज प्रतिबंधात्मक इंजेक्शन देतात. श्वान, मांजर यांना रेबिज प्रतिबंधक लस दिली जाते. एखाद्या प्राण्याला रेबीज आहे, असा संशय असल्यास त्याच्या तपासण्या केल्या जातात. रेबीजचे निदान झाल्यास त्याला विलगीकरणात ठेवले जाते. पाळीव प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा पहिल्या वर्षी आणि त्यानंतर दरवर्षी एक एक मात्रा देणे अत्यावश्यक आहे. प्राणी हाताळण्याच्या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, प्राण्यांचे डॉक्टर यांना प्रतिबंधात्मक लस देणे आवश्यक आणि उपयुक्त ठरते.